वाईन द्राक्ष लागवड व उत्पादन

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


महाराष्ट्रात द्राक्ष लागवडीखालील क्षेत्र हे खाण्याच्या द्राक्षांचे (Table Grapes) आहे. द्राक्षावर प्रक्रिया करून वाईन निर्मितीसाठी मागील काही वर्षापासून वाईन द्राक्षांच्या वाणांची बागायतदार लागवड करीत आहेत.

इटली, फ्रान्स, स्पेन, अर्जेटिना, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पोर्तुगल या देशांत वाईन निर्मितीसाठी वाईन व्हरायटीच्या (जाती) लागवडी फार वर्षापासून झाल्या व वाईन प्रकल्प उभारले गेले.

ग्रेपवाईनचे प्रकार : १) स्टील वाईन

२ ) व्हाईट वाईन

३ ) रेड वाईन

४ ) शॅम्पेन

५) स्वीट वाईन अथवा डेसर्ट वाईन

द्राक्ष उत्पादन जास्त झाले. (भरपूर प्रमाणात लागवड व. जादा उत्पादन) तसेच बाजारपेठेत स्पर्धातमक फळे, आंबा, मोसंबी, संत्री यासारखी इतर फळे भरपूर प्रमाणात आली तर तर तुलनेने कमी टिकवू द्राक्षे यांना उत्यंत कमी भाव मिळतो. अशातच मागील तीन ते चार वर्षापासून वाईन जातींच्या द्राक्षांना वाईनरीकडून फिक्स बाजारभाव ३० रू. किलो. याप्रमाणे देऊ लागल्या, त्यामुळे बागायतदारांचा वाईन जाती लावण्याकडे कल वाढला.

वाईन द्राक्षाच्या लागवडीचे फायदे :

द्राक्षाची वाईन जितकी जुनी, तितकी त्याची किंमत वाढतच असल्यामुळे तयार झालेले उत्पादन लगेच विकण्याची गरज नाही. बागायतदारांच्या उत्पादीत द्राक्षाच्या चांगल्या व कमी प्रतीच्या द्राक्षाची विभागणी करण्याची गरज नसल्यामुळे सर्व उत्पादनाला सारखाच भाव मिळाल्याने शेतकर्‍यांना विक्रीची भीती नाही. द्राक्ष उत्पादनावर होणारा खर्च व वेळ वाचवता येणार आहे. वर्षातून दोन हंगामात द्राक्षाचे पीक घेता येणार आहे. त्यामुळे उत्पादनात चांगलीच वाढ होणार आहे. चांगल्या प्रतीचे उत्पादन केल्यास परदेशी निर्यात शक्य आहे. अशासारखे अनेक फायदे द्राक्षाच्या वाईनच्या कारखानदारीत आहेत. त्याचा फायदा घेण्याची जबाबदारी द्राक्ष उत्पादकांची आहे.

द्राक्ष वाईनचे आहाराच्या दृष्टीने महत्त्व:

द्राक्षाच्या वाईनचे अनेक प्रकारचे महत्त्व आहे. द्राक्षाची वाईन आपल्या देशाला तसेच संस्कृतीला नवीन नाही. आमच्या आयुर्वेदीक औषधामध्ये द्राक्षासव तयार करतातच. ते चांगले टॉंनीक म्हणून योग्य आहे. अपचन पोट जड होणे, भूक न लागणे, तापानंतर येणारा खोकला व अशक्तपणा, खाल्लेल्या अन्नाचे चांगल्या प्रकारे पचन होण्यासाठी उपयुक्त आहे. फुफ्फुसाचे विकार, दमा, खोकला, ब्रॉकायटीस, दाह यासाठी द्राक्षासवचा चांगला उपयोग होतो. द्राक्षासवलाच परदेशात द्राक्षाची वाईन म्हणतात.

