आंबा काढणी आणि हाताळणी

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर



आंबा फळाची काढणी आणि हाताळणी फार महत्त्वाची आहे. या प्रक्रियेत काही चुका झाल्या तर त्याचा दुष्परिणाम फळांवर होतो. सर्व प्रकारच्या मेहनतीवर पाणी फिरून पश्चातापाची वेळ येते. ही वेळ आपल्यावर येऊ नये, याची काळजी आंबा उत्पादकांनी घेतली पाहिजे. त्यासाठीचे तंत्रज्ञाना आत्मसात करून घेतले पाहिजे.

फळांची काढणी शक्यतो हातांनी करावी. ते शक्य नसेल तर कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेला झेला वापरावा. काढणीनंतर फळांची हाताळणी करताना आदळआपट होणार नाही, याची काळजी घ्यावी. फळे पिकविण्यासाठी वाळलेले गवत, भाताचे तुस, किंवा वृत्तपत्राची रद्दी याची अढी घालावी. अशा अढीत फळे लवकर पिकतात. अढीत घालण्यापूर्वी फळे ५०० पीपीएम इथ्रेलच्या द्रावणात बुडवून घेतल्यास पिकल्यानंतर फळांना एकसारखा रंग येतो व ती चांगली आणि एकसारखी पिकतात. या फळांना स्थानिक बाजारपेठेत खूप चांगला भाव मिळतो. फळे निर्यात करायची असल्यास विशेष वेगळी काळजी घ्यावी लागते. निर्यातीसाठी आंबा झाडावरून काढून पॅकिंग हाऊसला पाठविताना वाहतूक काळजीपूर्वक करावी. यासाठी काही मार्गदर्शन तत्त्वे आहेत…

* निर्यातीसाठी पूर्ण वाढ झालेली, ठरलेल्या आकाराचीच फळे काढावीत. अशा फळांचा देठ खाली जाऊन फळांचे खांदे वर आलेले असावेत. फळाची चोच बोथट झालेली असावी. फळे योग्य पोसलेले व त्यास भरीव आकार आलेला असावा. फळे साध्या पाण्यात टाकली असता बुडावीत. बुडाली नाही तर त्यांचा थोदाफारच भाग वर असावा.

* देठ खाली गेला नसेल, खांदे वर आले नसतील, चोच बोथट झाली नसेल आणि फळ पाण्यात तरंगत असतील तर अशी फळे काढणीस अपरिपक्व समजावीत. त्याची काढणी करू नये. अपरिपक्व फळे काढल्यास नंतर ती चांगली पिकत नाहीत.

* फळे काढताना त्यांचा रंग थोडा बदलतो. हे पक्वतेचे लक्षण असू शकते. पण कधी झाडाच्या आतील बाजूस असतील तर पक्वतेनंतरही त्यांच्या रंगात फरक पडत नाही. तेव्हा फळाच्या रंगातील हा फरक लक्षात घेऊन अनुभवी व्यक्तींकडून त्याची पाहणी करून घ्यावी.

* फळातील एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण (टीएसएस) पाहूनसुद्धा फळांची पक्वता ठरवता येते. फळे समुद्रमार्गे परदेशी पाठवायची असतील तर काढणी करताना टीएसएस ७ - ८ टक्के हवा. हवाईमार्ग फळे लवकर जातात. यासाठी टीएसएस ९ - १३ टक्के हवा. या पद्धतीपेक्षा वरील पद्धती सोप्या व साध्या आहेत. त्यामुळे पक्वता तपासतानाच त्यावर अधिक भर द्यावा.

* फळाच्या गराचा कठीणपणा फ्रूट प्रेशर टेस्टरने मोजूनही फळाची पक्वता ठरवता येते. हे प्रेशर २२ - २६ पाऊंड प्रति चौरस इंच आले असता फळ पक्व असल्याचे समजावे.

* झाडावर शाक लागली किंवा पाड लागला म्हणजे त्या झाडावरील सर्वच फळे काढणीस योग्य आहेत, असे समजू नये. त्या झाडावरील फळे पक्व व अपरिपक्वही असू शकतात.

