भारतीय शेतीमालाच्या मुल्यवर्धनाची यशस्वी वाटचाल

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


२०१६ च्या मान्सूनची सुरुवात ही मृगाच्या शेवटच्या चरणात (२२ जून) महाराष्ट्रात व देशाच्या वेगवेगळ्या भागात झाली आहे. या काळामध्ये राहिलेल्या भागात उत्तर महाराष्ट्र (जळगाव, धुळे) येथे पावसाची सुरुवात ही उशीरा का होईना पण व्हावी अशी इच्छा आहे. म्हणजे पेरणी होऊन चिंतेचा विषय राहणार नाही.

यंदाच्या (२०१५ - १६) वर्षी मागील दोन वर्षापेक्षा दुष्काळाची तिव्रता जास्त जाणवल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्या फळबागा टँकरने पाणी आणून ठिबकने देऊन वाचविल्या. ज्यांना ही व्यवस्था नव्हती त्यांच्या फळबागा करदळल्या, जळाल्या, असे जरी झाले तरी शेतकऱ्यांनी उमेद सोडली नाही.

प्राप्त परिस्थितीमध्ये नुसता दर्जेदार माल उत्पादन करून २ पैसे अधिक मिळतील असे नाही. कारण शेतकऱ्याला त्याचा माल स्वतः विकण्याची परिस्थिती अजुन विकसीत झाली नाही. महिला बचत गट, कॉन्ट्रॅक्ट फार्मींग आणि सरकारने उत्तेजन दिलेल्या खाजगी बाजार समित्या गावोगावी निर्माण करून त्या संस्थेमार्फत बाजार विकास करण्याची संकल्पना अजून मूळ धरून बाळसे धरण्याच्या अवस्थेत वाटचाल करते आहे.

शेतकऱ्यांनी नुसता दर्जेदार माल पिकवून २ पैसे अधिक मिळविणे ही प्रथमावस्था होती. परंतु याच्या पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजे आपल्या मालावर प्रक्रिया करून त्याचे मुल्यवर्धन करून आपला ब्रँड निर्माण करून नेहमीच्या अधिक भावापेक्षा मुल्यवर्धनाने जास्त पैसे मिळतील ही संकल्पना आता शेतकऱ्यांमध्ये व तरुण मुलांमध्ये रुजुन त्याला गती येणे गरजेजे आहे.

आता आपण विविध पिकांमध्ये मुल्यवर्धन कसे करता येईल हे पाहूया -

* केळी : केळीचे दर्जेदार उत्पादन आले असे न म्हणता दर्जेदार केळी पिकवून कच्च्या केळीचे भाजी ज्या ठिकाणी दक्षिण भारतात केली जाते ताशा प्रकारची दर्जेदार केळी पिकविणे गरजेचे आहे. नंतर याच कच्च्या केळीपासून आपल्याला 'बनाना चिप्स' तयार करून त्याला शहरी मार्केट आणि जिल्ह्याच्या बाजारपेठा येथे शालेय मुले व तरुण पिढी यांचे चांगले उत्तम मार्कट मिळेल.

रशिया, आखाती राष्ट्र, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, कॅनडा या देशात भारतीय केळींना मागणी चांगली आहे, तेव्हा तेथे केळी पाठविणे आपणास शक्य आहे. जेव्हा केळीचे उत्पादन अधिक येते तेव्हा बाजारभाव पडतात, तेव्हा पिकलेल्या केळीचा बनाना पल्प (केळीचा गर) प्रक्रिया उद्योगाने तयार करून तो पॅक करून त्याला परदेशात मोठी मागणी आहे. केळीच्या पावडरचा विविध मिठाई, अन्नपदार्थ, लहान मुलांच्या पोषक आहारात त्याचा समावेश होतो. त्या दृष्टीने केळी बागायतदरांनी याची वाट चोखाळावी. केळीच्या टाकाऊ पदार्थापासून उदा. खोड यापासून धागे काढले जातात. त्यापासून नाजूक, तलम, टिकाऊ कापड व विविध कपडे तसेच नाविण्यपुर्ण बॅगा, टोप्या, शोभेचे दोर, पादत्राणे तयार करता येतात. याला परदेशात फार मागणी आहे. तेव्हा त्या दृष्टीने भारत सरकारने विचार करावा. आयुर्वेदामध्ये केळीच्या खोडाचे पाणी हे गोवर आलेल्या लहान मुलांना फायदेशीर ठरते. केळीच्या सुकलेल्या पानांचा वापर दुष्काळी परिस्थितीत पाण्याचे बाष्पीभवन थांबवण्यासाठी अच्छादन करणे, कंपोस्ट खत तयार करून जमिनीची जैविक व भौतीक सुपिकता वाढण्यास मदत होईल.