ग्रेप वाईन प्रकल्प :

१) सामंत सोमा वाईन्स लि. गोवर्धन, नाशिक

२) शँपेन इंडेज - नारायणगांव, पुणे

३) संकल्प वाईन्स - विंचूर,निफाड

४) सुला वाईन्स लि. - नारायणगांव, पुणे

वाईन द्राक्षाच्या लागवडीसाठी हवामान : वाईन द्राक्षाची प्रत, गुणवत्ता यासाठी फळ तयार होताना थंड हवामानाची गरज असते. जास्त तापमानात वाईन द्राक्ष तग धरू शकत नाही. तसेच आर्द्र, उन्हाळा हानीकारक असतो दीर्ध उबदार ते उष्ण कोरडा उन्हाळा व थंड हवामान असावे.

वाईन द्राक्ष लागवडीसाठी जमीन : जमीन मुरमाड व हलकी असावी, भारी व काळ्या जमिनी वाईन द्राक्ष लागवडीस अयोग्य, मुळ्यांची वाढ खोलपर्यंत जाते. गाळाच्या व क्षारतेचे प्रमाण अधिक असलेल्या जमिनीत लागवड करू नये. महाराष्ट्रात वाईन द्राक्ष बाग हिवाळ्यात लागवड करावी.

लागवडीतील अंतर : ९' x ५' अंतरावर करावी. ९ फूट अंतरावर चार तयार करून ५ - ५ फुटावर हुंडी लावावी. छाट कलमांच वापर वापर करावा. शॅराडोने पिनोब्वार या वाईन जाती नाशिक मधील हवामानात तग धरत नाही. त्यामुळे कॅबरने शॉव्हिनोओ व शेनन ब्लॅक या जातीची लागवड केली जाते. एकदा निवड केलेली जात लागवड झाल्यानंतर बदलणे खूप खर्चिक असल्याने विचारांती निर्णय घेणे गरजेचे आहे. तसेच जमिनीचे क्षेत्र, वाहतुकीचा खर्च, वाईनरी फेक्टरीशी करार इ. बाबी शेतकर्‍यांनी लक्षात घ्याव्यात. वाईन द्राक्ष लागवड करण्याकडे द्राक्ष बागायतदरांचा असलेला कल मुख्यत. महाराष्ट्रातील द्राक्षे जागतीक बाजारपेठ गाजवतात. महाराष्ट्राच्या हवामानात वाइन्सची द्राक्षे चांगली वाढतात व वाईनरी चांगला दर देतात. वाईनसाठी कितीही चांगल्या जातीची लागवड केली, तरी योग्य वेळी काढणी न केल्यास वाईनचा दर्जा खालावतो. त्याकरीता योग्य वेळी करणे काढणी फार महत्वाचे असते.

जाती : भारतातील वाईन द्राक्षाच्या जाती

१) अर्कावती : ही जात इंडियन इन्सिटट्यूट ऑफ हॉर्टिकल्चरल रिसर्च बंगलोर येथे विकसीत केलेली आहे. या जातीचे द्राक्षवेल जोमाने वाढणारे असून द्राक्षाघड आकाराने मध्यम. पूर्ण भरलेले, सुटसुटीत निमुळत्या आकाराचे असतात. द्राक्षमणी गोलाकार, रंगाने फिक्कट पांढरट असून बियारहित असतात. या जातीमध्ये टी. एस. एस. १८ ते २० टक्के, आम्लता ०.५ ते ०.६ टक्के तर द्राक्षरसाचे प्रमाण ६८ ते ७२ टक्के एवढे असते. ही जात कोरडी सफेद वाईन बनविण्यासाठी वापरली जाते.

२) अर्का कांचन : ही जात अनाबेशाही व क्वीन ऑफ वाईनमार्ड यांच्या संकरातून निर्माण केलेली आहे. पण या जातीचे वेल जोमदारपणे वाढणारे असून, द्राक्षाचे घड मध्यम ते मोठ्या आकाराचे, पूर्ण भरलेले लांब शंखाकृती असतात. द्राक्षमणी आकाराने मोठे, अंडाकृती पिवळसर - सोनेरी रंगाचे, बियासह, मस्कत सुगंध देणारे असतात. या जातीचा टी. एस. एस. १९ ते २२ टक्के, आम्लता ०.५ ते ०.६ टक्के, आम्ल विल्म निर्देशांक ३.५ ते ३.८ व द्रक्षारास ६० ते ६५ टक्क्यांच्या दरम्यान असतो. या जातीची उत्पादनक्षमता चांगली असते. या जातीपासून उत्तम प्रकारची ड्राय व्हाईट वाईन बनविली जाते.

