पैका देतो मका म्हणून सतत लावू नका

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


मका पिकाला जगातील तिसऱ्या क्रमांकाचे पीक म्हणून ओळखले जाते. हे पीक मुळचे पेरू, इक्वाडोर, बेलिव्हिया तसेच दक्षिण मेक्सिको आणि मध्य अमेरिकेतील आहे. मक्याची लागवड अन्नधान्य, चारा, पशुखाद्य तसेच काही उद्योगांसाठी कच्चा माल म्हणून करतात.

जगात मक्याची दरवर्षी १३२ दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते. सरसरी उत्पादकता ५७० दशलक्ष टन असून उत्पादकता ४.३ टन प्रति हेक्टर आहे. तर भारत देशाचा जगात उत्पादनाच्या बाबतीत ६ वा तर उत्पादकतेच्या बाबतीत १५ वा क्रमांक लागतो. देशातील सध्याचे मका लागवडीचे क्षेत्र ७ दशलक्ष हेक्टर आहे.

मक्याचे विविध उपयोग - दाणे, अन्नधान्य तसेच कुक्कुट पालनातील खाद्य, पशुखाद्य म्हणून वापरतात. पाने, खोड, दाणे काढल्यानंतर उरलेला भाग जनावरांना चारा म्हणून वापरता येतो. मक्याच्या दाण्यापासून रोजच्या वापरासाठी पशुखाद्यासाठी ५०० हून अधिक प्रकारची उत्पादने बनविली जातात. यामध्ये तेल, सायरप, स्टार्च, डेक्ट्रोज साखर पेये, जीवनसत्त्वे, अॅमिनो, अॅसिड, औषधे, सेंद्रिय आम्ले व अल्कोहोल इ. चा समावेश असतो. कोंबड्यांचे खाद्यामध्ये मक्याचा मोठ्याप्रमाणावर वापर होतो. भारतातील एकूण उत्पादनामधील ६५% घरगुती वापरासाठी आणि १४.५% पशु- पक्षीखाद्य, १० % स्टार्चसाठी, ९% इतर प्रक्रियांसाठी (तेल इथेनॉलसाठी) आणि १.५ % बियाणे म्हणून वापरले जाते.

मक्यामधील अन्नघटकांचे प्रमाण - मक्याचे दाण्यामध्ये स्टार्च ६७.७४%, फॅट ३.९ ते ५.८ %, प्रथिने ८.१ ते ११.५% राख १.३७ ते १.५ % साखर १.१६ ते १.२२ % असते. हे प्रमाण वेगवेगळ्या वाणाच्या उत्पादनात कमी - अधिक असते. पांढरा व पिवळसर अशा दोन रंगाच्या गाभ्यावरून 'अ' जीवनसत्वाचे प्रमाण बदलते. पांढऱ्या वाणात ०.०५ युनिट तर पिवळसर वाणात ७.०५ युनिट असते.

मक्याचे उपयोग (मक्यापासूनची उत्पादने)

१) कॉर्न तेल - मक्याच्या दाण्यात ३.९ ते ५.८ % स्निग्ध पदार्थ असतात. यापासूनचे तेल हे जगातील उत्कृष्ट खाद्यतेल समजले जाते.

२) हाय फ्रक्टोज सायरप - ४२% फ्रक्टोज सायरपची गोडी सुक्रोज इतकी किंवा इनव्हर्ट साखरे इतकी आहे. यामुळे अन्न उत्पादनाच्या उपयोगात फ्रक्टोजचा समावेश राहील. आयसोमेरिझम तंत्राया वापर करून दोन हाय फ्रक्टोज सायरप तयार झाली आहेत. एक 'आयसोमेरोज ६०० ' ६०% फ्रक्टोज तर दोन 'आयसोमरोज ९००' ९०% फ़्रक्टोज असते ते सॅकॅरिनला पर्याय म्हणून वापरता येईल.

३) लॅक्टिक अॅसिड - मक्यापासून लॅक्टिक अॅसिड मिळते त्याचा उपयोग फळांची जेली, अर्क, पेये, मिठाई लोणची अशा पदार्थांना स्वाद आणण्यासाठी होतो. तसेच मक्यापासून ग्लुटेन हे वेट मिलींग प्रक्रियेतून तयार होते. यात प्रथिने व अन्नद्रव्ये असतात. झेन हे एक प्रथिने सॉल्व्हट, एक्टॅक्शन (अर्क करणे) आणि प्रेसिपिटेशन तंत्रान वेगळे करतात. औषधांच्या गोळ्यांचे आवरणासाठी याचा उपयोग होतो.

मक्याचे अर्थशास्त्र - मक्यामध्ये कार्बोहायड्रेट निर्माण करण्याची क्षमता सर्वात अधिक आहे. गहू, तांदळापेक्षाही नफ्याचे प्रमाण मक्यामध्ये अधिक आहे.

