पाण्याची बचत- जमीन, पाणी, पिकांचे फेरनियोजन

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


महाराष्ट्रातील पाण्याच्या भीषण परिस्थितीवर मात करण्याच्या दृष्टीने खालील विवेचन सामान्य शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण ठरेले.

कमी पाणी लागणारी पिके घेणे - खरीपातील कमी पाण्यावर येणारी पिके बाजरी, जनावरांसाठी कडवळ, श्रावणी मूग, खरीप तीळ अशी पिके घ्यावीत. तिळाचे पीक अतिशय कमी पाण्यावर येणारे आहे. त्याचे बी कमी लागते. तिळाचे पीक जनावरे खात नाहीत. त्यामुळे मुख्य पीक पेरल्यावर आडतासत हे पीक पेरतात. परिणामी जनावरांचा मुख्य पिकाला त्रास होत नाही.

भाजीपाला - भाजीपाला पिकामध्ये काटेमाठ, साधा माठ, राजगिरा, चिलाटीची भाजी, शेपू, पालक अंबाडी, मेथी आणि कोथिंबीर या पालेभाज्या एरवी १॥ ते २ महिन्यात येतात. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर केला असता मेथी २२ दिवसात व कोथिंबीर ३० दिवसात येते. (संदर्भ - कृषी विज्ञान, मे २०१२, पान नं. १८ व ३४ पहा.)

रब्बी हंगामात कमी पाण्यावर घ्यावयाची पिके - खरीपात पाऊस जर चांगला झाला असेल तर - सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये नांगराच्या तासामागे मोध्यावर हरभरा पेरला किंवा फोकला तर नुसत्या दवावर हरभरा ११० ते १२० दिवसात चांगला येतो. पाण्याची टंचाई भासली व हवामानात बदल झाले तर डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार अधिक उत्पादन घेत येते. जवस व लाखेची डाळ ही अतिशय कमी पाण्यावर येणारी व अतिशय पोषण मुल्य असणारी पिके आहेत. जवस हे कमी पाण्यावर येणारे बहुउपयोगी पीक आहे. याचा उपयोग चटणी व तेलापासून अनेक प्रकारची औषधे तयार करतात. याच्या तेलाचा उपयोग वासे व कडीपाट यांना वाळवी लागू नये म्हणून करतात.

लाख - आतापर्यंत लाख या डाळीवर बहिरेपणा येतो अशी समजून होती, त्यामुळे त्यावर बंदी होती. परंतु हे पीक कमी पाण्यावर येऊन बहुउपयोगी आहे. विशेषकरून यामध्ये प्रथिने अधिक, असल्याने कुपोषणावर मात करता येते. एरवी तुरीची व इतर डाळी, महाग असतात. देशाची गरज भागविण्यासाठी त्यांची आयात करावी लागते. तेव्हा वरील पद्धतीने या डाळिंची आयात थांबून परकीय चलन वाचेल.

जेव्हा खरीपाचा पाऊस की पडतो असे तज्ज्ञ अंदाज वर्तवितात. तेव्हा रब्बीत तूर व उडीद करू नये.

उन्हाळी हंगामात अत्यंत कमी पाण्यावर येणारी पिके - गवारगम हे राजस्थानमधील जोधपूर येथे मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. तेथे प्रक्रिया उद्योगाचे कारखाने आहेत. महाराष्ट्रात हे पीक नवीनच असून याला कारखान्यामध्ये, तेलविहीरी आणि गॅस उत्खननामध्ये आणि टेक्सटाईल इंडस्ट्रिजमध्ये मोठी मागणी आहे. मागील वर्षी देशामध्ये ५०५ अब्ज डॉंलर उत्पादन गवारगमपासून झाले. एप्रिल ते जानेवारीमध्ये ४ अब्ज ९० कोटी इतकी एकूण निर्यात देशातून झाली. २०११ वर्षापेक्षा जानेवारी २०१२ मध्ये ३७४% निर्यात झाली. भारतातील केणत्याही पिकांपेक्षा ही निर्यात अधिक होती. तेव्हा गवारगम हे अवध्य २॥ ते ३ महिन्यामध्ये येणारे कडक पीक आहे. याचा वायदे बाजारात १० हजार ते ३० हजार रू./ क्विंटल दर आहे.

