नारळाची यशस्वी लागवड

नारळ हे बहुवर्षायु, बहूपयोगी असे फळझाड आहे. या झाडास माड म्हणतात. नारळाचे उत्पादन वाढविणे गरजेचे आहे आणि त्यासाठी या फळपिकाचा विविध अंगांनी अभ्यास करावयास हवा.

भारतात नारळाची लागवड अनेक शतकांपासून केली जाते. जगातील नारळ लागवडीखाली असलेल्या एकूण क्षेत्रापैकी १२ % क्षेत्र भारतात आहे. भारताचा नारळ लागवडीखालील क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात तिसरा क्रमांक लागतो. भारतातील नारळ लागवडीखालील एकूण ११ लाख हेक्टर क्षेत्रापैकी केरळ ६४%, तामिळनाडू १३%, कर्नाटक १४% आणि आंध्रप्रदेश ३% ह्या राज्यांत असून महराष्ट्रात फक्त १% क्षेत्र आहे. महाराष्ट्रातील नारळ लागवडीखालील प्रामुख्याने कोकण विभागापुरतेच मर्यादित आहे. नारळाच्या झाडाचा कुठलाही भाग वाया जात नाही. नारळाच्या फळांपासून तेल व खोबरे मिळते, तसेच झाडाच्या पानांपासून झाडू, खराटे तर काथ्यापासून दोर, चटई, गाद्या, हस्तकला वस्तू इत्यादी विविध वस्तू बनवतात. नारळाच्या अपक्क फळांना (शहाळ्यांना) शहरी विभागात खूपच मागणी आहे. वर्षभर उत्पादन देणार्‍या या झाडाला त्याच्या विविध उपयुक्ततेमुळे 'कल्पवृक्ष' असे म्हणतात. नारळाच्या झाडामुळे विविध व्यवसाय महाराष्ट्रातील ग्रामीण भागात करता येण्याजोगे आहेत. जमीन आणि हवामानाचा विचार करता नारळाच्या लागवडीस महराष्ट्रात बराच वाव आहे.

उगमस्थान, महत्त्व, भौगोगिक प्रसार :

नारळाच्या झाडाच्या उगमस्थानाबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही. परंतु दक्षिण - पूर्व आशियात मलेशिया किंवा इंडोनेशिया हा देश नारळाचे उगमस्थान असावे असे मानले जाते.

नारळाच्या झाडाचा 'कल्पवृक्ष' असे म्हणतात. कारण नारळाच्या प्रत्येक भागाचा उपयोग करता येतो आणि झाडाचा कोणताही भाग वाया जात नाही. नारळापासून अनेक उपयुक्त वस्तू बनविल्या जातात.

नारळाचे फळ मंगल व शुभकार्यात 'श्रीफळ' म्हणून अगत्याने वापरतात. नारळाची फळे शहाळ्यासाठी प्रसिद्ध आहेत. शहाळे पौष्टिक व आरोग्यदायक असते. शहाळ्याचे पाणी विशिष्ट प्रकारच्या रोग्यांना अतिशय लाभदायक असते.

नारळाच्या पाण्यातील उन्नघटकांचे प्रमाण:

अन्नघटक   प्रमाण %  
    पाणी       ९५.५०  
    शर्करा (कर्बोहायड्रेट्स)       ४.००  
    प्रथिने (प्रोटिन्स)       ०.१०  
    स्निग्धांश (फॅटस)       ०.१०  
    लोह       ०.०००५  
    स्फुरद       ०.०१  
    चुना       ०.०२  


नारळाच्या फळाच्या १०० ग्रॅम ताज्या खोबर्‍यामध्ये पुढीलप्रमाणे अन्नद्रव्ये असतात.

अन्नद्रव्ये   प्रमाण (%)  
पाणी   ४५.०  
शर्करा (कर्बोहायड्रेट्स)   १०.०  
प्रथिने (प्रोटिन्स)   ४.०  
स्निग्धांश (फॅटस)   ३७.०  
खनिज पदार्थ   ४.०  


नारळाच्या अपक्क फळातील खोबरे सर्वांनाच आवडते. नारळाच्या फळातील खोबर्‍याचा भाजीत टाकण्यासाठी तसेच मिठाईसाठी वापर केला जातो. नारळाच्या फळापासून ६० ते ७० % तेल आणि ३० ते ४०% पेंड मिळते. दक्षिण भारतात नारळाच्या तेलाचा उपयोग खाण्यासाठी करतात. नारळाची पेंड जनावरांसाठी तसेच कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून वापरली जाते.

