द्राक्षावरील रोग व त्यावरील उपाय

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


करपा : (अॅन्थ्रॅकनोज) हा बुरशीजन्य रोग असून अधिक तापमान व ढगाळ हवामान असणाऱ्या भागात मोठ्या प्रमाणात आढळतो पावसाळ्यात जास्त जाणवतो. ऑक्टोबर छाटणी आणि त्यानंतरच्या काळात दोन्ही हंगामात या रोगाचा प्रादुर्भाव होतो.

लक्षणे : हा रोग सुरुवातीला कोवळ्या फुटीच्या शेंड्यावर तसेच कोवळ्या पानावर आढळतो. पानांवर लहान, गोलाकार, गर्द तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. पुढे ठिपक्यांचा मध्य भाग राखाडा आणि गर्द तपकिरी होतो. काही वेळेस ठिपक्याचा मध्य भाग राखाडा आणि गर्द तपकिरी होतो. काही वेळेस ठिपक्याचा मधील भाग वाळून जातो. त्यामुळे पानांस छिद्र पडतात. तसेच कोवळ्या काड्या, घडांचे दांडे आणि ताणावे यावर तपकिरी फिक्कट रंगाचे ठिपके पडतात. पानांवर मध्य शिरा व मुख्य शिरांवर लहान, गोलाकार, कोनात्मक आकाराचे गर्द तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. रोगट पानांच्या दांड्यावर व्रण आढळून शिरा गुंडाळल्यासारख्या दिसतात. मण्यांचे देठे गोलाकार, खोलगट, मध्यभागी राखाडी व कडा तांबुस तपकिरी पडतात.

उपाय :

१) कमी निचऱ्याच्या भारी सतत ओल घरून ठेवणाऱ्या जमिनीत लागण करू नये.

२) लागवडीच्या वेळी पुर्ण निरोगी काड्या लावाव्यात.

३) बागेत स्वच्छता ठेवावी.

४) प्रतिबंधात्मक उप्पाय म्हणून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या वेळापत्रकाप्रमाणे फवारण्या घ्याव्यात.

५) प्रादुर्भाव झालेला असल्यास थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ५ मिली प्रति लि. पाण्यातून १ ते २ वेळा ८ - ८ दिवसांनी फवारावे.

झान्थोमोनस : बागेची छाटणी केल्यानंतर किंवा शेंडा मारणे, घडांची विरळणी तसेच गर्डलिंगच्या वेळी झालेल्या जखमातून या रोगाचे जीवाणू वेलीत प्रवेश करतात. वेलीच्या गाभ्यात जिवंत राहून गाभ्यातून वर वाहणाऱ्या अन्नरसासोबत नवीन निरोगी फांद्या, फुटी व घडत जातात. छाटणीच्या तसेच गर्डलिंगच्या हात्यारामार्फत रोगाचा प्रसार होतो. जमिनीवरून वाहणाऱ्या पाण्यावाटे हे जीवाणू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात .

लक्षणे :

या रोगाचे प्रमुख लक्षण म्हणजे पानाखाली पिनाग्रासारखे ठिपके दिसतात. हे ठिपके पानाची मुख्य शीर तसेच उपशिरांच्या बाजूला अधिक आढळतात. ठिपके गोलाकार असून त्याभोवती गोल पिवळे वलय दिसते. पुढे हे ठिपके पानांच्या वर दिसतात. काही काळाने ठिपके कोनाकृती करड्या रंगाचे दिसून पुढे त्यांचे काळ्या चट्ट्यात रूपांतर होते. ठिपके मोठे होऊन एकमेकांत मिसळतात व पाने करपून गळू लागतात.

उपाय : लागवडीसाठी निरोगी बेण्याचा वापर करावा.

२) रोगट फांद्या व फूट काढून जाळून टाकवी.

३) छाटणी तसेच गर्डलिंगची हत्यारे ३ ग्रॅम ताम्रयुक्त बुरशीनाशक प्रति लि. पाणी या द्रावणाने निर्जंतुक करून वापरावीत.

४) जवळच्या 'कृषी विज्ञान' केंद्राशी संपर्क साधून तज्ञांच्या सल्ल्यानुसार रोगाची अवस्था पाहून योग्य औषधांच्या प्रमाणबद्ध फवारण्या घ्याव्यात.

केवडा(दाऊनी मिल्ड्यू) : केवडा रोगाची बुरशी ही जिवंत पेशीवर आपली उपजीविका करते. नवीन येणाऱ्या फुटी, ऊती हे रोगाला बळी पडतात. आपल्याकडील द्राक्ष बागायतदार उशीरा माल घेण्यासाठी एप्रिल छाटणी उशीरा करतात. त्यामुळे वेलीवर नवीन येणारी फूट पावसाळ्यात येते, त्यामुळे फुटी रोगाला जास्त बळी पडतात.

