पाणी नियोजनाचे महत्त्व

प्राजक्ता मो. मेटकरी, सुरेश स. खरात,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला,
मो. ८२७५२७५८१२


पीक उत्पादात पाणी हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. पिकाच्या वाढीवर व पर्यायाने उत्पादनावर गरजेपेक्षा की अथवा अधिक पाणी दिल्यास अनिष्ट परिणाम होतो. याकरिता पिकासाठी पाण्याचे योग्य नियोजन करणे जरूरीचे आहे. पाण्याचे नियोजन हे प्रमुख्याने पीक प्रकार, जमिनीचा प्रकार, पिकाच्या वाढीच्या अवस्था हवामान व हंगामा या बाबींवर अवलंबून आहे. पाण्याचे योग्य नियोजन करणे म्हणजे एखाद्या पिकास हंगामानुसार व त्याच्या गरजेनुसार किती पाणी द्यावे ? पाण्याची गरज भागविण्यासाठी पाण्याच्या किती पाळ्या व प्रत्येक पाळीस किती पाणी द्यावे ? पाणी कसे द्यावे ? या सर्व गोष्टींचा समावेश होतो.

* पाण्याचे नियोजन :

पिकास पाणी देत असताना जमिनीचा विचार करणे आवशयक आहे. जमिनीतील ओलावा धरून ठेवण्याचे प्रमाण, पाणी मुरण्याचा वेग, पाण्याचा निचरा हे जमिनीच्या प्रकारानुसार बदलत असते. भारी जमिनीमध्ये उपलब्ध पाणी धारणा शक्ती ही हलक्या जमिनीपेक्षा जास्त असते. या उलट जमिनीत पाणी मुरण्याचा वेग हा हलक्या जमिनीपेक्षा कमी असतो. तसेच भारी जमिनीची खोली ही हलक्या जमिनीपेक्षा तुलनेने जास्त असते त्यामळे पाणी साठवून ठेवण्याची क्षमतासुद्धा भारी जमिनीत जास्त असते. त्यामुळे भारी जमिनीत पाणी देण्याच्या दोन पाळ्यातील अंतर हलक्या जमिनीपेक्षा जास्त असते.

पिकाची पाण्याची गरज तेथील हवामानावर म्हणजे आर्द्रता, बाष्पीभवनाचा वेग, तापमान, पाऊस इत्यादी बाबींवर अवलंबून असते. बाष्पीभवन पात्रातून दररोज जेवढे पाणी बाष्पाच्या स्वरूपात उडून जाईल तेवढेच पाणी अथवा थोडे कमी पाणी पिकाच्या व जमिनीच्या माध्यमातून उडून जाते असे गृहित धरले जाते. तसेच जमिनीतील ओलाव्याच्या प्रमाणानुसार पाण्याची मात्रा ठरविली जाते. जमिनीतील उपलब्ध ओलाव्याच्या ५० टक्के पाणी उडून गेल्यावर पाणी दिले जाते. पावसाळ्यात १५ ते २० दिवसांनी, हिवाळ्यात ७ ते ८ दिवसांनी व उन्हाळ्यात ३ ते ४ दिवसांनी पाणी द्यावे.

* पीक वाढीच्या अवस्था व पाण्याची गरज :

कुठल्याही पिकाची पाण्याची गरज त्याच्या संपूर्ण कालावधीमध्ये एक सारखी नसते. धान्य पिकाच्या बाबतीत पिकाच्या सुरूवातीच्या काळात म्हणजेच उगवणीच्या वेळेस पाण्याची गरज कमी असते. पिकाच्या मुख्य वाढीच्या अवस्थेत पाण्याची गरज जास्तीत जास्त असते. तर पीक पक्व होण्याच्या पाण्याची गरज पुन्हा कमी होते. एकंदरीत पिकास त्याच्या वाढीच्या संवेदनक्षम अवस्थेत पाणी देणे अत्यंत गरजेचे असते. उदा. गव्हामध्ये मुगुटमुळे फुटण्याच्या अवस्थेत पाणी द्यावे.

