दालचिनीची लागवड

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


भारतात दालचिनी फार पुर्वीपासून लोकांना माहित आहे. ती मूळची श्रीलंका व मलबार येथील असल्याचे मानतात. चिनी दालचिनी Cinnamomum Cassia ह्या झाडाच्या खोडाच्या सालीपासून तयार केलेली असते. भारतीय व्यापारी दालचिनी, वर उल्लेखिलेल्या झाडांची आंतरसाल असते, दाल म्हणजे साल. त्यावरून दालचिनी शबद रूढ झाला.

दालचिनीचे झाड झुडुपाप्रमाणे सदाहरित असते. या झाडाची नैसर्गिक उंची सुमारे १० ते १५ मीटर असते. परंतु लागवडीच्या झाडांची नियमितपणे दालचिनीसाठी तोडणी होत असल्याने झाडे इतकी उंच वाढत नाहीत. खोडाची साला सौम्य आम्ल स्वादाची असते. साल काढल्यानंतर तिचा सुवास वाढतो. कॅसिया झाडापेक्षा दालचिनीच्या खोडाची साल पातळ असते. पाने लहान असतात आणि सुवास कमी असतो.

कोकणातील फळबागातून मधून मधून दालचिनीची झाडे दिसतात. या झाडाच्या सराव पंचांगाला दालचिनी चा वास येतो. खोडावरील फांद्या जवळजवळ असतात. साल पिंगट व जाड असते. आंतरसाल लाल रंगाची असते. पाने समोरासमोर,जाड, ताठर, टोकदार वरून तकतकीत व खालून खरखरीत असतात. फुले झुबकेबाज, लहान, लोंबकळती असतात. एका दांड्यावर तीन फुलांचा गुच्छ असतो. कलिकेवर लव असते. फळे बोरासारखी लहान, काळी करडी व तेलकट असतात. हिरव्या पानापासून १% तेल मिळते. तेलाचा रंग सोनेरी पिवळा असतो. पानातील तेलात व लवंग तेलात युजेनालचे प्रमाण सारखे असते. दातदुखीवर हे तेल वापरतात. हे तेल पाण्यात टाकून गुळण्या केल्याने हिरड्या मजबूत होतात. सांधेदुखीवर व डोकेदुखीवर हे तेल चोळतात.

दालचिनीच्या लागवडीबाबत 'मसाल्याकरिता राष्ट्रीय संशोधन केंद्रा' ने केलेल्या शिफारशी खाली दिला आहेत.

हवामान व जमीन : दालचिनीचे झाड काटक असते. हवामान व जमिनीच्या विविध परिस्थितीत ते वाढते. पश्चिम समुद्र किनारपट्टीच या प्रदेशात ही झाडे जाभ्या खडकाच्या जमिनीत व वाळूच्या पट्ट्यात हलक्या जमिनीत वाढतात. या जमिनीत पिकांची अन्नद्रव्ये कमी असतात. समुद्रसपाटीपासून सुमारे १००० मीटर उंचीपर्यंत ही झाडे वाढतात. दालचिनीचे कोरडवाहू पीक घेतल्याने वार्षिक पाऊसमान २०० ते २५० सें.मी. योग्य ठरले आहे.

चिनी दालचिनीचे झाड सदाहरित असून ती झाडे दक्षिण व्हिएतनाम व पुर्व हिमालयात आढळतात. ही झाडे मोठी असतात. त्यांच्या खोडाची साल जाड असते, पाने मोठी असतात आणि फुले लहान असतात.

अभिवृद्धी : दालचिनीची लागवड बियांपासून करतात. फळांची काढणी केल्यानंतर त्या फळातील बी तिसऱ्या दिवशी जमिनीत पेरले असता ९० % बी उगवते. पेरणीस दोन आठवडे उशीर झाल्यास ५० % बी उगवते. बी ४० दिवस साठवून ठेवल्यानंतर उगवत नाही. झाडावरून काढलेल्या फळातील बी एका आठवड्यात जमिनीत पेरले असतात २० ते २५ दिवसात उगवते. त्यानंतर पेरले असता उगवण्यास ३० ते ४२ दिवस लागतात.

या करिता योग्य वेळेत जर्मिनेटरची बीजप्रक्रिया करून पेरणी करावी. म्हणजे अधिक उगवण होईल.