* डाळींब - डाळींब हे फळपीक भारतासारख्या उष्णदेशीय खंडप्राय देशामध्ये जेथे हवामान उष्ण आहे तेथे चांगले येते. महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, गुजरातचा काही भाग हा डाळींब लागवडीस अनुकूल आहे. कारण याला जमीन हलकी व अधिक उष्णतामान मानवते, अशा ठिकाणी डाळींब चांगले येते. या पिकामध्ये २ ओळी व २ झाडातील अंतर १०' x १०' न ठेवता १४' x १२' किंवा १४' x १४' ठेवले म्हणजे बागेमध्ये आर्द्रता कमी राहून तणांचे प्रमाण कमी राहते, हवा व सुर्यप्रकाश अधिक प्रमाणात मिळाल्यामुळे डाळींबामधील तेल्या, मर अशा घातक रोगांचा व किडींचा प्रादुर्भाव हा लागवडीतीळ आंतर जास्त ठेवल्याने होणार नाही. तसेच या पिकात दिर्घकालीन आंतरपिके घेऊ नये. प्रथम वर्षी बागेची वाढ होत असताना पाण्याची व्यवस्था चांगली असताना कमी दिवसाची थोडक्यात मेथी, कोथिंबीर, पालक, शेपू, पुदीना, चुका अशी १ ते २ महिन्यात येणारी पालेभाज्या पिके मार्केटची मागणी पाहून घेतली म्हणजे या पिकातील आंतरपिके घेऊन मुल्यवर्धन साधता येते. तसेच गणपती, नवरात्र, लग्नसराई, पाडवा, अक्षय्यतृतीया या काळात झेंडूवर्गीय फुलपिके घेतल्याने मुख्य बागांमध्ये सुत्रकृमी होऊ नये यासाठी हे सापळा पीक म्हणून फायदेशीर ठरते व फुलांना वर दिलेल्या सणांमध्ये बाजारभाव चांगले मिळतात. म्हणजे हे एक मुल्यवर्धन व पिकाच्या सार्थक उपयुक्ततेचे एक उदाहरण आहे. म्हणजे सुत्रकृमीची प्रतिबंधात्मक दखल घेऊन बागांचे आयुष्य वाढेल व चांगले उत्पादन मिळेल.

डाळींबापासून विविध पदार्थ तयार होतात. अनारदाना, त्याचा रस काढून ज्यूस टेट्रापॅकमध्ये पॅक करून मुल्यवर्धन होते व छोटा कुटीर उद्योग तयार होतो. डाळींबाचे दाणे फळामध्ये ज्या पापुद्र्याला चिकटले जातात. त्या पापुड्यापासून कॅन्सरची औषधे तयार केली जातात. तर शेतकऱ्यांच्या मुलांना त्याचे प्रशिक्षण देऊन अत्याधुनिक पद्धतीने त्याचे मुल्यवर्धन साधून स्वतःचे आयुर्वेद औषधे कारखाने निर्माण करण्यास चालना द्यावी. डाळींबाच्या सालीपासून खोकल्याची औषधे व दंतमंजन तयार करता येते. म्हणजे फळ पिकातून फक्त रसातून २ पैसे न मिळविता टाकाऊ पदार्थातून अत्यंत उपयुक्त अशी औषधे निर्माण करून आरोग्य सुधारून या औषधांचे आरोग्यावर दुष्परिणाम होणार नाही. डाळींबाच्या उत्पादकतेमध्ये कमी - जास्त फेरफार झाला तरीही निर्यातक्षम माल निर्माण करून बाजारपेठ काबीज करता येते. म्हणून एका बाजूला रोगाने क्षेत्र घटते आहे व दुसऱ्या बाजूला दराच्या हमीमुळे प्रतिकूल परिस्थितीमध्ये लागवडीखालील क्षेत्र वाढते आहे.

