शेतीमालाचे भाव कशावरून ठरतात ? (३) - तेलबिया

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


* भुईमूग : भुईमूगाचे भाव हे विशेषेकरून शेंगदाण्यातील तेलाच्या प्रमाणावरून ठरतात. म्हणजे ४८ ते ५० टक्के तेल असणाऱ्या शेंगादाण्यास भाव जादा मिळतो. दाण्याच्या सालीवरून तेलाचे प्रमाण ठरत नाही. खाण्याच्या ज्या शेंगा असतात त्यांचा पांढरा दाणा असावा. यामध्ये तेलाचे प्रमाण थोडे कमी असते. त्याने डोके दुखत नाही. अशा शेंग हातगाडीवर भाजून किंवा शिजवून खातात. अशा शेंगा उपवासाच्या दिवसात आषाढी एकादशीला येतील या हिशोबाने शेतकरी उन्हाळी भुईमुगाची लागवड करतात. अशा शेंगांना मागणी असते. ३० - ४० वर्षापुर्वी नाशिकच्या मर्कटाला टरफलावर शिरा असलेल्या, पांढरे ३ ते ४ दाणे असलेल्या लांबत शेंगा खास खाण्यासाठी वापरल्या जात असत. हिचा दर १९४० - १९५० साली ३ आणे/शेर होता. तर १९७० ते ८० मध्ये ३ रू./शेर दर होता. आता ती दुर्मिळ जवळ - जवळ नाश झाली आहे. तिचे बी बहुतेक नामशेष झाले असावे. शेंगदाणे पावसळ्यात आर्द्रतेमुळे कुबट ओलसर होऊन त्यावर हिरवट (पिस्ता कलरची) बुरशी येते. यास अफ्लाटॉंक्सीन (Aflatoxin) म्हणतात. ही बुरशी कॅन्सर निर्माण करण्यास प्रेरक ठरते. तेव्हा शास्त्रज्ञांनी पावसाळ्यातही हवेत आर्द्रता जरी जास्त असली तरी त्याचे प्रतिबंधक जाती निर्माण कराव्यात. असे झाल्यास प्रकृती स्वास्थ्यास ते बाधक ठरणार नाही.

गुजरातमध्ये वालुकामय गोराडू जमिनीत पावसाळी भुईमुगाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. या राज्याच्या राजकरणावर भुईमूग आणि त्याच्या तेलाचे वर्चस्व असते. येथे वालुकामय जमीन असल्याने भुईमुगाच्या जाती ह्या मोठ्या दाण्याच्या आणि साधारण १०० ते १२० दिवसात येणाऱ्या आहेत. याचा दाणा गोड, आकाराने जंबो, मोठा व चवीष्ट असल्याने गुजरातमध्ये खाऱ्या शेंगदाण्याचा व फुटाण्याचा व्यापार मोठ्या प्रमाणात चालतो. रब्बी हंगामात येथे हरभऱ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. शेंगदाण्याचा दाणा मोठा आणि चविष्ट असल्याने देशभर मोठ्या प्रमाणावर मागणी असते. साधारण हे शेंगदाणे गुजरात मार्केटमध्ये ७० ते ८० रू./किलोने होलसेल मिळतात व याचे भाजल्याने मुल्यवर्धन होऊन १५० रू./किलो भाव होऊन किरकोळ विक्री २५० - ३०० रू. किलोने होते. याच्या विशिष्ट चवीमुळे युरोप, अमेरिकेत राहणाऱ्या गुजराती लोकांना हे पदार्थ कुरीअरने किंवा नातेवाईक जेव्हा परदेशात जातात तेव्हा ५ - १० किलो भेट म्हणून घेऊन जातात. या शेंगदाण्यापासून तेल काढल्यानंतर जी पेंड होते तिला दुभत्या म्हशींना खुराक म्हणून मोठ्या प्रमाणात मागणी असते. पेंडीमुळे म्हशींचे तूप रवेदार व स्वाद्युक्त होते असे अनुभवावरून लोक सांगतात. यामुळे याचे मुल्यवर्धन चांगले होते. ही जी पेंड आहे त्या पेंडीमधून राहिलेले ५ - ७% तेल सॉल्वंटचा वापर करून काढले जाते आणि ही पेंड मग परदेशामध्ये विविध प्रकारचे पुरक अन्नपदार्थ तयार करण्यामध्ये प्रथिने वाढीसाठी मिश्रण म्हणून वापरली जाते. अशा रितीने त्या पदार्थांचे मुल्यवर्धन होऊन ते पदार्थ साऱ्या जगभर विकले जातात. शेंगदाण्याचा लाडू, चिक्की बनविण्यात मोठ्या प्रमाणात वापर होतो. या देशात चातुर्मास पाळणारे लोक असल्याने आहार व उपपदार्थ तयार करण्यात मोठ्या प्रमाणात शेंगदाण्याचा वापर होतो. जेव्हा पाऊस कमी असतो तेव्हा फेब्रुवारी ते जूनपर्यंत शेंगदाण्याचे व तेलाचे भाव चढे असतात. याचे तेल हे स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतर २० वर्षात मजूर, गरीब व मध्यमवर्ग आहारात सरसकट वापरत असे. या तेलामध्ये सॅच्युरेटेड फॅडी अॅसिडचे प्रमाण ज्यादा असल्यामुळे याचा वापर सढळ केल्यावर रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढत असल्यामुळे हृदय विकाराचा त्रास बळावतो. म्हणून मध्यम व सुखवस्तू लोकांनी याच्या तेलाचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर कमी केला, वर्ज्य केला, त्यामुळे हे लोक करडई व सुर्यफूल तेलाकडे वळाले.