* फळाची निवड : फळे झाडावरून काढताना निश्चित केलेल्या आकाराची की ज्यांचे वजन किमान २५० ग्रॅम आणि अधिकाधिक ३०० ग्रॅमच्या दरम्यान पक्ष्यांनी टोचा मारलेली नसावीत. ती रोग विरहीत किडीचा प्रादुर्भाव नसलेली असावीत. करपा रोगाचे डाग आणि फळमाशीचे डाग फळांवर असल्यास लगेच ओळखू येतात.

काढणी :

फळांची काढणी सकाळी ६ ते ९ किंवा संध्याकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत करावी. यावेळी वातावरण थंड असते आणि हे वातावरण पुढील शीतसाखळीस पूरक ठरते. फळे काढणीसाठी स्टीलची कात्री वापरावी. लोखंडी कात्री किंवा चाकू कटाक्षाने टाळावा. या कामासाठी लहान सिकेटर वापरणेही सोईचे ठरते. फळे हातानेच काढावीत व खुडी आणि झेल्याचा वापर टाळावा. काढणीची अवजारे वेळीच पाण्याने झेल्याचा वापर टाळावा. काढणीच अवजारे वेळीच पाण्याने धुवावीत किंवा कापडाने पुसून घ्यावीत. फळे काढताना ४ ते ६ सें.मी. देठ ठेवून काढावी. साधारणपणे बोटभर लांबीचा देठ फळासोबत असावा. देठ कापताना फळ डाव्या हातास धरून उजव्या हाताने कापावे. महत्त्वाचे म्हणजे कापताना देठास थोडाही झटका बसणार नाही, याची काळजी घ्यावी, नाही तर देठाजवळच्या भागातून बाहेर पडणाऱ्या पिकाचा फळांवर डाग पडू शकतो. फळे काढणाऱ्या व्यक्तीची स्वच्छताही यात खूप महत्त्वाची असते. यात सर्वांची आपले हात वेळोवेळी साबणाने, क्लोरिनयुक्त पाण्याने किंवा पोटॅशियम परमँगनेटच्या पाण्याने धुऊन घ्यावेत. तसेच मजुराच्या डोक्याला रुमाल बांधलेला असावा. फळे काढल्यानंतर एक एक फळ अगदी अलगदपणे प्लॅस्टिकच्या क्रेटसमध्ये ठेवावेत. अगदी थोड्या अंतरावरूनसुद्धा फळ आदळता कामा नये. प्लॅस्टिकच्या क्रेटसमध्ये ओला कपडा निर्जंतूक करून दोन थरांत अंथरून ठेवावा. क्रेटसच्या कडेला कपड्याच्या कडा थोड्या वर आलेल्या असाव्यात. त्यामुळे फळाला खाली तसेच चोहोबाजूने गाडी तयार होईल. हे कापड निर्जेतुकीकरण करण्यासाठी १० मिनिटे उकळत्या पाण्यात ठेवावे.

फळे क्रेटसमध्ये अलगद आणि एकाच थरात देठ वरच्या बाजूने राहील अशा तऱ्हेने ठेवावीत. एका फळाचा देठ दुसऱ्या फळाला टेकता कामा नये. तेच देठालाही इजा होता कामा नये आणि फळांची वाहतूक करताना देठ तुटता कामा नये. तसेच क्रेटसमध्ये फळे ठेवल्यानंतर दोन फळे एकमे कांना घासणार नाहीत. यासाठी दोन फळांमध्ये कागद ठेवावा. क्रेटस पसरट व एका आकाराची असावीत. ती वेळीवेळी धुण्याचा सोडा किंवा क्लोरिनयुक्त असावीत. ती वेळोवेळी धुण्याचा सोडा किंवा क्लोरिनयुक्त पाण्याने धुऊन कोरडी ठेवावीत.

महत्त्वाचे म्हणजे काढणीनंतर फळांना अजिबात ऊन लागू देऊ नये. क्रेटस काढणीनंतर सावलीत ठेवावीत आणि वाहतूक करण्याच्या वाहनापर्यंत कापडाने झाकून आणावीत.

