भाजीपाला पिकावरील किडी व त्यांचे व्यवस्थापन

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


भाजीपाला पिकाची लागवड ही शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर आहे. महाराष्ट्रामध्ये मुख्यत्वे भेंडी, वांगी, मिरची, कोबी इत्यादी भाजीपाला पिके घेतली जातात. भाजीपाला पिकाचे उत्पादन कमी येणे व कमी दर्जाचा भाजीपाला तयार होणे यासाठी त्यावर होणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव हे महत्त्वाचे कारण आहे. सर्वसाधारणपणे भाजीपाल्यामध्ये किडींमुळे २० - ३० टक्के नुकसान होते. त्यामुळे अशा किडींचे एकात्मिक व्यवस्थापन करणे जरुरीचे आहे.

भेंडीवरील महत्त्वाच्या किडी.

१) ठिपक्याची अळी : ही भेंडीवरील सर्वात नुकसानकारक कीड आहे व भेंडीशिवाय कापूस, अंबाडी इत्यादी पिकालासुद्धा ती नुकसानकारक आहे. याची अळी तपकिरी रंगाची असून तिच्या शरीरावर काळे तांबडे ठिपके असतात. ही अळी सुरुवातीला झाडाचा शेंडा पोखरते, त्यामुळे शेंडा वाळून जातो. नंतर अळी कळ्या व फळामध्ये शिरते. त्यामुळे कळ्या व फुले परिपक्व न होताच गळून पडतात. जी फळे झाडावर राहतात ती वाकडी होतात व त्यावर अलीने केलेले छिद्र आणि तिची विष्ठा दिसते व फळे खाण्यास योग्य राहत नाहीत.

२) घाटेअळी : ही कीड बहुभक्षी असून भेंडीशिवाय कापूस, हरभरा, तूर, टोमॅटो, ज्वारी इत्यादी अनेक पिकावर उपजिविका करते. या किडीची अळी फळे पोखरते व त्यावर उपजिविका करते. या किडीचा मादी पतंग झाडाच्या कोवळ्या शेंड्यावर, काळ्यावर व फळावर अंडी देते. अंड्यातून निघणारी अळी ही फळाचे नुकसान करते. नंतर अळी जमिनीमध्ये कोषावस्थेत जाते.

३) तुडतुडे : तुडतुडे ही भेंडीवरील सर्वात महत्त्वाची रस शोषण करणारी कीड आहे. तुडतुडे पाचरीच्या आकाराचे व हिरवट पिवळे असून पंखावर काळे ठिपके असतात. ते नेहमी तिरके चालतात. या किडीचे प्रौढ व पिल्ले पानाच्या खालच्या बाजूस वाढून त्यातील रस शोषण करतात. त्यामुळे सुरुवातीला पाने आकसतात व कडा तपकिरी होतात.

४) पांढरी माशी : रोगाचा माशी ही भेंडीवरील रस शोषक कीड असून विषाणूजाण्य रोगाचा प्रसार करते. प्रौढ माशी आकाराने लहान असून पंख पांढुरके असतात व शरीरावर पिवळसर झाक असते. डोक्यावर मध्यभागी दोन तांबडे ठिपके असतात. पिल्ले पानाच्या खालच्या बजूने आढळतात. त्यांचा रंग फिकट पिवळा किंवा पिवळा असतो. ते कें ठिकाणी स्थिर राहतात. पांढऱ्या माशीचे प्रौढ व पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने रस शोषण करतात. याशिवाय पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने रस शोषण करतात. याशिवाय पिल्ले आपल्या शरिरातून गोड चिकट द्रव बाहेर टाकतात. त्यामुळे पाने चिकट होतात. त्यावर बुरशीची वाढ होते व पानाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर अनिष्ठ परिणाम होतो.

५) मावा : मावा पिवळसर किंवा काळा गोलाकार असून त्याच्या पाठीवर मागच्या बाजूने सूक्ष्म अशा दोन नलिका असतात. मावा व त्यांची पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने व कोवळ्या शेंड्यावर समूहाने राहून त्यातील रस शोषण करतात. याशिवाय शरिरातून गोड चिकट द्रव बाहेर टाकतात. कालांतराने त्यावर काळी बुरशी चढते व झाडाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.

