ग्रामीण विकासाचा वटवृक्ष

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


थोर गांधीवादी नेते डॉ. मोहन धारिया ऊर्फ अण्णा (वय ८८) यांचे दि. १४ ऑक्टोबर २०१३ सोमवारी सकाळी ८.०० च्या दरम्यान मुत्रपिंडाच्या विकाराने निधन झाले. अण्णांचा जन्म १४ फेब्रुवारी १९२५ रोजी कोकणातील नाते, जि. रायगड येथे झाला. त्यांनी शालेय शिक्षण कोकणात घेतल्यानंतर कॉलेजचे शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये घेतले. १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधीच्या हाकेस साद घालून भाग घेतला. १९५७ ते १९६० साली ते पुणे महानगरपालिकेत सदस्य होते. त्याकाळामध्ये ते समाजवादी नेते असल्याने राजकारणापेक्षा समाजकारण जास्त केले आणि गरीब लोकांसाठी झगडले. नंतर ते कोंग्रेसचे प्रदेश चिटणीस झाले. कामगारांच्या न्याय व हक्कासाठी आणि गरीबांना न्याय मिळण्यासाठी ते सतत संघर्ष करत राहिले. ते २ वेळा लोकसभेचे व १ वेळा राज्यसभेचे खासदार होते.

