सिताफळाची यशस्वी लागवड

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


सिताफळ ( Annona Squamosa) हे दक्षिण विभागमध्ये याच नावाने तर उत्तर विभागामध्ये शरिफा या नावाने ओळखले जाते.

महाराष्ट्रमध्ये ह्या कोरडवाहू फळझाडाची लागवड जळगाव, बीड, दौलताबाद (औरंगाबाद), अहमदनगर नाशिक, सोलापूर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त व हलक्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात केली जाते.

वैशिष्ट्ये : सिताफळाचे झाड ४ ते ६ मीटर उंचीपर्यंत वाढणारे असून फळांचा आकार हृदयासारखा, संत्र्यापेक्षा मोठा असून फळाचे वजन १५० ते ३०० ग्रॅमपर्यंत असते. तसेच सिताफळाचे झाड काटक असून सिताफळाच्या पानामध्ये असणाऱ्या हायड्रोसायानिक आम्ल (HCN) या द्रव्यामुळे निसर्गामध्ये हे झाड झपाट्याने वाढत असते. जास्त पाण्याची गरज नसल्यामुळे कोरडवाहू भागांमध्ये हे उत्कृष्ट फळपीक असून हलक्या किंवा मुरमाड जमिनीत, पडीक जमिनीत किंवा वनीकरणाच्या जमिनीमध्ये याची लागवड फायदेशी ठरते.

महत्त्व : सिताफळ हे चवीला गोड असल्याने या फळांना ग्रामीण शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. गर मऊ, दुधाळ, रसाळ व मधूर फळ असते.

सिताफळामध्ये खालीलप्रमाणे घटकद्रव्ये असतात - पाणी - ७३.३%, प्रथिने - १.६%, खनिजे - ०.७%, पिष्टमय पदार्थ - २३.५% , चुना -०.२%, स्फुरद - ०.४७%, लोह -१.००%.

सिताफळांमध्ये जातीनुसार गराचे प्रमाण २८ ते ५५ टक्के व साखरेचे प्रमाण १८.१५% असते. सिताफळाच्या बियांपासून तेल काढून त्याचा उपयोग साबण निर्मितीत करतात.

औषधी उपयोग - सिताफळांमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म असून बर्‍याच पोटदुखीच्या विकारामध्ये या फळांचा उपयोग केल्यास निश्चितच फरक पडतो. सिताफळाच्या झाडांची पाने, साल, मुळ, बियाया सर्वाचाच उपयोग अनेक कारणांसाठी होत असल्याने सिताफळाची लागवड मोठ्या प्रमाणात करणे फायदेशीर आहे.

फळांचा उपयोग रक्तशुद्धीसाठी (टॉंनिक) म्हणून तसेच खोकला, सर्दी, पोटाचे विकार, पित्त, हगवण व क्षय रोगांस प्रतिबंधक म्हणून होतो. सिताफळापासून तयार केलेले सिताफळसव या औषधाचे सेवन वर्षभर नियमित केल्यास क्षयरोग व हगवणींचा विकार असलेल्या व्यक्तीस हमखास फरक पडतो. सिताफळाच्या झाडाच्या मुळांचा उपयोग शौचास त्रास किंवा व्यवस्थित होत नसल्यास केला जातो, तर पानांचा उपयोग मधुमेहाचा विकार असलेल्या व्यक्तिस साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी गुणकारी आहे.

जमीन व हवामान : सिताफळ हे गाळाच्या जमिनीत, पाण्याचा निचरा होणार्‍या जमिनीत किंवा लाल मुरमाड, हलक्या, खडकाळ, डोंगरकाठच्या जमिनीत, दगड गोटे असलेल्या जमिनीत देखील येते. भारी काळी व पाण्याचा निचरा न होणारी जमीन सिताफळाच्या लागवडीला अयोग्य आहे.

कोरडे व उष्ण हवामान सिताफळाच्या झाडांच्या व फळांच्या वाढीसाठी पोषक असून साधारणत: ५०० ते ७५० मि. मी. पाऊस पडणार्‍या भागांमध्ये उत्कृष्ट प्रकारे लागवड करता येते. अति दुष्काळ हानिकारक असतो. मोहोर, फुलोरा येणाऱ्या काळामध्ये कोरडी हवा आवश्यक असते. आर्द्र हवामान सिताफळास चालत नाही. कारण आर्द्र हवामानात पांढरी बुरशी डोळ्यांच्या बेचक्यांत तयार होऊन अळी पडते त्याचे नियंत्रण करणे अवधड आहे.