एकात्मिक कीड व्यवस्थापन :

१) उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करावी, त्यामुळे जमिनीतील किडींच्या सुप्तावस्था उन्हामुळे व पक्षी खावून नष्ट होतील.

२) किडींच्या पर्यायी खाद्य वनस्पती उपटून नष्ट कराव्यात.

३) भेंडीची वेळेवर लागवड करावी व खताची योग्य मात्र वापरावी. नत्राचा अतिरिक्त वापर करू नये.

४) पिकाची फेरपालट करावी.

५) लागवडीपुर्वी बियाण्यास ७० टक्के थायोमिथॉक्झॉंम / इमिडाक्लोप्रीड ५ ग्रॅम प्रति किलो या प्रमणात बियाण्यास बीज प्रक्रिया करावी.

६) किडग्रस्त भेंडी तोडून अळीसहीत नष्ट करावीत.

७ ) ठिपक्याची अळी व घाटेअळी यांची कामगंध सापळे शेतामध्ये सर्व्हेक्षणासाठी प्रति हेक्टरी ५ या प्रमाणात लावावे.

८ ) पांढऱ्या माशीसाठी पिवळे किंवा चिकट सापळे प्रति हेक्टरी १० लावावेत.

९ ) किटकनाशकाचा अनावश्यक वापर टाळावा. त्यामुळे परभक्षी कीटक जसे ढालकिडा, क्रायसोपा, सिराफिड माशी, कोळी, भक्षक ढेकूण इत्यादी व परोपजीवी कीटक जसे ट्रायकोग्राम, रोगस, ब्रॅकॉन इत्यादींचे संरक्षण होईल. त्यामुळे हानीकाराक किडींचे नैसर्गिकरित्या नियंत्रण होण्यास मदत होईल.

१०) ठिपक्याची अळी व घाटेअळीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामाची अंडी ५०,००० प्रति हेक्टरी शेतामध्ये सोडावीत.

११) पांढरी माशी व इतर लहान किडींच्या नियंत्रणासाठी क्रायसोपाच्या २ अळ्या प्रति झाड सोडावेत.

१२) घाटेअळीच्या नियंत्रणासाठी एचएएनपीव्ही २५० एलई प्रति हेक्टरी वापर करावा.

१३ ) घाटेअळीचा / ठिपक्याच्या अळीचा प्रादुर्भाव दिसताच ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.

१४ ) रासायनिक किटकनाशकाचा वापर फक्त किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतरच करावा. स्पिनोसॅड ४५% २२२ मिली, फोझॅलोन ३५% ८६० मिली किंवा सायपरमेथ्रीन २५ % २०० लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी.

अशाप्रकारे भेंडीवरील किडींची ओळख करून योग्य पद्धतीने एकात्मिक कीड व्यवस्थापना करून भेंडीचे भरघोस उत्पादन घ्यावे.

वांगी पिकावरील किडी : वांगी पिकावर मुख्यत्वे तुडतुड पांढरीमाशी, मावा, लालकोळी, सुत्रकृमी तसेच शेंडे आणि फळे पोखरणारी अळी या किडींच्या प्रादुर्भाव आढळून येतो.

१) तुडतुडे : ही कीड लहान पायरीच्या आकाराची असून रंग फिक्कट असतो. पिल्ले व प्रौढ पानातील रस शोषून घेतात. त्यामुळे पाने वाकडी होतात तसेच तुडतुड्यापासून पर्णगुच्छ या विषाणुजन्य रोगाचा प्रसार होतो.

२) पांढरी माशी : या किडीचे पंख पांढरे किंवा पिवळसर रंगाचे असतात, पिल्ले व कोष खवल्यासारखे कथ्थ्या रंगाचे असतात. या किडीचे पिल्ले व प्रौढ पानातील रस शोषण करतात. त्यामुळे पाने पिवळी पडून वाळतात. तसेच माशा शरीरातून गोड द्रव पदार्थ सोडतात. यामुळे पानावर काळ्या बुरशीची वाढ होते व पाने काळी पडतात.

३) मावा : वांग्यावरील मावा हा फिक्कट तपकिरी रंगाचा असून मावा बीनपंखी तसेच पंख असलेला सुद्धा आढळतो. माव्याची पिल्ले व प्रौढ कोवळी पाने व झाडाच्या कोवळ्या भागातून रस शोषण करतात. त्यामुळे पाने आकसून कोकडतात.