* करडई : करडई तेलामध्ये लिनोलीक (C17 H29 COOH) व लिनोलिनीक (C17 H29 COOH) या अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रक्तवाहिन्याच्या आतील बाजू जाड होत नाहीत म्हणून डॉक्टरांनी या करडई तेलाचा वापर वयाच्या ४० शी नंतर आहारात करणे या कारणास्तव उचित आहे अशी शिफारस केली. ६० ते ८० या काळामध्ये करडईच्या लागवडीमध्ये व अधिक तेलाच्या प्रमाणासाठी 'भिमा' ही जात कृषी संशोधन केंद्राने विकसित केली. या जातीत ४८ ते ५२% तेलाचे प्रमाण आहे. विशेषेकरून करडईची लागवड ही ९ सप्टेंबर ते १९ सप्टेंबरच्या दरम्यान करणे संशोधन केंद्राने शिफारशीत केले आहे. या काळात मान्सून पाऊस ओसरल्यानंतर परतीचा पाऊस पडतो. त्या ऑगस्टच्या ओलीवर हे पीक जोमदार येते. आता हवामान बदलल्यामुळे सुरूवातीचे पावसाचे १।। ते २ महिने कोरडे जात असल्याने आणि याला कारण डिसेंबर, मार्च, एप्रिल या महिन्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने शिवारे झोडपली जात आहेत. अशा परिस्थितीमुळे मोसमी पावसाचा काल व प्रमाण हा अनिश्चित झाला आणि १९५० ते ७० या काळामध्ये मान्सूनच्या पावसाचे अनुमान सुटसुटीत कालबद्ध असायचे आणि त्यामुळे खरीप व रब्बीची पिके चांगली येत असत. ते ७२ च्या दुष्काळानंतर सर्व प्रमाण बदलले, विस्कटले. ८० च्या दशकानंतर महाराष्ट्र व कर्नाटकात जी करडई लागवड होती ती कमी झाली. त्यामुळे या तेलाचा मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्याने तेजी निर्माण झाली व पर्यायाने लोक सुर्यफूल तेलाकडे वळावे.

* सुर्यफूल : हवामानातील बदलामुळे करदईचे उत्पादन घटले. रशिया व ऑस्ट्रेलियात प्रचलित असलेले सुर्यफूल पिकाचे १९७० ते ७२ मध्ये भारतात आगमन झाले. या तेलाचे गुणधर्म हे करडई तेलास अनुरूप कोलेस्टेरॉल कमी करणारे असल्याने करडई तेलाची जागा सुर्यफूल तेलाने घेतली. सुर्यफूल हे खरीप, रब्बी व उन्हाळी अशा तिन्ही हंगामात येऊ शकते. याची गमंत अशी याच्या तिन्ही हंगामात येणाऱ्या जाती विकसीत केल्या, मात्र याच्या मुळाचा प्रकार सोटमुळातील असल्यामुळे सुर्यफुलाची लागवड ही जमिनीचा कस कमी करते, असा शास्त्रीय समज झाला. म्हणून सुर्यफुलाच्या परिपक्वतेच्या काळात जो बियाचा तवा असतो तेव्हा जमिनीत पाण्याचा ओलावा आवश्यक असतो. तो जर कमी असला तर सुर्यफुलातील दाणे भरले जात नाहीत. त्यामुळे त्याचे उत्पादन घटते. तसेच पावसाचे प्रमाण व जमिनीतील पाणी कमी झाल्याने त्याच्या लागवडीवर मर्यादा आल्या. तुलनात्मकदृष्ट्या सुर्यफूल तेलाचे करडईपेक्षा भाव कमी झाले. त्यामुळे मध्यमवर्गीय व श्रीमंत वर्गामध्ये सुर्यफूल तेलाला मागणी टिकून आहे. परंतु पाऊसमान सारखे बदलत असल्याने याच्या लागवडीचे प्रमाण घटले.

