'सिद्धीविनायक' शेवगा लागवडीची काळजी, दक्षता आणि व्यवस्थापन !

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


* बी लागवडीसाठी मातीची निवड : पिशवीतील माती ही कमी किंवा अधिक पाणी धारण क्षमता (W.H.C.) असणारी जर असेल तर उगवण कमी होते. काळी माती असली तर पाणी धारण क्षमता अधिक असल्याने कवच पाणी जास्त शोषूण बी कुजून जाते आणि जर माती अतिशय हलकी मुरमाड कमी पाणी धारण क्षमता असणारी असली तर पाणी बियास मिळण्याअगोदर फक्त कवच ओले होऊन लगेच सुकते. त्यामुळे बियाणे कोरडे राहते व उगवण होत नाही. अनुकूल जमिनीत चिकनमाती (Clay) १० ते २०%, पोयटा (Alluvial Soil) ३० ते ५०%, वाळूचे प्रमाण ८ ते १०% आणि सेंद्रिय पदार्थ (Organic Carborn) ०.८ ते १.५% असावे. म्हणजे अशा प्रकारच्या मातीमध्ये गुणधर्म हे नदीकाठच्या पोयट्यामध्ये अथवा धरणाच्या सुपीक गाळ अथवा तांबूस पोयटायुक्त माती जी गुलाबाच्या काड्या कलम करून लागवडीसाठी वापरली जाते, अशी माती ही वरील उल्लेख केलेल्या गुणधर्मामध्ये बसते. म्हणून शक्यतो वरील एका प्रकारच्या मातीचा उपयोग पिशव्या भरताना करावा.

* पिशवी कशी भरावी ?: पिशव्या भरताना प्रथम पंचिंग मशीनने ०.७५ ते १ इंच वरून व खालून पिशवीच्या दोन्ही बाजूने होल मारून घेणे नंतर यामध्ये वरील एकाप्रकाराची माती आणि शेणखत २:१ आणि १ चमचा बारीक वाळू व एक चमचा कल्पतरू सेंद्रिय खत याप्रमाणे माती कालवून त्यामध्ये ट्रायकोडर्मा पावडर मिसळून मिश्रण मोठ्या प्रमाणात तयार करून घ्यावे. अशा रितीने पिशवी भरताना बाईने सपाट पिशवी ठेवून पेल्याने हे मिश्रण पिशवीत ओतणे आणि ही पिशवी भरत - भरत ठोकावी, म्हणजे मधील हवेतील पोकळी निघून जाईल. पिशवीचा वरील एक सेंटीमीटर भाग रिकामा ठेवावा.

* बीजप्रक्रिया : बीजप्रक्रिया करताना साधारणत: जमीन मध्यम ते हलकी असेल तर ८' x ८' वर, भारी बागायती जमिनीत १०' x ८' ते १२' x ८' किंवा १२' x १०' वर लागवड करावी. याकरिता एकरी १०० बियाची ८ ते १० पाकिटे बियाणे लागते. या बियाची पाकिटे फोडून यामध्ये १ लि. पाण्यात २५ - ३० मिली जर्मिनेटर व १० मिली प्रिझम एकत्र करून यामध्ये बावीस्टीन किंवा थायरम किंवा ट्रायकोडर्माचा वापर शिफारशीप्रमाणे करून ह्या द्रावणात बी टाकून काठीने ढवळून ते रात्रभर भिजवून त्यावर झाकण ठेवणे. दुसऱ्या दिवशी हे बी प्लॅस्टिकच्या कागदावर अंथरून सावलीत सुकविणे.

* बियाची पिशवीत लागवड : जर्मिनेटर व प्रिझम वापरण्याचे कारण असे की, ज्या बियाचे कवच जाड, टणक असते, तेथे प्रिझमच्या वापरामुळे ते मऊ होऊन अंकुर निघण्यास मदत होते. पिशवीत बी टोकताना अर्धा ते एक सेंटीमीटर खोल मधोमध आडवे टोकावे. बी टोकताना पिशवीला पाडलेले वरील छिद्र हे साधारणत: अर्धा ते एक इंच खाली असावे, म्हणजे पाणी देताना वरच्या थरात पाणी मुरेल आणि जादा झालेले पाणी हे छिद्रावाटे निघून जाईल. कारण बऱ्याच वेळा ही चूक होते की, बी हे खाली टोकले जाते आणि होल वर राहिल्याने पाणी हे छिद्रावाटे निघून जाते आणि बी कोरडे राहते. त्यामुळे ते उगवत नाही.