नारळाच्या झावळ्या घरावर पावसापासून संरक्षण करण्यासाठी वापरतात. नारळाच्या झावळ्यांच्या जाड शिरांपासून झाडू तयार करतात. काथ्यापासून दोर, चटया, गाद्या, जाजमे वस्तू करतात. या वस्तूंच्या उत्पादनात भारत आघाडीवर असून या वस्तूंची मोठ्या प्रमाणावर प्रदेशात निर्यात होते. त्यामुळे भारताला परकीय चलन तर मिळतेच, पण भारताच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला आहे. जवळजवळ वर्षभर फळे देणारा आणि इतक्या अनेकविध उपयुक्त वस्तु पुरविणारा नारळासारखा दुसरा वृक्ष निसर्गात नाही. म्हणूनच नारळाच्या झाडाला 'कल्पवृक्ष' असे म्हणतात.

महाराष्ट्रात मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये शहाळ्यांना भरपूर मागणी आहे. शहरी भागामध्ये रोजच्या खाण्यात नारळाचे प्रमाण वाढलेले आहे. यासाठी महाराष्ट्रात नारळाची लागवड वाढविणे आवश्यक आहे. सध्या देशातील इतर राज्यांतून महाराष्ट्रात नारळाचा आणि शहाळ्यांचा पुरवठा होतो. महाराष्ट्रातील बर्‍याच भागातील जमीन व हवामान नारळाच्या पिकास पोषक असल्याने नारळ लागवडीस महाराष्ट्रात खूप वाव आहे.

हवामान : नारळाची लागवड उष्ण कटिबंधातील भागात चांगल्या प्रकारे होते. मंद वाहणारे वारे, जास्त आणि विखुरलेला पाऊस, दमट हवामान आणि हवेत भरपूर आर्द्रता असलेल्या प्रदेशात नारळाची झाडे चांगली वाढतात. उष्ण व कोरड्या प्रदेशात नारळाची योग्य वाढ होत नाही. नारळाच्या झाडाची वाढ १५ ते ३७ डी. सेल्सिअस तापमानात चांगली होते. १० डी. सेल्सिअसपेक्षा कमी तापमान नारळाच्या झाडाच्या वाढीला हानीकारक असते. समुद्राजवळच्या भागातील हवामानात विशेष बदल होत नाहीत, असे हवामान नारळाच्या वाढीसाठी पोषक असते. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील हवामान उष्ण व कोरडे असते. तसेच दिवस व रात्रीच्या हवामानामध्ये बराच फरक असतो. अशा हवामानात नारळाच्या पिकात फळधारणा कमी होते आणि, फळातील खोबर्‍याची जाडी कमी असते. मात्र योग्य काळजी घेतल्यास विदर्भाच्या काही भागांत मर्यादित प्रमाणावर नारळाची लागवड करण्यास बराच वाव आहे.

जमिन : नारळ हे बागायती फळझाड असून पाण्याची सोय असल्यास विविध प्रकारच्या पण उत्तम निचरा होणार्‍या जमिनीत या पिकाची लागवड करता येते. गाळणे तयार झालेल्या भुसभुशीत, समुद्रकाठच्या रेताड, वाळुमय जमिनी आणि मध्यम भारी जमिनी नारळाच्या लागवडीसाठी उपयुक्त असतात. अतिभारी, चिकण व पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसलेल्या जमिनीवर नारळाची लागवड करू नये. पाण्याच्या निचर्‍याची योग्य व्यवस्था करून (मोठे चर खोदून) नारळ लागवड करणे शक्य आहे. सुधारलेल्या खार जमिनीतही नारळाची लागवड करू नये. खाचराच्या रुंद बांधावर तसेच ज्या जमिनीमध्ये पाण्याची पातळी खूप वर आहे अशा ठिकाणी जमिनीच्या तालीवर नारळाची लागवड करावी.

सुधारित जाती: नारळाच्या झाडाच्या उंचीवरून नारळाच्या जातींची विभागणी उंच वाढणार्‍या जाती आणि बुटक्या जाती अशी केली जाते. बाणावली ही उंच वाढणारी जात आहे तर ऑरेंज ड्वार्फ ही बुटकी जात आहे.

१) बाणावली : नारळाच्या या जातीला 'वेस्ट कोस्ट टॉंल' असेही म्हणतात. या जातीच्या झाडांना ८ ते १० वर्षांनी फळे येतात. या जातीच्या झाडाची फळे मोठी असून त्यातील खोबरे जाड असते. फळातील तेलाचे प्रमाण ७० % असते. या जातीची झाडे ८० ते १०० वर्षांपर्यंत फळे देतात. नारळाच्या या जातीवर किडींचा आणि रोगांचा उपद्रव कमी प्रमाणात दिसून येतो.

