द्राक्षाला लागणारी अन्नद्रव्ये अशी उपलब्ध करावीत

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


अन्नद्रव्यांची कार्यक्षमता ही जमिनीवर तसेच द्राक्षाला दिले जाणारे कमी किंवा जास्त पाणी यावर अवलंबून असते. इतर पिकांप्रमाणे द्राक्षाला अंदाजे दिलेल्या खताचा उपयोग होत नाही. द्राक्षाची अन्नद्रव्ये ग्रहण करण्याची शक्ती फारच कमी आहे आणि दिवसेंदिवस खतांच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे केवळ अंदाजाने खते देणे द्राक्षाला टाळावे. त्यामुळे या मुलद्रव्यांची कार्यक्षमता पुढीलप्रमाणे वाढवावी.

नत्र : द्रक्षवेलीच्या वाढीसाठी नत्र महत्त्वाचे कार्य करते. जमिनीमध्ये नत्र व कार्बनचे प्रमाण बिघडले तर बरीचशी अन्नद्रव्ये द्राक्षवेलीला उपलब्ध होऊ शकत नाहीत. जेव्हा आपण नत्रयुक्त खतांचा वापर करतो त्यापैकी फक्त २० - ४० % नत्रच द्राक्षवेलीला उपलब्ध होत असते बाकीचे एकतर जमिनीत पाण्याद्वारे वाहून जाऊ शकते व बाकीचे तण आपल्यासाठी वापर करते.

नत्रयुक्त खतांची कार्यक्षमता वाढवायची असेल तर सर्वप्रथम ते द्राक्षवेलीच्या गरजेनुसार वापरावे. अन्यथा जास्त झालेले नत्र जमिनीत पाण्याबरोबर वाहून (८ ते १५% ) जाते. नत्रयुक्त खते ही विभागूनच द्यावी लागतात. नत्रयुक्त खतांचा वापर करण्यासाठी आपली जमीन उदासीन ते आम्लयुक्त असावी. जेणेकरून त्याची कार्यक्षमता वाढेल. तसेच नत्र युक्त खतांचा वापर करताना ती जमिनीत मिसळली जावीत, जेणेकरून ४ ते ६ दिवसात आपल्याला त्याचा परिणाम दिसून येतो. तसेच आम्लयुक्त नत्र खते उदा. युरिया, अमोनियम सल्फेट ऑक्टोबर छाटणीनंतर द्यावेत. त्याचा चांगल परिणाम हा द्रक्षवेलीची चांगली वाढ, घडांचा आकार व मण्यांचा आकार व्यवस्थित होण्यासाठी होतो. नत्रयुक्त खतांचा वापर पृष्ठभागावर टाकून करू नये, नाहीतर बाष्पी भवन (५ ते ७%) होऊन खत वाया जाते. टाकलेल्या नत्रयुक्त खतापैकी जवळ - जवळ २५ ते ३५ टक्के खत तण शोषून घेते,

त्यमुळे द्राक्षबागेतील तणांचा बेंदोबस्त करणे अतिशय गरजेचे आहे. तसेच पाणी व्यवस्थापन देखील नत्रयुक्त खतांची कार्य क्षमता वाढविण्यासाठी महत्त्वाचे आहे. द्राक्षवेलीला नत्रयुक्त खत दिल्यानंतर जास्त पाणी देणे टाळावे. जेणेकरून खतांचा द्राक्षवेलीच्या योग्य फायदा होईल. जर ऑक्टोबर छाटणीनंतर द्राक्षवेलीच्या फुटीसाठी पाणी द्यावयाचे असेल तर नत्रयुक्त खतांचा वापर पाणी दिल्यानंतर करावा. जेणेकरून नत्र द्राक्षवेलीला योग्य प्रमाणात उपलब्ध होईल, तसेच नत्राची पानांवरती फवारणी १- २ ग्रॅम युरिया प्रति लिटर या प्रमाणात ऑक्टोबर छाटणीच्या वेळेस करावी. नत्र द्राक्षाला सेंद्रिय खातांद्वारेच द्यावे. कारण सेंद्रिय नत्रयुक्त खतातील नत्र द्राक्षाला हळूहळू प्रमाणात उपलब्ध होते. रासायनिक खतातील नत्र द्राक्षाला लगेच उपलब्ध करून देतात. त्यामुळे एकतर नत्र वाया जाते किंवा विपरीत परिणाम द्राक्षावरती दिसून येतो. खरड छाटणीनंतर रासायनिक खते वापरली तर चालू शकतात परंतु ऑक्टोबर छाटणीनंतर नत्रयुक्त रासायनिक खतांचा अती वापर टाळावा.

