कृषी कौशल्य विकासाचा इतिहास

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


शेती हे तसे सोपे शास्त्र वाटते पण कठीण कला आहे. हल्लीच्या परिस्थितीत शेती किफायतशीर करणे अतिशय कठीण व जिकीरीचे होऊन बसले आहे. १७ ते १८ व्या शतकामध्ये शेती ही उन्नत किंवा प्रगत नव्हती. उसाचा शोध नव्हता. त्यामुळे साखरेचा शोध नव्हता. १९२० पर्यंत भारतात चहा माहीत नव्हता. त्याकाळी वाणी एक आण्याची साखर पिशवीत न देता हातात देत असत आणि न मागता चहाची बुकणी त्या साखरेवर टाकून देत असे. जेणेकरून ती साखर वेगळ्या पदार्थासाठी न वापरता ती चहासाठी वापरली जावी, हे त्याकाळचे ब्रिटीश धोरणे होते. अशा रितीने भारतीयांना चहा प्यायला शिकविला व चहाची चटक भारतीयांना लागली.

१९२० साली भारताची लोकसंख्या साधारण ६ ते ८ कोटी होती. या काळात भारत हा पारतंत्र्याच्या महान संकटात होता. संपुर्ण देश पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी झगडत होता. सारे राष्ट्र यामध्ये गुरफटून गेले होते. कृषी प्रधान देश असल्यामुळे शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने शिक्षण क्षेत्रातील वाटा माहीत नव्हत्या. इंग्रजी जुजबी होते. सातवी (VII) व्हर्नाक्युलर फायनल झालेले हेडमास्तर होत असत. म्हणजे मराठी शिक्षणच हे सिंहीणीच्या दुधासारखे होते. त्याकाळात इंग्रजी शाळाच नव्हत्या. हायस्कूल नसायचे. त्यामुळे विषय मोजके गरजेपुरते, आधुनिक तंत्रज्ञान तर सोडाच पण तंत्रज्ञान त्याकाळात भारताला शिवलेही नव्हते. पारतंत्र्यच्या जाळ्यात अडकलेला देश मुक्त करणे हाच त्याकाळचा ध्यास होता. शेती खाते अस्तित्वात नव्हते. कापूस, धान्य पेरणी माहिती होती. ३ छिद्राचे चाडे पाभरीला जोडताना त्याकाळच्या प्रत्येक शेतकऱ्याला व त्यांच्या मुलांना कौशल्याने चाडेगाठ शिकविली जात असे. चौथी पाचवीच्या मुलांना चाडेगाठ शिकविली जायची. आम्हाला पहिलीपासूनच शेती विषय बेसीक असल्याने मला १९४८ साली चाडेगाठ शिकविली. दुसरे कौशल्य म्हणजे नांगर सुताने (सरळ रेषेत) चालविणे. त्यानंतर वखरपाळी मुळीला न आडकता एका फटक्यात मारणे. त्याकाळी सर्व पेरणी एका ओळीमध्ये दोन बैलाच्या साह्याने पेरणारा चाड्यावरचा माणूस किंवा बाई चतुर कौशल्यवान असत. पेरणी ज्याला करता येते तो चतुर कौशल्यवान समजला जात असे. वखर मारणे, मैंद चालविणे हे त्यामानाने खुरपणी हा विषय नसे. पिकाच्या २ तासामध्ये आलेले गवत लाकडी नांगराने जागेवरच दाबले जात असे. त्याचे खत होत असे. त्याकाळी कंपोस्ट माहित नव्हते. फक्त शेणखत देशाला माहीत होते.