* पिशवीतील रोपांचे पाणी व्यवस्थापन : मार्च - एप्रिल - मे महिन्यातील बी लागवडीच्या पिशवीतील रोपांना पाणी हे झारीने सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. नळीने पाणी देऊ नये. कारण त्याने बी उघडे होऊन ते बी उगवत नाही. प्रत्येक वेळी झारीने २ ते ३ वेळा पिशव्यांवरून पाणी फिरवावे. म्हणजे रोपांना चांगले पाणी बसते.

* वाफ्यात पिशव्या लावायच्या कशा ? : १० पिशव्यांची आडवी (रुंदीची) ओळ करावी आणि लांबी ही पाहिजे तेवढी ६० ते १०० पिशव्यांची करावी. गवत टिपणी करीता दोन्ही बाजूने हात पोहचेल अशा पद्धतीनेच मांडणी करावी. उन्हाळ्यामध्ये बी हे ६ ते ८ दिवसात उगवून येते. उन्हाळ्यामध्ये पिशव्या ह्या आंबा, वड, पिंपळ, उंबर, कडुनिंब अशा झाडाखाली ठेवाव्यात. पिशव्या ठेवताना दक्षिणोत्तर ठेवाव्यात. म्हणजे पूर्वेकडील कोवळे ऊन या पिशव्यांना मिळेल असे पहावे. दुपारच्या उन्हाच्या झळा पिशवीवर पडणार नाही याची काळजी घ्यावी. असे रोप आठ दिवसात बोटभर वर आल्यावर जर्मिनेटर, थ्राईवर प्रत्येकी १ मिली व क्रॉपशाईनर २ मिली, प्रोटेक्टंट कॉफीच्या चमचाएवढे (निवळी करून) प्रति लिटर पाण्यास घेऊन एक दिवसाआड प्लॅस्टिकच्या पंपामधून फक्त रोपांवर ४ ते ६ वेळा फवारावे. म्हणजे रोपे सुद्दढ होतात. वातावरणात धुके आणि ढगाळ हवामान असेल तर रोपांना गळ (Collar rot) पडू नये म्हणून बावीस्टीन शिफारशीनुसार (०.७५ ते १ ग्रॅम/लि.) वापरावे. अशा प्रकारे तयार होणारी रोपे ही एक महिन्यात तयार होतात. ही रोपे जून - जुलैमध्ये पहिले दोन पाऊस पडल्यानंतर शेतात सरी बांधून वरंब्याच्या बगलेत लावावीत. लागवड करताना रोपाची पिशवी ब्लेडने अलगद फाडावी. फाडताना मुळांना इजा होणार नाही हे पहावे. पिशव्या आदल्या दिवशी पूर्ण ओल्या कराव्यात. रोप लावताना रोपाच्या मातीच्या आकाराचा खड्डा करून त्यात कल्पतरू खत चहाच्या चमचाभर टाकून रोपे सरी दक्षिणोत्तर काढून पूर्वेच्या बाजूला लावावीत. म्हणजे पुढे भाद्रपदाच्या उन्हाच्यावेळी उन्हाची तिरीप रोपांवर पडणार नाही.