* द्राक्ष : साधारण १५० ते २०० वर्षापासून द्राक्ष हे पीक महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. जुन्या काळात फकडी आणि भोकरी या पारंपारिक आणि स्थानिक जाती १५० वर्षापुर्वी पिकविल्या जात असत. त्याकाळी व्यापार उदीम नव्हता, दळणवळण नव्हते, उद्योगधंदे नव्हते, व्यवसाय नव्हते, शिक्षण क्षेत्र विकसीत नव्हते, देश पारतंत्र्यातच होता त्यामुळे ब्रिटीशांनी त्यांच्या उद्योगापुरते भारतीयांना फक्त अर्ध शिक्षीत बाबू बनवित होते. कारण येथील कच्चा माल नेऊन त्याचे मुल्यवर्धन करून जगभर निर्यात करून पैसा मिळविण्याचे तंत्र त्यांनी अवलंबले होते. त्याकाळी द्राक्षाची टिकाऊ क्षमता कमी असून जाड सालीच्या बी असलेल्या द्राक्षास बाजारभाव ८ आणे ते १२ आणे शेर होता. त्याखालोखाल गुलाबी काळसर रंगाची जात होती तिला बी फार व कडक असल्याने परंतु रसाला सुगंध असल्याने याला 'गुलाबी' हे नाव प्रचलित झाले आणि १।। ते २ रु./किलो भाव शेतकी कॉलेज, पुणे येथे मिळत असे. १९४७ सालापर्यंत ही जात जिल्ह्याची व मुंबईसारखी शहरे, गुजरात, मध्येप्रदेश येथे चालत असत. नंतर दक्षिण भारतात निजाम, हौद्राबाद व बेंगलोर येथे मोठ्या फळाची, जाड सालीची अनाबेशाही ही जात १९७० - ७५ सालापर्यंत श्रीमंत लोकांत प्रचलित होती. परंतु या फळाचे बी हे अतिशय जाड व मोठे असायचे. फळ गोटीसारखे गोल असायचे. गोडी बऱ्यापैकी असायची. म्हणून अनाबेशाही हे नाव द्राक्षामध्ये फार वरच्या थरातील समजले जायचे. स्वातंत्र्यानंतर १९६० - ७० च्या दशकात महाराष्ट्रातील काही प्रगतीशिल द्राक्ष बागायतदार अण्णासाहेब शेंबेकर यासारख्या शेतकऱ्यांनी द्राक्षामध्ये संशोधनाने प्रसार करण्याचा विडा उचलला. एकेकाळी एकरी ३२ टन द्राक्षे पिकवून जागतिक निर्यातीमध्ये शेंबेकारांचा पहिला नंबर आला होता. यातूनच द्राक्ष बागायतदार संघ निर्माण करण्याची कल्पना रुजली व हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्याच सभासदांनी त्याला मुहुर्तरूप दिले. नंतर यातील निवडक शेतकऱ्यांनी नवीन जाती शोधणे, निर्माण करणे व प्रसार करणे अशा प्रकारची वाटचाल चालू झाली. त्याकाळचे फळबाग तज्ञ डॉ. चिमा यांनी सिलेक्शन ७ मधून चिमासाहेबी जात निर्माण केली. त्यानंतर सिलेक्शन ७ ची जागा थॉमसन सिडलेसने घेतली कारण ही विरहीत जात होती. मग ही जात नाशिक जिल्ह्यात नंतर सांगली व कर्नाटकच्या भागात पसरली.