नर्सरी : पश्चिम समुद्रकिनारा पट्टीच्या प्रदेशात दालचीनीच्या झाडांना जानेवारी महिन्यात मोहोर येतो आणि फळे जून ते ऑगस्ट महिन्यात पिकून तयार होतात. पूर्ण पिकलेली फळे झाडावरून गोळा करतात. अगर झाडाखाली गळून पडलेली पिकलेली फळे गोळा करतात. या फळातील बी वेगळे काढतात. बी पाण्याने धुवून त्यावरच गर काढून टाकतात आणि लागवडीचे बी नर्सरीत पेरतात. एक तर बी गादीवाफ्यात पेरतात किंवा वाळू, कुजलेले शेणखत व माती यांचे २:१:१ प्रमाणातील मिश्रण भरलेल्या पॉलिथिनच्या पिशव्यात पेरतात. बी उगवण्यास १२ ते २० दिवसांनी सुरुवात होते. याकरिता जर्मिनेटर ३० मिली. + १ किलो बी १ लि. पाणी याप्रमाणात बीजप्रक्रिया केली असता उगवण कमी दिवसात ९० ते १०० % होते. वाफ्यातील किंवा पिशव्यातील मातीमध्ये पुरेसा ओलावा राहण्यासाठी नियमितपणे झारीने पाणी द्यावे. ही रोपे सहा महिन्यांची होईपर्यंत त्यांच्यावर मंडपाची सावली ठेवावी.

लागवड : बागेत दालचिनीची लागवड करण्यासाठी ३ x ३ मी. अंतरावर ५० सें.मी. x ५० सें.मी. x ५० सें.मी. आकाराचे खड्डे तयार करावेत. रोप लावणीपुर्वी हे खड्डे पृष्ठभागाची माती व कंपोस्ट खत यांच्या मिश्रणाने भरावेत. रोपांची बागेत लावणी जून - जुलै महिन्यात करावी. म्हणजे पावसाचा लाभ मिळतो. रोप लावणीसाठी १० ते १२ महिने वयाची रोपे योग्य असतात. एका खड्ड्यात २ - ३ रोपे लावावीत. कधी कधी खड्ड्यामध्ये प्रत्यक्ष हाताने दालचिनीचे बी पेरतात. झाडांना सुरुवातीच्या वाढीच्या काळात अंशत: सावलीची गरज असते. त्यामुळे त्यांची वाढ जोमाने होते आणि ती निरोगी राहतात.

खते : पहिल्या वर्षी रोपांना प्रत्येकी २० ग्रॅम नत्र, १८ ग्रॅम स्फुरद व २५ ग्रॅम पालाश ही खते देण्याची शिफारस आहे. खतांची मात्र दरवर्षी वाढवावी.१० वर्षांच्या झाडाला आणि नंतर दरवर्षी २०० ग्रॅम नत्र, १८० ग्रॅम स्फुरद व २०० ग्रॅम पालाश खते द्यावीत. यासाठी कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर केल्याने अधिक फायदा होतो. म्हणून पहिले दोन वर्षांपर्यंत २५० - २५० ग्रॅम मे- जून आणि सप्टेंबर - ऑक्टोबर महिन्यात द्यावे. त्यानंतर दरवर्षी ५०० ग्रॅम ते १ किलो कल्पतरू खत प्रत्येक झाडास द्यावे.

निगा : पानांचे तेल काढल्यानंतर जो चोथा शिल्लक राहतो. त्याचा उपयोग जमिनीवर आच्छादन पसरण्याकरिता करावा. वर्षातून दोन वेळा जून - जुलै व ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात निंदणीची पाळी द्यावी. ऑगस्ट - सप्टेंबर महिन्यात एकदा झाडाखालील जमीन खोदून मोकळी करावी. पक्षी फळे खातात.

पीक संरक्षण :

१) गुलाबी रोग : बुरशीमुळे हा रोग होतो. दालचिनीच्या झाडावर पावसळ्यात हा रोग आढळतो. झाडाच्या खोडावर फिकट गुलाबी पांढरा थर आढळतो. झाडाच्या खोडावर फिकट गुलाबी पांढरा थर आढळतो. त्यामुळे फांदी मरते.

उपाय : या रोगाचे सहज नियंत्रण एक टक्का बोर्डो मिश्रण झाडावर फवारल्याने होते.

२) रोप करणे : नर्सरीतील रोपाच्या खोडावर फिकट तपकिरी रंगाचे चट्टे दिसतात. त्यामुळे बहुधा रोप मरते. बुरशीमुळे हा रोग होतो.

३) पानावरील ठिपके : बुरशीमुळे काही झाडांच्या पानावर गडद तपकिरी रंगाचे ठिपके आढळतात. हे ठिपके ठिसूळ व आत दबलेले असतात. दुसऱ्या बुरशीमुळेही पानावर डाग आढळतात.

४) दालचिनी फुलपाखरू : दालचिनीच्या झाडावर अनेक प्रकरच्या किडी आढळतात, त्यापैकी फुलपाखरू महत्त्वाची कीड आहे. ह्या किडीची अळी अधाशीपणाने दालचिनीच्या झाडांची पाने खाते आणि झाड पर्णहीन करून टाकते.

उपाय : ०.०५% क्विनॉलफॉसची झाडावर फवारणी करावी.

५) पाने पोखरणारी अळी : अधीकधी नर्सरीतील रोपांची कोवळी पाने ही कीड पोखरते.

उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी नर्सरीतील रोपावर ०.०५ % मोनोक्रोटोफॉसची फवारणी करावी. इतर पाने खाणाऱ्या अळ्या व भुंगेरे यांचे नियंत्रण झाडावर ०.०५% क्विनॉलफॉसची फवारणी केल्याने होते.

काढणी व प्रक्रिया : नैसर्गिकपणे दालचीनीच्या झाडाची उंची सुमारे १० ते १५ मीटर वाढते, परंतु बागेतील झाडांची छाटणी नियमितपणे केल्याने एवढी उंची वाढत नाही. झाडे दोन वर्षांची झाली कि त्यांची छाटणी जमिनीपासून १२ सें. मी. उंचीवर जून - जुलै महिन्यात करतात. जमिनीतील राहिलेल्या खुंटावर मातीची भर घालतात. त्यामुळे खुंटाच्या बाजूचे धुमारे वाढतात. मुख्य खोडापासून वाढलेल्या धुमाऱ्यांची नंतरच्या हंगामात छाटणी करतात. त्यामुळे झाडाला २ मी. उंचीच्या झुडुपाचा आकार येतो. चार वर्षाच्या काळात दालचिनी काढण्यासाठी अनेक फांद्या मिळतात. धुमाऱ्यांच्या फांद्यांच्या वाढीनुसार चौथ्या किंवा पाचव्या वर्षापासून नियमितपणे फांद्या मिळतात.

केरळमध्ये फांद्यांची छाटणी सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात करतात. समान्यपणे फांद्यांची छाटणी एक वर्षाआड करतात. बोटाइतक्या जाडीच्या व साल तपकिरी रंग असलेल्या फांद्या साल सोलण्यासाठी योग्य असतात. याची चाचणी घ्यावी. धारदार चाकूने फांदीवरील साल फांद्याची छाटणी करण्यास सुरुवात करावी. फांद्या जमिनीजवळ कापाव्या. त्या दोन वर्षे वयाच्या, शक्यतो सरळ वाढलेल्या एक ते सव्वा मीटर लांबीच्या व १.२५ सें.मी. जाडीच्या असाव्यात. अशा फांद्यांवरील पाने काढून टाकावीत, शेंडे कापून टाकावेत आणि त्याचे गठ्ठे बांधावेत.

फांद्यावरील साल काढणे कौशल्याचे काम असते. अनुभवाने ते साध्य होते. त्यासाठी विशिष्ट बनविलेला चाकू वापरतात. फांदीवरील खडबडीत बाह्य साल प्रथम काढून टाकतात. त्यानंतर फांदीच्या खरवडलेल्या भागावर पितळेच्या गर्जाने घासतात. पॉलीश करतात. म्हणजे आंतरसाल सहज सुटी होते. त्यानंतर फांदीवर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत उभा लांब छेद मारतात. फांदीचे लाकूड व साल यामधून चाकू फिरवून लागलीच फांदीवरील साल काढतात. सकाळी बागेतून गोळा करून आणलेल्या फांद्यांची साल त्याच दिवशी काढतात. साल गोल करून ती रात्रभर छपरात ठेवतात. एक दिवस साल सावलीत वाळवितात आणि त्यानंतर चार दिवस उन्हात वाळवितात. साल वाळत असताना आकसते. ही गोलाकार साल कापून तुकडे करतात. मोठ्या गोलाच्या तुकड्यात लहान गोलाचे तुकडे बसवितात.

प्रतवारी : दालचिनीची प्रतवारी करतात. या दालचिनीला 'क्विल' (Quill) म्हणतात. '०००००' ही उत्तम प्रतीची आणि '०' ही जाडीभरडी दालचिनी मानतात. दालचिनी तयार करताना लहान तुकडे करतात. त्यांना 'क्विलिंग्ज ' म्हणतात. खूप पातळ आंतरसालीला वाळल्यानंतर 'फिदरिंग्ज' म्हणतात. जाड्याभरड्या फांद्यांची साला सोलून न काढता खरवडून काढतात तिला 'स्क्रेप्ट चीप्स' म्हणतात. बाह्य साल वेगळी न काढता संपूर्ण साल काढतात. तिला 'अनस्क्रेप्ड चिप्स' म्हणतात. निरनिराळ्या प्रतीच्या दालचिनी भुकटी तयार करतात तिला 'सिन्नामॉन पावडर' म्हणतात.

दालचिनीचे तेल : दालचिनीच्या झाडाची वाळलेली पाने व खोडाची साल यांचेपासून ऊर्ध्वपातन पद्धतीचे तेल काढतात. एक हेक्टर लागवडीच्या झाडाच्या सालीपासून चार किलोग्रॅम तेल मिळते. या तेलाचा व्यापारी उपयोग साबण, टूथपेस्ट, केसतेल, सौंदर्यप्रसाधने व स्वस्त अत्तरासाठी करतात. मधाला स्वाद येण्यासाठीही उपयोग करतात.