* थंडीत बियांची रोपे व लागवड करू नये: थंडीमध्ये शेवग्याची उगवण (बी लागण) करू नये व लागवडही करू नये. नंतर हवामानाच्या बदलामुळे झाडांची वाढ खुंटते, फुले नीट लागत नाहीत. छाटणी व्यवस्थित करूनही फुले लागत नाही. कारण तापमान आवश्यकतेपेक्षा कमी असते. जर वादळ आले तर ऊन व वारा जादा तसेच पाण्याचे प्रमाण कमी - जास्त झाले तरी फुलगळ होते. थंडीमुळे शेंगा पोसत नाहीत. वाध्या हिरव्याऐवजी पिवळ्या होतात. देठाला व शेंड्याला वाकड्या - तिकड्या होतात. तुरखाटीसारख्या व दाबणासारख्या जाडीच्या शेंगा ह्या सरळ न होता व न पोसता मध्ये वाकड्या - तिकड्या होतात आणि देठाला व शेंगांच्या टोकाला सुकल्यासारख्या आणि तडे गेल्यासारख्या होतात. शेंगांचा रंग तांबडा ते तपकिरी होऊन पोसत नाहीत. त्यामुळे हा माल बदल म्हणूनही उपयोगी येत नाही. तेव्हा येथे रासायनिक खताचा वापर कमी करावा व जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर करावा. तसेच कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांकडे पिकाचे नमुने घेवून हवामानाचे मापदंड लक्षात घेवून तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. परस्पर निर्णय घेवू नये.

* उन्हाळी रोपे तयार करणे : सर्वसाधारणपणे जानेवारीमध्ये संक्रांतीनंतर वरीलप्रमाणे पिशव्या भराव्यात. येथे बी फार खोल टोकू नये, कारण थंडीचा कालावधी असल्याने उष्णता कमी असते. परिणामी उगवण व्हायला १५ ते २० दिवसांचा कालावधी लागतो. तसेच या काळात धुके असते, त्यामुळे कॉलर रॉट संभवतो. म्हणून शक्यतो डिसेंबर- जानेवारीत रोपे तयार करू नये. कारण अशावेळी रोपे वाया गेल्याने शेतकऱ्याचे नुकसान होते. परिणामी तो बियाला दोष देतो. मात्र हा परिणाम हवामानाचा असतो. याकरिता फेब्रुवारी, मार्चमध्ये रोप तयार करावीत. म्हणजे एप्रिल महिन्यात पाण्याची उपलब्धता चांगली असल्यास लागवड यशस्वी होते. मात्र उन्हाच्या झळा अधिक असल्याने मर संभवते. तेव्हा क्रॉंपशाईनरचे प्रमाण वाढवून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या घ्याव्यात. म्हणजे अशा रोपांपासून लागवड केलेल्या झाडांना पुढील ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये फुल लागून शेंगा मिळतात.

* शेवग्याची उगवण समस्या व उपाय

सर्वसाधारणपणे काही शेतकऱ्यांच्या रोपे तयार करण्याच्या पद्धतीमध्ये असे आढळले की, हे शेतकरी कुशलतेने रोपांसाठी बियाला जर्मीनेटरची बीजप्रक्रिया करतात, मात्र मातीची चुकीची निवड व अयोग्य पाणी व्यवस्थापन यामुळे बियांच्या उगवणीवर काही प्रमाणात समस्या निर्मात होत आहे.

रोपे तयार करण्यासाठी काळी माती (चुकीची) वापरत असल्याचे आढळले आहे. या मातीत जेव्हा रोपांसाठी बी जर्मीनेटरची बीजप्रक्रिया करून पिशव्यांमध्ये लावले जाते, तसेत रोपे वाफ्यात घट्ट रचल्याने अगदी झारीने जरी पाणी दिले, तरी ही काळी माती जास्त चिकणमाती युक्त असल्याने वरील भागावरील मातीची ढपली तयार होते. परिणामी अंकूर बाहेर येण्यास वरील कडक ढपलीच अडथडा निर्माण होतो. तसेच आतपर्यंत उष्णता न मिळाल्याने आतील ओली माती तशीच कायम चिकट राहते आणि बी सडू लागते. तर काही वेळा बी पिशवीमध्ये अर्धा इंचापेक्षा अधिक खोल लावले जाते, तेव्हा रोपांसाठी झारीने पाणी (वाफ्यात रचलेल्या रोपांच्या पिशव्यांना) दिल्याने फक्त वरील पापुद्रा ओला होतो आणि आतील बियाजवळील माती सतत कोरडी राहिल्यामुळेही उगवण क्षमतेवर त्याचा अनिष्ठ परिणाम झाल्याचे आढळले आहे.