खर्च व नफ्याचा तुलनात्मक तक्ता

अ.क्र.   बाब   गहू   भात   मका  
१   लागवडीचा खर्च (रू./हेक्टरी)   ३८१५   ३५५५   ३२३५  
२   दर क्विंटलचा उत्पादन खर्च रू.   १६६   १४०   १२९  
३   सरासरी उत्पादन (कि.ग्रॅ./हेक्टरी)   २३१३   २५४४   २५११  
४   नफा   २९९५   २७४०   ३०१५  


वरील तक्त्यावरून असे लक्षात येते की, १०० किले मक्याला येणारा खर्च १२९ रू. आहे. गहू व भात यांचा अनुक्रमे १६६ रू. व १४० रू. आहे. तसेच मक्याचे नफ्याचे प्रमाण ३०१५ रू./ हेक्टर असून गहू व भात यांच्या नफ्याचे प्रमाण अनुक्रमे २९९५ रू. आणि २७४० रू./हेक्टर आहे. म्हणजे नफ्याची क्षमता मक्याची जादा आहे.

त्याचप्रमाणे गहू व तांदुक यांच्या तुलनेत अधिक उत्पादन देणाऱ्या मक्याचे क्षेत्र अधिक आहे.

अ.क्र.   बाब   गहू   भात   मका  
१)   जागतिक उत्पादकता (क्विं./ हे)   १८.७   १८.३   ३८.१०  
२)   भारतीय उत्पादकता (क्विं./हे)   २१.२   १६.५   १५.१  
३)   अधिक उत्पदान देणाऱ्या वाणांचे क्षेत्राची टक्केवारी   ८३%   ७२%   ३४%  


म्हणजे भारताची मक्याची सरासरी उत्पादकता १५.१% क्विं./हे एवढी आहे. याचे कारण अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांखालील देशातील क्षेत्र कमी आहे.

बियाणे - रब्बी हंगामासाठी अधिक उत्पदान मिळण्यासाठी रोपांची संख्या ९०,००० प्रति हेक्टर आणि खरीप हंगामासाठी ६५,००० ते ७५,००० इतकी ठेवणे फायदेशीर ठरते. दोन ओळीतील अंतर ६० ते ७५ सेमी आणि २ रोपांतील अंतर २० सेमी ठेवल्यामुळे अपेक्षित रोपे राखता येतात. यासाठी हेक्टरी २० - २५ किलो बियाणे लागते.

बीज प्रक्रिया -जर्मिनेटर २५ मिली + १ किलो बी + १ लि. पाणी या द्रावणात १५ ते २० मिनीटे भिजवून लागवड करावी. ज्यावेळेस प्रतिकुल परिस्थितीत म्हणजे कमी पाऊस किंवा पाण्याची उपलब्धता नसते. तसेच पेरणीनंतर उशीरा पाऊस सुरू झाल्याने पेरलेले बी वाया जाते. अशावेळी सुरूवातीसच जर्मिनेटसोबत 'प्रिझम' २० मिलीचा वापर करावा म्हणजे अशा कमी ते मध्यम प्रतिकूल परिस्थितीत देखील बियाची ८० ते ९० % उगवण होऊन पेरणी यशस्वी होते.

मक्याची पेरणी - खरीप, रब्बी, उन्हाळी अशा तिन्ही हंगामात केली जाते. यामध्ये खरीप व रब्बी हे मुख्य हंगाम आहते. खरीपातील मक्याची पेरणी पाऊस सुरू होण्याच्या १० ते १५ दिवस आधी (पाण्याची सोय असल्यास) केल्यास पाऊस सुरू झाल्यानंतर पेरणी केलेल्या मक्यापेक्षा १५% उत्पादन अधिक मिळते. लवकर पेरणी केल्यामुळे तणांचा बंदोबस्त करता येतो. पाण्याची व्यवस्था नसल्यास पाऊस झाल्यानंतर जमिनीत पुरेसा ओलावा झाल्यावर लगेच पेरणी करावी. म्हणजे उगवण चांगली होईल. रब्बी हंगाम बियाच्या उगवणीच्या बाबतीत प्रतिकुल ठरतो. त्यासाठी योग्यवेळी पेरणी करणे आवश्यक असते. १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर नंतरच्या काळात मक्याच्या क्षेत्रात तापमान एकदम खाली जाते. त्यामुळे उगवण कमी होऊन पिकाची वाढही मंदावते. तसेच उशीरा पेरणी केलेल्या पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होतो. तशी वेळेवर पेरणी केलेल्या पिकात नसतो. त्याकरिता ऑक्टोबरअखेर पेरणी पुर्ण करावी. ऑक्टोबरचा मध्य काळ चांगला असतो. हिवाळी हंगामातील पेरणी डिसेंबर अखेरपर्यंत करतात, मात्र उत्पादनाची पातळी कमी होते. तापमान कमी असते अशावेळी सरीच्या खोलगट भागात पेरणी करावी. डिसेंबरनंतर सुर्य दक्षिणायनातून जात असल्याने सारी पुर्व - पश्चिम काढून दक्षिणेकडील बाजूस तळाशी पेरणी करावी. म्हणजे उत्तमप्रकारे सुर्यप्रकाश मिळून वाढ चांगली होते.