२) ऑरेंज ड्वार्फ : नारळाच्या या जातीला 'सिंगापुरी' असेही म्हणतात. या जातीची झाडे कमी उंचीची असून फळे नारिंगी रंगाची असतात. नारळाच्या या जातीला ४ ते ५ वर्षात फळे येतात. या जातीची फळे आकाराने लहान असतात आणि फळातील तेलाचे प्रमाण ५५% असते. या जातीची झाडे ४० ते ५० वर्षांपर्यंत फळे देतात. नारळाच्या या जातीवर कीड व रोगाचे प्रमाण जास्त दिसून येते.

३) टी x डी (टॉंल x ड्वार्फ ) : उंच आणि बुटक्या अशा दोन जातींचा संकर करून 'टी x डी' ही नारळाची संकरित जात तयार करण्यात आली आहे. या संकरित जातीत नारळाच्या उंच जातीच्या उत्तम खोबर्‍याचा गुणधर्म व बुटक्या जातीचा लवकर फळे धरण्याचा गुणधर्म एकत्र झालेला आहे. नारळाच्या या जातीला ४ ते ५ वर्षांनी फळे येतात. फळे आकाराने मोठी असतात. या जातीच्या एका झाडापासून दरवर्षी सरासरी १०० ते १२५ फळे मिळतात.

४) प्रताप : ही जात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठने विकसित केली आहे. या जातीचे नारळ मोठे, भरपूर खोबर्‍याचे असून झाडाची उत्पादन क्षमता ही चांगली आहे.

५) लक्षद्विप ऑर्डिनरी (चंद्रकल्प : ही जात निवड पद्धतीने विकसित केली आहे. पूर्ण वाढीच्या झाडापासून प्रत्येक वर्षी सरासरी १५१ फळे मिळतात. या जातीच्या नारळांमध्ये तेलाचे प्रमाण ७२% आहे.

६) फिलिपीन्स ऑर्डिनरी : या जातीचे माड उंच वाढतात. पूर्ण वाढलेल्या माडापासून सरासरी १०५ नारळ मिळतात. नारळाचा आकार मोठा असून त्यापासून सुमारे २१३ ग्रॅम खोबरे मिळते. नारळामध्ये तेलाचे प्रमाण ६९% आहे.

अभिवृद्धीच्या पद्धती : नारळाच्या झाडाची अभिवृद्धी रोपापासून करतात. नारळाचे झाड दीर्घ काळ फळे देत असल्याने उत्तम प्रतीच्या झाडांच्या रोपांची निवड करणे अत्यंत आवश्यक असते. नारळाची उत्तम प्रतीची रोपे तयार करण्यासाठी मातृवृक्षाची निवड व मातृवृक्षापासून मिळणार्‍या फळांची निवड ह्या महत्त्वाच्या बाबी आहेत.

१) मातृवृक्षाची निवड : ज्या नारळाच्या झाडाची फळे रोपे तयार करण्यासाठी वापरतात त्या झाडाला मातृवृक्ष असे म्हणतात. मातृवृक्षाची निवड करताना झाडाचे उत्पादन, नियमितपणा, फळाची प्रत, झाडाची वाढ, रोग -किडींचा उपद्रव इत्यादी गोष्टी प्रामुख्याने विचारात घ्याव्यात.

अ ) अधिक उत्पादन देणार्‍या, मोठ्या आकाराची फळे असलेल्या निरोगी बागेतील मातृवृक्षाची निवड करावी.

आ ) मातृवृक्ष म्हणून निवडलेले झाड नियमित व भरपूर उत्पादन देणारे असावे. एक वर्षाआड फळे देणारे अथवा मातृवृक्ष म्हणून दर वर्षी १०० फळांपेक्षा कमी फळे देणारे नारळाचे झाड निवडू नये. बिनखोबर्‍याचे नारळ अतिशय जुनाट अथवा लहान झाडे मातृवृक्ष म्हणून निवडू नयेत.

इ ) मातृवृक्ष म्हणून निवडलेले झाड निरोगी आणि जोमदार वाढलेले असावे. झाडाच्या फांद्यांचे देठ आखूड व जाड असावेत. झाडाच्या पानांचा संभार छत्रीसारखा असावा .

ई) घराशेजारी, गुरांज्या गोठ्याशेजारी अथवा कंपोस्ट खड्ड्याजवळील नारळाच्या झाडाची मातृवृक्षासाठी निवड करू नये, कारण या झाडांची मूळची उत्पादनक्षमता ओळखता येत नाही.

