नोकरी करून 'सिद्धीविनायक' शेवग्याने दिला ३५ हजार रू. बोनस

श्री. गंगाधर रामभाऊ सुकरे,
मु.पो. वडगाव, ता. जि. परभणी,
मो : ७७९८१४०३१६



मी पेगरगव्हाप येथे जि. प. प्राथमिक शाळेत शिपाई आहे. आमच्या शाळेतील एक मित्राच्या केकरजवळा, ता. पाथरी येथील पाहुण्यांनी शेवगा लावला आहे व त्यापासून चांगले उत्पादन मिळत असल्याचे सांगितले. त्यावरून मी तो प्लॉट पाहण्यास गेलो तेव्हा त्या प्लॉट मधील झाडे शेंगांनी लगडलेली पाहून आश्चर्यचकित झालो. मी त्या शेतकऱ्याला विचारले, कोणत्या जातीचे बी लावले आहे. तर तो शेतकरी या शेवग्याबद्दल काहीच माहिती सांगेना. म्ह्णून तेथूनच मी मित्राला फोन लावून सांगितले, तुमचे पाहुणे तर कुठलीच माहिती देत नाहीत. त्यानंतर त्यांनी पाहुण्यांना माहिती देण्यास सांगितल्यावर त्यांनी हा 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवगा आहे असे सांगितले. त्यानंतर परभणी येथे बऱ्याच कृषी सेवा केंद्रात बियाची चौकशी केली तेव्हा तिरूमल अॅग्रो डेव्हलपर्स येथे मला 'सिद्धीविनायक' शेवग्याचे बी मिळाले. तेथून बी आणि जर्मिनेटर नेले.

प्रथम त्याची रोपे तयार करून मग १६ जानेवारी २०१५ रोजी ८ x ८ फुटावर २० गुंठ्यात लागवड केली. जमीन मध्यम प्रतिची आहे. वेळच्यावेळी सप्तामृत फवारण्या करत होतो. तसेच छाटणी २।। ते ३ फुटावरून सुरुवातीला केली. ५।। महिन्यात शेंगा घरी खाण्यासाठी मिळू लागल्या. त्यानंतर सुरुवातीला पाहुण्यांना, मित्रांना भेट दिल्या. पुढे ६ महिन्यांनी माल वाढल्यावर दररोज ३५ ते ४० किलो शेंगा मिळू लागल्या. शेंगांची तोडणी घरची मंडळी करीत असत व त्या शेंगा घेऊन गड्याला परभणीला संध्याकाळी ५ वाजता बोलवित असे. मी ५ वाजेपर्यंत शाळेची ड्युटी करून नंतर परभणीतील काळीकमान या ठिकाणी नोकरदार वर्ग आहे तेथे स्वत: हातविक्रीने शेंगा विकत होतो. १० ते १५ रू. पाव किलो दराने पावशेर, अर्धा किलो अशी दररोज ३५ ते ४० किलो शेंग खपत होती. शेंग २ ते २।। फुट लांबीची मासाळू, हिरवीगार तसेच अतिशय चवदार असल्याने गिऱ्हाईक आवर्जुन आपल्याकडीलच शेंगा घेत. येथील गिऱ्हाईक अच्चभ्रू असल्याने त्यांना वस्तू महाग असली तरी चालते, मात्र दर्जा उत्तम लागतो. आपल्या शेंगा उच्च प्रतिच्या असल्यामुळे आपला माल संपत आला तरी इतरांच्या शेंगा विक्री सुरू होत नसे. त्यामुळे सुरुवातीला तेथील स्थानिक विक्रेते मला तेथे शेंगा विकू देईनात. मग तेथीलच एका मित्राच्या ओळखीने पुन्हा जागा मिळविली.

अशा प्रकारे १।। महिना दररोज ३५ ते ४० किलो शेंगा ४० ते ६० रू. ने विकल्या. तर या २० गुंठ्यातील शेवग्यापासून ३५ हजार रू. निव्वळ नफा मिळाला. आता या शेवग्याची छाटणी करून नवीन फुटवे निघाले आहेत. त्याची वाढही चांगली आहे. तो साधारण डिसेंबर - जानेवारीत (२०१६) पुन्हा चालू होईल. या अनुभवातून अजून १।। एकर नवीन लागवड केली आहे. त्यामध्ये १०० % उगवण होऊन रोपे १।। फुटाची झाली आहेत.