स्फुरद : द्राक्षपिकास स्फुरादाचे कार्य घड निर्मितीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे आणि वाढीच्या काळात त्याची निरनिराळ्या कारणासाठी गरजा असते. हरीतद्रव्यांची निर्मिती, न्युक्लिक आम्लांचे संश्लेषण यासाठी स्फुरदाची गरज असते. जमिनीमध्ये स्फुरदाची कार्यक्षमता अतिशय कमी (५- १०%) आहे. स्फुरद जर सेंद्रिय खताबरोबर दिले तर १५ - २० टक्के ते वनस्पतीला उपलब्ध होते. स्फुरदाचे जवळजवळ ६० - ८० टक्के स्थिरीकरण जमिनीमध्ये होते. जमिनीमध्ये विनियम कॅल्शियमचे प्रमाण जास्त असेल तर ते स्फूरदबरोबर संयोग पाहून प्रथम मोनोकॅल्शियम फॉस्फेट तयार होते हे वनस्पतीला उपलब्ध होते. कारण हे पानाय्त विद्राव्य आहे. त्यानंतर मोनो कॅल्शियम फॉस्फेटचा (H2PO4 ) डाय केल्शियम (H2PO4 ) व ट्रायकेल्शियम फॉस्फेटमध्ये (PO4) रूपांतर होते जे वनस्पतींना उपलब्ध नसतात, कारण ते पाण्यात विरघळत नाहीत जमिनीमध्ये स्फुरदाचे H2PO4 HPO4 & PO4 असे तीन रूप असतात. त्यापैकी H2PO4 हे रूप वनस्पतीला सर्वाधिक उपलब्ध असते. स्फुरद मातीमध्ये वहनीय नाही. त्यामुळे ते ज्या ठिकाणी पडेल त्याच ठिकाणी राहते. त्यामुळे स्फुरदची कार्यक्षमता फारच कमी होते. आपल्या जमिनीमध्ये जर अॅल्युमिनियम,लोह, जस्त मँगेनिजचे प्रमाण जास्त असेल तर स्फुरद याबरोबर संयोग पावून वनस्पतीला उपलब्ध होत नाही.

स्फुरद वनस्पतीला फारच उपयुक्त असतो. त्यामुळे त्याची कार्यक्षमता वाढवायची असेल तर पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी.

स्फुरदयुक्त खते मातीमध्ये मिसळू नयेत. मातीमध्ये स्फुरद वहनीय नाही. त्यामुळे त्याची कार्यक्षमता कमी होते. द्फुरद युक्त खत सेंद्रिय खताबरोबर जेथे द्राक्षवेलीची कार्यक्षम मुले असतील तेथेच टाकावे. त्यामुळे त्याची कार्यक्षमता वाढते व ते द्राक्षवेलीला योग्य प्रमाणात उपलब्ध होते. स्फुरदयुक्त खते जसे की डी. ए. पी १०० - २०० ग्रॅम प्रति १०० लिटर व फोस्फोरीक आम्ल ७० मिली/ १०० लि. या प्रमाणात पानांवरती फवारणी करावी. फोस्फोरीक आम्ल फर्टीगेशनद्वारे २ लिटर प्रति एकर या प्रमाणात आठवड्यातून दोन वेळा द्यावे. त्यासाठी जमिनीचा सामू विल्मधर्मी असावा व जमिनीत मुक्त चुन्याने प्रमाण जास्त असावे.

पालाश : पालाश हे स्निग्ध पदार्थ व प्रथिने यांच्या संश्लेषणासाठी आवश्यक असते. तसेच कांड्यांच्या पक्वतेसाठी व साखरेच्या प्रमाणात वाढ होण्यासाठी पालाश आवश्यक असते, ज्या जमिनीची कॅटआयन विनिमय क्षमता जास्त असते, त्या जमिनीत क्ले कणांच्या पृष्ठभागावर अनद्रव्ये शोषली जातात, त्यामुळे ती द्राक्षवेलीला उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अशा जमिनीमध्ये जास्त प्रमाणात पाणी देऊन पाण्याचा निचरा करावा.

जमिनीमध्ये पालशयुक्त खत टाकले तर त्याची द्राक्षवेलीला उपलब्धता ५० - १०० टक्के असते, कारण जेव्हा बाहेरून जमिनीमध्ये पालाश टाकतो, तेव्हा जमिनीत असणारे काही प्रमाणातील पालाश द्राक्षवेलीला उपलब्ध होते.