२) रोपांसाठी नारळाची निवड :

१) जड व पूर्ण विकसित झालेली, ११ महिन्यांपेक्षा अधिक वयाची नारळाची फळे रोपे तयार करणयासाठी निवडावीत.

२) पाणी नसलेली आणि खोबरे नरोटीपासून सुटलेली फळे तसेच गुडगुड वाजणारी आणि भेगा पडलेली नारळाची फळे रोपे तयार करण्यासाठी वापरू नयेत.

३) मध्यम आकाराची आणि गोल फळे नारळाची रोपे तयार करण्यासाठी निवडावीत.

४) रोपे तयार करण्यासाठी फेब्रुवारी ते मे या कालावधीत मिळणारी नारळाची फळे वापरावीत.

३) नारळाची रोपे तयार करणे :

१) उन्हाळ्यात रोपवाटिकेत १ ते १.५ मीटर रुंद, ८ ते १० मिटर लांब, ३० सेंमी खोल आकाराचे वाफे तयार करावेत. वाफे वाळू, माती आणि कुजलेले शेणखत ह्यांच्या मिश्रणाने भरावेत. दोन वाफ्यांमध्ये जाडा होणार्‍या पाण्याचा निचरा होण्यासाठी चर खोडून नाल्या कराव्यात.

२) जून महिन्याच्या मध्यापासून पुढे बियाण्याचे नारळ लावतात. नारळाची फळे वाफ्यांवर आडवी रुजवावीत. दोन ओळींमध्ये ४५ सेंमी आणि एका ओळीतील दोन फळांमध्ये ३० सेंमी अंतर ठेवावे.

३) नारळा रोपवाटिकेसाठी गवताचे आच्छादन केल्यास नारळ लवकर रुजतात आणि रोपे चांगली वाढतात.

४) नारळाच्या रोपांना नियमित पाणी द्यावे आणि उन्हाळ्यात रोपांवर सावली करावी.

५) लावणीनंतर तीन महिन्यांनी नारळ रुजून पाच महिन्यांत नारळाला कोंब येतात. ९ -१० महिन्यांनी महणजे जून - जुलैमध्ये नारळाची रोपे लागवडीसाठी उपलब्ध होतात.

रोपांची निवड : शक्य असल्यास स्वत: च वरीलप्रमाणे काळजी घेऊन नारळाची रोपे तयार करावीत आठव कृषी विद्यापीठे किंवा शासकीय रोपवाटीकेतून खात्रीशीर रोपे मिळवावीत. नारळाची रोपे निवडताना खालील गोष्टींकडे लक्ष द्यावे.

१) रोपवाटिकेत रोपे लवकर रुजलेली असावीत.

२) रोपे कमीत कमी ९ ते १२ महिने वयाची असावीत. साधारणपणे १ ते १.५ वर्षे वयाची रोपे लागवडीसाठी योग्य असतात. रोपांची पाने विलग झालेली असावीत. रोपांच्या पानांचे देठ जाड आणि आखूड असावेत..

३) रोपे जोमदार आणि निरोगी असावीत. रोपांचा बुंधा आखूड आणि १० ते १२ सेंमी जाडीचा असावा. वरील निकष लावून रोपांची निवड केल्यास नारळाचे लवकर व अधिक उत्पादन मिळते.

पूर्वमशागत :नारळाच्या लागवडीसाठी निवडलेली जमिन उन्हाळ्यापूर्वी तयार करावी. जमीन तयार केल्यानंतर उन्हाळ्यात ८ x ८ मीटर अंतरावर १ x १x १ मीटर आकाराचे खड्डे घ्यावेत. एका हेक्टरमध्ये नारळाची १५० ते १५६ झाडे लावावीत.

खड्डे भरताना खड्ड्याच्या तळाला पालापाचोळा घालून त्यावर शेणखत किंवा कंपोस्ट खत आणि पोयट्याची माती यांचे मिश्रण टाकून साधारणपाने अर्धा खड्डा भरावा. नारळाची रोपे खड्ड्यात लावताना प्रत्येक खड्ड्यात १ किलो कल्पतरू सेंद्रिय खत आणि सिंगल सुपर फॉस्फेट मातीने चांगले मिसळावे, अशा खतमिश्रित मातीने खड्ड्याचा उरलेला भाग भरावा.

लागवड: रोपवाटिकेतून नारळाची रोपे नारळ व मुळासकट काळजीपूर्वक काढावीत. रोपे प्रत्यक्ष लागवडीपूर्वी काढावीत. निवडलेले नारळाचे रोपे खड्ड्याच्या मध्यभागी अशा रितीने लावावे, की रोपाचा नारळ जमिनीच्या पृष्ठभागाच्या ३० ते ४५ सेंमी खोल राहील.