* तीळ : तिळाला याच्या विशिष्ट स्निग्ध पदार्थ व तेलाच्या गुणामुळे जगभर मागणी आहे. याचे तेलामध्ये करडई व सुर्यफुलाप्रमाणे अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे हृदयविकाराला ताजे तिळाचे तेल हे अधिक परिणामकारक आहे, असे डॉंक्टरांकडून सांगितले जाते. काळे तीळ हे आयुर्वेदिक असते. याच्या केसवाढीच्या गुणधर्मामुळे केसाचे तेल निर्माण करणाऱ्या कंपन्या या तेलाचा वापर करतात. त्यामुळे काळ्या तिळाचे भाव हे जादा असतात. आहारात व तेलासाठी पांढऱ्या तिळाचा वापर मोठ्या प्रमाणात जगभर केला जातो. शेतातून निर्माण झालेले जे पांढरे तीळ असते ते थोडे मळकट असते. मोठ्या शहरामध्ये आणि कोरिया, चायना, अमेरिका, युरोप, रशिया, जपान, केनडा अशा पाश्चात्य राष्ट्रांत पॉलिश केलेले पांढरे तीळ मोठ्या प्रमाणात वापरले जाते. विशेषेकरून बर्गर, पावाचे प्रकार व तिळापासून केले जाणारे विविध नाविण्यापूर्ण प्रकार आणि भारतात तिळाचा उपयोग गूळ वापरून चिक्की, संक्रांतीत वड्या करण्यासाठी पांढऱ्या तिळाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे पॉलिश केलेल्या पांढऱ्या तिळाला साऱ्या जगभर मागणी असते. त्यामुळे या तिळाला सर्वसाधारण पांढऱ्या तिळापेक्षा भाव ज्यादा असतो. आपत्कालीन परिस्थिती असते तेव्हा तिळाचे पीक घ्यावे असे सुचविले जाते. तेव्हा शास्त्रज्ञांनी कमी पाण्यावर, कमी काळात येणारे व तिळापासून मुल्यवर्धन झालेले पदार्थ जास्तीत जास्त कसे टिकतील अशा जाती जगभर विकसीत कराव्यात. म्हणजे तीळ ही श्रीमंतांचीच मक्तेदारी न होता तिसऱ्या जगातील गरीबी मिटविणारे तीळ हे बहुआयामी व्हावे असे वाटते. तिळामध्ये सर्वसाधारण तेलाचे प्रमाण ५०% असते. तिळापासून पेंड तयार होते. ती खाद्यान्न व पेंडीची भाजी केली जाते. तिळातील उर्वरित राहिलेले तेल सॉल्वंटने काढल्यावर जगभर विविध उपपदार्थ बनविण्यामध्ये या पेंडीचा पुरक पदार्थ म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे तिळाचे मुल्यवर्धनामध्ये वाढ होते. जगभर तीळ या पिकाखालील क्षेत्र हे कमी प्रमाणात आहे आणि तसे पहिले तर याला नाविण्य व मागणी अधिक आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी होत. असल्याने याचे भाव बाराही महिने टिकून व चढे असतात.