पाण्याचे व्यवस्थापन करीत असताना हंगामातील किती पाणी उपलब्ध होऊ शकते याचा अंदाज करूनच योग्य त्या पिक पद्धतीची निवड करावी. पावसाचे, कालव्याचे आणि विहिरीतील पाण्याचा एकमेकांना पूरक होऊल अशा तऱ्हेने वापर करावा. पाटातील पाणी उपलब्ध असल्यास पिकाच्या संवेदनशील अवस्थेतच पाणी द्यावे. तसेच पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीक निवडून त्यामध्ये संवेदनशील अवस्थेत पाणी द्यावे. उपलब्ध पाण्याच्या जास्तीत जास्त कार्यक्षम वापर करण्याच्या दृष्टीने सिंचन पद्धत निवडणे फार महत्त्वाचे आहे. सिंचन पद्धत जर योग्य नसेल तर जास्त दिलेले पाणी पिकाच्या मुलाच्या खाली झिरपून वाय तर जातेच तसेच पिकाला दिलेली अन्नद्रव्ये, रासायनिक खतेसुद्धा पाण्याबरोबर झिरपून जमिनीमध्ये मुलाच्याखाली जातात आणि या अन्नद्रव्याचा पिकाच्या वाढीसाठी काहीच उपयोग होत नाही. उपलब्ध पाण्याच्या कार्यक्षमरित्या उपयोग होण्यासाठी शेतात येणाऱ्या प्रवाहाची योग्य अशी वितरण व जमिनीचे सपाटीकरण हे फार महत्त्वाचे आहे.

* पाणी व्यवस्थापन व सिंचन पद्धती:

पाणी देण्याच्या मोकाट पद्धतीमध्ये एकूण पाण्याच्या २० टक्के किंवा त्यापेक्षाही कमी उपयोग पिकास होतो. बाकीचे पाणी वाया जाते, झिरपते किंवा बाष्पीभवन होते. तसेच पाणी सर्वत्र सारखे मिळत नाही जमिनीला हलकासा उतार असल्यास उताराच्या बाजूने पेरणी झाल्यावर सारा यंत्राच्या सहाय्याने सारे तयार करावे. जमिनीच्या प्रकारानुसार साऱ्याची योग्य ती लांबी, रुंदी ठेवावी, गहू, ज्वारी, भुईमूग, चारापिके व कडधान्य पिकांना साऱ्याची पद्धत ही योग्य आहे. जमिनीला उंच सखलपणा असेल व उतार एकसारखा नसेल तर वाफे पद्धत वापरावी. वाफे साधारणत: १० मीटर बाय ४.५ मीटर आकाराचे असावेत. गाडी वाफे पद्धत ही रोपे तयार करण्यास उपयुक्त आहे. आले पद्धत ही फळझाडे, भोपळा, कारली, दोडका, काकडी यासारख्या वेलवर्गीय भाज्यांना उपयुक्त आहे. सारी वरंबा पद्धत ही ऊस कपाशी, कांदा, वांगी तसेच इतर नगदी पिकांसाठी वापरतात.

सध्या पावसाच प्रमाण हे अनियमित व अनिश्चित असल्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे अत्यावश्यक आहे. प्रवाही सिंचन पद्धतीमध्ये पाणी वाटपाची कार्यक्षमता कमी आहे व पाण्याचा अपव्यय सुद्धा जास्त होतो. त्यामुळे तुषार व ठिबक सिंचनासारख्या आधुनिक सिंचन पद्धती वापरणे गरजेचे आहे. तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास ३० ते ३५ टक्के पाण्याची बचत होऊन २० ते २५ टक्के उत्पादनात झाल्याचे निष्पन्न झालेले आहे. तसेच रात्रीसुद्धा भिजवण करता येणे शक्य झाले आहे. या पद्धतीत पाट, बांध ह्यांची गरज नसल्याने जमीन वाया जात नाही, खते व किटकनाशके काही प्रमाणात फवारण्यांतून देता येतात. ही पद्धत भुईमूग, सोयाबीन सूर्यफूल, गहू, कापूस, मका इत्यादींसाठी उपयुक्त आहे.

ठिबक सिंचन पद्धतीमध्ये २५ ते ६० टक्के पाण्याची बचत होते व ३० टक्क्यापर्यंत उत्पादनात वाढ होते. जमीन, पाणी व हवा यांची उत्तम सांगड घातली गेल्याने उत्पादनाची परत सुद्धा सुधारते. तसेच कोणत्याही जमिनीवर त्याचा अवलंब करता येतो. यामधून खते देता येत असल्यामुळे खत वापर क्षमता जवळपास दुप्पटीने वाढते. यासर्व बाबतीत येणारा मजुरांवरील खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होतो.

* पिक नियोजन :

उपलब्ध पाणी व पिकांना लागणाऱ्या पाण्याची गरज लक्षात घेवूनच पीक निवडावे म्हणजेच पाण्याचा कार्यक्षम वापर होऊ शकेल. पाण्याचे नियोजन व पिकाचे नियोजन हे दोन भाग आहेत. केवळ पाणी नियोजन करून भागणार नाही तर पिकाचे नियोजन करणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.