पाऊस मृग नक्षत्रात होत असे. जनावरे मोजकीच होती. बैलगाठ खुंटीला मारणे व दावणीला गुरे बांधणे किंवा जनावरांना वेसण बांधणे, नंतर वढाळ जनावरांना पुढील २ पायांच्या मध्ये लोढणं बांधणे ही कौशल्याची कामे १६ वर्षाची मुले करत असत. पुस्तके मोजकीच होती. शाळा मराठी सातवीपर्यंतच होती. जर हुशार मुले असतील व त्यांची आर्थिक परिस्थिती सबल असेल, म्हणजे वडील शाळा मास्तर किंवा भाऊ कुठेतरी बाबु असेल अशा कुटुंबातील मुलगा जिल्ह्याच्या ठिकाणी मॅट्रीकपर्यंत कसा बसा जात असे व मॅट्रीक झालेला मामलेदार बनत असे. त्याकाळी स्पर्धा परिक्षा नसत. कारण शिकलेली मुले फार नसत. १०० -२०० एकर शेती असणारी त्याकाळची धनवान, जहागिरदार माणसांची मुले पुणे,मुंबई,दिल्ली,कलकत्ता या ठिकाणी शिकली. कौशल्य या शब्दाप्रमाणे भारतीयांना शिक्षण घेता येत नसे. परंतु पारंपारिक पद्धतीने त्यातील वळण म्हणून आपोआप शिकले जात असे. जसे आजच्या काळात २ वर्षाची लहान मुले टी.व्ही. वरील क्रिकेट बधून बॅट - बॉल खेळतात, तसे त्याकाळी दुभत्या जनावरांचे दूध काढणे, शेण काढणे, चारा कापणे आंबवण देणे, पोळ्याला बैलांची शिंगे रंगविणे अशा प्रकारची कामे शेतीमध्ये होत असत. बागायती फार कमी होती. कॅनॉल नव्हते. त्यामुळे विहिरीवर मोट चालवून बारे धरणे व व्यवस्थित पाणी देऊन बारे बंद करणे हे अव्व्ल दर्जाचे कौशल्य त्याकाळी ज्ञात (माहीत) होते. गावातील सुतार लाकडी औजारे बनवत असे व पाऊस पडण्याअगोदर पेरणी अगोदर शेतकरी त्याच्याकडे ती औजारे दुरुस्तीला नेट असत आणि वखराच्या पासा, जानोळी किंवा खुरपी, विळे हे दसरा किंवा दिवाळीच्या सुमारास लोहार दुरूस्ती करत असे. कुऱ्हाड, टिकाव, फावड्याला पोलादाचे पाणी लावत (टिकाऊपणासाठी) असे.

२० व्या शतकामध्ये विहीर बागायती झाली आणि अधुनमधून खुरपणी करावी लागत असे. सुपीक जमिनीत दादर पेरली की फक्त कापायलाच जावे लागत असे. उडीद, मूग निघाला की खपली किंवा बन्सी गहू करत असत आणि याच्यावर शेती शिक्षणाची पुस्तके नसत. हे ज्ञान वडिलोपार्जीत अनुभवाने, घरचे काम करून, शिकताशिकता मिळत असे. प्रत्येकाकडे काहीना काही शेती असल्याने मजूर म्हणून कोणी काम करीत नसे. ज्या घरात काम असेल त्यावेळी एकमेकांकडे बदली किंवा मदत म्हणून काम करण्यास जात असे. त्याकाळात मजूर हा शब्द नव्हता. 'एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ' हे घोष वाक्य न शिकविता अंगवळणी पडले होते.

पारतंत्र्याच्या शेवटी शेवटी व स्वातंत्र्यानंतरची १० - १५ वर्ष अन्नधान्य कमी पडतेय म्हणून ते अमेरिका, ऑस्ट्रलिया येथून आयात केले जात असे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शेतीचा विकास व्हायला सुरुवात झाल्यानंतर मराठी शेतीशाळा, शेतीचे हायस्कूल हे दुर्मिळच होते. देशामध्ये लॉयलपूर, पुणे, नागपूर अशा मोजक्या ५ - ६ ठिकाणी भारतात शेतकी कॉलेजेस होती आणि तेथे सुद्धा शेती शास्त्र हे भारतीय शेतीकरीता न शिकविता इंग्लंडमध्ये किंवा परदेशी शेती कशी केली जाते या विषयी शिकविले जात असे. परदेशातील ट्रॅक्टर भारतातील बैल नांगरटीपेक्षा कसा श्रेष्ठ आहे आणि भारतातील लोखंडी नांगर हा लाकडी नांगरापेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे शिकविले जात असे.

