भगवा डाळींबापासून दीड एकरात तीन लाख रू. नफा

डॉ. हरिश्चंद्र पंडीत आहेर,
मु. पो. मकरंदवाडी, ता. देवळा, जि. नाशिक.
मो. ९४०३६५१४९४



मध्यम मुरमाड प्रतिच्या दीड एकर जमिनीत ८ वर्षापुर्वी भगवा डाळींबाची लागवड १०' x १०' वर केली आहे.

मागील वर्षी जानेवारी २००८ मध्ये बागेस ताण देऊन १ फेब्रुवारी पहिले पाणी दिले. त्या आगोदर झाडांना शेणखत, निंबोळी पेंडीचा वापर केला, पाणी दिल्यानंतर दुसर्‍या दिवशी १ लि. जर्मिनेटरची २०० लि. पाण्यातून फवारणी केली. त्याने फुट व्यवस्थित निघाली. त्याच अवस्थेत ड्रिपवाटे आठवड्यातून ३ वेळा असे दिवसाड एकदा जर्मिनेटर (एकरी १.५ लि.), दुसर्‍यांदा १९:१९ (एकरी १० किलो)आणि तिसर्‍यावेळी १२:६१ (एकरी १० किलो) असे पुर्ण महिनाभर (फेब्रुवारी) दिले.

पाणी दिल्यानंतर १२ व्या दिवशी पोपटी पालवी आल्यावर थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी १ लि. ची २०० लि. पाण्यातून फवारणी केली. एवढ्यावर फुलकळी निघून गाठ सेट झाली. तेल्या रोगाचा प्राथमिक अवस्थेत प्रादुर्भाव काही झाडांवर आढळून आला होता. त्यावर ताबडतोब डॉ.बावसकर तंत्रज्ञान व बुरशीनाशकांचा वापर करून तो आटोक्यात आणला.

गाठ सेटिंग झाल्यानंतर १८:४६ डी. ए. पी. खताच्या एकरी ३ बॅगा ड्रिपरजवळ देऊन फळे लिंबाएवढी झाल्यानंतर पोटॅश २० किलो आणि युरिया १० किलो ड्रीपवाटे दिले. तसेच २० ते २५ दिवसांच्या अंतराने थ्राईवर, क्रॉंपशाईनर,राईपनर, न्युट्राटोनच्या एकूण ५ ते ६ फवारण्या घेतल्या. त्यामुळे एकं दरीत फलधारणा एकसारखी होऊन फळांचे पोषण व्यवस्थित झाले (संदर्भ:पान नं. ३३ वरील फोटो) फळांना चमक, आकर्षकपणा वाढला. व्यापार्‍याने बागेतील ५५२६ किलो माल जागेवरून ४१ रू. किलो भावाने नेला. त्याचे २,२६,५६६ रू. झाले. ३२७ क्रेट (२० किलोचे) ५०० रू. प्रमाणे नाशिकला विकला. त्याचे १,६३,५०० रू. झाले असे दीड एकरात एकूण ३,९०,०६६ रू. उत्पन्न मिळाले. दीड एकरात ५७० झाडे असून प्रत्येक झाडापासून सरासरी २१ किलो डाळींब उत्पादन मिळाले. रासायनिक, सेंद्रिय खते, निंबोळी पेंड, औषधे असा दीड एकरास एकूण बहार धरल्यापासून माल संपेपर्यंत ८८,६०० रू. खर्च आला. तरी दीड एकरात खर्च वजा जात ३,०१,४६६ रू. नफा मिळाला.