डाळींब फळझाडाचा बहार कसा धरावा ?

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर



अनेकदा डाळींबास कितव्या वर्षी फळे धरावीत हे शेतकऱ्यांना माहित नसते. म्हणजेच फळझाड लावल्यानंतर कितव्या वर्षी फळे घेण्यास सुरुवात करावी याची माहिती असणे जरूरीचे आहे. लागवडीनंतर पहिल्या २- ३ वर्षात झाडांची वाढ चांगली होण्याच्या दृष्टीने या काळात फळे धरू नयेत. या झाडावर येणारी फळे वेळीच काढून टाकावीत. सर्व साधारण झाडे ३ - ४ वर्षाची झाल्यावर नियमीत बहार धरावा.

डाळींबास आपल्या हवामानात कमी जास्त प्रमाणात वर्षभर फुले येतात. जानेवारी, जून आणि ऑक्टोबर महिन्यात फुले लागण्याचे प्रमाण जास्त असते. जानेवारी महिन्यात लागणार्‍या फुलांना आंबे बहार म्हणतात. कारण याच महिन्यात आंब्यासही मोहोर येतो. जून महिन्यात येणार्‍या बहारास मृग बहार म्हणतात. कारण या काळात मृग नक्षत्र सुरू होते. आणि ऑक्टोबर महिन्यात येणार्‍या बहारास हस्त बहार म्हणतात कारण त्यावेळी पावसाचे हस्त नक्षत्र असते.

डाळींब उत्पादनासाठी त्याचा बहार धरणे ही क्रिया फार महत्त्वाची असते. डाळींबाची फुले ही मागील हंगामातील पक्व काडीवर येतात. या काडीचे पोषण व्यवस्थित होणे गरजेचे असते. या फुटीवरील पाने अन्न तयार करून काडीत साठवितात. फुले येण्याचा जेव्हा हंगाम असतो त्याच काळात झाडावर नवीन पालवी येते. काड्यात, फांद्यात आणि खोडात ज्या प्रमाणात अन्नसाठा असतो त्यानुसार नवीन फुटीचे साधारण तीन प्रकार पडतात. एक पालवीसह फुले येणे, दुसरा नुसती फुले येणे आणि तिसरा नुसती पालवी येणे होय. म्हणजेच अन्नसाठा जर फारच कमी असेल तर येणारी नवीन फुट फक्त्त पालवीच असते. म्हणजेच फुले नसतात. असलीतरी ती फार कमी प्रमाणात असतात. अन्नसाठा मध्यम स्वरूपाचा असेल तर पालवी आणि फुले सारख्या प्रमाणात लागतात. आणि जेव्हा अन्नसाठा मोठ्या प्रमाणात असतो तेव्हा फुले भरपूर लागतात त्या मानाने पालवी कमी असते.

खोडात अन्न साठविण्याच्या प्रक्रियेस सी: एन रेशो असे म्हणतात. सी म्हणजे कर्बो हायड्रेटस आणि एन म्हणजे नायट्रोजन (नत्र) होय. खोडांमध्ये यांचे प्रमाण खालील गटात मोडते.

१) C : n =भरपूर कर्बोदके व अल्प नत्र

२) c: N = अल्प कर्बोदके व भरपूर नत्र

३) c : n= अल्प कर्बोदके व अल्प नत्र

४) C : N = भरपूर कर्बोदके व भरपूर नत्र

या गटापैकी पहिल्या गटातील स्थिती असल्यास कोणत्याही बहाराची भरपूर फुले निघतात. त्यामानाने पालवी कमी असते. झाडावर फळांची संख्या पुष्कळ असून फळे झुपाक्यात लागतात एका झुपाक्यात ३ ते ४ फळे लागण्याचे प्रमाण अधिक असते. मात्र फळे आकाराने मोठी वाढत नाहीत. जोड फळातील काही फळांची विरळणी करून मोजकी फळे ठेवली तरी राखून ठेवलेल्या फळांचा आकार वाढत नाही. उत्पादन कमी निघते. याचा दुसरा परिणाम असा होता की, पुढील बहार उशिराने निघतो, कमी फुले लागतात, फुले येण्याचा कालावधी वाढतो आणि दुसर्‍या हंगामातही उत्पादन कमी निघते. लागोपाठ दोन हंगामात उत्पादन कमी निघाल्यामुळे एकूण नुकसान वाढते.