नारळाचे रोपे लावताना त्याचा कोंब मातीत गाडला जाणार नाही याची काळजी घ्यावी. रोपे जसे वाढत जाईल तसे खड्डा मातीने भरून घ्यावा. नारळाच्या रोपांची लागवड पावसाळ्याच्या सुरुवातीला करावी. परंतु लागवडीच्या जागी पाणी साचण्याची शक्यता असेल तर अशा भागात रोपांची लागवड ऑगस्ट - सप्टेंबर महिन्यात म्हणजे जोराचा पाऊस संपल्यावर करावी. नारळाच्या रोपाभोवती पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.

वळण आणि छाटणीच्या पद्धती :

नारळाचे झाड सरळ व उंच वाढते. नारळाच्या खोडाची वाढ सतत एकाच कोंबातून होते. नारळाचे खोड तयार झाल्यानंतर म्हणजे ५ ते ६ वर्षांनंतर झाडांना फुलोरा येतो व फळे मिळतात. नारळाच्या झाडाची छाटणी करण्याची किंवा झाडाला वळण देण्याची आवश्यकत नाही.

खते आणि पाणी व्यवस्थापन : नारळाच्या झाडांना चांगल्या वाढीसाठी नत्र, स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांची गरज असते. खते आणि पाणी नियमित दिले तर नारळाची वाढ होऊन झाड ५ ते ६ वर्षांतच फुलोर्‍यावर येते. पहिल्यावर्षी शेणखत १० किलो, नत्र २०० ग्रॅम , स्फुरद १०० ग्रॅम, पालाश २०० ग्रॅम आणि कल्पतरू सेंद्रिय खत ५०० ग्रॅम या प्रमाणात द्यावे. नंतर पुढे तेवढेच प्रमाण वाढवून दरवर्षी खते द्यावीत.

नत्र व पालाश ह्या खतांच्या मात्रा जून, सप्टेंबर आणि फेब्रुवारी महिन्यांमध्ये तीन वेळा विभागून द्याव्यात. तर शेणखत, कल्पतरू सेंद्रिय खत आणि स्फुरद संपूर्ण मात्रा जूनमध्ये द्यावी.

खते कशी द्यावीत : झाडाच्या बुंध्यापासून एक मीटर अंतरावर ३० सेंमी रुंदीचा व १५ सेंमी खोलीचा चर काढून त्यात खते द्यावीत आणि चर पुन्हा बुजवावा. जसजसे रोप मोठे होईल तसतसा चर बुंध्यापासून दूर काढावा.

मिठाचा वापर : कोकणातील काही शेतकरी नारळाच्या झाडाला खत म्हणून काही प्रमाणात मिठाचा वापर करतात. परंतु खत म्हणून मिठाची उपयुक्तात सिद्ध झालेली नाही. यामुळे खत म्हणून मिठाच वापर करू नये. देशावरील भागात तर मिठाचा वापर अजीवात करू नये.

पाणी : नारळाच्या झाडांना नियमितपणे पाणी दिले तर त्यांचे उत्पादन बर्‍याच प्रमाणात वाढते. नारळाच्या झाडांना मुख्यत्वेकरून उन्हाळ्यात पाणी देण्याची जास्त आवश्यकताही असते. काही ठिकाणी पावसाळ्यानंतर नारळाच्या झाडांना पाणी दिले जात नाही. परिणामी झाडांची योग्य वाढ होत नाही आणि उत्पादन कमी मिळते.

नारळाची नवीन लागवड केल्यानंतर पहिली ३ ते ४ वर्षे झाडांना हिवाळ्यात व उन्हाळ्यात आठवड्यातून दोन वेळा पाणी द्यावे. पूर्ण वाढलेल्या नारळाच्या झाडांना जमिनीच्या मगदुराप्रमाणे ५ ते १० दिवसांतून वेळा पाणी द्यावे. नारळाच्या झाडाच्या बुंध्याभोवती झाडाच्या आकारानुसार १ ते २ मीटर व्यासाचे गोल किंवा चौकोनी आले करून पाणी द्यावे. पाणी झाडाच्या खोडाजवळ फार काळ साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.

आंतरपिके, आंतरमशागत आणि तणनियंत्रण :

कोकणासारख्या भागात काळी मिरी, जायफळ, दालचिनी या पिकांची लागवड आंतरपिके म्हणून करतात. मात्र आंतरपिकांना खताच्या पूरक मात्रा देणे आवश्यक आहे. ८ x ८ मीटर अंतरावर लागवड केलेल्या नारळाच्या बागेत, एक एकर क्षेत्रात ७० नारळाची झाडे बसतात.