जाती :

१) लाल सिताफळ : या सिताफळाची झाडे कमी उंचीची असून पाने लहान असून मधली शीर जांभळट रंगाची असते. एका झाडापासून ५० ते ७५ फळे मिळतात. फळामध्ये बियांचे प्रमाण जास्त असून गर रंगाने गुलाबी व साधारण चवीचा असतो. फळ बाहेरून लालसर जांभळ्या रंगाचे दिसते. मुंबई मार्केटला गुजराती समाजाचे लोक या वाणाची खरेदी करतात. त्यमुळे बाजारभाव चांगला मिळत असल्याने थेट हैद्राबादहून ही फळे मुंबईला येतात.

२) बिटीश गियाना : उत्पादनाच्या दृष्टीने ह्या जातीच्या झाडांपासून फळे भरपूर मिळतात. फुलापासून फलधारणा जादा होते. फळे आकर्षक १७५ ते २०० ग्रॅम वजनाची असून आकार मध्यम असतो. फळांमध्ये गर कमी व बी जास्त असते.

३) मेमॉब : फळे लंबोळ्या आकाराची असून फळ फोडले असता फोडी रुंद, गोल असतात. चव, स्वाद अप्रतिम असल्याने तसेच बियांचे प्रमाण कमी असल्याने फळांना मागणी भरपूर आहे. एका झाडावर ८० ते १०० फळे लागतात. फळे दरवर्षी, नियमित लागतात. फळे वजनाने हलकी साधारण १८० ते १९० ग्रॅमची असतात.

४) वॉशिग्टन (१०७००५) : या वाणाची लागवड महाराष्ट्रात फारच कमी आहे. कर्नाटक, आंध्रप्रदेशात ह्या वाणाची झाडे पाहायला मिळतात. फळे आकाराने लहान १६५ ग्रॅम वजनाची असतात. गर लोण्यासारखा मऊ, पिवळसर छटा असलेला दिसतो.

५) बाळानगर : ही जात मुळची हैद्राबादजवळ बाळानगर भागातली. या वाणाच्या बियापासून रोपे महाराष्ट्रात १० ते १५ वर्षापासून शासनामार्फत वाटल्यामुळे बऱ्याच ठिकाणी बाळानगर वाणाच्याच सिताफळाच्या बागा दिसतात. ह्या फळाचा आकार मोठा, होळे मोठे आहेत. फळामध्ये बी कमी व गर जादा असतो. गराची चव अतिशय चांगली आहे. गरात साखरेचे प्रमाण साधारण असल्याने टिकाऊपणा जास्त आहे. प्रक्रिया उद्योगामध्ये ह्या वाणाचा गर वापरला जातो. इतर वाणांपेक्षा या सिताफळाला बाजारभाव चांगली मिळतो.

लागवड: सिताफळाच्या झाडांची लागवड मुख्यात्वे बियापासून रोपे तयार करून करतात. ताज्या फळातील काढलेल्या बिया लावल्यास उगवण होण्यास वेळ लागतो, परंतु बिया काढल्यानंतर काही महिन्यांनी लावल्यास तीस दिवसांमध्ये उगवण होते.

रोपे तयार करण्यासाठी सिताफळाच्या बिया ३ ते ४ दिवस गरम पाण्यात जर्मिनेटर बरोबर भिजवून गादी वाफ्यावर किंवा पॉलिथीनच्या पिशवीत लावाव्यात. बियांसाठी जर्मिनेटर औषधाचा उपयोग केल्यास बियांची उगवणशक्ती वाढून उगवण लवकर होते. तसेच मर होत नाही. ही तयार झालेली रोपे जर्मिनेटर मध्ये संपूर्ण बुडवून (२५ ते ३० मिली जर्मिनेटर + १ लि. पाणी या प्रमाणवर) चैत्र महिन्यात लावावीत. कारण चैत्र महिन्यात लावलेली रोपे चांगली येतात. वेळेत सिताफळास पालवी, पाने फुटत असल्याने पानगळ होत नाही व नांग्या पडत नाही.

जून - जुलै मधील लागवडीस फूट न होता पानगळ होते व एक वर्ष वाया जाते. चैत्रात केलेल्या बिया फाल्गून महिन्यात रुजवण्यासाठी अनुकूल असतात.

