डाळींबावरील कीड व रोग

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर



कीड १) मावा : ही कीड कोवळी पाने व फळावरील पेशीद्रव्य शोषून घेणारी अत्यंत लहान आकाराची असून प्रजातीनुसार तिचा रंग हिरवा, पिवळा व तपकिरी काळपट असतो. या किडीच्या शरीरातूनही गोड चिकट पदार्थ स्रवतो व त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. पाने वेडीवाकडी होऊन फांद्यांची वाढ थांबते.

२) पिठ्या ढेकूण (मिली बग) : पिठ्या ढेकूण ही कीड 'मिलीबग' किंवा' पांढर्‍या ढेकण्या' या नवानेही ओळखली जाते. या किडीच्या निरनिराळ्या प्रजाती महाराष्ट्रात आढळून येतात. उष्ण आणि कोरड्या हवामानात या किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. या किडीच्या शरीराला मऊ कापसासारखे आवरण असल्याने किटकनाशक किडीपर्यंत पोहचण्यास अडथळा येतो. म्हणून या किडीच्या बाल्यावस्थेतच जर किटकनाशंकांची फवारणी केली तर या किडीचे नियंत्रण चांगल्या प्रकारे होते. पिल्ले नारंगी रंगाची असतात.

हे किटक झाडांवरील फळांवर देठांवर तसेच फळाच्या खालील पाकळीत कापसासारख्या आवरणाखाली पुंजक्याच्या स्वरूपात एका जागेवर राहून पेशीद्रव्ये शोषणात. या किडीच्या शरीरातून चिकट द्रव स्त्रावत असल्याने फळे चिकट होऊन त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. फळे लहान असताना जर प्रादुर्भाव झाला तर अशी फळे चिकट - काळपट झाल्याने बाजारात विकण्यायोग्य राहत नाहीत. किडीचा प्रदुर्भाव जास्त असल्यास फळांची गळ होते. कळी अवस्थेत सुद्धा या किडीचा प्रादुर्भाव होतो. त्यावेळी कळ्या गळून पडतात. (फोटो क्र. २ पहा.)

३) फुलकिडे व कोळीकीड : ही कीड पानांचा, फळांचा पृष्ठभाग खरडून त्यातील पेशिद्रव्य शोषून घेतात. त्यामुळे पानांची वेडीवाकडी वाढ होऊन पानांवर व फळांवर तपकिरी रंगाचे चट्टे दिसून येतात. ही कीड अत्यंत लहान असल्याने सहजरित्या दिसून येत नाही.

४) स्केल किंवा देवी किंवा खवले कीड : नोव्हेंबर महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यापासून या किडीचा प्रादुर्भाव सुरू होत असून तो मार्च पर्यंत राहतो. मध्यम व पुर्ण वाढ झालेले खवले किडे पानातून, कोवळ्या फांद्यातून व फळांतून रस शोषून घेतात. रस शोषणाच्या क्रियेमुळे फांद्या सुकतात व काही वेळा वाळून जातात. किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास संपुर्ण झाड वाळून जाते. तसेच ही कीड मधासारख चिकट व गोड पदार्थ बाहेर टाकते. या चिकट गोडपणामुळे यावर काळी बुरशी वाढते. त्यामुळे पानांसह संपुर्ण झाड काळे दिसते. याचा फळांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो.

(फोटो क्र. ७ पहा.)

५) फळे पोखणारी अळी (सुरसा अळी) : ही कीड मुख्यत्वे पावसाळ्यात मृग बहारावरील फळांवर आढळून येते. ये किडीच्या तपकिरी निळ्या रंगाच्या पाकोळ्या असून त्या फळांवर व फुलांवर साबुदाण्यापेक्षा थोड्या लहान आकाराची अंडी घालतात. अंड्यातील बाहेर आलेली अळी फळाच्या, फुलाच्या आतील भागात जाऊन तेथे आपली उपजिवीका करते. फळाला पाडलेल्या छिद्राद्वारे अळीची विष्ठा बाहेर येते. ही अळी रंगाने काळी व अंगावर पांढरे डाग असतात. पूर्ण वाढ झालेली अळी १७ ते २० मि.मी. लांब असते. (फोटो क्र. ८ पहा.) अशा फळात छिद्रावाटे जीवाणू तसेच बुरशीचा प्रादुर्भाव होऊन फळे कुजून खराब होतात. परिणामी उत्पादनात घट येते.