काही शेतकरी रोपे तयार न करता डायरेक्ट (थेट) बांधावर अथवा शेतात बी टोकून लागवड करतात. येथे मात्र जर बी कमी - अधिक खोलीवर लावले गेले तर त्याचा उगवणीवर परिणाम होतो. तसेच पाटाने पाणी दिल्यास माती वाहून बी उघडे पडले की उगवण होत नाही. काही प्रमाणात उगवणा झाली तर त्यांची निगा राखल्यास झाडे तयार होतात. त्यांना शेंगा लागतात पण काळजी न घेतल्यास विशेष करून छाटणी, फवारणीची तर शाखीय वाढ अधिक होऊन झाडे उंच वाढतात. फुलकळी व शेंगांचे प्रमाण अत्यल्प अथवा ०% असते. याकरिता रोपे ही पिशवीत तयार करूनच शेतात लावावीत. तसेच त्यांची छाटणी, पाणी खत याचेही नियोजन काळजीपुर्वक करावे.

* जमीन व तापमान : या पिकाला जमीन हलकी, मध्यम पोयट्याची व इतर धानपिकाची चालते. विदर्भातील भारी काळ्या जमिनी किंवा अधिक चिकणमाती किंवा अधिक क्षाराच्या (मुक्त चुना ५.५% पेक्षा अधिक, Na, So4, No3, Co3, HCO3,CI इ.) जमिनीचे या पिकास वावडे आहे यासाठी लागवडीपुर्वी आपल्या श्तातील मातीचे पृथ्थ:करण जिल्ह्याच्या मृद प्रयोग शाळेत करून त्याचा अहवाल आमच्या मुख्य कार्यालयास दाखवून त्यानंतर केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करूनच लागवड करावी. पडीक जमिनी व गाळाचा वापर केलेल्या जमिनीत शेवग्याची शाखीय वाढ जास्त होते. विकृती येते. त्यामुळे शेंगा लागत नाहीत. तेव्हा पडीक जमिनीत शेवगा लावू नये. तसेच गाळाची माती वापरलेली असल्यास प्रथम वर सुचविल्याप्रमाणे त्या मातीचे पृथ्थ:करण त्यानंतरच योग्य तो निर्णय घ्यावा.

शेवग्याला २५ डी. ते ४० डी. सेल्सिअस तापमान अनुकूल आहे, इतके उच्च तापमान कोणत्याही भाजीपाला पिकाला अनुकूल नसते. मात्र ४० डी. सेल्सिअसच्या पुढील तापमानात शेव्गायची पाने करपतात. वळीवाचा पाऊस झाला की, फुलगळ होते, झाडे मोडतात. अति पाऊस किंवा ओलावा या पिकास मानवत नाही.

रोपे लागवडीच्या वेळी अगोदरच्या उन्हाळ्याची हवेत उष्णता असते. जमीन तापलेली असते. जून - जुलैमधील पावसाने/बुरंगाटाने (Drizzle) तापलेल्या जमिनीचा रोपाला चटका बसतो. त्याने रोपांना गळ (collar Rot) पडते. याकरित सप्तामृतासोबत कार्बनडेझिम घेऊन १५ दिवसात गरजेनुसार ३ - ४ वेळा रोपांवर फवारणी व ड्रेंचिंग करावे. याने रोपांचे खोड दणकट, निरोगी होऊन रोगप्रतिकारशक्ती वाढते.

पहिल्या पावसाने हवेत ५०% उष्णता व ५०% गारवा निर्माण होतो. याचा फटका रोपांना जसे लहान मुलांना उन्हाळ्यात बर्फाचा तुकडा दिला असता बरे वाटते. मात्र त्याने मुलांना सर्दी होते तशी अवस्था ही रोपांची होते.

