पपईची यशस्वी लागवड

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


पपईचा उपयोग फळ म्हणून खाण्यासाठी केकमध्ये, मसाला पानामध्ये वापरण्यात येणारी टुटी - फ्रुटी, जाम, जेली इ. पदार्थ तयार करण्यासाठी, तर पपईच्या पेपेनपासून मौल्यवान औषधे, बिअर, च्युईंगम तयार करतात. त्याचबरोबर कातडी कमविण्यासाठी, लोकर, रेशीम उद्योगात वापर करतात. पेपेनचा उद्योग सर्वसामान्यांना परवडणारा नसला तरी पेपेनच्या राहिलेल्या भागापासून टुटी - फ्रुटी तयार करता येते व हा टुटी - फ्रुटीचा उद्योग सुशिक्षित बेरोजगारांसाठी उद्योगाचे नवीन दालन ठरेल.

औषधी उपयोग - पपई गुणधर्माने रुचकर, पाचक, थंड, पित्तशामक, यकृत, प्लीहारोग यांचा नाश करते. पपईमध्ये व्हिटॅमिन 'ए ' भरपूर प्रमाणात असते. दृष्टीदोष असणाऱ्यांसाठी पपई हितावह ठरते. पचनाच्या तक्रारींवर तसेच आम्लपित्तावर ३ ते ४ गुंजा पेपेन जेवणानंतर द्यावे. मुळव्याधींच्या मोडांना पपईचा चीक लावल्याने ते गळून पडतात. पपईच्या पानांच्या रसात अफू उगाळून लावल्याने नारू ताबडतोब बाहेर पडतो. घटसर्प झाल्यास घशाला पपईचा चीक लावल्याने रोगजंतूचा पांढरा पडदा विरघळून घसा मोकळा होतो. जळवातावर हिरव्या पपयाचा किस पातेल्यात घालून वाफवावा व तो ४ -५ दिवस तळहात व तळपायांना लावल्याने जळवाताचा त्रास कमी होतो. कृमीवर पपईच्या फळांना एक चमचा चीक साखरेबरोबर द्यावा. लहान मुलांसाठी २ ते ३ थेंबच चीक साखरेबरोबर द्यावा. गजकर्णावर पपईच्या कच्च्या फळावरील चीक काढून तो लावावा.

पपईच्या हिरव्या फळात ९२% पाणी, १% पेक्टीन, ४.५% कर्बोदके, ०.५ ते १% पेपेन असते. पिकलेल्या फळात पेपेन व पेक्टीन नसते. परंतु कर्बोदके व कॅरोटेनाईट वाढलेली असतात. पिकलेल्या पपईच्या गरात ८९% पाणी, ८.२% साखर, ०.५ % प्रथिने असतात. १०० ग्रां गरामध्ये ४३ मिलीग्रॅम ऑस्कर्बिक आम्ल आणि ९२७ मायक्रोग्रॅम बीटा -कॅरोटीन असते.

हवामान - पपईचे झाड हे उष्ण कटीबंधात वाढणारे असून सौम्य उष्ण हवामानात त्याची वाढ चांगली होते. मात्र गोठणारी थंडी या झाडास सहन होत नाही. तापमान जर १० डी. से. च्या खाली गेले तर फळे पोसली जात नसून पिकण्याची क्रिया फार मंदावते. त्याचबरोबर झाडांच्या वाढीवर व फळधारणेवरही त्याचा दुष्परिणाम जाणवू लागतो. पपईची झाडे ३५ डी. ते ४५ डी. सेल्सिअस तापमानातही येतात. मात्र ५ डी. सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाचा पिकावर परिणाम जाणवतो.

पपईच्या झाडांना जोराचे उष्ण, कोरडे वारे सहन होत नाही. फळे पिकण्याच्या वेळी कोरडे हवामान लाभदायक असते. दमट हवामानात फळाची प्रत व दर्जा ढासळतो. जास्त पावसाच्या प्रदेशात झाडांनी वाढ होते. मात्र पपईचे खोड ठिसूळ असल्याने ते सडते. त्यामुळे झाडांची मर मोठ्या प्रमाणात जाणवते. तेव्हा अशावेळी जर्मिनेटर, थ्राईवर, प्रिझम या औषधाचे (प्रत्येकी ५ मिली प्रती लि. पाण्यातून) ड्रेंचिंग करावे.