खोडाची आल खाणारी अळी : ही अळी विशेषत: जुन्या बागेवर तसेच दुर्लक्षीत झाडांवर मोठ्या प्रमाणात दिसून येते. ह्या किडीचा आळ्या मुख्यत्वे खोडाची साल खातात तसेच फांद्याच्या बेचक्यात छिद्र पाडून आतील भाग पोखरतात. किडीची विष्टा आणि तिने पोखरलेला भुसा फांदीच्या बेचक्यालगत जाळीसारखा दिसून येतो. पूर्ण वाढ झालेली अळी ५० ते ६० मि.मी. लांब असून काळसर तपकिरी रंगाची दिसते.

या किडीच्या नियंत्रणासाठी बाग स्वच्छ ठेवून झाडांची जास्त गर्दी देऊ नये. तसेच किडीने पोखरलेल्या छिद्रामध्ये बारीक तारेला पेट्रोल किंवा रॉकेलचा बोळा बांधून तो त्यामध्ये घालून छिद्र चिखलाने बंद करावे.

७) फळातील रस शोषणारे पतंग : मोसंबी - संत्र्यावरील हे पतंग आता डाळींबावर मोठ्या प्रमाणात आढळतात याच्या अनेक जाती असून वेगवेगळ्या रंगाचे लहान मोठे आढळून येतात. हे पतंग रात्रीच्या वेळी पावसाळ्यामध्ये (जुलै ते ऑक्टोबर) डाळींबाचे पक्व फळांतील रस शोषतात. त्यामुळे फळात इतर जीवाणू व बुरशीचा प्रादुर्भाव होतो हे छिद्र अतिशय लहान असल्याने सहजासहजी दिसून येत नाही. मात्र छिद्राच्या भोवती नंतर गोलाकार काळा सडलेला भाग दिसतो आणि त्यामुळे पुढे फळांची गळ होते.

८) पाने खाणारी अळी : अंड्यातून बाहेर पडलेल्या आळ्या पानांच्या खालची बाजू खातात. आळ्या मोठ्या होऊ लागल्यानंतर पाने संपुर्णपणे खातात, कीड मोठ्या प्रमाणावर पडल्यास झाडावर एकही पान ठेवत नाही.

९) काळे ढेकूण : या किडीच्या मागील पायांची पोटरी पानांच्या आकाराची व पसरट असल्याने या किडीस इंग्रजीत 'लीफ फुटेड बग' असे संबोधण्यात येते. पुर्ण वाढ झालेले ढेकूण डाळींब बागेप्रमाणे मोसंबी बागेचेही नुकसान करतात. ढेकूण झाडाच्या सालीतून खोलवर सोंड खुपसतात व आतील रस शोषूण घेतात. ही कीड फळांमधील रस शोषूण घेते. त्यामुळे फळे निस्तेज बनतात. अपक्व फळे सडतात व गळून पडतात.

१०) खोडकिडा :डाळींब फळझाडावरील अनेकविध नुकसानकारक किडीपैकीच खोडकिडा ही एक महत्त्वाची कीड होय. या खिडकिडीमुळे बागेत मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. संपुर्ण झाड या किडीमुळे मरत असल्याने बागेत दोन झाडांमध्ये अंतर पडते. खोडकिडीचा प्रादुर्भाव लवकर लक्षात येत नाही. झाड किंवा फांदी वाळण्यास सुरुवात झाल्यानंतर त्या झाडाचे बारकाईने निरीक्षण केल्यास या किडीचे अस्तित्व निदर्शनास येते. बिशेषत: जुन्या बागेत किंवा दुर्लक्षीत बागेत या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.