रोगाची लक्षणे : द्रक्षवेलीच्या सर्व हिरव्या भागावर विशेष करून पानांवर या रोगाची लक्षणे दिसून येतात. प्रथम पानाच्या पृष्ठभागावर फिक्कट पिवळ्या रंगाचे डाग दिसतात.हे डाग पानांवर कोनात्मक पिवळसर, तांबूस डाग दिसतात. हे डाग पानांवर ३- ४ ठिकाणी, दिसतात. रोगग्रस्त पाने सुर्यप्रकाशाकडे धरल्यास पानावर पडलेले डाग पारदर्शक दिसतात. दमट हवामानात पानांच्या डागांच्या खालील बाजूस बुरशीची असंख्य बीजे तयार होतात. अशी बीजे रुजण्यासाठी १८ ते २४ डी. सें. तापमान अनुकूल असते. अलैंगिक बीजे निरोगी भागांवर रुजल्यावर बुरशीचे धागे पानाच्या वरील बाजूला छिद्रद्वारे आत प्रवेश करून तेथे वाढतात. चार दिवसाच्या अवधीत रोगाची प्राथमिक लक्षणे दिसू लागतात.

पुढे ये पानांच्या भाग पांढरट दिसतो. रोगग्रस्त पाने तपकिरी पडून वळतात व गळून पडतात. रोगाची तिव्रता वाढल्यास पाने गळून वेळीच नुसता सांगाडा राहतो.

एकात्मिक व्यवस्थापन :

१) खरड छाटणीच्यावेळी वेलीवरील सर्व रोगट, अपक्व अशा सर्व काड्या व पाने काढल्यामुळे वेलीवरील असलेले सुप्तावस्थेतील बीजाणू काढून टाकले जातात. त्यामुळे या काळात द्राक्ष बागही रोग विरहीत राहते.

२) खरड छाटणी उशीरा घेतल्यास काडी उशीरा पक्व होते व वेलीवर कोवळी फूट राहते. केवडा रोगाचा प्रादुर्भाव हा कोवळ्या फुटीवर जास्त जाणवतो. त्यासाठी खरड छाटणी वेलेवर होणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून काडी पावसाळयाआधी पक्व होईल व कोवळ्या फूटी काढून टाकता येतील.

३) प्रतिकुल हवामान किंवा अन्नाचे दुर्भिक्ष असेल तर बुरशीचे बीजाणू घागे सुप्तावस्थेत जातात विशेषत: एप्रिल छाटणीच्या वेळी ही परिस्थिती असते.

छाटणीनंतर खाली पडलेल्या काड्या, पाने सर्व गोळा करून जाळून टाकावे.

भुरी (Powdery Mildew) :- द्राक्षोत्पादनामध्ये भुरी रोगामुळे मोठे नुकसान होते. त्याकरिता वेळीच त्याचे नियंत्रण करणे गरजेचे असते. अनसिनुला निकेटर या बुरशीमुळे द्राक्षावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतो. थंड आणि ढगाळ वातावरण, हवेचे तापमान २० ते ३० डी. सें. भुरी रोगाला अनुकूल असते. पावसाळ्याच्या दिवसात पाऊस पडला नाही आणि ढगाळ वातावरण राहिल्यास भुरी रोग वाऱ्यामार्फत पसरतो. ऑक्टोबर छाटणीनंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून थंडी सुरू झाल्यानंतर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतो. द्राक्षावेलीची पाने, कोवळी फुट व घडांवर भुरीचा प्रादुर्भाव होतो.

द्राक्षावेलीवर कोणत्याही अवस्थेत भुरी रोग येण्याची शक्यता असते. वेलीवरील वांझफुटी सावलीत असतील तसेच कॅनॉपीमध्ये जास्त गर्दी झाली की , सावलीत राहिलेल्या पानांवर, घडांवर भुरीचा प्रादुर्भाव वाढतो. मण्यात पाणी भरण्यास सुरुवात झाली की मण्यावर भुरी येत नाही मात्र मण्याच्या देठावर भुरी येऊ शकते.