महाराष्ट्रा, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल, बिहार व मध्येप्रदेशच्या काही भागात पपईची व्यापारी तत्त्वावर मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे.

जमीन - पपईच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची, सुपीक, मध्यमकाळी, नदीकाठची गाळाची, तांबडी पोयटायुक्त जमीन योग्य असते. परंतु चुनखडीच्या किंवा खडकाळ जमिनीत पपईची चांगली वाढ होते नाही. पपईच्या झाडाच्या मुळ्या उथळ वाढत असल्याने पपईची लागवड ४५ सेमी खोलीच्या जमिनीत करता येते. पानथळ जमिनीत पपईची लागवड करू नये. कारण झाडाची पाने पिवळी पडून गळतात. त्यामुळे झाडाच्या वाढीवर दुष्परिणाम होतो. त्याचबरोबर खोड सडण्याची शक्यता असते.

पपईच्या झाडाच्या मुळ्या मांसल, पाणी शोषणाऱ्या व अतिशय ठिसूळ असतात. चिकण व चुनखडीच्या जमिनीत लागवड केल्यास पाण्याचा निचरा न झाल्याने मुळ्या सडतात. जमिनीचा सामू हा ६ ते ७ असावा.

जाती- पपईच्या विविध जाती असून कोईमतूर १ ते ६ नंबर, वॉशिंग्टन, मधुबिंदू इत्यादी जाती फळांसाठी प्रसिद्ध असून विशेष करून पेपेनसाठी कोईमतूर जाती प्रचलित आहेत.यानंतर म्हणजे १९९० ते १९९५ या बारा - पंधरा वर्षामध्ये 'डिस्को ' नावाच्या पपईच्या जातीने पपई क्षेत्रात क्रांतीची सुरुवात झाली होती. ह्या जातीची पपई दिसण्यास कुरूप, लहान असून वजन ३०० ते ३५० ग्रॅम व फळाची साल हिरवट रंगाची असते. तरी देखील ही पपई मुंबई मार्केटमध्ये रू. १०० /१० फळांची करंडी या दराने विकली जात असे. कारण ह्या जातीची फळे दिसण्यास आकर्षक नसली, तरी आतमध्ये बी फारच कमी, तोंडाजवळ फक्त २ ते ४ बिया असतात. फळाचा गर गर्द केशरी रंगाचा,स्वादयुक्त, मधुर असा असल्यामुळे सुखवस्तु लोकांच्या पसंतीत उतरलेली अशी जात होती. त्याच डिस्को पपईच्या आगमनापासून पपईच्या लागवडीमध्ये क्रांती होऊन पपईची लागवड मोठ्या प्रमाणावर सुरू झाली व नंतर 'तैवान' जातीच्या पपईचे बी भारतात आयात होऊ लागले. भारतात आयात होणाऱ्या पपईच्या लागवडीतील मुख्य अडचण म्हणजे या पपईच्या बियाणाची उगवण क्षमता फार कमी. शेतकऱ्याला ह्या आयात केलेल्या पपईच्या बियांसाठी १८०० ते २००० रू. / दहा ग्रॅम असा सोन्यासारखा भाव देऊन फार मोठा धोका पत्करावा लागतो. हा धोका तो एकरी होणाऱ्या २ ते ४ लाख रुपयांच्या उत्पन्नाच्या मृगजळामागे धावण्यापोटी होतो. मात्र ज्या शेतकऱ्यांनी डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा वापर कृषी विज्ञान केंद्रातील तज्ञांच्या सल्ल्यानुसार त्यांनी अशा परिस्थितीवरही मात करून अपेक्षीत उत्पादन घेतले आहे. त्यांच्या मुलाखती पुढे दिलेल्या आहेतच त्या पहाव्यात.