३) अर्का शाम : ही जात बंगलोर ब्ल्यू व ब्लॅक चंपा यांच्या संकरातून निर्माण केलेली आहे. द्राक्षवेल चांगले वाढणारे असून द्राक्षघड मध्यम आकाराचे, पूर्ण भरलेले संघटीत, शंखाकृती आकाराचे असतात. द्राक्षमणी मध्यम मोठ्या आकाराचे, काळ्या रंगाचे चकाकणारे, गोलाकार ते अंडाकृती, बियासह सौम्य फॉक्सी सुगंध असणारे असतात. यामध्ये टी. एस. एस. २२ ते २५ टक्के, आम्लता ०.५ ते ०.६ टक्के, आम्ल विम्ल निर्देशांक ३.७ ते ३.८ टक्के व द्राक्षरस ६० - ७२ टक्के एवढा असतो. या जातीची द्राक्ष उत्पादनक्षमता चांगली असून ही जात ड्राय रेड वाईन तसेच रेड डेझर्ट वाईन बनविण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

भारताबाहेरील वाण -

१) अंगूर कलान : ही जात सोव्हियत संघराज्यातून आणली आहे. या जातीचे द्राक्षवेल मध्यम वाढणारे असून, द्राक्षघड आकर्षक, आकाराने मोठा, तिसर्‍या व पाचव्या डोळ्यावर येणारा, लांब शंखाकृती व सैलसरपणे भरलेले असतो. द्राक्षमणी पिवळसर सोनेरी व निळसर गुलाबी रंगाचे, मोठ्या आकाराचे, आतील गर घट्ट, रसदार असून त्याचा रस हिरवट पिवळसर आणि स्वच्छ असतो. या जातीच्या मण्यांमधील बियांचे प्रमाण अत्यल्प असते. मण्यांनी परिपक्वता एकसारखी असून मध्य हंगामात पक्व होऊन त्यांच्यामध्ये टी. एस. एस. १८ -२० टक्के, आम्लता ०.६ ते ०.७ टक्के व द्राक्षरस ७० ते ८० टक्के एवढा असतो. वाईन बनविण्याच्या प्रमुख जातीत हिचा उल्लेख होतो.

२) कॉनव्हेट लार्ज ब्लॅक : या जातीने भारतमध्ये काही ठिकाणी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. या जातीचे द्राक्षवेळ मध्यम, जोमाने वाढ होणारे असून द्राक्षघड मध्यम मोठा व लांब, लहान शंखाकृती आकाराचा, अतिसंघटीत असलेला, दुसर्‍या व पाचव्या डोळ्यावर येणारा असतो. द्राक्षमणी निळसर काळ्या रंगाचे, गोलाकार, मध्य मोठ्या आकाराचे बिया असणारे असतात. मण्याची साल आतील गराला पूर्ण चिकटलेली असते. हा गर मस्की सुगंधाचा वास देणारा असून रस स्वच्छ आणि गोड असतो. या जातीच्या मण्यांची परिपक्वता सारखी होते. यामध्ये टी. एस. एस. २० ते २५ टक्के, आम्लता ०.४ ते ०.५ टक्के व द्राक्षरस ६५ ते ७० टक्के एवढा आढळून येतो. ही जात डेझर्ट वाईन बनविण्यासाठी खास करून वापरली जाते.

३) पिनो नायर: या जातीपासून लाल रंगाची दारू बनविली जाते. त्याचबरोबर लाल स्पार्क लिंग शाम्पेन दारू बनविण्यासाठी सुद्धा या जातीचा उपयोग करतात. ही जात जुनी जात म्हणूनही प्रसिद्ध आहे. या जातीचा द्राक्षघड लहान संघटीत पूर्ण भरलेला असतो. थंड वातावरणातील प्रदेशामधील या जातीच्या द्राक्षापासून तयार केलेल्या मद्याला उत्तम प्रकारचा वास व चव आढळून येते. या जातीच द्राक्षमणी रंगाने काळे, आकाराने लहान व वर्तुळाकार असतात. ही जात परिपक्व होण्यास कमी कालावधी लागतो. या जातीमध्ये टी. एस. एस. १५ ते १७ टक्के, आम्लता ०.६ ते ०.७ टक्के व द्राक्षरस ६५ ते ७० टक्के असतो.