नुकसानीचा प्रकार : डाळींब फळपिकावर बॅटोसेरा रूफोमॅक्युलेटा ही खोडकिड्याची प्रजाती निदर्शनास आलेली असून ही प्रजाती इतर ३० प्रकारच्या फळझाडे आणि जंगली झाडांवर नुकसान करते. या किडीची अळी सुरुवातीला खोडावरील साल खाते आणि नंतर खोडला छिद्र पाडून आतील गाभ्यात शिरून खोड पोखरते. खोडाच्या आतील भागात सरळ अथवा नागमोडी पोखरलेला भाग दिसतो. या संपूर्ण पोखरलेल्या भागात पोखरलेला भुस्सा आणि अळीची विष्ठा भरलेली दिसते खोडाच्या बुंध्याजवळ जमिनीवर लाकडी भुस्सा छिद्रातून पडून साचलेला दिसतो. यावरून खोडकिड्याचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट होते. ज्या फांदीवर खोडकिड्याचा प्रादुर्भाव झालेला आहे. अशी फांदी पिवळी पडून कमकुवत होऊन कालांतराने वाळून जाते आणि खाली पडते. खोडाच्या सर्व भागात किडीचा प्रादुर्भाव झालेला असल्यास झाड निस्तेज होऊन कालांतराने वाळून जाते आणि खाली पडते. खोडाच्या सर्व भागात किडीचा प्रादुर्भाव झालेला असल्यास झाड निस्तेज होऊन कालांतराने वाळते. खोडकिड्याच्या प्रादुर्भावाने झाडांच्या फळधारणेच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होतो.

किडीचा जीवनक्रम: खोडकिड्याचे भुंगेरे पावसाळ्यात जून ते ऑगस्ट दरम्यान बाहेर पडतात. नर मादीचे मिलन झाल्यानंतर खोडकिड्याची मादी भुंगेर डाळींबाच्या फांद्यांवर किंवा खोडावरील सालीला छेद्र घेऊन या सालीखाली भुरकट अंडी घालते. खोडाकिड्याची एक मादी जून ते ऑक्टोबरच्या कालावधीत १०० ते २०० अंडी घालते. अंडी ७ ते १४ दिवसांत उबतात आणि त्यातून बाहेर पडलेली अळी खोड किंवा फांदी पोखरण्यास सुरुवात करते. खोडात / फांदीत शिरल्यानंतर अळीची अवस्था ३ ते ६ महिने असते. कोषावस्थेतच जाण्यापुर्वी खोडकिड्याची अळी हिवाळ्यात सुप्तावस्थेत जाते आणि त्यानंतर जमिनीखालील ५ सें.मी. खोडाच्या पोखरलेल्या भागात लंबवर्तुळाकार पोकळ घरटे करून त्यात कोषावस्थेत जाते. या किडीचा जीवनक्रम ४ ते ७ महिन्यात पुर्ण होतो. वर्षभरात एकच पिढी पूर्ण होते.

व्यवस्थापनाकरीत उपाययोजना :

१) खोडावर किंवा फांद्यावर भुस्सा दिसल्यास त्या जागेवरील छिद्र साफ करून छिद्रात तारेच्या सहाय्याने अळीचा नाश करावा.

२) खोडावर/ फांद्यावर प्रादुर्भाव झालेल्या छिद्रामध्ये डायक्लोरव्हॉस १० मि. ली. किंवा फेनव्हलरेट ५ मिली प्रति लिटर पाण्यात घेऊन किंवा पेट्रोल ५ मि. ली. छिद्रात इंजेक्शनच्या सहाय्याने सोडून छिद्रे चिखलाने अथवा लांबीने सिलबंद करावीत.

३) पावसाळी हंगामात जून - ऑक्टोबर कालावधीत कार्बारील ५० % विद्राव्य ४० ग्रॅम किंवा डायक्लोरव्हॉस २५ मि.ली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून झाडांवर २ ते ३ वेळेस फवारणी करावी.

४) खोडाला जून - जुलै महिन्यात प्रतिबंधात्मक उपायांतर्गत मुलामा (पेस्ट) लावावी. त्यासाठी कॉपर ५०० ग्रॅम, गेरू ५०० ग्रॅम, प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम आणि चुना २५० ते ५०० ग्रॅम (झाडाच्या खोडाच्या आकारमानानुसार) १० लिटर पाण्यात पेस्ट करून कुंच्याने किंवा ब्रशने खोडाचे २' ते २ ॥' भागावर बहार धरतेवेळेस एकदा आणि नंतर दोन महिन्याने लावणे.