सुधारीत जाती -

१) वॉशिंग्टन - या जातीची लागवड सर्वत्र होत असली तरी भारताच्या पश्चिम विभागमध्ये ही जात अतिशय लोकप्रिय आहे. या जातीच्या पानांचे देठ जांभळ्या रंगाचे असून झाडे ठेंगणी असतात. फुले पिवळी असून फळे गोलाकार ते लांबोळी मध्यम ते मोठ्या आकाराची असतात. फळे २० सेमी लांब असून घेर जास्तीत जास्त ४० सेमी असतो. फळाचे वजन १ किलो असते. पिकलेल्या फळाची साल तेजस्वी पिवळ्या रंगाची असून गर नारिंगी असतो. पपईस वास सौम्य असला तरी स्वाद आवडणारा असतो. या जातीमध्ये नर झाडे आणि मादी झाडे वेगवेगळी असतात.

२) कूर्ग हनीड्यू - ही जात कूर्गमधील चेथाली येथील संत्रा संशोधन केंद्रामध्ये हनीड्यू या जातीच्या झाडापासून कूर्ग हनीड्यू जातीची निवड केली आहे. हनीड्यू या जातीला मधुबिंदू देखील म्हणतात. हनीड्यू जातीच्या एकाच झाडावर मादीफुले व द्विलिंगी फुले असतात. त्यामुळे वेगळ्या नर फुलांची गरज नसते. झाडावर फळे खालीपासून लागलेली असतात. फळे लांबोळी असून फळात बियांचे प्रमाण कमी असते. उत्पादन भरपूर मिळते. ही जात उत्तर भारतात लोकप्रिय आहे.

कूर्ग हनीड्यू जातीपासून फक्त मादी आणि द्विलिंगी झाडे येतात. शुद्ध नर झाडे नसतात. या जातीची फळे लांबोळी असून स्वाद चांगला असतो. उत्पादन भरपूर मिळते. गर जाड, मऊ, नारिंगी, मध्यम रसदार आणि उत्तम स्वादाचा असतो. झाडे मध्यम ठेंगणी असतात.

३) रांची - ही बिहारची जात असून दक्षिण भारतात लोकप्रिय आहे. या जातीच्या झाडावर खोडापासून फळे लागतात. बियापासूनची झाडे सतत वाढतच असतात. फळे मध्यम आकाराची अंडाकृती असून गर तेजस्वी पिवळा व गोड असतो.

४) को १ - तामिळनाडू कृषी विद्यापीठाने संशोधीत केलेल्या रांची या जातीमधून निवड पद्धतीने विकसित केलेली ही जात आहे. झाडे ठेंगणी , एकसारखी असतात. जमिनीपासून ४ ते ५ फुट उंचीपासून झाडाला फळे लागतात. फळे मध्यम आकाराची लंबवर्तुळाकार, गोल असतात, फळावरील साल सोनेरी पिवळ्या रंगाची असते. गर नारिंगी रंगाचा गोड असतो. या जातीमध्ये नर आणि मादी फुलांची झाडे वेगवेगळी असतात.

५) को २- तामिळनाडू कृषी विद्यापीठाने १९७३ मध्ये स्थानिक जातीमधून निवड पद्धतीने निवडलेली ही जात आहे. झाडाचे खोड जाड असून उंची मध्यम असते. फळे मोठी, लांबोळी व साल पिवळसर हिरवी असते. गर नारिंगी, मध्यम व रसदार असतो. या जातीची फळे खाण्यासाठी आणि पेपेन काढण्यासाठी उत्तम असतात. एका फळापासून ४ ते ६ ग्रॅम पेपेन मिळते. एकरी १०० ते १२० किलो पेपेन मिळते.

६) को ३- को ३ ही जात तामिळनाडू कृषी विद्यापीठाने को -२ आणि सनराईज सोलो या दोन जातींच्या संकरापासून तयार केली. या जातीची फळे मध्यम आकाराची गोड व टिकाऊ असतात.

