डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची किमया न्यारी, आंबाच नव्हे तर साऱ्या पिकांचे मार्केट घरूनच करी

श्री. प्रकाश यशवंतराव भोसले (गृह खात्यातील राजपत्रीत वर्ग - १ पदावरून सेवानिवृत्त),
सी - २/८ करण पार्क, को- ऑप. हौसिंग सोसायटी, सोमनाथनगर, वडगावशेरी, पुणे - ४११०१४.
मोबा : ९४२२३१३११३



मी २००५ साली गावी शेडगाव (श्रीगोंदा), जि. अहमदनगर येथे ८ एकर जमिनीत केशर आंबा, लिंबू, पेरू, चिकू अशी फळबाग लावली आहे. याची मुलाखत कृषी विज्ञान, मार्च २०१५ मध्ये पान नं. २९ वर आलेली आहे.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर मी सर्वच पिकांना पहिल्यापासून करत आहे. केशरची ७ - ८ वर्षाची झाडे आहेत. यावर्षी एका झाडापासून १५ किलो माल मिळाला. सरांनी सांगितले, "७०० ते १००० फळे प्रत्येक झाडांपासून मिळायला पाहिजेत." फळे जरी कमी मिळाली असली तरी आम्ही समाधानी आहोत. कारण डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने फळे ३५० ते ४०० ग्रॅमची मिळाली. हा अतिशय चविष्ठ सेंद्रिय आंबा आहे. आम्ही हा आंबा मार्केटला न विकता अहमदनगरमधील डॉक्टर, इंजिनिअर अशा प्रतिष्ठीत लोकांना ८० - ९० रू. किलोने विकला. या आंब्याचा रस एवढा मोहीत करतो की, याची ज्यांनी चव चाखली ते लोक पुन्हा - पुन्हा २ डझन पासून ५ डझन अशी आंब्याची मागणी रोज करू लागले. आता आंबे संपले आहेत तरी ते विचारतात, आंबे आहेत का ?

१ जून २०१५ ला हा केशर आंबा काढला, तो १५ जूनला पिकला. त्याला पिकण्यासाठी कोणतेही केमिकल वापरले नाही. आजही (२३ जून २०१५) तो आंबा जशाचा तसा आहे. सरांनी १२ ते १५ वर्षापुर्वी सांगितले होते, "हापूसला केशर मागे टाकेल" तो प्रत्येक्ष अनुभव आम्हाला आला. एकही फळ सडले, खराब नाही. या तंत्रज्ञानामुळे केशर आंबा 'केशर' सारखाच मौल्यवान मिळाला.

आम्ही वडगावशेरी, पुणे येथे राहतो तर तेथे एन. के. जी एस. बी. आय. ही बँक आहे. येथील बँकेच्या व्यवस्थापकांना सुरुवातीला आम्ही चवीसाठी थोडे आंबे दिले. त्यानंतर त्यांनी आंबे खाल्ल्यावर ३० - ३५ किलोची ऑर्डर दिली. आंबा संपला तरी बँकेतून आंब्याच्या मागणीबद्दल विचारणा होत होती.

काही रस टिकण्याचा पदार्थ व फ्रिजमध्ये न ठेवताही रस चांगला !

माझ्या पत्नीने गेल्यावर्षी आंब्याचा पल्प आणि रस काढून छोटे - छोटे कॅन भरले, तर मागच्या वर्षीचा रस अजूनही टिकून आहे. या रसाला टिकण्यासाठी कोणताही घटक वापरला नाही. न फ्रिजलाही ठेवला. मोकळ्या वातावरणात हे रसाचे कॅन असून देखील रसाची चव पुर्वी सारखीच म्हणजे ताज्या रासासारखी आहे. हे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे खास वैशिष्ट्ये आहे.

२।। एकरात ३३' x ३३' वर ११० कालीपत्ती चिकूची झाडे आहेत. तर १० वर्षात फांद्या एवढ्या वाढल्या आहेत की, मधली संपूर्ण मोकळी जागा झाकली गेली आहे. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने एका किलोत या चिकूची फक्त १० फळे बसतात. म्हणजे साधारण १०० ग्रॅमचे १ फळ आहे. फळाला कुठेही डाग नाही. खायला अप्रतिम आहे. या चिकूचा मिल्कशेकसाठी जास्त वापर करतात. असे मिल्कशेकचे ग्लास अहमदनगरमध्ये २५ रू. ला जातात. तेव्हा सरांनी सांगितले. "एरवी शेतकऱ्याला उत्पादन जरी जास्त मिळाले तरी मार्केटची समस्या उद्भवते. त्याच्या मालाला अपेक्षित भाव मिळत नाही. तेव्हा अशा घरातील मुलगा जर हुशार असेल तर असे मुल्यवर्धीत पदार्थ बनवले व ते जर अहमदनगरला २५ ते ३० रू. ला १ ग्लास जात असेल तर तोच नागपूरला ५० रू. ला, मुंबईला ६० रू. ला व पंचतारांकित हॉटेलमध्ये १०० रू. ला जाईल. म्हणजे शेतकऱ्याला निश्चित चांगले पैसे मिळतील." मिल्कशेकवाले आमचा चिकू जागेवरून ४० रू. किलोने नेतात. मार्केटमध्ये चिकू पाठविला तर व्यापारी १५ रू. भाव देतात. खर्च जाऊन हातात १० रू. किलोच भाव मिळतो. तर सामान्य गिऱ्हाईकाला तोच चिकू ६० ते १०० रू. किलोने घ्यावा लागतो. आमची फळे घेण्यास लोक विश्वासाने येतात. सिझन संपला तरी जसे मधाच्या पोळावर मधमाशा बसतात तसे या तंत्रज्ञानाने मिळवलेल्या व पिकविलेल्या फळांच्या चवीने ग्राहकांना मोहीत केले आहे.