जसे दळणवळण, शिक्षणाच्या सुविधा वाढल्या तसाच अमेरिका, इंग्लंडचा भारताशी संपर्क येऊ लागला आणि शेतीमधील परदेशातील व्यापारी फळपिके धान्यपिके यांच्या लागवडीचा श्रीगणेशा भारतामध्ये १९५० ते १९६० च्या काळात झाला व हळुहळु ऊस शेतीचा उदय झाला. पिकांच्या गरजेनुसार मशागतीच्या खते देण्याच्या, फवारणी, पाणी यामधील कौशल्य भारताने आपोआपच विकसित केले. त्याचा सोय व उन्नत निविष्ठा म्हणून वापर होऊ लागला. कौशल्य ही उत्पादनाशी निगडीत न राहता त्याची गरज आहे म्हणून शिकावे असे समिकरण झाले आणि त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा खरे कौशल्य विकासाचे रोपटे किंवा व्यापारी पिके ही १९८० च्या काली रुजली गेली व त्याला गती आली. विदर्भातील संत्री, मोसंबी व नाशिकची द्राक्ष, हिमाचल प्रदेशची सफरचंद, आग्र्याचा बटाटा, विदर्भ - मराठवाड्यातील कापूस आणि खानदेशातील आयसपूर ज्वारी तसेच उडीद, मूग, मटकी, चवळी व बरड रानातील पावसाळी मूग - मटकी, भुईमूग ही पिके कुठल्याही कौशल्याविना, खताविना, पावसाच्या पाण्यावर मुबलक येत असत. म्हणजे शेती ही बिगर कौशल्याची पारंपारिक आहे. याला काही कौशल्य लागत नाही. ज्या रोजच्या शेताच्या रस्त्याने बैलगाडी जाते तो रस्ता त्या बैलांना जसा माहित असतो, म्हणजे नेहमीच धुरकरी जरी गाडीवर बसला नाही व त्याने त्याच्या छोट्या मुलाच्या हातात गाडीचा कासरा दिला तरी ते बैल शेतावर पोहचवत असे, त्याच पद्धतीने सर्व पारंपारिक पिके ही शेतकरी व त्याची मुले सहज करत असत. ही सर्व पिके त्याच्या प्राथमिक गरजा भागविण्या इतकीच असत. १९९० च्या काळानंतर भारतातील कृषी विद्यापीठे उभारण्याचा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा १९५६ चा रिपोर्ट भारत सरकराने मान्य करून पहिले कृषी विद्यापीठ उत्तरप्रदेशात नैनिताल येथे उभारले. त्यानंतर १९७० ते ८० च्या काळात सर्व भारतात ३९ कृषी विद्यापीठे उभारण्यात आली. कृषी अभियांत्रिकी, फलोद्यान, किटकशास्त्र व रोगशास्त्र निर्माण झाले. खतांचे, रासायनिक खतांचे विविध प्रकार निर्माण झाले. परदेशातील फळे, फुले आली. नंतर पॉलीहाऊस, शेडनेट, संकरीत भाजीपाला, हॉलंडची फुले यांचा २००० नंतर मोठ्या प्रमाणात भारतात उदय झाला. नंतर त्यांच्या जोपासनेसाठी आधुनिक शास्त्र निर्माण झाले. ग्रिन हाऊस, पॉलीहाऊस, फवारणीची नवीन यंत्र, डोळे भरणे, खत भरणे, बियाणाबरोबर खते पेरणी यंत्र, नंतर पेट्रोल पंपाने फवारणी करणे व उंच फळबागांवर फवारणी करण्यासाठी मरूत पंपाचा शोध लागला आणि आता या १० - १५ वर्षात उतीसंवर्धन व जैवतंत्रज्ञान शास्त्र बऱ्यापैकी माहीत झाले. आधुनिक कृषी तंत्रज्ञान डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा १९८५ मध्ये जन्म झाला. नंतर ठिबक सिंचन, तुषार सिंचन आले. म्हणून शेतीतील आणि विद्यापीठातील अनेक अंग आणि उपांग याचा वापर शेतीत होऊ लागला व याचा फायदा विविध क्षेत्रात जाणवू लागला. दुभत्या जनावरांचे दूध हाताने काढत असे, पुढे मोठ्या प्रणमातील दुग्धोत्पादनात दूध काढण्याची यंत्रे आली मात्र त्यामध्ये दूध संपल्यानंतरही मशीन चालूच राहत असल्याने सडातून रक्त येत असे, हा त्यामधील मोठा धोका होता. पुढे यंत्र कौशल्यात विकास होऊन सडातील दूध काढून संपल्यानंतर हे यंत्र आपोआप बंद होत असल्याने हे यंत्र सोईचे व उपयुक्त असे ठरू लागले. आज मजुरांची टंचाई असलयाने भारतीय शेतीस उपयुक्त, कमी पैशात चांगले काम करणारी नैपुरण्यता विकसित झाली. ही काळाची गरज आहे. त्या दृष्टीने शेती शास्त्रामध्ये कौशल्य (Advance Skill Development Training Program) निर्माण करणे ही काळाची गरज आहे.