११) खोडाला लहान छिद्रे पाडणारे भुंगेरे (शॉट होल बोरर)

डाळींब फळझाडाच्या मररोगास कारणीभूत असलेला किडीपैकी दुसरा एक घटक म्हणजेच 'खोडाला लहान छिद्रे पाडणारे भुंगेरे' ही किड असून यालाच 'खोडभुंगा किंवा शॉट होल बोरर ' असेही संबोधतात. आकाराने अतिसुक्ष्म असल्याने या किडीचे अस्तित्व सहजासहजी दिसून येत नाही. मात्र खोडाचे वाराकाईने निरीक्षण केले असता, लहान छिद्रे आणि त्यातुन भुस्सा बाहेर पडत असल्याचे दिसून येते. सन १९८६ साली डॉं. मोटे यांनी कोल्हार परिसरातील डाळींब फळपिकावर आणि एरंडी या तेलवर्गीय पिकावर या किडीचा प्रादुर्भाव सुरू झाल्याचे प्रथम निदर्शनास आणले. सन १९९२ - ९५ मध्ये अहमदनगर जिल्ह्यांतील कोल्हार परिसरातील डाळींबाचे क्षेत्र या खोडभुंग्याने प्रदुर्भावीत होऊन सर्व बागा ऊध्वस्त झाल्या. वास्तविक ही कीड चहाच्या झाडांवर मोठ्या प्रमाणावर निदर्शनास येते. डाळींबावर या किडीची इवलेसी (झायलोबोरस) फॉर्निकॅटस ही प्रजात आढळून आली.

या भुंग्यांची मादी खोडात शिरून आत खोड पोखरते. खोडात कोणत्याही दिशेने पोखरते आणि त्यातून भुस्सा बाहेर फेकते. पोखरण्यामुळे आत लहान म्हणजे टाचणी किंवा सुईच्या आकाराचे बोगदे तयार करतात. या किडीचा प्रादुर्भाव जमिनीपासून खोडाजवळ जास्त असतो व पुढे पुढे वरच्या भागात पसरत जातो. जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास अगदी वरच्या फांद्यांच्या शेंड्याकडील भागातही ही कीड छिद्रे पाडतांना दिसून येते. या छिद्रे व बोगद्यामुळे झाडातील अन्नरस व्यवस्थित मुळांकडे व पाने निस्तेज होऊन गळू लागतात. फुले व फळे कमी प्रमाणात येतात. तसेच वार्‍यामुळे कमकुवत झालेल्या फांद्या मोडतात. जास्त प्रादुर्भावामुळे झाडे वाळतात असे आढळून आलेले आहे. या किडीचा प्रादुर्भाव जास्त म्हणजेच ८ - १० वर्षे वयाच्या बागेमध्ये झाडावर मोठ्या प्रमाणात नुकसान करतांना दिसून येते. परंतु अलीकडे कमी वयाच्या बागेमध्येही या किडींचा प्रादुर्भाव निदर्शनास येत आहे.

खोडाला लहान छिद्रे पाडणार्‍या भुंगेर्‍याची पुर्ण वाढ झालेली मादी भुंगेरा काळपट रंगाचा आणि आकाराने अतिशय लहान म्हणजे २ ते २.५ मि. मी. लांबीचा असतो. नर आकाराने मादीपेक्षा निम्मा असतो, व त्याला पंख नसतात, तसेच तो खोड पोखरत नाही. नराची संख्या फारच कमी असते. या किडीची अंडी पांढर्‍या रंगाची लांब गोलाकार असून मादी प्रत्येक बोगद्यात एक - एक अशी सुटी अंडी घालते. एक मादी २० दिवसांपेक्षा जास्त दिवस अंडी घालते. ही अंडी ८ - १० दिवसांत उबवून त्यातून पांढरी अळी बाहेर पडते. ही अळी मादीने बाहेरून आणलेल्या बुरशीवर उपजिविका करते. मादी बाहेरून मोनॅक्रोस्प्रोरियम अम्ब्रोसियम बुरशीचे कण आणुन प्रत्येक बोगद्यात / छिद्रात ठेवते. पुढे या बुरशीची या बोगद्यात / छिद्रात वाढ होते. या बुरशीवर या अळ्या उपजीविका करण्यामुळे या किडीला 'अॅम्ब्रोसिया बीटल' असेही नाव आहे. अळीची अवस्था २१ ते २६ दिवस असते. नराची अळी फारच लहान आकाराची असते.