पपईचे झाड जोमाने वाढणारे आहे. पानाचा देठ सर्वसाधारण दीड फुटाचा, आखूड असतो. झाडाला खोडापासून ४ फुटावरून फळे लागतात. लागवडीपासून ९ ते ९।। महिन्यात फळे काढणीस येतात. को -२ आणि सनराईज सोलो या दोन्ही जातीपेक्षा फळांची प्रत उत्कृष्ट असते. गर लाल रंगाचा असून गरामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. या जातीमध्ये एकाच झाडावर द्विलींगी व मादी फुले असल्याने बागेमध्ये परागीकरणासाठी वेगळी नर झाडे राखाण्याची गरज नसते. दोन वर्षामध्ये एका झाडापासून १०० ते १२० फळे मिळतात.

७) को ४- को ४ ही जात को -१ आणि वॉशिंग्टन या जातींच्या संकरापासून तयार केली आहे. या जातीची झाडे ८ फुटापासून १२ फुटापर्यंत वाढतात. पानांचा देठ लांब ३ ते ३।। फुट जांभळ्या रंगाचा असतो. झाडाचे खोड बुंध्याकडे तपकिरी व शेंड्याकडे जांभळ्या छटेचे असते. नर आणि मादी फुलांची झाडे वेगवेगळी असतात. जमिनीपासून अडीच फूट उंचीवरून फळे लागतात. ४।। ते ५ महिन्यात फुले लागून ९ ते १० महिन्यात फळे काढणीस सुरुवात होते. फळातील गर पिवळ्या रंगाचा, जांभळी छटा असलेला जाड असतो. एका झाडापासून दोन वर्षामध्ये ८० ते १०० फळे मिळतात.

८) को ६ - कोईमतूरच्या तामिळनाडू कृषी विद्यापीठाने बिहारमधील पुसा मॅजेस्ट्री या जातीमधून शुद्ध ओळ पद्धतीने विकसीत केली असून या जातीच्या फळांचा उपयोग पेपेन व खाण्यासाठी होतो. झाडे ठेंगणी असून फुले लवकर येत असल्याने को -२ पेक्षा १ महिना लवकर फळे येतात. को -२ फळांपेक्षा या जातीच्या फळांपासून ४ ते ५ ग्रॅम पेपेन अधिक मिळते. लागवडीपासूनच्या २ वर्षात एका झाडापासून ८० ते ९० फळे मिळतात. एकरी २०० ते २१० टन उत्पादन मिळून ३२० ते ३६० किलो पेपेन मिळते.

९) पुसा देलिशियस (पुसा १ -१५) - या जातीच्या एकाच झाडावर दोन्ही (नर आणि मादी) प्रकारची फुले असतात. झाडे जास्तीत जास्त ७ ते ७.५ फुट उंचीची असून लागवडीपासून ८ महिन्यात फळे लागतात. जमिनीपासून अडीच ते पावणेतीन फुटावरून फळे लागतात. फळांची प्रत उत्कृष्ट असल्याने बाजारभाव चांगले मिळतात. फळाचा गर नारिंगी असून चव व स्वाद उत्तम आहे. फळे मध्यम ते मोठ्या आकाराची, गोलाकार लांबोळी असतात. फळे १ ते २ किलो वजनाची असून गर ४ सेमी जाडीचा असतो.

१० ) पुसा मॅजेस्टी (पुसा २२ -३) - या जातीमध्ये नर आणि मादी होन्ही फुले एकाच झाडावर असतात. झाडांची उंची ६ ते ६.५ फुट असून रोपे लावल्यापासून ५ महिन्यात जमिनीपासून दीड फुटावरून फळधारणेस सुरवात होते.फळे मध्यम, गोलाकार, गर घट्ट पिवळसर, ३.५ सेमी जाडीचा असून फळे १ किलोपासून २ ।। किलोपर्यंत असतात. टिकाऊपणा अधिक असल्याने साठवणुकीत फळे खराब होण्याचे प्रमाण फार कमी असते.