'सिद्धीविनायक' शेवग्याला पाणी कमी लागते. दुष्काळी भागातसुद्धा या शेवग्याने शेतकर्‍यांना बर्‍यापैकी आधार दिला आहे. (संदर्भ - कृषी विज्ञान, मार्च २०१३, पान नं. ३० आणि शेवगा पुस्तक)

उन्हाळी वैशाखी मूग - मूग हे असे पीक आहे की, १-२ उगवणीचे वेळेस पाणी व २ - ३ वाढीचे पाणी दिले आणि डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरून अवध्या ४५ दिवसात येणारे पीक आहे. मूग पाचक, सहज पचणारे, मूल्यवर्धन होणारे अतिशय उपयुक्त असे पीक आहे. वैशाखी मुगातील निरीक्षण असे आहे की, ज्यावेळेस २८ ते ३० दिवसात हे पीक फुलावर येते, तेव्हा मधमाशांचे प्रमाण वाढून परागीभवन वाढते. मधमशाच्या जर पेट्या ठेवल्या तर आयुर्वेदिक मुगाचे मध व त्याचप्रमाणे शेवग्याचे मध मिळू शकते. ते अतिशय औषधी आहे. शेवग्याचे मध बिहारमधील मधुबन जिल्ह्यात जास्त होते. ८ ते १० महिन्याच्या दुष्काळी भागात उन्हाळी भाजीपाला घेऊ नये. परंतु ज्या ठिकाणी इतर पिके असतात तेथे पाणी वाहणार्‍या दांडाला लाल माठ व पात्री ही भाजीपिके आपोआप येतात. ती औषधी आहेत.

पाण्याची बचत करतान उसासारखी अधिक पाणी लागणारी १० ते १५ महिन्याची पिके पाट पाण्यावर घेऊ नये. याचे क्षेत्र झपाट्याने खाली येने गरजेचे आहे. कारण १ एकर उसासाठी लागणारे पाणी हजार माणसांना वर्षभरासाठी पुरते. तेव्हा यावर विचार करून हे क्षेत्र कमी करावे.

ऊस हे पीक फक्त अल्कोहोल निर्मितीसाठी घ्यावे. १०० % पेट्रोलवर चालणारी वाहने न चालविता पेट्रोलमध्ये २५% इथेनॉलचा वापर करून पेट्रोलच्या वापरत २५% बचत होईल. हळुहळु ब्राझीलप्रमाणे नुसत्या इथेनॉलवर वाहने चालली तर अब्जावधी डॉंलरचे परकीय चलन वाचेल. तोटा होणार नाही. सामान्य माणूस महागाई कमी होऊन सुखाने जगेल. साखरेसाठी उसाला पर्यायी कमी पाण्यावर येणार्‍या पिकांचा शोध घ्यावा. वाहने, विमानासाठी स्वस्त इंधन निर्माण करता येईल अशा प्रकारची कार्यप्रणाली शास्त्रज्ञांनी निर्माण करावी. उसासाठी ठिबक सिंचनास १००% अनुदान दिले तर पाण्याची फार मोठ्या प्रमाणात बचत होईल.

कापसासाठीदेखील याचप्रमाणे ठिबक सिंचनला १००% अनुदान देणे गरजेचे आहे. फळबागांना पुर्णपणे ठिबकचा अवलंब करावा. या सर्व पिकांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावा. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की, दुष्काळी परिस्थितीत जमिनीला पाणी न देत पिकांना पाणी देणे गरजेचे आहे. म्हणजे पिकांच्या मुळाजवळ पाणी देऊन कमी पाण्यात पिके चांगली येतील. यासाठी ठिबक व तुषार सिंचन प्रणाली टप्प्या - टप्प्याने अनुदानीत करून याचा काही भाग राज्य सरकार व काही भाग केंद्र सरकार असा विभागून अवलंबला तर भारतीय शेतीला एक मोठा ब्रेक - थ्रू मिळेल आणि कायम स्वरूपी दुष्काळी परिस्थितीत घाबरण्याचे कारण राहणार नाही. यासाठी सौरउर्जेचा वापर करून विजेच्या खर्चात फार मोठी बचत होईल. असे प्रयोग जगभर होताहेत भारतातील तरूण वर्गाने पाण्यावर व हायड्रोजनवर फवारणीचे यंत्र विकसित केले आहे. हे खरोखरच प्रेरणादायक आहे. अशा तरुणांना शोधून त्यांना स्वतंत्र स्कॉलरशिप देऊन जिल्हा पातळीवर फार्मर Farmer's Low Innovative Center (FLCIC) हे कृषी शिक्षण संस्थेने व परिषदेने देशभर निर्माण करावे. वर्षातून एकदा याचे प्रदर्शन भरवावे. परिक्षक मंडळाने देश पातळीवर याला १ लाख रुपयाचे बक्षिस, राज्य पातळीवर ५० हजार रुपयाचे बक्षिस तर जिल्हा पातळीवर २५ हजार रुपयांचे बक्षिस जाहीर करून द्यावे. म्हणजे यातून फार मोठे संशोधक देशभर निर्माण होतील. विविध चाचण्यातून जिल्ह्यातून अशा १० संशोधकांची निवड करावी. त्यांना वैयक्तिक २००० रू. महिना खर्चासाठी द्यावे. व त्यांना लागणाऱ्या सर्व साधन सामुग्रीची वस्तू आणि बिल दाखविल्यावर Innovative संस्थेने खर्चाचे बिल द्यावे. म्हणजे तरुण संशोधकाला अडथळा येणार नाही व संशोधन लाभदादायक ठरेल. यामध्ये सोलरवर जास्तीत जास्त जो कमी खर्चात संशोधन करेल त्याला जास्तीत जास्त पोत्साहन द्यावे आणि विशेष पुरस्कार देऊन त्याचा राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर डॉ. अब्दुल कलाम यांसारख्या शास्त्रज्ञाच्या हस्ते सत्कार करावा.