सिताफळाची झाडे ३ ते ४ महिन्याची झाल्यावर जून जुलैमध्ये खोडाभोवती जमिनीलगत गवताचे आच्छादन करून दगडगोटे एकावर एक रचून आळे तयार करावे. म्हणजे आच्छादनामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन ओलावा टिकविला जातो. तसेच खोडाभोवती गवत उगवत नाही. त्यामुळे झाडाला दिलेल्या खतापासूनची अन्नद्रव्ये फक्त झाडालाच उपयोगी येतात. दगडाचे आळे केल्यामुळे उन्हाळ्यातील उष्ण वारे खोडापासून वाहताना हवा दगडामधून गाळून गेल्याने उष्ण हवा थंड होते. त्यामुळे खोडाभोवती गारवा निर्माण होतो. त्यामुळे पाण्याची बचत होते. दुष्काळी भागातील फळपिकांसाठी हा प्रयोग उपयुक्त ठरवा.

झाडांची निरोगी, जोमदार वाढ होण्यासाठी पहिले ३ वर्षे बहार लागेपर्यंत दरवर्षी जून, जुलै, ऑगस्टमध्ये वर्षातून ३ वेळा सप्तामृत २५० मिली ते ५०० मिली आणि हार्मोनी १५० ते ३०० मिली १०० लिटर पाण्यातून फवारावे. सिताफळांच्या झाडांस डोळे भरून किंवा कलम करून देखील लागवड करतात. कलम केलेल्या झाडांना लवकर फळे लागतात.

प्रत्यक्ष लागवड: लागवडीसाठी जमिन पूर्व - पश्चिम निवडावी. एप्रिल - मे च्या सुमारास ६० x ६० x ६० सेंमी आकाराचे खड्डे घ्यावेत. जमिन हलकी, डोंगर उताराची असल्यास ४ x ४ मी. अंतरावर तर मध्यम जमिनीत ५ x ५ मी. अंतरावर खड्डे घेतल्यास हेक्टरी सरासरी ४०० झाडे बसतात.

खड्डा भरताना ३० ते ४० किलो शेणखत आणि ५०० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खतामध्ये ५० ग्रॅम प्रोटेक्टंट (आयुर्वेदिक औषध ) यांचे मिश्रण करून पोयटा -मातीसह भरावा.

खते : खते शक्यतो नैसर्गिक द्यावीत. खतांची जास्त मात्रा सिताफळाच्या झाडास लागत नसून झाडांच्या वाढीसाठी व अधिक उत्पादनासाठी ३ ते ४ घमेली शेणखत किंवा कंपोस्ट खत सिताफळाच्या प्रत्येक झाडास द्यावे. झाडाचे वय जसजसे वाढेल तसतसे खताचे प्रमाण वाढवावे. कल्पतरू सेंद्रिय खत २५० ग्रॅम प्रत्येक झाडास वापरणे उत्तम.

पाणी - सिताफळाच्या झाडांस जास्त पाण्याची आवश्यकता नसते. परंतु फळे पक्क होण्याच्या सुमारास एक दोन वेळेस पाणी फळाचा आकार व दर्जा वाढविण्यासाठी आवश्यक आहे.

सीताफळाची छाटणी का, केव्हा, कशी करावी ?

सिताफळाची छाटणी ही जानेवारी - फेब्रुवारी महिन्यात करावी. छाटणी करताना सुकलेल्या, तुरीच्या,सनकाडी, जाड उदबत्तीसारख्या काड्या आणि शेंड्याकडून मागे येऊन पेन्सीलच्या आकाराच्या फांद्या डोळ्याच्या वर १ सुतभर क्रॉस (सरळ नव्हे) छाटाव्यात, म्हणजे मार्च एप्रिलमध्ये फुलकळी लागते. फुलकळी ही चवीला गोड असल्याने तिला कीड लागण्याची शक्यता असते. तसेच उन्हाळ्यातील उष्णतेमुळे कळीचा देठ सुकतो आणि दक्षिणेकडील वाऱ्याने तो गळून पडतो. परिणामी माल कमी लागून उत्पादनात घट येते. त्यासठी सप्तामृतची फवारणी वेळापत्रकाप्रमाणे घेतल्याने कळी गळ होत नाही. तसेच फळे काळी पडणे अशापासून संरक्षण होते. शिवाय फळे भरपूर लागून, फळे मोठी, एकसारखी येऊन गरामध्ये गोडी वाढते. डोळ्यांचा आकार वाढून, डोळे ठळक, उठावदार दिसतात. त्यामुळे बाजारभाव चांगले मिळतात.