दारिद्र्य आणि वाढती बेरोजगारी या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी अखेरपर्यंत झुंज दिली. हे मुद्दे जयप्रकाश नारायण यांनी उचलून धरले होते. अण्णा व्यक्ती स्वातंत्र्यासाठी जागृत होते. इंदिरा गांधीच्याबरोबर त्यांनी जाहीर विरोध केल्याने त्याचा त्यांना त्रास झाला. पक्षात विरोधी भूमिका घेतल्याने त्यांनी स्वत: हून राजीनामा दिला. आणीबाणीनंतर ते १९७८ साली नगरविकास आणि वाणिज्य खात्याचे राज्यमंत्री झाले. मुरारजी देसाईंचे सरकार होते तेव्हा ते मंत्री होते. काही काळ चंद्रशेखर हे पंतप्रधान झाले त्या काळात भारताच्या केंद्रीय नियोजन मंडळाचे ते उपाध्यक्ष होते. त्यांनी या काळात पर्यावरण, ग्रामीण विकास या गोष्टीसाठी चांगले निर्णय घेतले. तेव्हापासून पर्यावरण खात्याला महत्त्व आले. सामान्य नागरिक, प्रशासक, शास्त्रज्ञ पर्यावरणासंदंर्भात बोलू लागले, लिहू लागले. 'पर्यावरण' हे मानवाच्या मुलभूत गरजापैकी एक मुलभूत गरज म्हणून धारियांनी मोठी चळवळ उभी केली. पर्यावरणाचे स्वतंत्र खाते निर्माण केले. वनखाते व वृक्ष लागवड याविषयी देशभर जागृती व चळवळ उभी केली. त्यामुळे एका बाजूला सिमेंटची जरी जंगले वाढत असली तरी त्याचा पर्यावरणावर दुष्परिणाम होणार नाही यासाठी त्यांनी वृक्ष लागवड, वनांची जोपासन व संवर्धन याला महत्व दिले. पर्यावरण विषय हा स्वतंत्रपणे अनेक सामाजिक संस्थांनी चांगल्यारितीने हाताळला. त्यामुळे भारताचे वाळवंट होण्याचे थांबले. तरी त्यांच्या अपेक्षेपेक्षा ही प्रगती कमी होती. त्यामुळे या प्रगतीबाबत ते समाधानी नव्हते. पर्यावरण हा विषय अनेक विद्यापीठामध्ये पदवीसाठी समाविष्ठ झाला. अशारितीने पर्यावरणाची मुहुर्तमेढ रोवणारे धारिया हे या गोष्टीचे अग्रणी झाले. त्यांनी राजसंन्यास घेतल्यानंतर २५ वर्षापुर्वी वनराई संस्थेची स्थापना केली आणि त्या संस्थेमार्फत पडीक जमिनीचा विकास देशातील सर्व राज्यांमध्ये वृक्ष लागवड, संवर्धन व जंगल संवर्धनाची मोठी कामे केली. चिपको आंदोलनाचे जनक बहुगुणा यांच्या चळवळीला धारियांनी साथ दिली आणि तिथून वनखाते खऱ्या अर्थाने सक्षम झाले. दरवर्षी पावसाळा आला म्हणजे वृक्ष लागवड होते असते, परंतु त्या लागवड केलेल्या वृक्षांचे पुढे काय होते याची कधीच शहानिशा होत नसे. वृक्षारोपणाची बातमी, फोटो एवढ्यापुरतेच ते मर्यादीत राहत असे. त्यांचे आणि प्रशासनातील लोकांनी स्नेहाचे संबंध होते. पर्यावरण, वृक्षसंवर्धन, जलसंधारण व मृदसंधारण यासंदर्भामध्ये शासकीय लोकांत गोडी निर्माण करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. शासनातील निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. वनराई या संस्थेतून होणाऱ्या कार्यक्रमाला ते प्रशासकीय अधिकारी, भारत सरकारचे पदाधिकारी येत असत. त्यांच्या अनेक कार्यक्रमाला मला खास आमंत्रण असत. त्या कार्यक्रमास मी उपस्थित राहून मार्गदर्शन केले आहे. मध्यंतरीच्या दुष्काळामध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात दुष्काळावर मात करण्यासाठी वनराई बंधारे बांधून पाणी साठवून भूजल पातळी वाढविण्यासाठी व गावोगावी पिण्याच्या पाण्यासाठी त्यांनी केलेल्या कामाची भारत सरकारने दखल घेऊन राष्ट्रपती, पंतप्रधान, डॉ. स्वामीनाथन यांनी त्यांचा गौरव केला व अनेक नागरी सन्मान त्यांना प्राप्त झाले. नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष असताना त्यांच्या माझ्या बऱ्याचवेळा मुलाखती होत असत आणि मी केलेल्या कृषी सुचनांना ते आनंदाने प्रोत्साहन देत असत. सेंद्रिय शेतीविषयी त्यांनी माझ्या कामास शाबासकी दिली होती. आम्ही आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा २००० साली जो कार्यक्रम घेतला होता, त्यामध्ये त्यांनी प्रगतशिल शेतकरी, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ यांना थोर गांधीवादी नेते बाळासाहेब भारदे यांच्या समवेत येऊन त्यांनी मार्गदर्शन केले होते. संद्रिय शेतीचे माझे विचार त्यांना खूप आवडत असत. सेंद्रिय शेती, पर्यावरण व ग्रामीण आरोग्या या विषयी ते अतिशय जागृत होते. गरीबांसाठी सरकारने नुसती मलमपट्टी न करता भरीव कामगिरी करावी असे त्यांचे मत होते. शेतकऱ्यांच्या कर्ज माफीसाठी त्यांनी खूप प्रयत्न केला व त्यासाठी त्यांना यश आले. विशेषत: खान्देश, मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत होते. तेथील शेतकऱ्यांना सरकारकडून कर्ज मिळण्यास विलंब होत असे व त्यात भ्रष्टाचार होत असे, त्यामुळे शेतकरी हे खाजगी सावकारीचा भक्ष ठरत होते. त्यांच्या जमिनी सावकार कर्जापोटी लिहून घेत असत याचे त्यांना फार मोठे दु:ख होते. अनेक ठिकाणी ते आमच्या अभियानाचा, कार्याचा चांगला उल्लेख करत असत. त्यांना 'सिद्धीविनायक' शेवग्याविषयी फार गोडी होती. त्यांनी त्यांच्या शेतावर 'सिद्धीविनायक' शेवग्याची लागवड केली होती. तसेच डॉ.बावसकर तंत्रज्ञान ते वापरत असत. त्यांना 'कृषी विज्ञान' मासिक फार आवडत असे, कारण शेतकऱ्यांनी त्यांचे प्रश्न आधुनिक तंत्रज्ञानाने सोडविल्याचे व त्यांची प्रगती साधल्याच्या यशोगाथा 'कृषी विज्ञान' मधून वाचण्यात येत असत. अनेक वेळी भेटी दरम्यान ते माझ्याशी दिलखुलास चर्चा करीत. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी सेंद्रिय शेती. 'सिद्धीविनायक' मोरिंगा अशा तत्सम विषयाबद्दल त्यांना अभिमान होता. एकदा त्यांनी आमच्या ऑफिसला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा त्यांनी वृक्ष लागवड, वृक्ष जोपासना, वृक्ष संवर्धन, मृद संवर्धन, जलसंवर्धन अशा प्रकारचे शेतकऱ्यांचे जीवन उंचविण्यासाठी त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. अशा थोर नेत्यास देश मुकला आहे. परंतु त्यांचे विचार व कृती याचे संवर्धन केले तर त्यांचे ग्रामीण विकासाचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल आणि तिच त्यांना खरी आदरांजली ठरेल !