पारंपारिक तसेच व्यापारी पिकांतील 'सिद्धीविनायक' शेवग्याची यशस्वी लागवड!

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


शेवगा हे पीक सर्वेक्षण संशोधनाच्या गेल्या २५ वर्षाच्या अनुभवातून असे लक्षात आले की, शेतकऱ्यांना पडत्या काळामध्ये (प्रतिकूल परिस्थितीत) सर्व दृष्टीने आधार देते. शेवग्यातून वर्षाला एक एकरातून ५० हजार ते १ लाख रू. होतात व त्यातील आंतरपिकापासून ५० ते ८० हजार रू. सहज होतात. असे देशातील व महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात यशस्वी केले. वरील अनुभवाने 'सिद्धीविनायक' शेवग्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत केल्या. जेव्हा शेतकरी भाजीपाला व फळपिके घेतो तेथे शेवगा हे मिश्र पीक घेतो. त्यावेळी त्याला मुख्य पिकापेक्षा शेवगा हे मिश्र पीक परवडते असे लक्षात आहे. उदा. पपई, लिंबू, डाळींब, चिकू, पेरू, चिंच अशा बहुवर्षीय (Perrinal ) फळपिकांमध्ये जेव्हा उत्पन्न चालू व्हायला वेळ असतो आणि त्याचा खर्च मात्र काही थांबत नाही, फळपिकांवर औषध फवारणी, खत, मशागत, पाणी इ. वरील खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज काढावे लागते व हा खर्च कसा भागवायचा ही समस्या शेतकऱ्यांपुढे उभी राहते. तेव्हा आम्ही सुचविल्यानंतर शेकडो एकरवर ही मिश्र पीक पद्धती अवलंबली गेली व त्यातून मुख्य पिकाच्या खर्चाची गरज या 'सिद्धीविनायक' शेवगा पिकातून भागून या पैशातून विहीर, ट्रॅक्टर, जीप, मुलांचे लग्न, उच्च शिक्षण या खर्चाच्या मुख्य बाबींसाठी पैशाची पुर्तता या शेवग्यापासून होऊ लागली. त्यामुळे शेतकरी या लागवडीकडे वळू लागला. जी प्रतिकूल परिस्थती भाजीपाला पिकांसाठी असते. ती म्हणजे हलकी जमीन, पाणी कमी यामध्येदेखील शेवगा हे पीक अतिशय चांगले येते. याला रोगराई, कीड, खर्च कमी त्यामुळे हे पीक परवडते.

दुसऱ्या पद्धतीत फळभाज्या व भाजीपाला उदा. टोमॅटो, वांगी, मिरची, कांदा, तत्सम पालेभाज्या यामध्ये सुद्धा 'सिद्धीविनायक' शेवग्याचे मिश्र/आंतरपीक हे यशस्वी ठरले आहे. कारण पालेभाज्यांचे पीक हे जेव्हा अनुकूल परिस्थती असते तेव्हा उत्पन्न चांगले येते व त्यामुळे मार्केटमध्ये मालाची रेलचेल सुरू होते व भाव कोसळतात. तर प्रतिकुल परिस्थितीत उत्पदान कमी येते. येथे भाव जरी ज्यादा मिळाले तरी एकूण उत्पादन कमी आल्याने शेतकऱ्याला खर्च व उत्पन्न याची तोंड मिळवणी करणे अवघड जाते. अशा दोन्ही परिस्थितीत 'सिद्धीविनायक' शेवगा आंतरपीक म्हणून घेतल्यास शेवग्यापासून वर्षभरात ५० हजार ते १ लाख रू. मिळतात आणि तो यशस्वी होतो. अनेक जिल्ह्यांमध्ये १२ ही महिने 'सिद्धीविनायक' शेवग्याची यशस्वीरित्या लागवड केली आहे. यामध्ये अतिपावसाच्या भागात लावलेल्या शेवग्याला मात्र फुले व शेंगा कमी लागतात. नुसतीच वाढ होते. तर आठमाही बागायती क्षेत्रात याची लागवड करून शेतकऱ्यांनी आपले जीवन समृध्द केले आहे. याकरिता संदर्भासाठी लावा शेतात 'सिद्धीविनायक' शेवगा मोरिंगा लागवड' पुस्तक पाचवी आवृत्ती पहावी.