४) रूबी रेड : ही जात टिनो कॅओ व अलिकॅन्टो गणझीन यांच्या संकरातून सन १९५८ मध्ये कॅलिफोर्निया येथे निर्माण केली आहे. या जातीचे मणी रंगाने काळे, लहान, गोलाकार असतात. घडाचा आकार मध्यम, सैलसर स्वरूपाचा असतो, तर परिपक्वतेसाठी मध्यम कालावधी लागतो. बहुतेककरून ही जात रंगीत मद्यनिर्मितीसाठी वापरली जाते. याचा रस लाल रंगाचा असतो. तसेच ही जात काही बुरशीजन्य रोगाला प्रतिकारक्षम आहे. या जातीच्या द्राक्षात टी. एस. एस. १५ ते १७ टक्के, आम्लता ०.६ ते ०.७ टक्के, रस ६८ ते ७२ टक्के एवढा आढळतो.

५) वाल्थन क्रॉस: ही मध्य हंगामात येणारी प्रसिद्ध जात आहे. या जातीचे मूळ रोसाकी या क्लोनमध्ये आढळते. याच्या खजूरासारख्या आकारमानामुळे या जातीलच डाटीयार असेही म्हणतात. या जातीचे द्राक्षमणी सोनेरी - हिरवे मोठे, लंबगोलाकार आणि बिया असणारे असतात. मण्यांची साल घट्ट, गरही घट्ट आणि रसदार तसेच मण्यांना आकर्षक असा मद्यासंबंधीचा सुगंध असतो. या जातीचे द्राक्षघड मोठे, लंब गोलाकार ते वृत्तचित्तीच्या आकाराचे आणि पूर्ण भरलेले असतात. द्राक्षवेल जोमाने वाढणारे आणि उत्पादनक्षम असतात. मध्यम आकाराचे, गडद हिरवे, केसरहित पाने असणे ही या जातीची वैशिष्ट्ये आहेत. या जातीच्या बहुतेक अंकुराला दोन घड असतात. त्यापैकी पहिला घड अत्यंत चांगल्याप्रतीचाअसतो. घडाच्या तळाशी असलेली पाने काढल्यास मण्याच्या सोनेरी रंगात भर पडण्यास मदत होते.

६) कॅलमिरिया : ही जात सन १९३८ मध्ये कॅलिफोर्नियामध्ये डॉ. ई. सिनेड्य यांनी ओझनेझ (अलमिरिया) या बियापासून तयार केली आहे. ही उशिरा हंगामात येणारी आणि आपल्या मातृवृक्षा प्रमाणे संपूर्ण फूल असल्यामुळे परागीकरणाला अडचण नसणारी जात आहे. या जातीचे मणी रंगाने फिक्कट हिरवे. आकाराने मोठे वृत्तचित्तीकार, बिया असणारे असतात. या जातीच्या मण्याची साल टणक, आतील गर मांसल आणि आकर्षक पण नैसर्गिक वास असणारा आहे. द्राक्षघड मोठे, लंब वर्तुळाकार आणि पूर्ण भरलेले असतात. द्राक्षवेळ जोमाने वाढणारी असून पाने मोठी, पिवळ्या - हिरव्या रंगाची केसरहित असतात. ओझनेझ जातीप्रमाणे ही जातही ८ ते ९ डोळ्यांवर छाटणी करून मोठ्या आकारमानाचा फायदा घ्यायचा असतो. या जातीचे अंकुर चांगल्याप्रकारे वाढतात आणि ही जात ओझनेझ जातीच्या अगोदर परिपक्व होते. या जातीचे वेळ पाण्याच्या ताणाला बळी पडून निळसर विटकरी छटा मण्याच्या कडेला पडतात. ही जात वाहतुकीस अत्यंत उपयुक्त असून साठवणुकक्षमता जवळपास १६ आठवडे इतकी असते.