४) लालकोळी : हे अष्टपाद प्राणी असून ते तांबूस रंगाचे असतात. पिल्ले आणि प्रौढ पानाच्या वर आणि खाली राहून त्यातील रस शोषून घेतात. त्यामुळे पाने पांढरट पडतात व पानावर जाळे तयार होवून झाडाची वाढ खुंटते.

५) शेंडे आणि फळे पोखरणारी अळी : या किडींचे पतंग पांढरे असून त्यावर गुलाबी व पिंगट ठिपके असतात. तर अळ्या गुलाबी रंगाच्या असतात. अळ्या प्रथम कोवळ्या शेंड्यात शिरून आतील भाग खातात. त्यामुळे शेंडे जळतात. तसेच ही अळी फळे आल्यावर फळे पोखरते व फळांना खाण्यासाठी निरुपयोगी ठरतात व गळून जातात.

६) सुत्रकृत्री : ही कीड वांगी पिकाव्यतिरिक्त टोमॅटो वेलवर्गीय भाजीपाला या पिकावर आढळते. हे धाग्यासारखे सुक्ष्म उघड्या डोळ्यास दिसू न शकणारे प्राणी असतात. ते जमिनीत राहून पिकाच्या मुळात शिरतात आणि मुळातील रस शोषण करतात. त्यामुळे मुळावर गाठी तयार होवून झाडाची वाढ खुंटते.

वांग्यावरील किडीचे एकात्मिक व्यवस्थापन खालील प्रमाणे करावे.

१) पीक लागवडीपुर्वी शेताची खोल नांगरट करवी. ज्या शेतात अगोदर टोमॅटो, मिरची, भेंडी, वेलवर्गीय भाज्या लावलेल्या आहेत त्या शेतात सुत्रकृमी असण्याची शक्यता असते. म्हणून अशा पिकानंतर त्या जमिनीत लागवड करू नये.

२) रोपांसाठी तयार केलेल्या वाफ्यात फोरेट १० ग्रॅम टाकावे. रोपांवर नायलॉन कापडाचे आच्छादन घालावे किंवा डायमिथोएट ३० टक्के प्रवाही १५ मिली किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

३) रोपांची पुनर्लागवड करतांना रोपे इमिडाक्लोप्रड १० मिली १० लिटर पाण्याच्या द्रावणात अर्धातास ठेवावीत व नंतर लावावीत.

४) मावा, तुडतुडे, पांढरी माशी या किडी आढळल्यास डायमिथोएट ३० टक्के प्रवाही १० मिली किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही १५ मिली किंवा मिथील डीमेटॉंन २५ टक्के प्रवाही १० लिटर पाण्यातून फवारावे.

५) शेंडे व फळे किडलेली आढळल्यास कीडलेले शेंडे काढून नष्ट करावेत.

६) तसेच ५ टक्के निंबोळी अर्क किंवा सायापरमेथ्रीन २५ टक्के प्रवाही ५ मिली किंवा एन्डोसल्फान ३५ टक्के प्रवाही २० मिली किंवा बी. टी. जिवाणू १०० ग्रॅम १० लिटर पाण्यातून फवारावे.

७) पिकावर कोळी आढळल्यास पा. मि. ८० टक्के गंधक ४० ग्रॅम १० लिटर पाण्यातून फवारावे.

अशा प्रकारे वांग्यावरील किडीचे योग्य व्यवस्थापन केल्यास किडीमुळे उत्पादनात होणारी घट टाळता येवू शकते.

मिरची पिकावरील महत्त्वाच्चा किडी : मिरची पिकावर मुख्यत्वे फुलकिडे, मावा, पांढरीमाशी, कोळी हरभऱ्यावरील घाटेअळी आणि तंबाखूवरील पाने खाणारी अळी ह्या किडी आढळतात.

१) फुलकिडे : हे किडे अतिशय लहान व आकाराने निमुळते असतात. ह्यांचा रंग फिक्कट पिवळा व करडा असतो. लांबी १ मि. मी. पेक्षा कमी असते. ही कीड पानाचा खालचा पापुद्रा खरडून पानातील रस शोषून घेते. ही कीड पानाच्या खालच्या किंवा वरच्या बाजूला मुरडली जातात व त्यांचा आकार द्रोणासारखा होतो. ह्या किडीचा उपद्रव पीक लहान असतानाच सुरू होतो व ते मोठे होईपर्यंत राहतो. ह्या किडीमुळे मिरचीमध्ये चुरडामुरडा नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव होतो व त्यामुळे झाडांची वाढ खुंटते.