कोष पांढर्‍या रंगाचे असून कोषावस्था १० - १२ दिवस असते. किडीची एक पिढी पुर्ण होण्यास ३९ ते ४८ दिवस लागतात. खोडांतील भुंग्यांचा रंग तांबडा असतो व दोन - तीन दिवसांनी तो काळा होतो. या किडीची कोणतीही अवस्था प्रत्यक्ष झाडाचा कोणताच भाग खात नाही. फक्त बारीक छिद्रे पडून आतील भागात पोखरून बोगदे तयार करतात.

या किडीचा प्रादुर्भाव जवळपास वर्षभर आढळून येतो. परंतु जास्त प्रमाणात ते जून ते डिसेंबर म्हणजे दमट हवामानात पावसाळ्यात भुंग्याची संख्या जास्त असते. मात्र छिद्रे पडण्याचे प्रमान ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये सर्वात जास्त असते. उष्ण हवामान व कमी आर्द्रता या किडीस अनुकूल असते. या किडीचा प्रादुर्भाव अमिनीलगटाच्या खोडावर जास्त असला तरी फांद्यापर्यंत गेलेला दिसतो. तसेच जमिनीलगतच्या मुळांवर ही समस्या जास्त आहे. या छिद्रातून फ्यूजॅरियम रायझोक्टोनिया या रोगांचे बुरशीजन्य जंतुंचा शिरकाव होऊन रोगांचे प्रमाण वाढण्यास मदत होते. परिणामी फ्यूजॅरियम आणि रायझोक्टोनियामुळे खोडाळगतची तसेच मुळांची साल कुजते आणि झाडे मरतात. म्हणुन खोडावरील लहान छिद्रे पाडणार्‍या मुंगेर्‍यांचे व्यवस्थापन करणे अत्यंत अत्यावश्यक आहे.

व्यवस्थापनाकरीता उपाययोजना -

१) बाग स्वच्छ ठेवावी, झाडांची दाटी होणार नाही याची काळजी घ्यावी.

२) बोगेभोवती अथवा जवळपास शक्यतो एरंडी लागवड करू नये.

३) क्लोरपारिफॉस २०% प्रवाही किंवा कार्बारिल ५०% ४० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून खोडावर/ फांद्यावर फवारावे.

४) खोडाजवळ क्लोरपायरीफॉस २० % प्रवाही किंवा कार्बारिल ५० %, २०% प्रवाही, ४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून ५ ते १० लिटर द्रावण प्रति झाड ओतावे, जेणेकरून मुळांवरील किडींचे नियंत्रण होईल.

५) साधारणपाने वर्षातून एकदा जून - जुलै महिन्यात खोडाला मुलामा (पेस्ट) लावावा. पेस्ट अशी तयार करा - चार किलो गेरू १० लिटर पाण्यात रात्रभर भिजत घालून दुसर्‍या दिवशी काठीने द्रावण चांगले ढवळावे. त्यात क्ळोरपायरीफॉस २० % प्रवाही ५० मि.ली आणि २५ ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड टाकून काठीने मिसळावे. अशी तयार झालेली पेस्ट खोडावर ३ ते ४ फुटापर्यंत ब्रशच्या 'सहाय्याने लावावी' .

६) कमी प्रमाणात प्रादुर्भाव असेल तेव्हा छिद्रामध्ये डायक्लोरव्हॉस ७५ % ५ मि. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून इंजेक्शनच्या सहाय्याने छिद्रात सोडावे.

७) नेहमीच्या किटकनाशक फवारणीचे वेळी अधुन - मधून खोडावर आणि फांद्यावर अशी संपुर्ण झाडावर फवारणी करावी.

रोग - डाळींबावर प्रामुख्याने मर रोग तसेच पानांवरील व फळांवरील ठिपके या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. बुरशीजन्य रोग मुख्यत्वे अल्टरनेरीया, सरकोस्पोरा, अॅस्परजिल्स व कोलेटोट्रीकम या बुरशीमुळे होतो.