* पाणी देण्याची पद्धत : आतापर्यंत १५ ते २० वर्षात हजारो शेतकऱ्यांनी देशाच्या विविध भागात केलेल्या प्रयोगाच्या निरीक्षणातून लक्षात आले की, थेट पाटाने टेक पाणी दिलेले चालते. पाणी हे मुरत मुरत द्यावे. वेगाने पाणी देऊ नये. दुसरी अशी पद्धत लक्षात आली की, मध्यम काळी जमिन असल्यास लागवड केलेली सरी न भिजवता लागवडीच्या सरीच्या शेजारील दोन्ही बाजूच्या सरीतून पाणी दिल्याने मुळे पाण्याचा शोध घेतात आणि झाडे काटक राहतात. काळ्या जमिनीत ठिबकचा वापर पाणी कमी असेल तरच करावा. तसेच थंडीमध्ये १० ते १५ दिवसांनी मध्यम अवस्थेत (१।। ते २ फूट उंचीचे रोप असताना) २ ते ३ लिटर पाणी द्यावे. मध्यम ते हलक्या जमिनीमध्ये दर ५ ते ६ दिवसांनी पाणी द्यावी. रोपे पोटरीपासून ते गुडध्याएवढे होईपर्यंत १५ दिवसाच्या अंतराने जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनरची फवारणी करावी. कल्पतरू एकदा बांगडी पद्धतीने द्यावे. त्यानंतर शिफारशीप्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या घेत राहणे. म्हणजे पाने पोपटी न होता हिरवी राहून फूट वाढेल.

* छाटणी : झाडे छत्रीसारखी होणे फार महत्त्वाचे आहे. याकरिता शेवगा साधारण गुडघ्यापासून मांडीपर्यंत (२ ते ३ फूट उंचीचा) असतानाच पहिल्यांदा शेंडा खुडावा. तो आठवड्यातून २ ते ३ वेळा मारावा. परीघावरच्या फांद्या ह्या छत्रीच्या आकाराच्या व्हाव्यात म्हणून पोपटी शेंडा हा ५ ते १५ -२० गुंठ्याची लागवड असली तर अंगठा व शेजारच्या बोटाने शेंडे छाटता येतात, परंतु १ ते २ एकर लागवड असल्यास द्राक्षाच्या थिनींगच्या कात्रीने छाटणी करावी. यानंतर झाडाला छत्रीसारखा आकार येतो. फुल लागेपर्यंत छाटणी करावी. फुले कशी लागतात व छाटणीची फूट कशी असते याचा फोटो शेवगा पुस्तकाच्या कव्हरवर दिलेला आहे तो पहावा.

* खते : झाड ३ फुटाचे झाल्यावर पुन्हा १०० ते १५० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे. भारी जमिनीत नत्रयुक्त खते अत्यल्प द्यावी. ती जर जास्त झाली तर छाटणी व्यवस्थित केली तरी शाखीय वाढ वेगाने होऊन फूल लागत नाही. झाडाची वाढ होऊन शेंगा लवकर याव्यात या हेतूने नत्रयुक्त खताचा वापर अधिक केल्याने शाखीय वाढ अनावश्यक होते व फूल लागत नाही किंवा ते कमी लागते. फूल लागल्यानंतर २ महिन्यांनी शेंगा लागतात. दक्षिणोत्तर लागवड केल्यामुळे सुर्यप्रकाश भरपूर मिळून ७ ते ८ व्या महिन्यात भरपूर पोषण झालेल्या शेंगा मिळतात. सप्तामृत फवारणी व कल्पतरू खत वापरल्यास शेंगा अतिशय चविष्ट तयार होतात. रंग व चव चांगली मिळावी यासाठी राईपनर वापरावे. शेंगा हिरव्या होण्यासाठी थ्राईवर, क्रॉंपशाईनरचा वापर करावा. कीड-रोग प्रतिबंधासाठी प्रोटेक्टंट, हार्मोनीचा वापरा करावा.