पालाश मातीमध्ये मिसळून टाकता येते तसेच फर्टीगेशन द्वारेदेखील देता येते. तसेच पालाशची पानांवरती फवारणी करून पालाशची कमतरता दूर करता येते. पालाशचा वापर करताना सल्फेट ऑफ पोटॅश वापरावे. तसेच म्युरेट ऑफ पोटॅश आणि इतर भारतीय मिश्र खते वापरू नयेत की ज्याच्यामध्ये क्लोराईड असेल.

कॅल्शियम : कॅल्शियम या अन्नद्रव्याचा वपर पुलोर्‍याच्या वेळी पानांवरती फवारणी करून अथवा डिपींगद्वारे करतात. कॅल्शियम हे मुलद्र्व्य द्राक्षवेलीत वहनीय नाही. द्राक्षवेळीमध्ये जी (व्हाईट रूटस) पांढरी मुळे असतात तीच फक्त केल्शियम शोषून घेऊ शकतात. जर द्राक्षवेलीला जास्त प्रमाणात पाणी अथवा पाण्याची टंचाई किंवा कमी तापमान असेल तर ही पांढरी मुळे तयार होत नाहीत आणि त्यामुळे कॅल्शियम शोषला जात नाही. त्याचा परिणाम लगेचच वाढत्या नवीन शेंड्यावर होतो. त्यामुळे जेव्हा जी. ए. ची फवारणी किंवा डिपींग करतो. त्यानंतर लगेच कॅल्शियम नायट्रेट किंवा कॅल्शियम क्लोराईड ची पानांवरती फवारणी करावी. त्यामुळे घडकुज रोखता येते. आपल्या जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम उपलब्ध असते, परंतु द्राक्षवेल ते घेऊ शकत नाही, कारण ते अविद्राव्य स्थितीत असते. त्यामुळे जेव्हा आपण आम्लयुक्त खते जसे युरिया व आमोनियम सल्फेट देतो. तेव्हा काही प्रमाणत कॅल्शियम द्राक्षवेलीला उपलब्ध होतो. परंतु हे फक्त ऑक्टोबर छाटणीनंतरच करावे.

माती परीक्षणाद्वारे आपल्या जमिनीतील सोडियमचे प्रमाण आपण जाणून द्यावे. जर सोडियम १५ पेक्षा जास्त असेल तर ती जमीन क्षारयुक्त असते अशी जमीन सुधारण्यासाठी जिप्सचा वापर करतात. जिप्सममध्ये कॅल्शियम असल्या कारणाने जमिनीतील सोडियमची जागा कॅल्शियम घेते व कॅल्शियम द्राक्षवेलीला उपलब्ध होतो.

मॅग्नेशियम : काळ्या कसदार जमिनीत मॅग्नेशियम जास्त प्रमाणात असते. मॅग्नेशियमची कमतरता फक्त कमी प्रतीची जमीन, वाळूयुक्त जमिनीत जाणवते. ज्या जमिनीमध्ये पोटॅशियम प्रमाण अधिक असते, त्या जमिनीत मॅग्नेशियमची कमतरता जाणवते. एकदा द्राक्षवेलीत प्रकाश संश्केषणाची क्रिया बंद पडली की क्लोराफील तयार होत नाही व द्राक्षांच्या घडांची वाढ होत नाही.

मॅग्नेशियमयुक्त खते सेंद्रिय खतानांबरोबर व शेणाच्या प्रवाही मिश्रणाबरोबर देऊ शकतो. तसेच मॅग्नेशियम सल्फेट ५ ग्रॅम प्रतिलिटर या प्रमाणात पानांवर फवारू शकतो. जेणेकरून मॅग्नेशियमची कमतरता दूर होऊ शकते.

गंधक : गंधक द्रक्षापिकामध्ये अन्नद्रव्याबरोबर जमीन सुधारकाचे (पी. एच. कमी करण्याचे) देखील काम करते. गंधकाची कमतरता दूर करण्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट (११ टक्के गंधक), अमोनियम सल्फेट (२४ टक्के गंधक) व पोटॅशियम सल्फेट (१८ टक्के गंधक) चा वापर करावा.