यातील दुसर्‍या गटाची अवस्था असेल तर बहार धरताच लवकर पालवी येते, पालवी जोमदार वाढते, फुले उशिराने लागतात, फुलगळ अधिक होते. फळांची संख्या कमी असते. फळांची संख्या कमी असूनही त्यांचा आकार लहान राहतो. उपलब्ध अन्नसाठा पालवी वाढण्याकडे खर्च होतो आणि फळांचे पोषण अपूर्ण राहते. अशा वेळी फळे रोगांना लवकर बळी पडतात. त्यांची गुणवत्ता कमी दर्जाची असते. अशा परिस्थितीनंतर येणारा दुसरा बहार मात्र चांगला येतो.

तिसर्‍या गटाची अवस्था तर फारच हानिकारक ठरते. साठीव अन्न आणि नत्र यांचे प्रमाण अल्प असल्यामुळे पालवी खुरटते, फळे कमी व लहान राहतात आणि एकूण झाडाची अवस्था खुरटलेली दिसते. अशी अवस्था सुधारणे अवघड आणि खर्चिक जाते.

डाळींब झाडांची चौथ्या गटातील अवस्था योग्य समजली जाते. या अवस्थेत भरपूर अन्नसाठा आणि त्यास समतोल असे नत्र असल्यामुळे फुले आणि पालवी भरपूर येते. फळधारणा चांगली होत असल्यामुळे फळांची संख्याही भरपूर येते आणि त्याचबरोबर पालवी चांगली असल्यामुळे फळे मोठी होतात. फळांची गुणवत्ता वाढविणे सोपे पडते. या बहाराची फळे वेळेवर तयार होतात आणि पुढच्या बहारावरही विपरीत परिणाम होत नाही.

बहार धरतानाया चार अवस्थांपैकी चौथी अवस्था असणे हे फायदेशीर ठरते, तथापि ही अवस्था आपोआप अथवा नैसर्गिकरीत्या घडून येईल असे मात्र नाही. आणि ती तशी घडवून आणणे कोणत्याही बहाराचा पाया आहे हे ध्यानात घ्यावे.

नैसर्गिकरित्या वर्षभरात ३ वेळा बहार येतो. तथापि योग्य अवस्था कोणत्या बहारासाठी आहे त्यासाठी खालील तीन बाबींचा विचार करूनच बहार धरण्याची प्रक्रिया सुरू करावी.

१) बाजारपेठेतील मागणी : डाळींबाच्या फळांना कोणत्या काळात आणि कोणत्या बाजारपेठेतून मागणी असते याचा प्रथम विचार करावा, म्हणजे त्यानुसार बहार धरणे सोईचे ठरेल.

२) हवामान : हिवाळा उन्हाळा आणि पावसाळा हे तीन हंगाम आपल्याकडे आहेत. हिवाळ्यातील कडक थंडी उन्हाळ्यातील उच्च तापमान आणि पावसाळ्यातील अधिक आर्द्रता यांचे संभाव्य परिणाम लक्षात घेऊन बहाराची निवड करावी.

३) पाण्याची उपलब्धता : डाळींब हे काटक वर्गातील फळझाड असले तरी बहार काळात पाण्याची गरज असते. जास्त पाणी मात्र या फळास घातक ठरते. पाणी टंचाई आहे काय ? ती कधी आणि किती प्रमाणात आहे, याचा विचार करून बहाराची निवड करावी.

एकदा बहाराची निवड केल्यानंतर त्यात बदल करू नये. निदान ५ वर्षांसाठी तरी बहार धरण्याचा कार्यक्रम पक्का करावा.

बहार धरण्यासाठी करावयाचे उपाय :

नैसर्गिक बाबींचा विचार करून इच्छित वेळेस फुले आपणे म्हणजे बहर धरणे होय. पण हा अर्थ फारच ढोबळमनाने वापरला जातो. बहार धरायचा म्हणजे, बागेचे पाणी तोडायचे, जमिनीची मशागत करायची आणि खाते घालून पाणी द्यायचे. या प्रत्येक बाबींचा कार्यकारणभाव काय असतो याचा विचार सहसा केला जात नाही. बहारापुर्वी बागेचे पाणी तोडायचे याचे कारण शेंडावाढ व पानेवाढ थांबवायची, म्हणजे नवीन वाढ होण्यासाठी जे अन्न खर्ची पडते, ते वाचवून खोड- फांद्यात साठवून ठेवायचे. मशागत करण्याचाही तोच मुख्य उद्देश की जेणेकरून तंतुमुळे तुटून त्यांचे कार्य बंद पडेल. पाणी तोडून मशागत केली की पानगळ होते. ज्यावेळी वर्षातून

एकच ठराविक बहार घेतला जातो. त्यावेळी अशी पानगळ होण्यापुर्वीच झाडाच्या खोडात - फांद्यात पुरेसे अन्न साठवलेले असते आणि त्यामुळे बहाराची फुले निघण्यास अडचण पडत नाही. पहिल्या बहारानंतर दुसरा बहार धरण्यापुर्वी खोड फांद्यात पुरेसे अन्न साठले पाहिजे म्हणजे दुसरा बहार घेणे सुलभ होते. या प्रक्रियेत महत्त्वाची बाब म्हणजे पानगळ होणे ही होय. बहार धरताना झाडावरील नैसर्गिक पानगळ म्हणजे खोड- फांद्यात पुरेसे अन्न साठले आहे याची खूणच होय.

