हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या यशोगाथा

श्री. बजरंग कृष्णा चौधरी, मु.पो. हरीपूर, ता. मिरज, जि. सांगली.
मोबा . ९९२३१४१०२०


हळदीची काढणी करतेवेळी बाजारभाव जास्त तेजीचे असतीलच असे नसते, म्हणून आम्ही हळद, काढणीनंतर शिजवून वाळवितो. नंतर जमिनीमध्ये तयार केलेल्या पेवामध्ये साठवितो. हे पेव जमिनीत घागरीच्या आकाराचे १५ फूट खोलीचे आणि २० फूट परीघाचे असते. अशा पेवामध्ये तळाला शेणाच्या गोवऱ्या अंथरूण त्यावर नयलॉनचा (प्लॅस्टिकचा) मोठा कागद अंथरला जातो आणि बाजूला उसाचे पाचट सुतळीने बांधले जाते. नंतर या पेवामध्ये १० ते १२ फूट उंचीपर्यंत हळद खुली भरून वर ३ ते ५ फुटाचा रिकामा भाग ठेवला जातो. गोवऱ्या अंथरण्याचा आणि वरील रिकामा भाग ठेवण्याचा उद्देश वेगळाच असतो. तो म्हणजे हे पेव रानात असतात आणि २०० क्विंटल साठवण क्षमतेच्या या पेवामध्ये ४-५ वर्षापर्यंत कोणत्याही हंगामात कीड न लागता सुस्थितीत हळद राहत असते. तेव्हा अशा हळदीची रात्री चोरी होऊ नये म्हणून तळाशी गोवऱ्या अंथरल्याने कार्बनडायऑक्साईड वायू वरील मोकळ्या पोकळीत जमा होतो. त्याचे प्रमाण इतके वाढते की, त्यामुळे पेवामध्ये कोणी व्यक्ती उतरली असता अक्षरश: मृत्यु ओढावतो. अशा काही घटनाही आमध्या भागात घडल्या आहेत. तेव्हा या (पेवातील) हळदीची चोरी करण्याचे कोणी धाडस करीत नाही.

पेवातील हळद विक्रीसाठी काढतेवेळी पेवावरील फरशीचे झाकण काढून ८ ते १० तास कार्बनडायऑक्साईड वायू बाहेर जाऊ द्यावा लागतो, नंतर या वायूचे प्रमाण कमी झाले आहे याची खात्री करूनच नंतर आत उतरून हळद बाहेर काढली जाते. हे पेव मातीचे असून ही त्यावरून लोडचा ट्रक गेला तरी तुटत नाहीत, इतके ते मजबूत असतात.