खते - मक्याला जास्तीत - जास्त सेंद्रिय खतांचा वापर करणे जमिनीच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते, मात्र मका हे कमी दिवसात अधिक उत्पदान देणारे खादाड पीक असल्याने त्याला खताची मात्रा मोठ्या प्रमाणात लागते. त्यासाठी शेणखत एकरी १५ ते २० टन पुर्व मशागतीच्यावेळी देऊन लागवडीच्यावेळी १ - १ चमचा कल्पतरू सेंद्रिय खताचा (एकरी २ ते ३ बॅगा) बी टोकाताना द्यावे तसेच रासायनिक खताचीही मात्रा आवश्यकतेनुसार द्यावी. यामध्ये बागायती पिकास १२० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ४० किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. तर पावसावरील मक्यास ७० किलो नत्र, ३५ किलो स्फुरद व २५ किलो पालाश द्यावे.

सुक्ष्म अन्नद्रव्ये - मका पिकास झिंक सल्फेटचा वापर करणे उत्पादनाच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. त्याकरिता हेक्टरी २० किलो झिंक सल्फेट नांगरणीच्यावेळी द्यावे. मात्र हे खत देताना स्फुरदयुक्त खतांबरोबर मिसळनार नाही याची दक्षता घ्यावी.

अधिक व दर्जेदार उत्पन्नासाठी - सप्तामृत फवारणी -

१) उगवणीनंतर १५ ते २१ दिवसांनी -२५० मिली सप्तामृत + १५० मि. हार्मोनी + १०० लि. पाणी.

२) उगवणीनंतर २१ ते ४० दिवसांनी - ५०० मिली सप्तामृत + २५० मिली हार्मोनी + १५० लि. पाणी

३) उगवणीनंतर ४० ते ५५ दिवसांनी - ७५० मिली ते १ लि. सप्तामृत + ३०० ते ३५० मिली हार्मोनी + २०० लि. पाणी.

दर्जा व उत्पादन वाढीच्या दृष्टीने या तंत्रज्ञानाचा निश्चितच फायदा होतो, असे अनेक शेतकऱ्यांनी अनुभवले आहे.

रेड सिग्नल (लाल दिवा)

गेल्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये विशेष करून खान्देश, मराठावाडा , विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये मक्याची लागवड झपाट्याने वाढत आहे. खरीपात हे पीक घेतल्यानंतर ऑक्टोबरमध्ये काढणीस येते. कधी काळी ३ ते ४ रू. किलो मिळणारी मका सध्या १० ते क्विंटलपर्यंत उत्पादन काढणारे शेतकरीहि आहेत. त्यामुळे कमी काळात अधिक उत्पादन मिळाल्याने मक्याखालील क्षेत्रात वाढ होत आहे.

युरोप आणि अमेरिका या प्रगत राष्ट्रांत ओझोनचे प्रमाण कमी होऊन कार्बनचे प्रमाण वाढल्याने तेथील पॉलिहाऊसचे प्रमाण की करून ते दुष्परिणामकारक, महागडे तंत्रज्ञान भारतात आले आणि सबसिडीच्या आधाराने ते पसरू लागले. त्या तत्वावर मक्याला भारतात आश्रय मिळाला आहे. शेतकरी फेरपालटीमध्ये कापसानंतर मका घेवू लागले. जरी हे तृणमूलवर्गीय (Gramminee Family) पीक असले तरी ते खादाड पीक आहे असे जगभर माहित आहे. ज्याप्रमाणे ऊस पिकाचे अधिक पाणी व अधिक रासायनिक खताने काही टप्प्यापर्यंत उत्पादन वाढले, परंतु सततच्या निविष्ठांच्या अधिक (रासायनिक व पाणी) माऱ्याने ६० टनाची सरासरी ३० टनावर खाली आली आणि हे शासनाला व शास्त्रज्ञांना कळायला १५ वर्षे लागले. तोपर्यंत जमिनी खराब झाल्या आणि यावर उपाय शोधण्यासाठी वेळ आणि खर्च वाढू लागला.

फेरपालट आणि पिकांचे नियोजन, सेंद्रिय खतांचा हिरवळीच्या खतांचा वापर नाही केला तर उसाहूनही बिकट अवस्था या मक्याने जमिनीची होईल, मक्यामुळे शेतकऱ्यांना तात्पुरता फायदा होईल परंतु सततच्या मक्यामुळे जमिनीची जडण - घडण, सेंद्रिय सुपिकतेचा, जैविक सुपिकतेचा, रासायनिक सुपिकतेचा नाश होऊन तो एक भारतीय शेतीला शाप ठरेल. वसुंधरेची भाषा आजार सुरू झाल्यावर शास्त्रज्ञांनाही कळायला १० त १५ वर्ष लागतात. मग ते सतत राबणाऱ्या अज्ञानी शेतकऱ्याचे काय ? त्याकरिता रासायनिक खतापेक्षा उसाचे पाचट, धसकटे, विविध प्रकारची हिरवळीची खते, गांडूळ खताचा व कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर आवश्यक तेवढ्या प्रमाणात करून जमिनीचे आरोग्य दिर्घकाळ टिकविता येईल. मात्र तरीही ही धोक्याची सुचना समजावी.