डाळींब झाडावर नवीन पालवी येते तेव्हा तिचा रंग पिवळसर तांबूस असतो. पालवी गर्द हिरव्या रंगाची व्हायला १५ - २० दिवस लागतात. त्यानंतर पानांचे कार्य जोमाने सुरू होते. कर्बग्रहणाची ही क्रिया सुमारे ६ आठवडे चालली की तेवढ्या अवधीत भरपूर अन्न तयार होते. अन्न साठविण्याची क्रिया पूर्ण होत आली की पानगळ व्हायला सुरुवात होते. हवामानानुसार पूर्ण पानगळ व्हायला २ ते ३ आठवडे लागतात. याचा अर्थ असा की, नवीन पालवी येऊन तिचे कार्य पूर्ण होऊन परत पानगळ व्हायला अशा एकूण कालावधी १० ते १२ आठवडे (७० ते ८४ दिवस) एवढा लागतो.

पावसाळ्यात पालवी लवकर निघते पण ती पक्क अवस्थेत यायल उशीर लागतो. पानांची कार्यक्षमता ढगाळ हवामानामुळे कमी होते आणि याचा परिणाम म्हणून हस्त बहार येण्यात अडचणी निर्माण होतात. हिवाळ्यामध्ये कडक थंडीच्या प्रभावामुळे पालवी जोमदार निघत नाही. पण पानांची कार्यक्षमता चांगली राहिल्यामुळे आंबेबहार चांगला निघतो. उन्हाळ्यात जी पालवी निघते ती जोमदार असते. कडक उन्हाळ्यात आणि पाणी टंचाई काळात पानांचे कार्य व्यवस्थित होऊनही अन्नसाठा भरपूर प्रमाणात साठत नाही. त्याचा परिणाम म्हणून मृग बहार उशिराने निघतो. पालवी येणे. ती तयार होणे आणि नंतर पानगळ होणे या तीन अवस्थांचा मेळ बसणे मूळत: आवश्यक आहे. यापैकी कोणत्याही एका बाबीत कमतरता राहिली तरी पुढील बहारावर विपरीत परिणाम होतो. ज्यावेळी संजीवकांचा अथवा रासायनिक द्रव्यांचा वापर करून पानगळ केली जाते त्यावेळी खात्रीचा बहार येण्यास अडचण पडते. जोमदार पाने कार्यरत असतानाच कृत्रिम उपचाराने पानगळ केली तर अन्नसाठा अपुरा राहतो आणो त्याचा परिणाम म्हणून बहार उशिराने आणि कमी प्रमाणात निघतो. फुले येण्याची क्रिया बरेच दिवस चालू राहते. शिवाय फुलगळीचे प्रमाणही वाढते. यावर उपाय म्हणजे पानगळ करून घेण्यापूर्वी खोडा - फांद्यात पुरेसा अन्नसाठा झाला किंवा नाही याचा विचार करायला हवा. नसेल तर तो करून घ्यायला हवा.

कमी कालावधीत पुरेसा अन्नसाठा करण्यासाठी दोन प्रकारची कामे करावीत. एक म्हणजे नवीन पालवी लवकर हिरवीगार होण्यासाठी पंचामृत फवारणी वेळापत्रकाप्रमाणे करावी म्हणजे पानांची कर्बग्रहणाची क्षमता वाढते. नवीन पालवी, पानांची कार्यक्षमता आणि पानगळ या तिन्ही अवस्थेत पंचामृत औषधांचा वापर केल्याने सुलभ ठरते. या तिन्ही अवस्था नैसर्गिकरीत्या पूर्ण होऊ शकल्या नाही तर अशा वेळी या फवारणीचा उपयोग होतो. ज्यावेळी हुकमी बहार घेऊन खात्रीचे उत्पादन घ्यायचे असते तेव्हा केवळ नैसर्गिक परिस्थितीवर विसंबून कार्यभाग साधत नाही. हा उपचार करताना पाणी तोडणे. मशागत करणे आणि पानगळ करणे म्हाणजे बहाराची पूर्व तयारी झाली, असे समजणे योग्य नाही तर मूळ तत्त्व समजून घेतले पाहिजे आणि त्याची हवामानाशी सांगडही घातली पाहिजे.