२) मावा : ही कीड आकाराने लहान असून रंगाने फिक्कट हिरवट किंवा काळसर असते. यामध्ये पंख असलेले व पंख नसलेले दोन्ही प्रकार असतात. मावा ही कीड पानाच्या मागच्या बाजूस, कळ्या व फुलांवर व झाडाच्या कोवळ्या भागावरील रस शोषण करते. त्यामुळे पाने सुरकुतल्यासारखी दिसतात. तसेच ही कीड रस शोषण करताना शरीराबाहेर मधासारखा चिकट पदार्थ सोडते. या चिकट पदार्थावर काळसर बुरशीची वाढ होते व त्यामुळे झाडाच्या अन्न तयार करण्याचा प्रक्रियेत बाधा येवून झाडाची वाढ खुंटते.

३) पांढरी माशी : ह्या किडीची माशी भुरकट पांढऱ्या रंगाची असून आकाराने लहान असते. ह्या किडीची पिल्ले तसेच प्रौढ पानातील रस शोषण करतात व त्यामुळे पानाचा आकार लहान होऊन चुरडली जातात. तसेच या माशीमुळे विषाणू रोगाचा प्रसार होतो.

४) लाल कोळी : ही कीड आकाराने अत्यंत लहान असून वर्तुळाकार, रंगाने लाल किंव पिवळसर व अष्टपाद असतात. ही कीड फळावर अथवा पानाच्या मागच्या बाजूस राहून पानातील रस शोषण करतात. त्यामुळे पानाच्या कडा खालच्या बाजूस मुरडल्या जातात. पादुर्भावग्रस्त झाडांची वाढ खुंटते. फुले मोठ्या प्रमाणवर गळून पडतात तसेच फळांचा आकार लहान, विद्रुप होतो व उत्पादनात घट येते.

५) घाटेअळी : ही कीड बहुभक्षी असून ह्या किडीचे पतंग रंगाने पिवळसर असतात. पुढील पंख तपकिरी असतात व त्यावर काळे ठिपके असतात. तर मागील पंखाच्या कडा धूरकट असतात. ह्या किडीच्या अळ्या विविध रंगछटेच्या असल्या तरी साधारणत :पोपटी रंगाच्या असतात व त्यांच्या पाठीवर दोन्ही बाजूस करड्या रंगाच्या उभ्या तूटक रेषा असतात. सुरूवातीला लहान अळ्या पाने कुरतडून खातात व नंतर फळे लागल्यावर त्यास छिद्र पाडून आतील भाग खातात. त्यामुळे फळांची गळ होवून अधिक नुकसान होते.

६) तंबाखूवरील पाने खाणारी अळी : ह्या किडीचा पतंग मध्यम आकाराचा असून त्याचे पुढील पंख फिक्कट करड्या रंगाचे असून त्याच्यावर नागमोडी पांढऱ्या रेषा असतात. तर मागील पंख पांढरे असतात. ह्या किडीच्या मानेवर व पाठीवर केसाचे झुपके असतात. या किडीची अळी फिक्कट हिरव्या रंगाची असून शरीर गुळगुळीत असते व शरीरावर काळ्या खूणा असतात व छातीवर पट्टा असतो. अळ्या दिवस लपून रहातात व रात्रीच्या वेळी झाडाची कोवळी पाने, शेंडे खावून मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. तसेच ही कीड कळ्या, फुले व फळांनाही नुकसान करतात.

मिरची पिकावरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन :

१) उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करावी, त्यामुळे जमिनीतील किडींच्या सुप्तावस्था उन्हामुळे व पक्षी खावून नष्ट होतील

२ ) शेतातील व बांधावरील किडींच्या पर्यायी खाद्य वनस्पती उपटून नष्ट कराव्यात.

३) वेळेवर लागवड करावी व खताची योग्य मात्र वापरावी. नत्राचा अतिरिक्त वापर करू नये.