जमिनीची क्षमता कशी वाढविता येईल ?

जमीन ही शहरीकरणाने, कारखाने, घरबांधणीने व भारत सरकारचे विविध प्रकल्प यामध्ये दरवर्षी १० % जमीन ही या खाली येते. जमिनीचे व्यापारीकरण झाल्यामुळे वर्षापासून २ - ३ किंवा ४ पिके घेण्याची अहमअहमिका लागलेली आहे. पाण्याचा तुटवडा झाला म्हणजे शेततळे, विहीरीचे पुनर्भरण, सिंचनाच्या विविध पद्धतीने येनकेन प्रकारे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. दुसर्‍या बाजूला व्यापारी फळपिके घेतली जात आहेत. दुष्काळी भागात कवठ, चिंच, बोर, जांभूळ अशी काटक कमी पाण्यावर येणारी बुहुवर्षीय फळपिके तसेच 'सिद्धीविनायक' शेवगा आणि तत्सम पिकांचा शेतकर्‍यांनी जरूर विचार करावा.

एकतर राज्यकीय दबावाने जास्त पाण्याने जमिनी क्षारपड, चोपण चिबड्या झाल्या. तेथील जमिनीची भौतिक व जैविक सुपिकता ढासळली, जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढले. Co३, HCO३, CL२, SO४ अशा विषारी घटकांचे प्रमाण वाढले. त्याचप्रमाणे कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, सोडियम अशा उपद्रवी क्षारांचे प्रमाण वाढल्यामुळे तेथे काटेरी बाभुळ, बाजीराव गवत हे सुद्धा उगवत नाही, अशी अवस्था निर्माण झाली आहे. तेव्हा प्रथम क्षार कमी करून जमिनीचे भौतिक गुणधर्म सुधारावेत म्हणून पावसाची व पाण्याची उपलब्धता बधून वर्षातून एकदातरी हिरवळीच्या खताचा वापर करावा. यामध्ये धैंचा किंवा आम्ही संशोधनातून टिपलेले बरबडा हे पीक घेऊन ते फुलावर येण्याचे सुमारास जमिनीत नांगराने गाडावे. म्हणजे जमिनीतील क्षाराचे प्रमाण कमी होईल. कर्ब व नत्राचे प्रमाण ४०:१ असावे, ते एक आदर्श समजले जाते. दुष्काळामुळे जनावरे कमी झाली तरी शेतकऱ्यांनी हतबल न होता २ एकर जमीन आहे तेथे किमान १० गुंठे तरी दरवर्षी हिरवळीच्या पिकाचा वापर करावा. मे ते सप्टेंबरपर्यंत ताग, मूग, मटकी, मेथी अशा प्रकारे कमी कालावधीची ५० ते ६० दिवसात येणारी हिरवळीचे खत देणारी पिके करावीत. म्हणजे यापासून एकरी ५ टन शेणखताचा फायदा मिळू शकेल. तसेच या खतामुळे १ पाऊस जरी झाला तरी जमिनीची पाणीधारण क्षमता वाढून मुळांची वाढ चांगली होईल. त्यामुळे त्याचा उत्पादन वाढीस निश्चित फायदा होईल.

शास्त्रज्ञ व संशोधकांसाठी आव्हान

देशातील कुपोषण थांबावे व दारिद्र्य हटावे आणि भूक मिटावी यासाठी विकसनशिल व अविकसित राष्ट्रांतील शास्त्रज्ञ आणि संशोधकांना आव्हान आहे की, देशातील बालकांसाठी, आफ्रिकन राष्ट्रांतील कुपोषितांसाठी चौरस आहार निर्माण करण्यासाठी धान्य, फळे, आयुर्वेदिक औषधे निर्माण करणे गरजेचे आहे. पारंपारिक किंवा उन्नत पद्धतीने भात लावायचे झाले तर पेर भातापेक्षा लागवडीच्या भाताला चिखलणी करावी लागते. त्यासाठी पाणी जास्त लागते तेव्हा शास्त्रज्ञांना आव्हान आहे की, कमी पाण्यावर दर्जेदार भात निर्माण करावे. आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र, मनीला, फिलीपाईन्स येथे याचे काम सुरू आहे. याला काही दिवसात यश येईलच. हैद्राबाद येथील इक्रीसॅट ही जी आंतरराष्ट्रीय संस्था आहे तेथे डाळवर्गीय, तृण धान्य व गळीत धान्यावर अतिशय कमी पाण्यावर येणाऱ्या जीनचा शोध लावून अशा नवीन जाती निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. थोडक्यात कमी पाणी, कमी रोगराई, कमी कीड आणि दर्जेदार व अधिक उत्पादन देणारे वाण आज जगाला गरजेचे आहेत.