लोह : सुक्ष्म अन्नद्रव्यामध्ये सर्वात महत्वाचे सुक्ष्म अन्नद्रव्य लोह हे आहे. Griss या शास्त्राज्ञाने लोहाचा द्राक्षामध्ये १८४४ ला शोध लावला. लोहाची कमतरता द्राक्षावेलीमध्ये असेल तर क्लोरोफिलचे संश्लेषण होत नाही, त्यामुळे पाने फिक्कट पिवळी होतात. लोहामध्ये लोहाचे फेरस रूप द्राक्षावेलीच्या शरीरांतर्गत दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. द्राक्षवेली लोह फेरीकच्या रूपाने जरी उपलब्ध असले, तरी ते वनस्पतीच्या शरीरांतर्गत पक्रियेत भाग घेत नाही. लोहाच्या कमततेमुळे द्राक्षात क्लोरोसीस (पिवळेपणा) दिसून येते आणि हे क्लोरोसिस दूर करणे अवधड आहे. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे तो पिवळेपणा जाऊन वेळ हिरवे. निरोगी, सशक्त होतात. द्राक्षामध्ये जमिनीचा पी. एच. ८ पेक्षा जास्त व जास्त मुक्त चुना असेल तर दिसून येते.

गाईच्या शेणाचे प्रवाही मिश्रण : गाईचे ताजे शेण १०० किलो घ्या, १०० लिटर पाणी आणि २ किलो फेरस सल्फेट टाका आणि मिशन चांगले ढवळून घ्यावे. असे मिशार्ण एक आठवड्याकरीता तसेच ठेऊन प्रत्येक दिवशी मिश्रणाला ढवळावे. एक आठवड्याच्या शेवटी त्यामध्ये आणखी ५०० लिटर पाणी टाकावे. असे तयार केलेले मिश्रण सर्व द्राक्षवेलीसाठी एकसारख्या प्रमाणात ठिबक पाईपमधून जिथे पाणी पडते, त्या ठिकाणी मातीवर टाकावे. अशाप्रकारे २० किली फेरस सल्फेट प्रति एकरी वापरावे.

लोह जमिनीमध्ये शेणाच्या प्रवाही मिश्रणासोबत फेरस सल्फेट टाकले तरच फायदा होतो. जर फेरस सल्फेट साधेपणाने टाकले तर त्याचा द्राक्षवेलीला फायदा होत नाही. लोहाचे चीलेटेड रूप वापरले तर लोहाची कमतता दूर होते. लोहाची पानांवरती फवारणी १०० ग्रॅम प्रति १०० लिटर व यासोबत ५० ग्रॅम युरिया, २० मिली स्टिकर टाकून करावी. त्यामुळे लोहाची द्राक्षवेलीला असलेली कमतरता दूर होते.

मंगल : जमिनीमध्ये जर मुक्त चुन्याचे प्रमाणत जास्त असेल व जमिनीचा सामू ८ पेक्षा जास्त असेल तर द्राक्षवेलीला मंगलची कमतरता जाणवते. मंगलची कमतरता नवीन पानांवरती दिसून येते. यामध्ये पानांच्या शिरा हिरव्या रंगाच्या व पान पिवळे दिसून येते. याला इंटरव्हिनल क्लोरोसिस म्हणतात.

मंगल मातीमध्ये शेणाच्या प्रवाही मिश्रणाबरोबर देतात जेणेकरून कार्यक्षमतावाढेल. गाईच ताजे शेण १०० किलो घ्या. त्यामध्ये १०० लिटर पाणी आणि २ किलो मॅग्नीज सल्फेट टाका आणि चांगले ढवळून घ्या. असे मिश्रण एक आठवड्याकरिता तसेच ठेऊन प्रत्येक दिवशी मिश्रणाला ढवळावे. एक आठवड्याच्या शेवटी, त्यामध्ये आणखी ५०० लिटर पाणी टाकावे, असे तयार केलेले मिश्रण सर्व द्राक्षवेलीसाठी एकसारख्या प्रमाणात ठिबक पाईपमधून जिथे पाणी पडते त्या ठिकाणी मातीवर टाकवे, अशाप्रकारे २० किलो मॅग्नीज सल्फेट प्रति एकरी वापरावे. मंगलची पानांवरती फवारणी मॅग्नीज सल्फेट २.५ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात करावी.

जस्त : द्रक्षवेलीत जास्त ऑक्झीनच्या संश्लेषणात महत्त्वाचे काम करते. जमिनीचा सामू जर ८ पेक्षा जास्त असेल आणि मुक्त चुन्याचे व स्फुरदचे प्रमाण जास्त असेल तर जस्त द्राक्षवेलीला उपलब्ध होत नाही. भारतातील जमीनीत जास्ताचे प्रमाण फारच कमी असते. त्यामुळे जस्ताची कमतरता द्राक्षबागेत दिसून येते. जस्ताच्या कमततेमुळे द्राक्षाच्या पानांचा आकार लहान तसेच वाढही कमी होते. ही वाढ व्यवस्थित करण्यासाठी नत्र, स्फुरद व पालाशचा वापर केला तरी ती व्यवस्थित होत नाही.