कीड - पिठ्या ढेकूण (मिली बग ) : ही कीड पाने, कोवळ्या फांद्या, कळ्या आणि कोवळी फळे यांतून रस शोषून घेते. त्यामुळे पानांचा व फळांचा आकार वेडावाकडा होतो. कळ्यांची आणि फळांची गळ होते. सिताफळाच्या फळांची वाढ होत असताना पृष्ठभागांच्या भेगांमध्ये किडीचा प्रादुर्भाव झाल्यास ही कीड फळातील रस शोषून घेते. अशा फळांना बाजारात किंमत मिळत नाही. पावसाळ्यात या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. या किडीच्या अंगावर लोकरी माव्यासारखे पांढरे आवरण असल्याने फवारणी केलेले औषध किडीपर्यंत पोहचत नाही.

नियंत्रण : जून - जुलै महिन्यात या किडीची पिले खोडावरून झाडावर चढतात. अशा वेळी १५ ते २० सेंटिमीटर रुंदीची प्लॅस्टिकची पट्टी घेऊन त्याला ग्रीस लावावे. हि पट्टी ग्रीस वरच्या बाजूला लावून सर्व्ह बाजूंनी बांधून घ्यावी, त्यामुळे खालून वर चढणारे किडे ग्रीसला चिकटून मरून जातात.

सप्तामृतातील प्रोटेक्टंटचा सुरूवातीपासून प्रतिबंधक उपाय म्हणून ( ५ ग्रॅम प्रती लिटर ) वापर करावा. म्हणजे ज्याप्रमाणे द्राक्षामध्ये, कापसामध्ये अपेक्षित रिझल्ट मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. त्याप्रमाणे सिताफळातील मिलीबग्जवरही त्याचा वापर करून निरीक्षणे आमच्या कृषी विज्ञान केंद्राला कळवावीत.

रोग :

१) सिताफळे कडक पडणे (स्टोन फ्रुटस) :

या विकृतीमध्ये सिताफळाच्या फळांची पूर्ण वाढ होत नाही. फळे आकाराने लहान राहतात., कडक होतात आणि त्यांचा रंग काळसर तपकिरी होतो. ही फळे, इतर फळांची काढणी पूर्ण होऊन झाड सुप्तावस्थेत गेल्यानंतरही झाडावर तशीच राहतात. फळवाढीच्या काळात ही फळे अन्नरसासाठी एकमेकांशी स्पर्धा करतात. त्यामुळे अन्नरसाचा तुटवडा भासणाऱ्या फळांमध्ये ही विकृती निर्माण होते.

२) सिताफळे काळी पडणे : सिताफळे ज्यावेळेस कैरीएवढी असतात या काळात जर हवेत आर्द्रता व संततधार पाऊस पडत असेल तेव्हा देठाजवळील खोलगट भागात पाणी साचून तेथील पेशी कुजू लागतात, बुरशी दिसते. याचे प्रमाण वाढत जाऊन सिताफळाचा बराचसा भाग काळा पडतो. प्रथमत: हे तपकिरी डागासारखे दिसून नंतर पूर्ण फळ काळे होऊ लागते. दुसरे कारण म्हणजे जर सिताफळाची बाग भारी काळ्या जमिनीत असेल. पाण्याचा निचर व्यवस्थित होत नसेल तेव्हा, तसेच बागेत स्वच्छता नसल्यास (तण वाढल्यास) हा प्रादुर्भाव होतो.

याकरिता मध्यम काळ्या, निचर्‍याच्या जमिनीत लागवड करावी. बाग तणमुक्त ठेवून बागेत स्वच्छता राखावी आणि फुलकळी अवस्थेपासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या नियमित फवारण्य कराव्यात. म्हणजेच बऱ्यापैकी प्रतिबंधक उपाय होतो. प्रादुर्भाव झाल्यानंतर वापर करावयाचा झाल्यास सप्तामृतातील क्रॉंपशाईनरचे प्रमाण वाढवून कॉपर ऑक्झीक्लोराईडचा वापर कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करावा.