११) पुसा जायंट (पुसा १ -४५ व्ही) - या जातीमध्ये नर व मादी फुलांची झाडे वेगवेगळी असतात. झाडे ७ ते ७.५ फुट उंच असतात. रोपांची लागवड केल्यापासून ८.५ महिन्यानंतर जमिनीपासून ३ फुटावरून फळे लागतात. खोड मजबूत असते. वारा व वादळ झाडे सहन करू शकतात. फळे आकर्षक, मोठी सव्वा ते ३ किलो वजनाची असतात. या फळांचा उपयोग भाजी व फॅनिंगसाठी केला जातो. फळाचा गर नारिंगी रंगाचा ५ सेमी जाडीचा असतो.

१२) पुसा ड्वार्फ (पुसा १ -४५ डी) - या जातीची झाडे ६ ते ६.५ फुट उंच (ठेंगणी) असून नर व मादी फुलांची झाडे वेगवेगळी असतात. आठ महिन्यानंतर झाडावर जमिनीपासून दीड फुटावरून फळे लागतात. फळे मध्यम, लंबवर्तुळाकर असतात. फळातील गर लाल, नारिंगी रंगाचा ३.५ सेमी जाडीचा असतो. फळे ५०० ग्रॅम ते १ किलो वजनाची असतात.

वरील चारही पुसा जाती भारतीय कृषी अनुसंधान संस्थेच्या पुसा (बिहार) येथील प्रादेशिक संशोधन केंदामध्ये तयार केलेल्या आहेत.

पपईच्या परदेशी जाती -

पेराडेनिया - फळे लहान ते मध्यम आकाराची लांबोळी, पिवळसर हिरव्या सालीची असतात. गर नारिंगी रंगाचा मऊ, घट्ट, रसदार असतो. फळाचा टिकाऊपणा चांगला आहे. पेपेनसाठी ही जात चांगली आहे.

फिलीपिन्स - फळ मध्यम, लंबवर्तुळाकर असून साल हिरव्या रंगाची असते. फळाच्या शेंड्यावर खाचा असून फळातील गर नारिंगी रंगाच, मऊ असतो. पेपेनसाठी ही जात चांगली आहे.

उगवण - संकरीत जातीच्या पपईची उगवण मुळातच कमी आहे. कारण संकरीत बी काढताना पक्क्या बियाबरोबर कच्च्या बिया ह्या काही प्रमाणात मिक्स होतात आणि त्यामुळे उगवण २० ते ३० % च होते. दुसरी बाब म्हणजे रोपासाठी बी पिशवीत टाकताना खोल जर गेले तर उगवण कमी होते. काही शेतकर्‍यांना अनुभव असे आले की, पाण्याचा निचरा होण्यासाठी जे छिद्र पाडले जाते ते वर राहून बी त्याखाली खोल लावल्याने दिलेले पाणी छीद्रावाटे जाते आणि बी खाली कोरडे राहते. त्याला बुरशी लागते किंवा मर होते. त्यामुळे उगवण कमी होते.

रोपे तयार करणे - एकरी २ ते ३ पाकिटे (१० ग्रॅमची ) बी पुरेसे होते. बियांपासून रोपे तयार होण्यासाठी दीड ते दोन महिने लागतात. जर्मिनेटर २५ ते ३० मिली अर्धा लिटर कोमट पाण्यात घेऊन त्यात पपई बियाची ४ -५ पाकिटे रात्रभर भिजत ठेवून सकाळी सावलीमध्ये सुकवून ४ x ६ इंचाच्या पिशवीला दोन्ही बाजूला ४ -४ होल पडून पिशवीत तांबट, पोयटायुक्त मातीमध्ये कल्पतरू सेंद्रिय खत १ चमचा मिसळून पिशवी पाणी बसण्यासाठी वरून १ इंच रिकामी ठेवून भरून घ्यावी आणि बी साधारण वरून १ सेमी खोल लावावे व नंतर झारीने पाणी द्यावे. अशा पद्धतीने ८ ते १२ दिवसांनी बियांची ८०% उगवण सहज होते.

रोपांवर फवारणी -

१) बी उगवून आल्यावर आठवड्याने रोप ३ -४ पानावर असताना (रोपांची मर होऊ नये म्हणून) - जर्मिनेटर ३० मिली + थ्राईवर २५ मिली + क्रॉंपशाईनर २५ मिली + प्रिझम २५ मिली + न्युट्राटोन २० मिली १० लिटर पाण्यातून झारीने किंवा पंपाचे नोझल काढून आळवणी (Drenching) करावे.

