डाळींबावरील सुत्रकृमीचे जैविक नियंत्रण

प्रा. डॉ. वि.सु. बावसकरगेल्या २ - ३ वर्षापासून पाऊसमान अनियमित व कमी प्रमाणात होत असल्यामुळे डाळींबाच्या बागा कमी होत आहेत. डाळींब हे काटक फळझाड असून त्यास कोरडे हवामान व हलकी जमीन मानवत असल्यामुळे कमी पाण्यावर, ठिबकवर सुद्धा वाल्ह्या (पुरंदर) सारख्या दुष्काळी भागात लागवडी वाढू लागल्या आहेत. तसेच डाळींबासाठी मुरमाड, हलक्या प्रतीची, चांगल्या पाण्याचा निचरा होणारी जमीन मानवत असल्यामुळे सांगोल्यासारख्या भागातून डाळींबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे आणि नवीन लागवडीही वाढू लागल्या आहेत.

अशा ह्या काटक फळझाडास सूत्रकृमीचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. जमिनीत ओलाव्याचे प्रमाण जास्त असल्यास आणि बागेमध्ये गवत किंवा इतर काडीकचर असल्यास याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. हे सुत्रकृमी धाग्यासारखे ०.२ ते ०.५ इतके लांब असून डोळ्यांना दिसत नाहीत.

सुत्रकृमीची ओळख -

मादी सुत्रकृमी ही आकाराने चंबूसारखी गोल असून ०.५० ते ०.७२ मिमी. असते. ती मुळाच्या अंतर्गत भागात राहून तोंडातील अतिसुक्ष्म पण तीक्ष्ण सुईसारख्या अवयवाने मुळांतील अन्नरस शोषून घेते. नराची लांबी १.१० ते १.१५ मिमी असून आकाराने लांब असतो. नराचे प्रमाण मादीपेक्षा कमी असून पाजोत्पादनाचे काम झाल्यावर लगेच मरतात. त्यामुळे त्याचा प्रादुर्भाव झाडांना होत नाही.

सुत्रमीच जीवनक्रम -

मुळाच्या पृष्ठभागावर मादी २०० ते २५० अंडी पुंजक्याने घालते. अंडी उबवल्यानंतर २- ३ दिवसांनी अळी बाहेर पडून ती अतीलहान मुळामध्ये शिरून अन्नरस शोषते. ही अळी दुसर्‍या अवस्थेतील असणे. पहिली अवस्था अळी उबविण्यापुर्वी अंड्यामध्येच पूर्ण होते. २२ ते २५ दिवसात ४ वेळा कात टाकते. (अंड्यातील कात धरून) या काळातील अंळी सुरुवातीला धाग्यासारखी दिसते. नंतर हळूहळू मोठी होऊन फुगते आणि शेवटी चंबूसारखी गोल दिसते. २५ ते ३० दिवसात जिवनक्रम पूर्ण होतो. २५ डी सें. तापमान व ६० ते ७५ % आर्द्रतेत सुत्रकृमीची वाढ होते.

सुत्रकृमीपासून होणारे नुकसान -

सुत्रकृमी आपल्या सुईसारख्या अवयवाने डाळींबाच्या अतिलहान मुळातील अन्नरस शोषून घेते. त्यामुळे मुळावर गाठी तयार होऊन झाडाची वाढ खुंटते पाने पिवळी पडून, फुले व फळे गळतात. त्यामुळे उत्पन्नात घट येते. तसेच सुत्रकृमी ने इजा केल्याने बुरशी रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.

डेगर सुत्रकृमी -

सुत्रकृमीच्या तोंडातील सुईसारखा अवयव भाल्यासारखा लांबट असल्यामुळे त्याला डेगर सुत्रकृमी म्हणतात. ह्या सुत्रक्रुमिच प्रादुर्भाव मुळावर होतो. हे सुत्रकृमी अंडी जमिनीलगत घालतात. त्यामुळे ते मुळाच्या बाहेर राहतात. पहिल्या अवस्थेतील अळी अंड्याबाहेर पडल्यानंतर पुन्हा तीन वेळा कात टाकून पूर्ण अवस्थेतील सुत्रकृमी तयार होते.

सुत्रकृमीचे जैविक नियंत्रण -

सुत्रकृमीचे नियंत्रण जैविक पद्धतीने करता येऊ शकते. त्यासाठी बागेतील तण वाढू देऊ नये. बाग स्वच्छ ठेवावी. म्हणजेच आंतर मशागतीची कामे करावीत. तसेच सुत्रकृमी असणार्‍या भागात तसेच बांधाने झेंडूची लागवड केल्यास सुत्रकृमीचा त्रास कमी होतो. तसेच ही फुले दसरा दिवाळीस विकून पैसे करता येतात. डाळींबास सेंद्रिय व भरखते देताना प्रत्येक झाडास १ / २ ते १ किली करंज, निंबोळी, एरंडी अशा अखाद्य कडू पेंडीचा वापर गरजेनुसार डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी कृषी विज्ञान केंद्राचे सल्ल्यानुसार करावा.