सीताफळाच्या झाडांवर कीड व रोग न येता तसेच फुलगळ टाळण्यासाठी, फळांचा आकार मोठा व गरातील साखरेचे प्रमाण वाढून अधिक उत्पादन घेण्यासाठी खालीलप्रमाणे फवारण्य कराव्यात. १) पहिली फवारणी : (बहार धरतेवेळेस, पाणी सोडताना ) : ५०० मिली. जर्मिनेटर + ५०० मिली. थ्राईवर + ५०० मिली. क्रॉंपशाईनर + ५०० ग्रॅम प्रोटेक्टंट + ५०० मिली. प्रिझम + १५० मिली हार्मोनी + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (१५ ते ३० दिवसांनी) : ५०० ते ७५० थ्राईवर + ५०० ते ७५० मिली. क्रॉंपशाईनर + ५०० ग्रॅम प्रोटेक्टंट + ४०० मिली. प्रिझम + २५० मिली. न्युट्राटोन + २५० मिली. हार्मोनी + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : ( ४० ते ५० दिवसांनी ) : ७५० ते १ लि. थ्राईवर + ७५० मिली. ते १ लि. क्रॉंपशाईनर + ७५० मिली. राईपनर + ५०० ते ७५० ग्रॅम प्रोटेक्टंट + ७५० मिली. न्युट्राटोन + ३०० मिली हार्मोनी + १५० ते २०० लि.पाणी.

४) चौठी फवारणी : (६० ते ७५ दिवसांनी) : १.५ ते २ लि. थ्राईवर + २ लि. क्रॉंपशाईनर + १.५ लि. राईपनर + १.५ किलो प्रोटेक्टंट + १.५ लि. न्युट्राटोन + ५०० मिली हार्मोनी + ३०० लि. पाणी.

फळांची काढणी व उत्पादन : सिताफळाच्या कलमी झाडांना लागवडीनंतर चौथ्या वर्षी फळे लागतात, तर बियांपासून अभिवृद्धी केलेल्या झाडांना लागवडीनंतर सहाव्या वर्षापासून फळे लागतात. जसजसे झाडाचे वय वाढते तसतसे उत्पादनही वाढते. सर्वसाधारणपणे ६ ते ७ वर्षे वयाच्या झाडाला १०० ते १५० फळे येतात.

सिताफळाच्या झाडांना जून - जुलैमध्ये फुले येण्यास सुरुवात होते. फुले आल्यापासून फळे तयार होण्यास साधारणपणे ५ महिन्यांचा कालावधी लागतो. फळे सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये तयार होतात.

सिताफळाची योग्य वेळी काढणी करावी. पक्क सिताफळे झाडावर जास्त काळ राहू दिल्यास फळांना तडे पडतात आणि फळे कुजू लागतात. स्थानिक जातीच्या सिताफळाचे दोन प्रकार आढळतात. एका प्रकारच्या सिताफळाच्या पृष्ठभागावर भेगा आणि आतील गर पिवळसर रंगाचा असतो, तर दुसऱ्या प्रकारच्या सिताफळाच्या पृष्ठभागावर भेगा आणि गर पांढर्‍या रंगाचा असतो. यापैकी पिवळसर गर आलेले सिताफळ उत्कृष्ट समजले जाते. सिताफळाच्या फळांचे डोळे उघडून दोन डोळ्यांमधील भाग पिवळसर रंगाचा दिसू लागल्यावर फळे काढणीस तयार झाली असे समजावे. फळांची काढणी केल्यानंतर फळे ३ -४ दिवसांत नरम पडून खाण्यायोग्य होतात. सिताफळाची फळे नशावंत असल्यामुळे काढणीनंतर जास्त दिवस टिकत नाहीत. म्हणूनच काढणीनंतर शक्य तितक्या लवकर फळांची विक्री करावी.

मार्केट : सिताफळांस ग्रामीण व शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असून दूरच्या बाजारपेठेत पाठवितान मार्केटचा व्यवस्थित अंदाज घेऊन मगच झाडावरून फळे पक्क होण्याच्या थोडे अगोदर काढणी करून बाजारपेठेत ताबडतोब पाठवावी. कारण सिताफळ हे नाशवंत असल्याने जास्त दिवसे ठेवल्यास खराब होतात. मुंबई मार्केटमध्ये मोठ्या सिताफळास ७० ते १०० रू. ६ नग असा भाव मिळतो.