* सरकीचे तेल (Cotton Seed Oil) : सरकीमध्ये १६ ते १८% तेल असते. हे तेल इतर सर्व तेलापेक्षा स्वस्त असते. कापूस सरकीपासून वेगळा केल्यानंतर सरकीची पेंड निघाल्यानंतर हे तेल निघते. त्याचा फरसाण, भेळ तयार करण्यासाठी खेडेगावात यात्रा, बाजार व जिल्ह्याच्या ठिकाणी फरसाण तळण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो. याचे कारण असे, या तेलाचा वापर केल्यामुळे फरसाण खौट होत नाही व ते अधिक दिवस टिकून चविष्ट तयार होते म्हणून या तेलाला देशभर प्रचंड मागणी आहे. शेंगदाणा तेलाने मात्र फरसाण खौट होतो त्यामुळे टिकत नाही, शिवाय शेंगदाणा तेल महाग असते. म्हणून खेडेगाव व जिल्ह्याच्या ठिकाणी या सरकी तेलाचा वापर फरसाण तयार करण्यासाठी केला जातो. दिल्ली, कलकत्ता, अहमदाबाद, मुंबई, चेन्नई, पुणे अशा मेट्रो सिटीत मात्र रिफाईड तेलाचा वापर केला जातो. तेथे सरकी तेलाचा वापर सहसा करत नाहीत.

* भाताच्या कोंड्यापासून निघणारे तेल : भात जेव्हा गिरणीतून भरडला जातो तेव्हा तांदळाच्या कोंड्यापासून निर्माण होणाऱ्या तेलास राईस ब्रन ऑईल (Rice Bran Oil) म्हणतात. या कोंड्यामध्ये ४ ते ६% तेल असते आणि हे तेल प्रकृती स्वास्थ्यास चांगले असते. तेव्हा हे वेगवेगळ्या ब्रँडने सर्वसाधारण माणसास उपलब्ध होते. अलिकडच्या १० वर्षात हे तेल उपलब्ध होऊ लागले आहे.

* मक्यापासून कॉर्न ऑईल : ज्याप्रमाणे भाताच्या कोंड्यापासून तेल निर्माण होते व ते प्रकृतीस चांगले आहे तसे कॉर्न फ्रुक्टोज एक्सप्रेस सिरप तयार केले जाते याचा उपयोग औषधे, गोळ्या चॉकलेट, बिस्कीटे तयार करण्याच्या कारखान्यात मोठ्या प्रमाणात परदेशात करतात, तद्वतच मक्यापासून तेल कॉर्न ऑईल (Corm Oil) काढले जाते व हे तेल सध्या आहारात वापरले जाऊन प्रचलित होऊ लागले आहे. त्यामुळे ज्या देशांमध्ये मक्याची लागवड वाढेल अर्थात मका हे पीक जास्त व सारखे घेतल्यास जमिनीच्या प्रकृतीस ती धोक्याची घंटा आहे. तेव्हा मक्याची लागवड आंधळेपणाने न करता डोळसपणे फेरपालटीत करावी. मक्याचे पीक हे सारखे घेऊ नये.

* कराळे : ज्या भागात पाऊस जादा आहे. उदा. इगतपुरी (नाशिक), उत्तरप्रदेशमध्ये कारळ्याचे पीक केले जाते. कारळे हे दोन्ही बाजूस निमुळते, काळे, चमकणारे, पिवळ्या फुलांचे तेलबिया पीक आहे. खेडेगावात व आदिवाशी भागात याची चटणी फार प्रचलित आहे. याचे उत्पादन व क्षेत्र कमी आहे. याचा आहारात वापर सहसा ऐकीवात नाही. त्यामुळे या तेलबियावर जास्त संशोधन व अभ्यास नाही.

तेलबियाचे बाजारभाव ठरविण्यामध्ये वर उल्लेख केलेल्या विविध अंगांचा व उपंगांचा वापर करून भाव ठरतात. भविष्यातील वायदे बाजारात तेलाचा वाटा फार मोठा व महत्त्वाचा आहे. जगाची वाढती लोकसंख्या व गरज लक्षात घेता नवीन तेलबियांचा शोध घेऊन त्याप्रमाणे विविध निवडुंग (कॅक्टस) पावसाशिवाय अगर पाण्याविना वर्षानुवर्षे जिवंत राहतात व आपले गुणधर्म सोडत नाही. अशाप्रकारे नवीन जंगली तेलबियांचा संकर करून जाती विकसित करून मानवाची गरज भागवावी. म्हणजे खाद्य तेल (पामतेल) आयात करण्यामध्ये जे जगभरातील लोकांचे परकीय चलन वापरले जाते ते वाचेल.