७) कॅरिलोना बॅल्करोझ : ही जात बॅल्करोझचाओज आणि बिलार्ड बाल्लस्क यांच्या संकरातून आर. डी. डनस्टन यांनी अमेरिकेमध्ये तयार केली आहे. या जातीमध्ये साखर्‍या व पावडरी मिल्ड्यू सारख्या रोगांना प्रतिकार करण्याची क्षमता जास्त प्रमाणात आहे. ही जात मध्यम हंगामात येणारी असून याचे मणी रंगाने काळे, बिया असणारे, लांब निमुळते आणि मध्यम ते मोठ्या आकाराचे असतात. मण्याची साल घट्ट तसेच आतील गरही घट्ट आणि रसदार तसेच मण्यांना मद्यासंबंधीचा सुगंधयुक्त वास येतो. द्राक्षघड मध्यम ते मोठा, शंखाकृती आणि पूर्ण मण्याने भरलेला असतो. या जातीचे द्राक्षवेल चांगली वाढ असणारे, मध्यम आकाराचे, तकतकीत पाने असलेली व पाने केसरहित कडा असलेले असतात. ही जात जास्त फलधारणक्षमता असलेली असल्यामुळे मण्यांना कमी प्रमाणात रंगधारणा होते. ही जात उष्ण, दमट भागात (काही प्रमाणात साखर्‍या व पावडरी मिल्ड्यू रोगांना प्रतिकारक असल्यामुळे) उपयुक्त आहे.

८) इटालिय : ही जात दिसण्यास अत्यंत आकर्षक असून बाकान आणि मस्कत हॅम्बर्ग यांच्या संकरातून तयार केली आहे. या जातीचे मणी सोनेरी, आकाराने मोठे व अंडाकृती / लंबगोलाकार, बिया असणारे असून कातडी घट्ट व आतील गर रसदार असतो. या जातीला पिकल्यानंतर सौम्य प्रमाणात मस्कत वास येतो.

या जातीचे द्राक्षघड मध्यम ते मोठ्या आकाराचे लंबवर्तुळाकार आणि पूर्ण भरलेले असतात. याचे वेळ जोमाने वाढणारे, मोठ्या गडद हिरव्या रंगाची पाने असणारे असतात. पानाच्या खालील बाजूस लहान प्रमाणात केस असतात. या जातीच्या वाढीसाठी काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेसे असते. घडाची व्यवस्थित हाताळणी न केल्यास मण्यांना जखम होणे किंवा मण्यांचा रंग बदलणे इ. क्रिया घडतात. याच बाबीमुळे या जातीची द्राक्षे जास्त काळ वाहतुकीत तग धरत नाहीत. त्याची साठवणुकक्षमता कालावधी -फक्त ६ -१० आठवडे असतो. ही जात दमट व उष्णतेला प्रतिकारक आहे. मण्यांच्या रंगात बदल होणे व पानांची एकमेकांवर घासण्याची क्रिया टाळण्यासाठी घडाच्या तळाशी असणारी ३ ते ४ पाने रंग बदलण्याच्या वेळेस काढून टाकावीत.

९ ) इम्परोर : ही उशीरा हंगामात येणारी जात असून ती मध्ये पूर्वेतून उगम झालेली आहे. उशिरा पक्व होणे आणि उत्तम साठवणूक क्षमता असणे, या गुणधर्मामुळे ही जात प्रसिद्ध झालेली आहे.

या जातीचे मणी लालरंगाचे, मोठे लंबवर्तुळाकार आणि बियासहीत असतात. मण्याची साल जाड आणि टणक, आतील गर मांसल असतो. द्राक्षघड मोठा, लांब, लंबवर्तुळाकार आणि पूर्ण भरलेला असतो. द्राक्षवेळ जोमाने वाढणारे आणि मोठ्या गडद हिरव्या पानाचे असतात. या जातीच्या द्राक्षमण्याचा रंग इथोपेन फवारल्यानंतर बदलतो. परंतु त्याचबरोबर यामुळे द्राक्षाचा साठवणूक काळ नरम होतो. ही जात दमट हवामान, वाहतुकीच्या कालावधीला प्रेकारक असून याची साठवणुकक्षमता जवळजवळ ६ महिने इतकी असते.