एका नारळावर २ काळ्या मिरीचे वेळ सोडल्यास १४० काळ्या मिरीच्या वेली, नारळाच्या दोन झाडांमध्ये व ओळीमध्ये एक दालचिनीचे झाड अशी एकूण १२४ दालचिनीची झाडे व चार नारळांमध्ये एक जायफळाचे झाड लावल्यास एकूण ५४ जायफळाची झाडे बसतात.

अशाप्रकारे आंतरपिकाची लागवड केल्यास पूर्ण वाढ झालेल्या एका एकर बागेपासून १ लाख रुपये उत्पन्न मिळते.

नारळाच्या झाडाच्या जोमदार वाढीसाठी बाग स्वच्छ ठेवणे आवश्यक असते. सुरुवातीच्या काळात भाजीपाल्यासारखी आंतरपिके घेतल्यास बागेमध्ये तणांचे प्रमाण कमी होते. बागेत वाढलेली तणे पाणी आणि अन्नासाठी मुख्य पिकाशी स्पर्धा करतात. म्हणून नियमित आंतरशागत करून बाग स्वच्छ ठेवावी. तणनाशकांचा आणि आच्छादनांचा वापर करूनही तणांचा बंदोबस्त करता येतो.

महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण : नारळाच्या झाडावर शंभरपेक्षा जास्त प्रकारच्या किडींची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी गेंड्या भुंगा, सोंड्या भुंगा आणि काळ्या डोक्याची अळी या किडी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात.

१) गेंड्या भुंगा : हा भुंगा नारळाच्या झाडाच्या शेंड्यामधून नवीन येणारा कोंब खातो, त्यामुळे झाडाचे फार नुकसान होते. कीडग्रस्त झाडांच्या झावळ्याही काही वेळा मध्यभागी कुरतडलेल्या दिसतात. गेंड्या भुंग्याचा प्रादुर्भाव झालेल्या झाडावर नवीन पाने त्रिकोणी आकारात कापलेली दिसतात. यावरून या किडीचा उपद्रव लगेच ओळखता येतो. किडीचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर असल्यास झाड सुकते आणि मरते.

उपाययोजना : या किडीची पैदास कंपोस्ट खताच्या खड्ड्यांमध्ये होते. म्हणून या खड्ड्यांवर दर दोन महिन्यांनी २० ग्रॅम ५०% लिंडेन अथवा कार्बारिल (५०%) भुकटी (पाण्यात मिसळणारी) दहा लिटर पाण्यात मिसळून झाडांवर फवारावीत. नारळाच्या बागेत ठिकठिकाणी भुंगेरे पकडण्यासाठी फसवे खड्डे करावेत. या खड्ड्यांमध्ये कुजलेले शेणखत आणि पालापाचोळा भरावा. तसेच वरील प्रमाणात ५०% लिंडेन पावडर फवारावी. गेंड्या भूग्याचा उपद्रव झालेल्या झाडातून लोखंडी सळईच्या सहाय्याने भुंगा काढून ठार मारावा आणि १० % लिंडेन आणि वाळू यांच्या मिश्रणाने झाडावरील छिद्रे बुजवून टाकावीत. हा उपाय दर तीन महिन्यांनी करावा.

२) सोंड्या भुंगा : या किडीच्या अळ्या झाडाच्या खोडाच्या आतील मऊ व खोड आतून पोखरतात. काही दिवसांनी सोंड्या भुंग्यांचा प्रादुर्भाव झालेला झाड मरते. सोंड्या भुंगा रात्रंदिवस कार्य करत असला तरी दिवसा उड्डाण करतो. हा भुंगा एका बागेतून दुसर्‍या भागेत सहजरित्या पोहोचू शकतो.

उपाय :

१) सोंड्या भुंग्याचा उपद्रव टाळण्यासाठी नारळाच्या प्रत्येक झाडावर बेचक्यात २५० ग्रॅम लिंडेन भुकटी टाकावी.

२) सोंड्याभुंग्याचा उपद्रव टाळण्यासाठी नारळाच्या प्रत्येक झाडावर भुंग्यामुळे पडलेल्या सर्वांत वरच्या भोकात २० ग्रॅम ५०% कार्बारिल टाकावे. कीडनाशक औषधे टाकण्यापूर्वी खालची सर्व भोके मातीने बंद करावीत. अथवा भोके वाळू आणि १० % लिंडेन १:१ प्रमाणात मिसळून भरवीत. सोंड्या भुंगा खालच्या भागावर वेष्टन तयार करून पानांतील हरितद्रव्ये खातो. त्यामुळे पाने करपल्यासारखी दिसतात. ह्या किडीची पादुर्भाव नारळाच्या सर्व पानांवर झाल्यास झाड वाळल्यासारखे दिसते आणि झाडाची उत्पादनक्षमता कमी होते.