जस्ताचा वापर शेणाच्या प्रवाही मिश्रणाबरोबर करावा त्यामुळे त्याची कार्यक्षमता वाढते. गाईचे ताजे शेण १०० किलो घ्या. त्यामध्ये १०० लिटर पाणी आणि २ किलो झिंक सल्फेट टाकून मिश्रण चांगले ढवळून घ्यावे. असे मिश्रण एक आठवड्याकरीता तसेच ठेऊन प्रत्येक दिवशी मिश्रणाला ढवळावे. एक आठवड्याच्या शेवटी त्यामध्ये आणखी ५०० लिटर पाणी टाका. असे तयार केलेले मिश्रण सर्व द्रक्षावेलींसाठी एकसारख्या प्रमाणात ठिबक पाईपमधून जिथे पाणी पडते त्या ठिकाणी मातीवर टाकावे. तसेच जस्ताची कमतरता दूर करण्यासाठी झिंक सल्फेट २ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात पानांवरती फवारावे.

तांबे - कॉपरयुक्त किटकनाशकांचा वापर केल्याने द्रक्षपिकला तांबे मिळते, त्यामुळे त्याचा स्वतंत्र वापर करण्याची गरज नाही तसेच माती व देठ तांब्यांच्या प्रमाणामध्ये योग्य असतात. त्यामुळे तांब्याचा वापर करण्याची गरज नसते.

बोरॉन : बोरॉनची कमतरता ही कमी प्रतीच्या (हलक्या) जमिनीमध्ये दिसून येते. बोरॉन साखरेच्या वाहनामध्ये तसेच पोलन वाढीसाठी मदत करते. बोरॉन कमतरतेमुळे द्राक्षमणी लहान होतात. द्रक्षामण्यांची गोडी कमी होते. देठ परीक्षणाद्वारे बोरॉनची कमतरता असेल तरच बोरॉनचा वापर करावा. बोरॉनचा वापर देठ परिक्षण न करता केला तर त्याचा विपरीत परिणाम पानांवरती व घडांवरती दिसून येतो. बोरॉनचे जमिनीमध्ये स्थिरीकरण होत नाही त्यामुळे बोरॉनचा जास्त वापर टाळावा. बोरॉन गरम पाण्यामध्ये मिसळून पानांवरती फवारणी करावी.

मॉलीब्डेनम : मॉलीब्डेनमची कमतरता ही कमी प्रतीच्या जमिनीमध्ये दिसून येते. देठ परीक्षणाच्या आधारे मॉलीब्डेनमची कमतरता असेल तरच त्याचा वापर करावा अन्यथा मॉलीब्डेनमचा जास्त वापर केला तर त्याचा विपरीत परिणाम द्राक्षांच्या पानांवरती दिसून येतो.

क्लोराईड : क्लोराईड हे इतर अन्नद्रव्याप्रमाणे अतिशय महत्त्वाचे आहे. क्लोराईडचे विपरीत परिणाम पानांवरती दिसून येतात. त्यामुळे हे विपरीत परिणाम टाळण्यासाठी क्लोराईडयुक्त खते वापरू नयेत. जेणेकरून द्राक्षामध्ये क्लोराईडचे प्रमाण वाढेल व द्राक्षाला ते हानीकारक होईल.

द्राक्षाला खते देण्याची योग्य वेळ : द्राक्षाला खते देताना शक्यतो एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ज्यावेळेस द्राक्षाला ज्या अन्नद्रव्यांची गरज असते, त्याच वेळेस ते द्यावे. जसे की खरड छाटणीनंतर फळधारणेच्या वेळेस स्फुरदची मात्रा द्यावी, व नत्राची गरज असेल तर गरजे एवढीच नत्राची मात्रा द्यावी, अन्यथा द्राक्षाची नको असलेली वाढ होईल. पोटॅशियमचा वापर काडी पक्क होतानाच करावा. सुक्ष्म अन्नद्रव्ये यांची नव्या पानांवरती फवारणी करावी, जेणेकरून त्यांची कमतरता द्राक्षाला भासणार नाही. अशा प्रकारे द्राक्ष बागेला खतांचे नियोजन करून सुद्दढ वेलींपासून दर्जेदार उत्पादन घ्यावे.