'सिद्धीविनायक' शेवग्याचा दूत व चिकित्सक अभ्यासू मार्गदर्शन

श्री. बाळासाहेब महादेव शेलार,
मु.पो. वडगाव रासाई, ता. शिरूर, जि. पुणे.
मो. नं. ८६९८९०९७७९


७ जून २०१५ ला २।। एकरमध्ये 'सिद्धीविनायक' शेवगा लावला आहे. जमीन मध्यम असून लागवड १० x ५ फूट अंतरावर आहे. याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या वेळच्यावेळी १५ दिवसाला फवारण्या करतो. कल्पतरू खत लागवडीच्या वेळी २५० ग्रॅम/झाड व नंतर फुलकळी लागल्यावर ५०० ग्रॅम दिले होते. त्याचबरोबर ३ फुटाचा असताना शेंडा खुडल्यानंतर फांद्या फुटतात. त्या फांद्या वाढीसाठी १३:४०:१३ एकरी ४ किलो देतो. याने शेंड्याचे आगरे जर जास्तच पळायला लागले तर ०:५२:३४ देतो, म्हणजे ते वाढ थोपवते व लगेच कळीसाठी १२:६१ ड्रिपमधून सोडतो. हे १५ दिवसाच्या अंतराने करतो.

मग कळी गळू नये. वाध्या लागाव्यात, शेंगा पोसाव्यात म्हणून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची नियमित फवारणी घेतो. हा शेवगा नोव्हेंबर २०१५ ला चालू झाला. तो आज ही (११ मार्च २०१६) चालू आहे. दररोज १५० ते ३०० - ५०० किलो असा माल निघत आहे. शेंग १।। फुटाचीच काढतो. त्यामुळे गावरानच्या भावात जाते. अजून २ महिने चालेल. आतापर्यंत ६ - ७ टन माल निघाला आहे. बाजारभाव कमी कमी होत गेला. सुरुवातीला (नोव्हेंबरमध्ये) ५० रू. नंतर ४० - ३० असा होत आता १२ ते १५ रू. भाव पुणे मार्केटला मिळत आहे. मागे ओडीसा जातीचा शेवगा लावला होता. तर त्यापेक्षा 'सिद्धीविनायक' शेवग्याचे उत्पादन जास्त मिळत असून शेंग हिरवीगार, मध्यम जाडीची गरयुक्त असल्याने भावही मार्केटमध्ये इतरांपेक्षा जादा मिळतो.

शेवग्याच्या दरात चढ - उतार होण्याची कारणे

सरांची सांगितले, "शेवग्याचे बाजारभाव सहसा खाली येत नाहीत. बाजारपेठेतील अभ्यासातून असे निदर्शनास आले की, जेव्हा वाटाणा थंडीमध्ये येतो तेव्हा वाटाण्याचे भावही तेजीत ६० रू. च्या पुढे ते १५० रू. पर्यंत असतात. अशावेळी शेवग्याचे देखील भाव तेजीतच असतात. सासवड, पारनेर, वाई या भागातील वाटाण्याची शेंग हिरवीगार, चमकदार ६ ते ८ दाण्याची असते. यातील मधले ३ दाणे मोठे असतात तर दोन्ही बाजूचे २ - २ दाणे हे मध्यम ते बारीक (तुरीच्या दाण्यासारखे) असतात. खायला हा वाटाणा अतिशय गोड असतो. गोल्डन, बंदेलखंड वाटाण्याच्या शेंगेत साधारण १० दाणे असतात. याची साल पातळ, दाणे गच्च भरलेले असतात. यातील जी शेंग वरून हिरवीगार चमकदार असते. त्यातील दाणे गोड असतात, मात्र जी शेंग पांढरट पोपटी व त्यावर पांढरे डाग असतात अशा शेंगेतील दाणे तोंडात धरवत नाही. हा वाटाणा सासवड, पारनेर वाटाण्यापेक्षा स्वस्त असतो. या वाटाण्याची मार्केटमध्ये आवक जोपर्यंत मर्यादित असते. तोपर्यंत वाटाण्याचे भाव हे कडक (तेजीचे) असतात. मात्र जेव्हा या वाटाण्याची आवक वाढते, हा वाटाणा मोठ्या प्रमाणात मार्केटला येतो. तेव्हा सर्वचा वाटाण्याचे भाव सुरुवातीला ६० रू. वर खाली येतो. तेव्हा उच्चभ्रू लोक वाटाणा खातात. पुढे भाव कमी होत ४० रू . वर येतो तेव्हा मध्यमवर्ग ज्या धरात नवरा बायको दोघेही नोकरी करतात असे लोक वाटाणा खातात. वाटाणा ४० रू. असेपर्यंत सर्वसामान्य किंवा खालचा वर्ग वाटाणा खाऊ शकत नाही. तोपर्यंत शेवग्याचे भाव स्थिर असतात. मात्र जेव्हा ह्याच वाटाण्याचा भाव कमी - कमी होत जात २२ ते २८ रू. किलोपर्यंत खाली येतो, तेव्हा मजूर, खालचा वर्ग तसेच हॉटेलवाले हा माल घेतात. तेव्हा आपोआपच शेवगा खाणारा ग्राहक वर्गही वाटाण्याकडे वळतो आणि मग शेवग्याची मागणी कमी होऊन शेवग्याचे दर पडतात. अशावेळी ५० - ६० रू./किलो असणारा शेवग्याचा भाव २० ते १५ रू. वर खाली येतो. येथे चव, आवड, मागणी व भाव याचा परिणाम शेवग्यावर होतो आणि आज मितीला मार्केटमध्ये तिच परिस्थिती असल्याने आपणास शेवगा १२ ते १५ रू. किलोने विकावा लागत आहे. मात्र हा निचांकी दर (मंद) फार काळ राहणार नाही. " असे सरांनी सांगितले.

माझ्या मते भाव जरी कमी मिळत असला तरी माल भरपूर निघत असल्याने अशाही परिस्थितीत शेवगा परवडत आहे.