३) ह्या किडीचा बंदोबस्त करण्यासाठी ४० ग्रॅम ५०% कार्बारिल भुकटी (पाण्यात मिसळणारी) १० लिटर पाण्यात मिसळून नारळाच्या झाडांवर फवारावी.

३) पानावरील कोळी : कोळी हा आठ पाय असलेला आणि कीटकासरखा दिसणार असून आकाराने अतिशय लहान असतो. ही कीड नारळाच्या झाडाच्या पानांवर अंडी घालते. अंड्यांतून बाहेर पडलेली पिले पानांतून रस शोषून घेतात, पानांवर पांढरट रेशमी धाग्याची जाळी तयार करतात. या किडीच्या प्रादुर्भावामुळे पानांवर पिवळसर ठिपके पडतात. किडीचा पादुर्भाव झाडांवर मोठ्या प्रमाणात झाल्यास लहान फळांची गळ होते.

उपाय :

या किडीच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात २५ ग्रॅम वेटेबल गंधक या प्रमाणत मिसळून फवारणी करावी.

४) उंदीर : उंदीर हे नारळाच्या झाडाच्या सर्व अवस्थांमध्ये उपद्रव करतात. उंदीर नारळाची कोवळी वाढणारी फळे पोखरतात. अशा पोखरलेल्या नारळांची गळ होते.

उपाय :

१) उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी झाडाच्या बुंध्यावर जमिनीपासून २ मीटर उंचीवर अर्धा मीटर गुळगुळीत पत्र्याच्या गोलाकार पट्ट्या बसवाव्यात. त्यामुळे उंदीर झाडावर चढताना घसरून पडतो व फळांपर्यंत पोहीचू शकत नाही.

२) १०० ग्रॅम गव्हाच्या पिठामध्ये ६ ग्रॅम झिंक फॉस्फाईड या प्रमाणात मिसळून त्याच्या गोळ्या तयार कराव्यात. या गोळ्या उंदरांनी पोखरलेल्या झाडाच्या खोडात ठेवाव्यात. झिंक फॉस्फाईडच्या गोळ्या बागेतील बिळातही टाकाव्यात, त्यामुळे उंदरांची संखया कमी होण्यास मदत होते.

महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण :

१) कोंब कुजणे : हा रोग फायटोप्थोरा पाल्मिव्होरा नावाच्या बुरशीपासून होतो. या रोगाची लागण झालेल्या झाडाचा वाढणार कोंब कुजतो व त्याला दुर्गंधी सुटते. हा रोग सर्व वयाच्या झाडांना होत असला तरी कोवळी झाडे या रोगाला अधिक प्रमाणात बळी पडतात.

उपाय :

या रोगाची लागण दिसताच झाडाचा कुजलेला कोंब आणि कोंबाचा भाग खरडून काढावा आणि त्या जागी बोर्डो मिश्रणाची पेस्ट लावावी. नवीन कोंबाची वाढ होईपर्यंत त्याचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी तो झाकून ठेवावा. हा रोग होऊ नये महणून वरचेवर नारळाच्या आणि प्रामुख्याने झाडाच्या शेंड्यावर १% बोर्डो मिश्रण किंवा डायथेन एम -४५ बुरशीनाशक औषध एक लिटर पाण्यात २ ग्रॅम या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.

२) फळांची गळ : नारळाच्या झाडाला नारळा धरण्यास सुरुवात झाल्यावर पहिली १ - २ वर्षे फळांची नैसर्गिक गळ होते. मात्र त्यानंतर होणारी फळगळ ही बुरशीजन्य रोगांमुळे असू शकतो. त्याचप्रमाणे अयोग्य रोपांची निवड किंवा अन्नद्रव्यांची कमतरता, पाण्याचा अयोग्य निचरा अथवा पाण्याचा ताण ह्या कारणांनीसुद्धा फळगळ होते.

उपाय :

पावसाळ्यापुर्वी १% बोर्डो मिश्रणाच्या १ किंवा २ फवारण्य घडावर किंवा पानांवर कराव्यात. तीन ते चार महिन्यांच्या अंतराने झाडावर बोर्डो मिश्रणाच्या फवारण्या चालू ठेवाव्यात. झाडावरून गळून पडलेली फुले व फळे जाळून नष्ट करावीत. खते आणि पाण्याचे नियोजन व्यवस्थित करावे.