2) नंतर १५ ते २० दिवसांनी (रोपे २ ते ३ इंच उंचीची असताना) रोपांचा पिवळटपणा जाऊन, रोपे हिरवीगार होऊन वाढ होण्यासाठी - जर्मिनेटर २५ मिली + थ्राईवर ३० मिली + क्रॉंपशाईनर ३० मिली +प्रोटेक्टंट २० ग्रॅम + प्रिझम २५ मिली + न्युट्राटोन २५ मिली + १० लि. पाण्यातून फवारणी करणे.

लागवडी अंतर - साधारणत: ६ x ६ फुट अंतरावर पपईची लागवड करावी. जमिनीचा मगदूर भारी असल्यास अंतर थोडे वाढवावे. लागवड दांड काढून त्यावर किंवा ४५ x ४५ x ४५ सेंमी आकाराचे खड्डे घेऊन त्यामध्ये शेणखत १० ते १५ किलो, कल्पतरू सेंद्रिय खत १०० -१५० तसेच प्रोटेक्टंट २० ते २५ ग्रॅम मिसळून खड्डे भरावेत व त्यामध्ये रोपांची लागण शक्यतो दुपारचे ऊन कमी झाल्यावर करावी म्हणजे रात्रीचा गारवा रोपांना मिळून रोपे एरवी जी उन्हाने कोमेजतात ती कोमजत नाहीत. त्यामुळे मारीचे प्रमाणही कमी होते.

पाणी - पपई पिकास पाणी देणे गरजेचे आहे. पाणी बांगडी पद्धतीने द्यावे. उन्हाळ्यामध्ये ५ ते ६ दिवसांचे अंतराने शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे. खोडाशी पाण्याचा संपर्क न येण्याची काळजी घ्यावी. कारण ह्यामुळे खोड कुजण्याचा संभव असतो.

खते - शक्यतो सेंद्रिय खतांचा वापर करावा. सेंद्रिय खतांचा वापर केल्यामुळे पपई दर्जाची. मधुर स्वादाची तयार होते. त्यासाठी खड्डा भरतेवेळी कल्पतरू सेंद्रिय खत २५० ग्रॅम द्यावे. नंतर लागवड झाल्यावर २ महिन्यांनी बुंध्याभोवती प्रत्येक झाडास १०० ग्रॅम, नंतर ५ महिन्यांची झाडे असताना २५० ग्रॅम आणि फळे पोसण्यासाठी ७ महिन्याची झाडे असताना ५०० ग्रॅम कल्पतरू खताचा डोस मातीमध्ये गाडून द्यावा. आवश्यकतेनुसार रासायनिक खते मिश्रखताच्या स्वरूपात द्यावीत. खत देताना झाडाच्या मुळ्या तुटणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

साधारण लागवडीनंतर चार ते पाच महिन्यांनी फुल येण्यास सुरुवात होते. निरोगी झाडाची, जोमदार वाढ होऊन फुलकळी भरपूर प्रमाणात लागण्यासाठी तसेच पपई पोसण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे खालील प्रमाणे फवारावीत.

फवारणी :

१) रोपांची लागवड केल्यानंतर १५ ते २१ दिवसांनी -(मर होऊ नये तसेच वाढीसाठी) -

जर्मिनेटर २५० मिली + थ्राईवर २५० मिली + क्रॉंपशाईनर २५० मिली + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली + न्युट्राटोन १०० मिली + हार्मोनी १५० मिली + १०० लिटर पाणी.

२) लागवडीनंतर २ महिन्यांनी - (झाडांच्या जोमदार वाढीसाठी) -

थ्राईवर ५०० मिली + क्रॉंपशाईनर ५०० मिली + राईपनर १०० ते १५० मिली + प्रोटेक्टंट ३०० ते ४०० ग्रॅम + प्रिझम ३५० ते ४०० मिली + न्युट्राटोन २५० मिली + १५० लिटर पाणी.