काढणी केलेल्या ठिकाणापासून पॅक हाऊसपर्यंत वाहतूक रेफर व्हॅनद्वारे करावी. वाहन वेळेवर उपलब्ध असावे. चाकाल चांगला असावा व वाहतूक चांगल्या रस्त्याने करावी. वाहनात निर्यातक्षम मालाशिवाय दुसरा माल भरू नये. पॅक हाऊसला माल उतरवताना क्रेटसना झटके न बसता अलगद उतरवून घ्यावेत. ही प्रक्रिया सावलीतच करावी.

समुद्रमार्ग निर्यातीसाठी :

* फळे ३ ते ५ सें.मी. देठासह काढावीत ही फळे सावलीत ठेवून त्यासाठी प्लॅस्टिक क्रेटस वापरावेत. पॅक हाऊसला आणल्यावर फळांची अर्धा सें.मी. देठे ठेवून बाकीची कापून टाकावीत. फळांतील चिकाला निचरा होण्यासाठी फळे तिरपी करून ठेवावीत. फळांतील चिकाचा निचरा होण्यासाठी फळे तिरपी करून ठेवावीत. त्यासाठी खास सांगाडा तयार करता येतो. फळांचा देठ थोडा लांब (२ सें.मी.) ठेवल्यास या प्रक्रियेची गरज भासत नाही.

* फळे स्वच्छ पाण्याने धुऊन त्याची प्रतवारी करावी. ५०० पीपीएम बेनोमिलच्या द्रावणात ०.१ टक्के व्हीट मिसळून हे पाणी ५२ अंश सेल्सिअसपर्यंत गरम करावे. त्या पाण्यात ही फळे २ मिनिटे बुडवून ठेवावीत. नंतर कापडाने हलके पुसून कोरडी करावीत. एका खोक्यात १२ फळे एकाच स्तरात भरावीत. याच वेळी निर्यातीसाठी आंब्याची शेवटची प्रतवारी करावी.

* १२.५ अंश सेल्सिअस तापमान ०.५ सेल्सिअसपर्यंत प्रशीतकरण करावे. यासाठी साधारणपणे ८ तास लागतात. फळे काढणीनंतर ६ तासांच्या आत प्रशीतकरण प्रक्रिया केल्यास फळांचे साठवणु कीतील आयुष्य वाढते. तसेच या प्रक्रियेचे इतरही लाभ मिळू शकतात.

* पॅकिंग बोक्सेसचे आंतरराष्ट्रीय निकषांप्रमाणे पॅलेटाझेशन करून घ्यावे. १२.५ अंश सेल्सिअस तापमान असलेल्या रिफर किंवा सी.ए. कंटेनरमध्ये पॅलेट्स भरून कंटेनर बंदराकडे रवाना करावा.

* जपान व अमेरिकेसाठी प्रक्रिया.

* आंबा अमेरिकेला निर्यात करायचा असल्यास त्यावर लासलगावच्या प्रक्रिया केंद्रात क्षकिरण प्रक्रिया करणे आवश्यक आहे. तर जपानला निर्यात करण्यासाठी वाशी (नवी मुंबई) येथे व्हेपर हिट ट्रिटमेंट (उज्ज्वल प्रक्रिया) करणे आवशयक आहे. यामुळे आंब्यातील फळमाशीचे नियंत्रण होते. या प्रक्रिया अमेरिका व जपाननेच शिफारस केल्या असल्याने आवश्यक व उपयोगी आहेत.

* फळे काढताना निर्यातीसाठी त्याच्या काही चाचण्या घेण्यासाठी फळे काढणीच्या ठिकाणी वजनकाटा, विद्राव्य पदार्थ रिफ्रॅक्टोमीटर, तापमान प्रोब थर्मामीटर, आकार व्हर्नियर कॅलिपर, गराचा नरमपणा, तपासणारे प्रेशन टेस्टर आदी चाचणी उपकरणे आवश्यक आहेत.