४) पिकाची फेराफालट करावी.

५) किडग्रस्त फळे तोडोन नष्ट करावीत.

६) घाटेअळीचे कामगंध सापळे शेतामध्ये प्रति हेक्टरी ५ या प्रमाणात लावावे.

७) पांढऱ्या माशीसाठी पिवळे किंवा चिकट सापळे प्रति हेक्टरी १० लावावेत.

८ ) किटकनाशकाचा अनावश्यक वापर टाळावा. त्यामुळे मित्रकिडीचे संवर्धन होवून हानीकारक किडीचे नियंत्रण होईल.

९ ) घाटेअळीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामाची अंडी ५०,००० प्रति हेक्टरी शेतामध्ये सोडावीत.

१० ) पांढरी माशी व इतर लहान किडींच्या नियंत्रणासाठी क्रायसोपाच्या २ अळ्या प्रति झाड सोडावेत.

११) घाटेअळीच्या नियंत्रणासाठी एचएएनपीव्ही २५० एलई प्रति हेक्टरी वापर करावा.

१२) रासायनिक किटकनाशकाचा वापर फक्त किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतरच करावी. रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही २० मिली १० लि. पाण्यातून फवारावे. तसेच फुलकिड्यासाठी फिप्रोनील ५% २० मिली १० लिटर पाण्यातून फवारावे. अशाप्रकारे मिरचीवरील किडींची ओळख करून योग्य पद्धतीने एकात्मिक कीड व्यवस्थापन करावे.

कोबीवर्गीय भाजीपाला पिकावरील मुख्य किडी: कोबीवर्गीय भाजीपाला पिकावर मुख्यत्वे करून मावा, चौकोनी ठिपक्याचा पतंग, मोहरीवरील काळी माशी, पानाची जाळी करणारी अळी, गडडे पोखरणारी अळी यांचा प्रादुर्भाव आढळून येतो.

१) मावा : ही कोबीवर्गीय पिकावरील महत्त्वाची कीड असून रंगाने फिक्कट हिरवी असते. ह्या किडीमध्ये पंख असलेले व पंख नसलेले दोन्ही प्रकार असतात. या किडीचा प्रादुर्भाव पीक लागवडीपासून पीक निघेपर्यंत असतो. ही कीड पानातून तसेच इतर कोवळ्या भागातून रस शोषण करते व प्रादुर्भाव जास्त असल्यास पाने पिवळी होवून सुअतात व रोपांची वाढ खुंटते. तसेच ही कीड शरीरातून गोड चिकट पातळ पदार्थ बाहेर टाकतात व त्यावर काळ्या बुरशीची वाढ होवून तीचा पिकाच्या वाढीवर परिणाम होतो.

२ ) मोहरीवरील काळी माशी : ही माशी काळ्या नारंगी रंगाची असून तिचे पंख फिक्कट असतात. अळीचा रंग गर्द काळसर असून शरीर मऊ असते. ह्या किडीचा प्रादुर्भाव मुख्यत्वे करून रोपवाटीकेत होतो. अळ्या पानांना छिद्र पडून हरितद्रव्य खातात व प्रादुर्भाव जास्त झाल्यास सर्व पाने फस्त करतात.

३) चौकोनी टिपक्याचा पतंग : ह्या किडीचा पतंग आकाराने लहान असून धुरकट तपकिरी रंगाचा असतो. पंख जेव्हा पाठीवर धरलेले असतात तेव्हा पंखावर चौकोनी आकाराचे ठिपके दिसतात. अळ्या पानाच्या खालच्या बाजूस राहून पानांना छिद्र पाडून त्यातील हरितद्रव्य खातात व ह्या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यानं पाने फस्त करून त्यांच्या फक्त शिराच शिल्लक राहतात.

४) पानाची जाळी करणारी अळी: ह्या किडीच्या अळीचा रंग फिक्कट जांभळा असतो व त्यावर रेषा असतात. पतंग फिक्कट भुरकट रंगाचे असतात व त्यांच्या समोरील पंखावर वेड्यावाकड्या रेषा व पांढरट ठिपके असतात व मागील पंख पांढरट रंगाचे असून त्याच्या कडा तपकिरी रंगाच्या असतात. ही कीड अतिशय नुकसानकारक असून ह्या किडीच्या अळ्या. इ. झाडाची पाने अधाशीपणे खातात. ही अळी पाने गुंडाळून आतील हरितद्रव्य खातात व जाळे करतात. ह्या जाळीमध्ये किडीची विष्ठा साचल्यामुळे पाने खराब होतात.