* कीड व रोग नियंत्रण : जून-जुलैमध्ये रोपे जेव्हा लहान असतात, तेव्हा पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव संभवतो. या काळात अळीस खाण्यास शेतात इतर पिके नसल्याने ती शेवग्याच्या रोपांवर तुटून पडते. त्यामुळे पानाच्या फक्त शिरा किंवा रेषा राहतात. प्रोटेक्टंटन व स्प्लेंडरने थंडीत व पावसाळ्यात येणारा मावा, तुडतुडे जातात. परंतु या अळीच्या बंदोबस्तासाठी अति विषारी कीटकनाशकाचा वापर करावा लागतो. म्हणून प्रतिबंधात्मक उपाय फार महत्त्वाचा आहे. कीड लागल्यानंतर उपाय हा खर्चिक, नियंत्रणाबाहेर व नुकसानकारक ठरतो.

* फुले न लागण्याची फुलगळीची करणे : साधारण ६ ते ७ महिन्यात फुले येतात. फुले लागण्यास अनुकूल काळ २५ ते ३० डी. सेल्सिअस तापमान व ६२ ते ६५ % आर्द्रता असावी लागते. तापमान १२ डी. सेल्सिअसपेक्षा कमी असल्यास फूल लागत नाही. त्याचबरोबर अधिक आर्द्रता व अधिक तापमानात (४० डी. सेल्सिअसच्या पुढे) फुलगळ होते. कारण अधिक उष्णतेच्या आघातामुळे फुलांचा दांडा हा नाजूक व टाचणीच्या आकाराचा असल्याने त्यातील पाण्याचे प्रमाण कमी होते व ते वाऱ्याने लगेच गळून जाते.

फुलगळीचे प्रमाण दुपारी १ ते ४ वाजण्याच्या काळात अधिक असते. अधिक पाणी दिल्यास व थंडीचे प्रमाण वाढल्यास ती देठाजवळ नाजूक बनतात व ती लिबलिबीत झाल्याने वाऱ्याच्या झोताने गळून जातात. म्हणून कमी किंवा अधिक पाणी, अधिक उष्णता, अधिक गारठा ही फुलगळीची मुख्य कारणे आहेत. या गोष्टीमुळे शेंगा कमी लागतात. साधारणत: मे महिन्यात लागलेल्या फुलांना जून-जुलैमध्ये शेंगा झपाट्याने वाढतात. २५ ते ३० डी. सेल्सिअस तापमान असलेल्या ठिकाणी फूल व शेंगा लागण्याचे प्रमाण वाढून २ ते ३ महिन्यात ३०० ते ४०० शेंगा एका झाडास लागतात. येथे एकरी २०० ते ५०० किलो शेंगा तोड्याला निघतात. शेंगा आठवड्याने अथवा आठवड्यातून दोनदा तोडाव्यात, म्हणजे पुढील शेंगा लगेच पोसतात.

* वातावरणाचा फलधारणा व शेंगा लागण्यावर होणारा परिणाम : जेव्हा तापमान ८ डी. ते १२ डी. सेल्सिअसचे दरम्यान थंडीमध्ये (डिसेंबर - जानेवारी - फेब्रुवारी) असते, तेव्हा जादा पाणी (आठवड्याला किंवा त्याच्याही अगोदर) दिले गेल्यास हवेमध्ये ओलावा, जमिनीत प्रमाणापेक्षा जास्त ओलावा, त्यामुळे फुलकळी लागता फांद्या अस्ताव्यस्त जोमाने सरळ १० - १५ फुटापर्यंत बेशरमी (महानंदा) सारख्या किंबहुना त्याकाळात छाटणी न केल्यास त्याहून अधिक वाढतात. तेव्हा फांधांची जाडी हाताच्या ते पायाच्या अंगठ्याच्या आकाराची राहते. परिणामी फुल लागतच नाही.