भाजीपाला पिकांना पाणी देतांना पिकाच्या वाढीसाठी पाण्याची एकूण गरज किती पाळ्यातून विभागून तसेच केव्हा द्यावे ? या बाबी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. कांदा व लसून या कंदवर्गीय भाज्या पाण्याला चांगला प्रतिसाद देतात. रोपावस्था व कंद पक्व होणे या काळात पाण्याची गरज कमी असते. कंदाच्या वाढीचा काळ पाण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. या काळात पाण्याचा ताण पडला तर उत्पादनात लक्षणीय घट होते. प्रमाणापेक्षा पाणी जास्त झाले तर पाने पिवळी पडतात. करपा रोगाचे प्रमाण वाढते. तसेच मुळे कुजण्याचे प्रमाणही वाढते. कांदा काढणीला आला असता तों आठवडे अगोदर पाणी बंद करणे आवश्यक आहे. लसूणाच्या बाबीत मात्र काढणी अगोदर हलके पाणी देणे आवश्यक असते, त्यामुळे माती मऊ होते व लसून काढणे सोपे जाते.

कोबी, फुलकोबी या भाज्या पाण्याच्या ताणाबाबत फारच संवेदनशील असतात. त्यांची मुळे जमिनीत ३० सें.मी. खोलीवर असतात. त्यामुळे वरच्या थरात ओलावा कायम राखण्यासाठी वारंवार पाणी द्यवे लागते. या प्रकारच्या भाज्यांमध्ये गड्डा धरण्यापासून ते काढणीपर्यंतचा काळ पाण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. कारली, दोडका, काकडी, भोपळा, कलिंगड, खरबुज इत्यादी वेलवर्गीय भाज्या पाण्याचा ताण सहन करू शकतात. परंतु भरपूर उत्पादनाच्या दृष्टी ने नियमित व भरपूर पाणीपुरवठा आवश्यक आहे. कमी पाणी किंवा अनियमितपणा यामुळे काकडी, कारली, दोडका इत्यादींची फळे सुकुन जातात व वेडीवाकडी होतात. पाण्याचा ताण दिला तर कलिंगड, खरबुज, भोपळा यांच्या फळांमध्ये भेगा पडतात. पाणी साचून राहिले किंवा निचरा चांगला झाला नाही तर फुलांची गळ होणे व अवेळी उन्मळून पडण्याची शक्यता वाढते. उन्हाळ्यात ४ - ५ दिवसांनी पाणी द्यावे लागते तर खरीपात पाऊस नसेल तेव्हा पाणी द्यावे लागते. भेंडीची लागवड जवळ - जवळ वर्षभर करतात. भरपूर पाणी किंवा पाण्याचा ताण हे पीक सहन करू शकत नाही. तजेलदार व कोवळी फळे मिळण्यासाठी नियमित पाणी पुरवठा आवश्यक आहे.

गाजर, बीट, मुळा या मुळेवर्गीय भाज्या आहेत. यांची मुळे जमिनीत वाढणारी फुगीर व पाणीदार असतात. मुळांच्या जोमदार वाढीसाठी नियमित परंतु थोडासा पाणीपुरवठा आवश्यक आहे. जास्त पाणी दिले तर मुळांची वाढ कमी होऊन नुसतीच त्यांच्या पानांची वाढ होते. वाढीच्या काळात जर पाण्याचा ताण बसला तर मुळे वेडीवाकडी होतात व मुळांचा भाग खराब होतो. वाल, घेवडा, चवळी, वाटाणा इत्यादी शेंगवर्गीय भाज्यांमध्ये फुले लागणे, फलधारणा व शेंगा भरणे या पिकाच्या अवस्था पाण्याच्या बाबतीत महत्त्वाच्या आहेत. गवार, चवळी, वाल या भाज्या तुलनेत पाण्याचा ताण सहन करू शकतात. उन्हाळ्यात मात्र नियमित परंतु माफक पाणी पुरवठा आवश्यक आहे.

मेथी, चुका, करडई, पालक, राजगिरा इत्यादी पालेभाज्या जवळ - जवळ वर्षभर घेतल्या जातात. या भाज्यांची मुळे बहुतेक करून २० ते ३० सें.मी. खोलीपर्यंत जातात व यांचा कालावधी देखील १ ते १.५ महिन्याचा असतो. तेव्हा ४ ते ५ पाण्याच्या पाळ्या पुरेश्या आहेत. खरीपामध्ये तर एक पाणी सुद्धा पुरेसे आहे. मात्र तजेला कायम टिकविण्यासाठी काढणीपर्यंत जमिनीत ओलावा राहील याची काळजी घ्यावी लागते.

महाराष्ट्रातील शेती ही बहुतांशी पावसावर अवलंबून आहे व पावसाचे प्रमाण हे अनियमित असल्यामुळे पीक उत्पादन हे निश्चित स्वरूपाचे नाही. त्याकरिता जेवढे पाणी उपलब्ध आहे. त्याचा काटकसरीने व योग्य उपयोग करण्याकरिता शास्त्रोत्क पद्धतीने पाण्याचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. केवळ पाणी नियोजन करून जमणार नाही तर पाण्याच्या उपलब्धते नुसार पिकांचे नियोजन करणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.