१०) रिबेरर : ही एक आकर्षक मध्य हंगामात येणारी ओरिएन्ट येथे तयार केलेली जात आहे. या जातीचे मणी रंगाने काळे, अत्यंत मोठे, टोकदार, वर्तुळाकार आणि बिया असलेले असतात. मण्याची साल कुरकुरीत आणि आतील गर नरम रसदार असतो. या मण्याला नैसर्गिक सुगंध असतो. जा जातीचे घड मध्यम आकाराचे, लहान लंबगोलाकार आणि सैलसर ते पूर्णपणे भरलेले असतात. द्राक्षवेळ जोमाने बाढणारे आणि मोठ्या पानाचे असतात. प्रत्येक केनवर २ ते ३ घडांची वाढ होऊन पहिला घड वेडावाकडा पसरणारा असल्यामुळे दुसरा तसाच ठेवतात. या कमी फलधारणक्षमतेमुळे नवीन फुले फुलण्याच्या वेळेस विरळ करावेत. तसेच घडाची प्रत चांगली मिळावी म्हणून टोकाकडील काही भाग (जवळजवळ ७ सें. मी.) काढून टाकावा. सर्व मण्यांना सारखा रंग येण्यासाठी घडाच्या तळाशी असलेली ३ ते ४ पाने काढून टाकावीत. या जातीचे द्राक्ष वाहतुकीसाठी उत्तम असून त्यांची साठवणुकक्षमता जवळजवळ १४ आठवडे इतकी आहे.

११) अलिदो : ही स्पॅनिश जात असून तिचे मूळ आग्नेय स्पेनमध्ये आहे. ही एक आकर्षक उशिरा हंगामात पक्व होणारी जात आहे. या जातीचे मणी पिवळे पांढरट, मोठे, लंबगोलाकार, आणि बियासहित असतात. मण्याची साल टणक, आतील गर घट्ट आणि रसदार तसेच मणी मद्याच्या सुवासिक वासाचे आहेत. या जातीचे घड मध्यम मोठे लंबवर्तुळाकार आणि पूर्ण भरलेले असतात. द्राक्षवेल पूर्ण वाढलेली असून पाने आकाराने मोठी गडद हिरवी केसरहित असतात. या जातीच्या मण्याचा आकार मोठा असून ही जात खाण्यामध्ये कॅलिमेरा किंवा ओझनेझपेक्षा सरस आहे. ही जात वाहतुकीसाठी तसेच काही कालावधीसाठी साठवणूक करण्यास चांगली आहे.

१२ ) थॉम्पसन सिडलेस : ही जात विल्यम थॉम्पसन यांनी मुबा (कॅलिफोर्निया)शोधून काढली. ही जात जगामध्ये सर्वत्र आढळते. या जातीचा जास्तीतजास्त उपयोग खाण्यासाठी, बेदाणे बनविण्यासाठी त्याचबरोबर व्हाईट डेझर्ट वाईन बनविण्यासाठी करतात. या जातीच्या नैसर्गिक सुगंधामुळे ही जात सुगंधी वाईन बनविण्यासाठी पायाभूत म्हणून वापरतात. या जातीचे वेळ मध्यम, जोमाने वाढणारे असून द्राक्षघड मध्यम, लांब, लांबनिमुळता किंवा शंखाकृती, पूर्ण भरलेला संघटीत स्वरूपात असतो. द्राक्षमणी पूर्ण पक्व झाल्यावर रंगाने पिवळसर - हिरवे ते सोनेरी पिवळसर, आकाराने लहान, निमुळते, बियारहित, आतील गर घट्ट असणारा, रस स्ट्रो रंगाचा, गोड आणि सुगंध असलेला असतो. यामध्ये टी.एस.एस. २० ते २२ टक्के, आम्लता ०.५ ते ०.६ टक्के आणि रस ७० ते ८० टक्के असतो. या जातीचा महत्त्वाचा फायदा म्हणजे तिचा नैसर्गिक सुगंध होय.