५) गड्डे पोखरणारी अळी : ह्या किडीच्या अळ्या पांढरट भुरक्या रंगाच्या असून शरीरावर तपकिरी रंगाचे लांब पट्टे असतात. तर पतंग करड्या तपकिरी रंगाचे असतात. ह्या किडीच्या अळ्या शिराच्या बाजूने पाने खातात. तसेच पानातील हरितद्रव्य, पानाचे देठ आणि पत्ताकोबी व फुलकोबीचे फुल व गड्डे पोखरतात त्यामुळे फुलांना व गड्ड्यांना विकृत आकार येतो व प्रादुर्भावग्रस्त झाडाची वाढ होत नाही.

कोबीवर्गीय भाजीपाला पिकावरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन :

१ ) उन्हाळ्यामध्ये नांगरट खोल केल्यामुळे किडींच्या सुप्तावस्थाचा नाश होईल.

२) पिकाची फेरपालट करावी.

३) किडींची अंडी व अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात.

४) प्रादुर्भावग्रस्त भाग काढून त्याचा बंदोबस्त करावा.

५) शेतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पक्षी थांबे लावावेत व थोडा भात शेतामध्ये ठेवल्यास पक्षी आकर्षित होतील. हे पक्षी पिकावरील किडी देखील खातात.

६) चौकोनी ठिपक्याचा पतंग व इतर पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी ट्रायकोग्राम परोपजीवी किटक ५०,००० प्रति हेक्टर ५ ते ७ दिवसाच्या अंतराने ४ - ५ वेळा सोडावेत.

७ ) चौकोनी ठिपक्याच्या पतंगाच्या नियंत्रणासाठी कोटेशिया प्लुटेली हे परोपजीवी कीटक ५,००० प्रति हेक्टर लागवडीनंतर १० ते १५ दिवसांनी सोडावीत.

८ ) चौकोनी ठिपक्याचा पतंग व इतर पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी बॉसिलस थुरिन जीनेनसीस (बीटी) या जैविक कीटकनाशकाची ५०० ग्रॅ./हेक्टर फवारणी लागवडीनंतर १५ दिवसांनी करावी.

९) गड्डे लागण्याच्या सुरुवातीला ५ टक्के निंबोळी अर्काची १५ दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी करावी.

१०) २० ते २५ ओळीनंतर २ ओळी मोहरी पेरावी.

११) रोपवाटिकेत बी लागण्यापूर्वी बियाण्यास इमिडाक्लोप्रीड ७० डब्ल्यू एस ५ ग्रॅम किंवा कार्बोसल्फान ३० ग्रॅम प्रति किलो लावावे.

१२ ) मॅलाथिऑन ५० ईसी २५० मिली किंवा कार्बारील ५० डब्ल्यू प ५०० ग्रॅम किंवा क्विनॉलफॉस २५ ई सी ५०० मिली कीटकनाशक २५० लि. पाण्यात मिसळून फवारावे.

भेंडी, वांगी, मिरची, कोबीवर्गीय भाजीपाला पिकावरील किडींच्या नियंत्रणासाठी तसेच उत्पादन आणि मालाच्या दर्जात वाढ होण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या नियमित वेळापत्रकाप्रमाणे खालीलप्रमाणे फवारण्या कराव्यात.

फवारण्या :

१) पहिली फवारणी : (लागवडीनंतर १० ते १५ दिवसांनी) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + हार्मोनी १५० मिली. + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी :(लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी) : जर्मिनेटर ३५० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + न्युट्राटोन २५० मिली. + हार्मोनी २०० ते २५० मिली. + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (लागवडीनंतर ४० ते ४५ दिवसांनी) : थ्राईवर ७५० मिली.+ क्रॉंपशाईनर ७५० मिली. + + राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी ३० ० ते ३५० मिली + २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : (लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली. + प्रोटेक्टंट ६०० ते ७५० ग्रॅम + न्युट्राटोन ७५० मिली. + हार्मोनी ४०० मिली. + २५० लि.पाणी