३) करपा : नारळाच्या झाडाच्या पानांवर पेस्टोलोशिया नावाच्या बुरशीमुळे तपकिरी लालसर रंगाचे ठिपके पडतात. हे ठिपके खालच्या पानांवर जास्त असतात. ठिपके मोठे होऊन झाडाचे संपूर्ण पान करपते. त्यामुळे झाड कमजोर होऊन नारळाचे उत्पादन घटते.

उपाय :

या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून वाळलेली पाने काढून नष्ट करावीत. झाडावर १% बोर्डो मिश्रण किंवा १० लिटर पाण्यात ३ ग्रॅम डायथेन झेड -७८ हे बुरशीनाशक मिसळून फवारणी करावी.

शारिरीक विकृती आणि त्यांचे नियंत्रण :

१) लागवडीनंतर होणारी रोपांची मर : १२ ते १४ महिन्यांची रोपे वाटिकेतून काढताना मुळांना काही वेळा इजा होते. झाडाचे खोडही पिरगळले जाते. लागवडीनंतर काही काळाने अशी रोपे मरतात.

उपाय :

रोपांच्या मरण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी रोपे काढताना मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. रोपे काढल्यानंतर ५ ते ७ दिवसांत ती ढगाळ हवामानात अथवा संध्याकाळच्या वेळी लावावीत. रोप लावताना रोपाचा फक्त नारळच जमिनीत पुरावा. रोपे जमिनीत अति खोल अथवा उथळ लावू नयेत. रोपांची लागवड केल्यानंतर जर्मिनेटर १ लि. चे १०० लि. पाण्यात द्रावण तयार करून प्रत्येक रोपास ५०० मिली ते १ लि. द्रावणाचे ड्रेंचिंग (आळवणी) करावे. असे ड्रेंचिंग दर १ ते २ महिन्याच्या अंतराने २ -३ वेळा करावे. म्हणजे रोपांची वाढ जोमाने होते.

२) खोड पाझरणे : नारळाच्या झाडाच्या खोडावर भेगा पडतात आणि त्यामधून तपकिरी रंगाचा द्रव पाझरतो

उपाय:

या विकृतीचे नियंत्रण करण्यासाठी जमिनीतून पाण्याचा चांगला निचरा करून घ्यावा. रोगामुळे कुजलेला भाग खरवडून काढावा आणि उघड्या भागावर बोर्डो पेस्ट लावावी. झाडांना खताच्या योग्य मात्रा द्याव्यात. झाडाला पाण्याचा ताण पडू देऊ नये.

फळांची काढणी आणि उत्पादन :
नारळाच्या झाडाला फुलोरा आल्यापासून १२ महिन्यांनी त्याची फळे पक्क होतात. या वेळी फळाचा हिरवा रंग जाऊन पिवळसर तपकिरी रंग येतो. नारळाच्या तयार फळावर टिचकी मारल्यास खणखणीत आवाज येतो. घडातील सर्व फळे जवळजवळ एका वेळी तयार होतात. पाडेली झाडावर चढून कोयत्याने नारळाचा घोस कापून काढतो.

शहाळ्यासाठी नारळाची पहले ६ ते महिन्यांची असताना अथवा आवश्कतेनुसार काढतात. त्यावेळी फळात पाणी भरलेले असते.

नियमितपणे भरपूर फळे देणार्‍या नारळाच्या झाडाला साधारणपणे दर महिन्याला एक पुष्पगुच्छ म्हणजेच एक घड येतो. त्यानुसार दर महिन्याला साधारणपणे एक घड काढणीस येणे गृहीत असले तरी साधारणपणे वर्षाला नारळाच्या एका झाडाला कमीत कमी ५ ते ६ पुष्पगुच्छ येतात.

ठेंगण्या जातींना चौथ्या वर्षी आणि उंच जातींना ७ ते ८ व्या वर्षी फळे येण्यास सुरुवात होते. नारळाचे उत्पादनक्षम आयुष्य ठेंगण्या जातीत ४० ते ५० आणि उंच जातीत ७० ते ८० वर्षे असते.

महाराष्ट्रात नारळाचे सरासरी उत्पादन प्रत्येक झाडापासून वर्षाला ३० ते ४० नारळ फळे इतके मिळते. परंतु बागेची योग्य काळजी घेतल्यास, खत आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास आणि कीड व रोगांपासून संरक्षण केल्यास एका झाडापासून १०० ते १२५ किंवा त्याहूनही जास्त फळे मिळू शकतात.

Related Articles
more...