७२१ डाळींब झाडांपासून (सर्व खर्च १।। लाख) जागेवर ५।। लाख

श्री. भास्करराव राघो जाधव,
मु.पो. उभंड, ता.जि. घुळे,
मोबा. ९३७२१७६७९३



आमच्याकडे भगवा डाळींबाची ७२१ झाडे २ एकर लाल - तांबड्या प्रतीच्या जमिनीत १२' x १०' वर मार्च २०१२ ला लावलेली आहेत. या झाडांना लागवडीनंतर शेणखत आणि रासायनिक खते देऊन बहार घराण्यायोग्य झाडे तयार केली. किटकनाशके, बुरशीनाशकांच्या फवारण्या गरजेनुसार करत होतो.

गेल्यावर्षी १५ जुलै २०१३ ते १५ ऑगस्ट १३ पर्यंत बागेला ताण दिला. त्यानंतर लगेच छाटणी करून शेणखत ७ ट्रोली, युरीया ५ बॅगा, डी.ए.पी. १४ बॅगा खत दिले आणि पाणी सोडले.

माझे वय ६९ असून मी बँकेतून निवृत्त झालो आहे. मुलगा नोकरी करतो. तो डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या वेळापत्रकाप्रमाणे सटाणा सेंटरवरून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे आणून देतो व मजुरांकडून त्याचा वापर केला जातो.

सुरूवातीला लागलेल्या कळीचा बहार धरताना पाऊस असल्याने कळी मागे - पुढे लागली. सुरूवातीला थोडीच कळी लागली. नात्णार शेंड्याला जादा कळी लागली. तिही धरली. झाडावर सुरूवातीला १० - १५ फळे लागली. नंतर २ महिन्याच्या काळानंतर शेंड्याला भरपूर कळी लागून ५० - ६० फळे लागली.

फेब्रुवारी - मार्च २०१४ ला माल काढला. फळांचा आकार २५० ते ३०० ग्रॅमचा मिळाला. ५०० ग्रॅमचा माल २०% निघाला. पहिले वर्षे असूनदेखील उत्पन्न चांगले मिळाले. सुरूवातीला लागलेल्या कळीपासून सव्वा दोन टन माल निघाला. जागेवरून व्यापाऱ्यांनी सव्वा २ टनाला ९८ रू. भाव दिला. नंतर लागलेल्या कळीपासून ७ टन माल निघाला. तो भाव कमी झाल्यावर म्हणजे मे २०१४ मध्ये निघाला. जागेवरून त्यातील काही ६१ रू. ने तर काही ५० रू. मी गेला. ७२१ झाडांपासून पहिल्या बहारापासून ५.५० लाख रू. झाले. यासाठी बहार धरल्यापासून १।। लाख रू. खर्च आला. यामध्ये खते, औषधे, मजुरी सर्व खर्च धरला आहे.

आता १५ सप्टेंबर २०१४ ला दुसऱ्या बहारासाठी पानगळ करून बोर्डो फवारले. २८ ऑकटोबर २०१४ ला पाणी सोडले आहे. या बहारालादेखील आम्ही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच वापरत आहे.