३) लागवडीनंतर ३ महिन्यांनी - (झाडांच्या जोमदार वाढीसाठी)-

थ्राईवर ७५० मिली + क्रॉंपशाईनर ७५० मिली + राईपनर २५० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली + न्युट्राटोन ५०० मिली + हार्मोनी २५० मिली + २०० लिटर पाणी.

४) पीक ४-५ महिन्याचे झाल्यावर (फुले भरपूर लागून ती गळू नयेत तसेच बाग निरोगी राहण्यासाठी) -

थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ५०० मिली + प्रोटेक्टंट १ किलो + प्रिझम ५०० मिली + न्युट्राटोन ५०० मिली + हार्मोनी ३०० मिली + २०० लिटर पाणी.

५) पीक ६ -७ महिन्याचे झाल्यावर (फळे पोसण्यासाठी) -

थ्राईवर १।। लि. + क्रॉंपशाईनर १।। लि. + राईपनर १ लि. + न्युट्राटोन १।। लि. + हार्मोनी ४०० मिली + २५० लि.पाणी.

तोडे चालू झाल्यानंतर दर १५ - २० दिवसांनी वरील फवारणी क्र. ५ चे प्रमाणे नियमित फवारणी घ्यावी.

पांढर्‍या मुलीचा जारवा वाढून सतत कार्यक्षम राहण्यासाठी - जर्मिनेटर एकरी १ लि. लागवडीनंतर दर १ ते १।। महिन्यांनी ड्रीप अथवा पाण्यावटे द्यावे. अधिक माहितीसाठी आमच्या कृषी विज्ञान केंद्रावरील तज्ञांशी संपर्क साधून सल्यानुसार वापर करावा.

काढणी - पपईचे पहिले पीक काढणीसाठी तयार होण्यास १० ते १२ महीन्यांचा कालावधी लागतो डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने ८।। ते ९ महिन्यातही पपई काढणीस येते. फळाची पुर्ण वाढ झाल्यानंतर फळावरील पाकळ्यांवर पिवळा डोळा पडतो. डोळा पडल्यानंतर ८ ते १० दिवसात पपई पिकते. डोळा पडण्याचे प्रमाण उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात जाणवते. उन्हाळ्यात डोळा हा केशरी रंगाचा, उठावदार दिसतो .( संदर्भासाठी कव्हरवर फोटो दिला आहे) हिवाळ्यात मात्र डोळा कमी पमाणात दिसतो. शिवाय डोळा पिवळसर, फिक्कट काही भागामध्ये या डोळा पडण्याच्या क्रियेला कवडी पडणे देखील म्हणतात.

दूरच्या मार्केटमध्ये पपई पाठवायची असल्यास अशी डोळा पडलेली फळे काढावीत. उंच झाडावरील पपईसाठी शिडीचा वापर करावा. वरून काढलेली फळे जमिनीवर पडू देऊ नयेत. कारण फळांना मार लागून फळे खराब होतात. तसेच माती लागल्याने फळाची प्रत खालावते. त्यासाठी झाडाखाली दोन माणसांना गोणपाट दोन्ही बाजूस धरून त्यावर अलगत फळे झेलावीत. अशी फळे कागदामध्ये गुंडाळून २० फळांचा नाम एका पोत्यात भरून मार्केटला पाठविला जातो. ज्या बाजारपेठेत पपईला अधिक भाव आहेत तेथे ८ ते १० -१२ रू. किलोपर्यंत किंवा १० ते १२ रू. प्रति नग असा भाव मिळतो. पपईस रमजानच्या महिन्यात भाव चांगले असतात. त्यामुळे शेतकरी चालू रमजानच्या महिन्यात पपई मार्केटला आणतात आणि त्यांना बाजारभाव सापडतो.

उत्पादन - एका झाडापासून जातीनुसार सरासरी ६० ते २०० पर्यंत फळे मिळतात. संकरीत पपईचे वजन १।। ते २ किलोपर्यंत तर देशी पपईचे वजन ३ ते ४ किलोपर्यंत मिळते.