गेल्या ५ ते १० वर्षाच्या नवीन प्रयोगातून असे लक्षात आले की, देशाच्या अनेक भागामध्ये कापूस या व्यापारी पिकाखालील क्षेत्र वाढत आहे. यामध्ये बी.टी . क्षेत्राची लागवड वाढल्याने लोकांचा उत्पादन खर्च वाढला आहे. याने बोंड अळीला जरी प्रतिबंध झाला असला तरी लाल्या व टाक्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे व अति पावसाने कपाशी पीक धोक्यात आले आहे. या प्रतिकुल परिस्थितीत कोरडवाहू कापसाचे एकरी १ ते २ क्विंटल उत्पादन एवढा उतारा खाली येतो. तर जेव्हा शेतकऱ्याचा माल दिवाळीत येतो तेव्हा मिल मालक, सरकार, फेडरेशन व्यापारी हे कापसाचे भाव मुद्दाम पाडतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस हे पीक परवडत नाही. तेव्हा अनेक शेतकरी कापसामध्ये 'सिद्धीविनायक' शेवग्याची ८ x ८ फुटावर जुनमध्ये लागवड करत आहेत आणि डिसेंबर ते मार्च या काळात या शेवग्यापासून ५० हजार ते १ लाख रू. सहज मिळतात. म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत जर कापसाच्या पिकाने साथ दिली नाही तर 'सिद्धीविनायक' शेवगा हा हमखास संकटकाळी शेतकऱ्यांना सहाय्यभूत ठरतो व शेतकऱ्याला उभारी देतो. जेथे बागायती क्षेत्रात कापसाचे पीक घेतले जाते तेथे कापसाची फरदड घेतली जाते. तेथे शेवग्याचे उत्पादन मार्चपर्यंत चांगले येते व डिसेंबर ते मार्च फरदडचेही उत्पन्न मिळते. एकाचवेळी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर दोन्ही पिकांना करता येतो त्यामुळे उत्पादन खर्च हा कमी येतो. उदाहरणादाखल १० क्विंटल जर हंगामी कापसाचा उतारा व त्याला ५ हजार रू./क्विटंल दर मिळाला तर ५० हजार रू. कापसापासून मिळतात व तेवढेच पैसे शेवग्यापासून किंबहुना याहून अधिक मिळतात व फडदडपासूनही उत्पादन मिळते. म्हणजे माय मरो (कापूस) पण मावशी उरो ('सिद्धीविनायक' शेवगा) ही म्हण 'सिद्धीविनायक' शेवगा सार्थ करतो. खरं तर प्रतिकूल परिस्थितीत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या वापराने कापूस (माय) मरत नाही. तर ती सुद्दढ राहून व मावशी ('सिद्धीविनायक' ) हे शाश्वत उत्पादन व भाव देत असल्याने कापसापेक्षा अधिक शेवगा (मावशी) परवडतो. नंतर मार्च - एप्रिलपर्यंत कपाशीचे पीक मोकळे झाले की, 'सिद्धीविनायक' शेवग्याचे पिकही शेतकरी उपटून टाकतो व परत कपाशीबरोबर जुनमध्ये पुन्हा नवीन शेवग्याची लागवड करतो आणि हे आता शेतकरी बहुतेक ठिकाणी करू लागले आहेत. त्यामुळे सिंगल कापूस पीक घेऊन शेतकऱ्यांची झालेली दैन्यावस्था (दशा) ही 'सिद्धीविनायक' शेवग्याचे मिश्रपिकाने समृद्ध जीवनासाठी दिशादर्शक ठरत आहे. म्हणजे एका बाजुला प्रतिकूल परिस्थिती, अतिपाऊस किंवा कमी पाऊस यामुळे कापसावर येणारी रोगराई, कीड व दुसऱ्या बाजुला भावाची पडझड या वादळी व तुफानी लाटामय जीवनामध्ये शेतकऱ्यांची भरकटलेली नौका 'सिद्धीविनायक' शेवगा किनाऱ्याला लावतो आहे. नव्हे तो त्याला समृद्ध जीवनाची प्रेरणा देतो आहे. जेव्हा पाकिस्तान, चाईन, अमेरिकेमध्ये दुष्काळ किंवा पुरामुळे तेथे कापसाचे उत्पादन कमी येते तेव्हा भारतीय कापसास अचानक मागणी वाढते, तेव्हा शेतकऱ्याच्या आशा पल्लवीत होतात. परंतु याच वेळी हे मृगजळ ठरते. 'सिद्धीविनायक' शेवगा कपाशीसारख्या व्यापारी पिकात मिश्र किंवा आंतरपीक घेऊन शेतकऱ्यांच्या जिवनात समुद्धीची मोहर उठवतो. तेव्हा ही प्रयोगीशिलता प्रगतीशिल शेतकरी, बँका, सेवाभावी संस्था, राज्य सरकारे व केंद्र सरकारने विचारपुर्वक गतीमानतेने राबविणे हे सुज्ञपणाचे ठरेल.