सिताफळाला दसरा दिवाळीत बाजारभाव कमी असतात. मात्र गौरी गणपती, महाशिवरात्रीला भाव चांगले असतात. मुंबई मार्केटला किंग साईज १ नंबर ४ ते ६ फळांना १०० ते १५० रू., २ नंबर १२ फळांना ८० ते ९० रू., ३ नंबर १५ ते १८ फळांना ४० ते ६० रू. ४ नंबर २४ ते ३० फळांना ३० ते ४० रू. दर मिळतो.

निर्यात : सिताफळाच्या निर्यातीस मध्य पूर्व युरोपीय देशांमध्ये, आखाती देशांत चांगले मार्केट असून जर्मनी, इंग्लंड देशामध्ये सिताफळ निर्यात होते.

चांगले सिताफळ कसे ओळखावे: सिताफळाचा आकर गोलाकार अंडाकृती व मोठा असल्यास डोळे व बिया भरपूर असल्यास अशा सिताफळांमध्ये गराचे प्रमाण कमी असते. तसेच लवकर खराब होतात. अशा सिताफळांना दूरच्या मार्केटमध्ये कमी भाव मिळतो.

सिताफळाचा आकार हृदयासारखा आणि डोळे व बिया कमी परंतु लांबट, मोठ्या असल्यास अशी सिताफळे जास्त दिवस टिकतात. तसेच गराचे प्रमाण जास्त असून चवीला मधूर, गोड असतात व अशा सिताफळांना मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. बाळानगरमध्ये अशा सिताफळांची लागवड मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे बाळानगर ह्याच नावाने ही जात संबोधली जाते. ह्या सिताफळाची लागवड बाळानगर, हैद्राबाद, संगारेड्डी, दौलताबाद, औरंगाबाद येथे मोठ्या प्रमाणात केली जाते.

काही वेड्यावाकड्या आकाराची फळे हिरवट रंगाची असून हे स्थानिक वाण परिंचे खंडाळा (सातारा ) डोंगरी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर असते. उकळत नसल्यामुळे तसेच अशा सिताफळांवर पांढरी बुरशी असते व त्यामध्ये अळी दिसते. त्यामुळे अशा फळांना मार्केटमध्ये कमी भाव मिळतो. सिताफळांच्या बियांचा आकार हा जाड, आखूड बोथट व रंग काळा किंवा करडा असल्यास गर भरपूर व अतिगोड, चिवट, घट्ट व सिलीकाचे प्रमाण जास्त असलेला तसेच अधिक शर्करायुक्त असून अशी सिताफळे आरोग्यवर्धक व बलवर्धक असतात. याउलट सिताफळांच्या बियांचा आकार लांबट असल्यास गर कातड्यासारखा चिवट व च्युईंगमसारखा चिकट, पातळ असतो, गराचे प्रमाण कमी असते, गर चवीस साधारण असतो. रासायनिक खते व किटकनाशके यांचा दुष्परिणाम जमिनीत व मानवास आज जाणवत आहेतच व काही काळानंतर ह्या रासायनिक खते व किटकनाशके यांच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्यांना तोंड देणे अवघड होणार आहे. याची काही प्रगतीशील शेतकऱ्यांना जाणीव होऊन नैसर्गिक शेतीचा यशस्वी प्रयोग करू लागले आहेत. नैसर्गिक, आयुर्वेदिक वनस्पतीजन्य किटकनाशके नामवंत शास्त्रज्ञांनी निर्माण केली आहेत. निरनिराळ्या उपयुक्त वनस्पतींपासून आपण विविध किटकनाशके निर्माण करू शकलो तर ते नक्कीच मानवाला वरदान ठरणारे आहे.

महत्त्वाचे : सिताफळांच्या पानांपासून व बियांपासून किफायतशीर नैसर्गिक किटकनाशक तयार करता येईल का ते प्रत्यक्ष प्रयोग करून पहावे. स्त्रियांच्या केसातील उवा, लिखा घालविण्यासाठी सिताफळांच्या पानांचा व बियांचा ठेचून केलेला काढा हे प्रभावी उवानाशक महणून सिद्ध झालेले आहे. याला निर्यातयोग्य मार्केट आफ्रिकेसारख्या उष्ण प्रदेशातील देशांमध्ये मिळू शकेल. तसेच याचा ढेकून, कोळी (माईटस) यावर उपाय करता येईल का ? यावरती संशोधन होणे शक्य आहे.