शेंगा जांभळ्या का होतात किंवा फिक्कट रंग का होतो ? : याचे कारण म्हणजे जमिनीचा मगदूर हा कधीच एकसारखा नसतो. पावसाचे प्रमाण अधिक झाल्याने ज्या ठिकाणी पाणी साचते, निचरा होत नाही, तेथे क्षाराचे प्रमाण वाढलेले असते. याकाळात शेंगा ह्या साधारण सनकाडीच्या, तुरखाटीच्या आकाराच्या असतात. त्यावेळी दुपारच्या उन्हाच्या तिरपेवर शेंगावर तपकिरी रंगाचा डाग तयार होतो किंवा ज्यावेळेस दव पडते, तेव्हा शेंगेच्या ज्या भागावर दव पडते त्या ठिकाणी तपकिरी रंगाचा डाग पडतो. परंतु क्रॉंपशाईनरचे प्रमाण सातत्याने ठेवले तर दव शेंगेवरून सटकून जाते. (संदर्भ : कृषी विज्ञान, मार्च २०१२, पान नं. ११) येथे डाग पडत नाही. कोवळ्या शेंगा अति उष्णतेने जांभळ्या होतात. तर काही शेंगा ह्या खालून टोकाकडून जांभळ्या होऊन वाळतात. याला कारण हवेतील, जमिनीतील अति उष्णता. पाऊस पडल्यापडल्या जमिनीतील उष्णतेची वाफा बाहेर येते. तसेच वरून उष्णतेचे प्रमाण अधिक असल्याने शेंगातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन शेंगा टोकाला फुटून वाळतात. साधारणत: ९ इंचपासून ते दिड फुटापर्यंत शेंगा जाड आणि टोकाकडे व देठाला सुकतात. यासाठी सप्तामृताचा वापर सल्ल्यानुसार करावा, म्हणजे काही अंशी यावर मात करता येईल.

* शेंगा आखुड, लांबट, बारीक, वेड्यावाकड्या निघण्याची कारणे व उपाय : नवीन लागवडीच्या 'सिद्धीविनायक' शेवग्यास सातव्या महिन्यात शेंगा लागतात. तेव्हा विविध कारणांमुळे मुख्य खोड व फांद्या ह्या चांगल्या न पोसल्या जाता त्या बारीक राहतात. त्यामुळे शेंगा आखुड, लांब, बारीक, वेड्यावाकड्या निपजतात. ज्या झाडाच्या भागावर सुर्यप्रकाश चांगला मिळतो. तेथे विकृती की प्रमाणात आढळते, पण बदलत्या, थंड, ढगाळ हवामानात जमिनीतील व हवेतील कमी - जास्त आर्दता त्यामुळे फुलगळ, शेंगा कमी - अधिक लागणे असे घडते.

तेव्हा मुख्य खोड पोटरीसारखे होण्यासाठी पहिले २ वर्ष तरी लागतात. फांद्या हाताच्या, पानाच्या अंगड्यासारख्या व हाताच्या मनगटासारख्या झाल्या म्हणजे फुलांचे व शेंगा पोसण्याचे तसेच शेंगा अधिक लागण्याचे प्रमाण वाढते.

* उत्पन्नातील चढ उतार : वर सांगितल्याप्रमाणे शेंगा फूल लागल्यानंतर त्या झपाट्याने वाढाव्यात म्हणून शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांचा व पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र त्याने शाखीय वाढ अनावश्यक होऊन फुल व शेंगा कमी लागतात. हे जर खत व पाण्याच्या वापरत चढ-उतार न केल्यास नवीन फूल निधते व शेंगा पोसतात. जेवढ्या शेंगा आपण तोडू तेवढ्याच पुढील शेंगा पोसतात. शेंगाची काढणी आठवड्यातून एकदा ते दोनदा सकाळी (६ ते ८ वा.) किंवा संध्याकाळी (४ ते ७ वा.) सुर्यास्ताच्या अगोदर एक तास व त्यानंतर एक तास करावी. शेंगा खाली पडू देऊ नये. त्या जमा करून सावलीत झाडाखाली ठेवाव्यात.