१) मर रोग : हा रोग झाडाच्या खोडाभोवती सतत ओलावा किंवा जमीन काळी असेल अथवा पावसाळ्याच्या सुरुवातीस उष्ण व आर्द्रतायुक्त हवामान असल्यास होतो.

झाडाची पाने शेंड्याकडून अचानक पिवळी पडण्यास सुरुवात होते. प्रथमत: एखादी फांदी वाळते. त्यानंतर त्याची तीव्रता वाढून संपूर्ण झाड वाळते. मुळे व खोडांचा आंतरर्छेद घेतला असता तपकिरी किंवा काळसर पट्टा दिसतो. खोडास लहान छिद्र पडणार्‍या भुंगेर्‍याच्या (शॉट होल बोरर) प्रादुर्भावमुळे मुख्य खोडावर आणि मुळावर लहान लहान छिद्रे दिसतात . खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्यावर एखादी फांदी किंवा पूर्ण झाड वाळते. मुळांवर सूत्रकृमीच्या गाठी दिसतात. हे प्रमाण जास्त झाल्यास झाडे मरतात. (फोटो क्र. ३ पहा.)

२) अल्टरनेरीया बुरशीची लक्षणे : ह्या बुरशीमुळे पानांवर वेडेवाकडे, तपकिरी ते गर्द तपकिरी ठिपके दिसतात. हे ठिपके मोठे होऊन पाने करपल्यासारखी (गर्द तपकिरी) दिसून कालांतराने पिवळी पडून गळतात.

फळांवर गोलाकार ते वेडेवाकडे लहान तपकिरी रंगाचे ठिपके दिसून येतात. रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यावर पुढे हे ठिपके लालसर तपकिरी ते गर्द तपकिरी किंवा काळपट तपकिरी रंगाचे होतात. हे ठिपके सुरुवातीला फळाच्या सालीवर पडून नतंर फळांच्या आतील भाग कुजतो. (फोटो क्र. ४ पहा. )

३) सरक्कोस्पोरा बुरशीची लक्षणे : पानांवर लहा न वेडेवाकडे काळे डाग पडतात. ह्या डागांचे प्रमाण वाढल्यावर पानगळ होते. तसेच फळांवर या बुरशीमुळे गोलाकार ते वेडेवाकडे गर्द काळे मोठे डाग पडतात. हे डाग मोठे होऊन काळा चट्टा पडतो व त्या ठिकाणी फळ आतून कुजते. (फोटो क्र. १० पहा.)

४) अॅस्परजिल्स बुरशीची लक्षणे : सुरुवातीस तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात. नंतर ते ठिपके आकाराने वाढत जाऊन काळे पडतात आणि त्यावर बुरशीची काळी वाढ दिसून येते. याचे प्रमाण वाढत जाऊन फळ कुजण्यास सुरुवात होते. रोगट फळे बोटांनी दाबली असता ती दबली जातात व आंबूस वास येतो. आतील दाणे रंगहीन होतात. (फोटो क्र. ११ पहा)

५) कोलिटोट्रीकम बुरशीची लक्षणे : प्रथम पानांवर जांभुळसर काळे अथवा पूर्ण काळे, लहान डाग दिसतात. नंतर डागांचे भोवतालचा भाग पिवळा पडून हे लहान लहान डाग पुढे मोठे होतात. पुढे हे डाग एकमेकांत मिसळून पानांवर डागांची गर्दी होते. त्यामुळे पानांची गळ होते. तसेच या बुरशीमुळे फळांवर खोलगट तपकिरी रंगाचे गोल डाग दिसतात. हे डाग मोठे होऊन चट्टा पडतो आणि असे फळ आतून कुजते. फळावरील छीद्राद्वारे बुरशी आत शिरकाव करते. ही बुरशी देटाच्या किंवा फळाच्या खालच्या बाजूने आत जाते अशी फळे तयार होण्याअगोदरच गळतात. (फोटो क्र. १२ पहा.)

वरील किडी व रोगांच्या नियंत्रणासाठी वेळापत्रकाप्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पंचामृत प्रिझम, न्युट्राटोनची फवारणी 'कृषी विज्ञान' केंद्रावरील तज्ञांचे सल्ल्याने करावी.