दक्षिण भारतातील राज्यांमध्ये आंबा, काजू, मसाला पिके यांचे मोठ्याप्रमाणात उत्पादन होत असल्याने त्यांच्या वृद्धीसाठी लागणाऱ्या कौशल्याचा विकास, उत्तरपूर्व भारतात मणीपूर, त्रिपुरा, नागालॅन्ड, अरुणाचल प्रदेश, मेघालय येथील भात, फुलपिके, फळपिके यांच्या वृद्धीसाठी कौशल्याचा विकास, उत्तर पश्चिम भारतातील हिमाचल प्रदेश, जम्मूकाश्मिर या राज्यांची फळपिके, फुलपिके, अॅरोमॅटीक क्रॉप केशर यांच्या वृद्धीसाठी कौशल्याचा विकास, राजस्थान, ओडिसा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, उत्तरप्रदेश येथील बटाटा, ऊस, कडधान्ये या पिकांना लागणारी कौशल्य, ज्ञान फार उपयुक्त ठरेल त्या दृष्टीने तंत्रज्ञान व कौशल्य ही एकाच कृषी शास्त्राच्या विकासाच्या रथाची महत्त्वाची दोन चाके ठरतील. मात्र या कौशल्य क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाहून अधिक प्रयोगात्मक, कसोटीत्मक, सरवात्मक, नैपुण्यात्मक प्रगती ही झोकून घेऊन (Devotion Dedication) या मुळच्या गुणामुळेच शक्य होईल. त्यादृष्टीने आता सांशोधन व विकास याला गती यायला ५ वर्षे लागतील. शेती उत्पादन व मार्केटींग, मुल्यवर्धन, कुटीरोद्योग यातील कौशल्य आणि अन्नधान्य, फळे, फले व आयुर्वेदिक वनस्पतींचे योगदान फार मोठे राहील. कृषी मालातून विविध पदार्थ म्हणजे रस, चोथा, कोया, बी, साल, खोडाची साल, पाने, फुले याला आयुर्वेदिक व फलोद्यान शास्त्रात, फळांचे काढणीपश्चात तंत्रज्ञान व त्यापासून निर्माण करणारे विविध उपयोगी पदार्थ इथे खरी कौशल्य व तंत्रज्ञानाची हातात हात घालून सांगड घालून प्रगती साधला आल्यास ती कृषी कौशल्य विकासाची क्रांती ठरेल.