नंतर स्थानिक जातीच्या निवडीतून माणिकचमन व तास ए - गणेश या जातीचा विकास झाला. याचा प्रसार वसंतराव आर्वे यांच्या सहभागातून झाला. किसमिस चोर्नी व शरद सिडलेस ही जात महाराष्ट्रात १९८० च्या काळात आली. यातील २ - ३ वाण विकसीत होऊन प्रचलित झाल्यानंतर आखाती व युरोप राष्ट्रात एक्सपोर्ट झाले व अशा रितीने द्राक्षाचे मुल्यवर्धन प्राथमिक अवस्थेत झाले. परंतु द्राक्ष बागायतदार हा चिकित्सक असल्याने तो नवीन - नवीन जातींचा शोध घेऊ लागला. परदेशात कॅलिफोर्निया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि इस्त्राईल सारख्या प्रगतीशिल राष्ट्रामध्ये द्राक्ष बागायतदारांचे अभ्यास दौरे आखुन त्यांची संशोधक वृत्ती जागृत करून तेथील जाती भारतात आयात केल्या आणि बलराम जाखड कृषी मंत्री असताना राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी येथे स्थापन करण्याची साद द्राक्ष बागायतदारांना दिली व त्याचा फायदा दक्षिणेतिला राज्य व महाराष्ट्राला द्राक्ष शरीर क्रिया, द्राक्षाचे उत्पादन, नवनवीन वाण निर्माण करणे, नवनवीन वाण निर्यात करणे व हवामानातील बदलांना सामोरे जाण्याचे काम या संशोधन संस्थेने केले. द्राक्ष निर्यात ही १९८० ते ९० व २००० नंतर विविध देशामध्ये झपाट्याने वाढली. ज्यावेळेस निर्यातीमध्ये भारतीय बागायतदारांची दोलायमान स्थिती जागतिक मंदीमुळे आणि त्यामध्ये सापडणाऱ्या क्लोरोमॅक्कॅट क्लोराईड (Chloromequat Chloride CCC) या विषारी घटकामुळे द्राक्ष शेतीला वाईट दिवस आले आणि सांगली सारख्या दुष्काळी भागात द्राक्ष बागायतदार निर्यातीकडे हाताच्या बोटावर मोजण्या इतके वळून द्राक्षाचा बेदाणा निर्माण करण्याकडे जास्त वळले. ही गोष्ट १९८० च्या दशकातील. द्राक्षे कामत ऑईलमध्ये बुडवून नायलॉन नेटवर वाळवून १७ ते २१ दिवसामध्ये हा बेदाणा उत्कृष्ट मिळू लागला. असा बेदाणा जागतिक दर्जाच्या बेदाण्याच्या तोडीस तोड निर्माण झाला. भारतीय बाजारपेठेत १९४७ पासून ७० पर्यंत अफगाणिस्तान व इराण वरून येणारा हा बेदाणा २।। रु. शेर मिळत होता. १९८० ते २००० या २० वर्षात गोल, हिरवा, पिवळा, काचेसारखा चमकदार, पातळ सालीचा असा दर्जेदार बेदाणा भारतात पिकू लागला. याचा दर सांगलीला ४० ते ६० रु./किलो असा होता, कारण तो बेदाणा निर्मितीचा श्रीगणेशा होता. याकाळात शितगृह नव्हते. मुल्यवर्धनाचा दर्जा नसल्याने बेदाण्याचे मोल शेतकऱ्यांना हवे तसे मिळत नसे. मग तास - ए - गणेश, थॉमसन सिडलेस, सोनाका या वाणांचे बेदाणे दर्जेदार व उत्पादन वाढीस डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करून पारंपारिकतेने ४ किलो द्राक्षापासून १ किलो बेदाणा मिळत असे. तोच १३०० ते १३५० ग्रॅम मिळून २५% अधिक उत्पादन वाढून मुल्यवर्धन केले. मग वसंतदादा मुख्यमंत्री असताना शितगृहाची निर्मिती करून गावोगावी मंदीच्या काळात हे बेदाणे साठवून दिवाळी, नाताळ, रमजान अशा विविध सणांच्या तोंडावर काढून १०० ते १५० रु./किलो दार मिळू लागला आणि सांगली बरोबर सोलापूर (जुनोनी), नाशिक, कर्नाटकचा काही भाग येथे दर्जेदार बेदाणा निर्माण करण्याची चुरस निर्माण झाली. कारण डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने आपला बेदाणा हा चीन, अफगाणिस्तान येथील बेदाण्यापेक्षा अधिक श्रेष्ठ असल्याने जागतिक मार्केटमध्ये याची मागणी वाढून नियत होऊ लागली.

देशातील जनतेला सणासुदीच्या अगोदर ८० ते १०० रु./किलो मिळणार बेदाणा १०० ते १५० रु. /किलो मिळू लागला आणि आता गेल्या ४ वर्षात सणासुदीला १५० ते २०० रु./किलो व जागतिक बाजारात २०० ते २५० रु. ने निर्यात होऊन याचा दर्जा चांगला असल्याने त्याची मागणी वाढली. अशा रितीने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने द्राक्षापासून बेदाणा निर्मिती करण्यात प्रचंड क्रांती झाली. अशा रितीने शेतीमालाच्या मुल्यवर्धनामध्ये द्राक्षापासून निर्माण झालेला बेदाणा हे मुल्यवर्धन भारतातील फळबागांमध्ये अव्व्ल ठरले आणि डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी रूपाने द्राक्षाच्या मुल्यवर्धानामध्ये एक मानाचा तूरा भारतीय शेतकऱ्याला गवसला.