रोगाची लक्षणे : पानांच्या वरील बाजूस पांढरट बुरशीची वाढ होते. पानांवरील रोगट भाग प्रथम पिवळसर पांढरा दिसतो. नंतर भुरकट पांढरा दिसतो. प्रादुर्भावामुळे द्राक्षावेलींच्या पानाची वाढ कमी प्रमाणात होते. रोगट कोवळी पाने आतील बाजूस वळतात. रोगाची तीव्रता वाढल्यास रोगट पाने तांबूस दिसतात. पानांच्या देठावर भुरीचा प्रादुर्भाव झाल्यास पानाचे देठ तुटतात, पानाची गळती होऊन कॅनॉपीचे प्रमाण कमी होते.

फुटीच्या शेंड्यावर भुरी आल्यास वाढ खुंटते भुरीमुळे हिरव्या काड्या प्रथम काळसर तपकिरी आणि त्यानंतर तांबुस तपकिरी होतात. द्राक्ष फुलोऱ्यात गळ होते. फलधारणा व्यवस्थित होत नाही. घडाच्या देठावर या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास देठ तुटतात. घडामध्ये आठ टक्क्याच्या पुढे साखरेचे प्रमाण गेल्यास द्राक्षमण्यावर भुरीचा प्रादुर्भाव होत नाही, पण अगोदरच प्रादुर्भाव झाला असल्यास मण्यांवर भुरकट थर दिसून पक्व होणाऱ्या मण्यांवर चिरा पडतात. द्राक्षामणी वाळतात, सडतात, परिणाम उत्पादनात घट येते व दर्जा ढासळतो.

भुरी रोगाचे एकात्मिक नियंत्रण :

१) द्राक्षबागेचे रोगासंबंधी नियमित सर्वेक्षण करावे आणि भुरी रोगासंबंधी पाहणी करावी. बागेतील अस्वच्छतेमुळे भुरी रोगाच्या बुरशीचे इनॉकुलम (बुरशीची अतिवाढ आणि बीजे) तयार होऊन भुरीचा परिणाम वातावरणानुसार होतो. प्रत्येक छाटणीनंतर सर्व रोगट अवशेष एकत्र करून जाळून नष्ट करावेत.

२) द्राक्षवेलींवर एखादे - दुसरे अति रोग्रस्त आणि पुर्ण भुरकट झालेले पान आढळलयास ते काढून घ्यावे आणि जाळून नष्ट करावेत म्हणजे पानांवरील बुरशीबीजे हवेमार्फत पसरणार नाहीत.

३) द्राक्ष बागेवर भरपूर स्वच्छ सुर्यप्रकाश, खेळती हवा आणि बाग नेहमी स्वच्छ राहील असे नियोजन करावे.

४) बाह्य स्पर्शजन्य (उदा. गंधक किंवा पोटॅशियम बाय कार्बोनेट) बुरशीनाशकांचा वापर फवारणीसाठी आवश्यकतेनुसार रोगनियंत्रणासाठी करावा, गंधक भुकटी किंवा पाण्यात मिसळणारे गंधक या स्वरूपात वापरता येते हवेत आर्द्रता कमी असल्यास भुकटी वापरावी. पावसाचे प्रमाण आणि हवेत आर्द्रता जास्त असल्यास पाण्यात मिसळणारे गंधक वापरावे. उष्ण व कोरड्या हवामानात (तापमान ३० डी. सें. च्या पुढे असल्यास) द्राक्षवेलीस गंधकाचा अपाय होऊ शकतो.

५) आंतरप्रवाही बुरशीनाशके (उदा. ट्रायडिमेफॉन / पेनकोनाझोल / हेक्झाकोनाझोल) आलटून पालटून वापरल्यास बुरशीमध्ये बुरशीनाशकांविरूध्द प्रतिकारशक्ती निर्माण न होता भुरी रोगाचे नियंत्रण करण्यास परिणामकारक ठरतील. आंतरप्रवाही बुरशीनाशकांची प्रतिकाराशक्ती बुरशीमध्ये तयार होते, म्हणून त्यांचा आवश्यकता असेल तरच वापर करावा.

६) द्राक्षवेलीवरील भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी ८० % पाण्यात विरघळणारे गंधक ५०० ग्रॅम किंवा डिनोकॅप १२५ मिली प्रती २५० लि. पाण्यात मिसळून फवारण्य कराव्यात. यानंतरही भुरी रोग आटोक्यात आला नाहीच तर ट्रायडिमेकॉन २५० ग्रॅम किंवा पेनकोनाझोल १२५ मिली २५० लि. पाण्यातून फवारावे.

७) निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी द्राक्षवेलीवरील शेवटची बुरशीनाशकाची फवारणी द्राक्ष काढणीनंतर द्राक्षामध्ये विषारी अवशेष राहणार नाहीत याचा विचार करून वेळेत करावी.