शेंगा मार्केटला नेताना कशा भराव्यात ? : शेंगा मार्केटला नेताना पोत्याच्या किलतानात भरून न्याव्यात. यासाठी पोत्याचा भोत आडव्या लांब बाजूने उसवून दोन्ही अरुंद बाजूला दंडगोलाकर बॅरलच्या आकारासारखा आकार तयार करून भोत पाण्याने भिजवून घ्यावा आणि त्यामध्ये आडव्या बाजूने शेवग्याच्या शेंगा रचून त्यावर कडूलिंबाच किंवा सिताफळाचा पाला अंथरूण पोते वरून शिवून घ्यावे. अशा पद्धतीने पॅकिंग केलेल्या शेंगांचा टिकाऊपणा वाढतो. शेंगांची टोके मोडत नाहीत. त्यामुळे भाव अधिक मिळतो. शेंगांचा बंडल टेम्पोमध्ये सर्वात वर ठेवावा म्हणजे शेंगा खराब होणार नाहीत.

* शेंगा विक्री करताना : हातगाडीवर शेंगा विकाणारे गिऱ्हाईकाला शेंगा दिसाव्यात म्हणून उभ्या मांडतात. यामध्ये शेगांची टोके वरच्या बाजूला आल्याने उन्हाने बाष्पीभवन होऊन शेंगाची टोके उचकटली (तडकली) जातात. परिणामी वजन घटल्याने विक्रेत्याचे नुकसान होते, तर ग्राहकाला टोकाकडून वाळलेली शेंग घ्यावी लागत असल्याने शेंगेस मुळची चव राहात नाही. यासाठी हातगाडीवर शेंगा ह्या उभ्या न ठेवता आडव्या ठेवाव्यात. उभ्या ठेवायच्या झाल्यास लहान बादलीमध्ये पाणी घेऊन त्यात त्या शेंगा उभ्या ठेवाव्यात. म्हणजे त्या वाळत नाहीत आणि हिरव्या राहिल्याने विक्रेता व ग्राहकाचेही नुकसान टळते.

एका किलोमध्ये १६ ते २० शेंगा बसतात. काही ठिकाणी शेंगाचे बोटाएवढे तुकडे करून २ ते ३ रुपयाला १ तुकडा प्रमाणे विक्री होते, तर सोलापूर भागात ३ शेंगा ५ ते ८ रुपयाला विकल्या जातात. काही ठिकाणी किलोवर विकतात. अनेक शेतकऱ्यांचा अनुभव असा आहे की, एकदा या शेंगा गिऱ्हाईकाने नेल्यावर पुन्हा त्याच शेंगांची मागणी होते व मार्केटमध्ये १ ते २ तासात 'सिद्धीविनायक' शेवग्याची विक्री होते आणि त्यानंतर इतर शेंगा विकल्या जातात.

* आंतरपीक : शेवग्याचे आंबा, चिकू, चिंच या फळझाडांमध्ये आंतरपीक घेता येते. या फळझाडांचे उत्पादन चालू होण्यास ३ ते ४ वर्षाहून अधिक काळ लागतो. तोपर्यंत या शेवग्यापासून उत्पादन मिळते. तसेच शेवग्यामध्ये उन्हाळ्यात मेथी, कोथिंबीर, पालक, शेपू, पुदीना अशी एक ते दीड महिन्यात येणारी पालेभाज्यावर्गीय पिके आंतरपीक म्हणून घेत येतात. उन्हाळ्यात या पालेभाज्यांना तेजीचे मार्केट असते. तसेच कडक उन्हाळ्यात शेवग्याच्या पातळ सावलीत ही पालेभाज्या पिके चांगली येतात. विशेष म्हणजे या आंतरापिकांना पाणी देताना शेवग्याला वेगळे पाणी देण्याची गरज भासत नाही. तर शेवग्यावर फवारणी करत असल्याने आंतरापिकांवर वेगळी फवारणी करण्याची गरज भासत नाही. असे सर्व व्यवस्थापन नीट जमल्यास शेवग्याचे उत्पन्न ४ ते ५ वर्षे तर चांगलेच मिळते, पण त्यातील आंतरपिके चांगली केल्यास पिकांची फेरपालट होऊन त्याहून अधिक काळ शेवगा उत्पन्न देतो असा अनुभव आहे. (संदर्भासाठी 'सिद्धीविनायक' शेवगा लागवड पुस्तक, पान नं. ४७ वरील श्री. वसंतराव काळे यांची मुलाखत पहावी.)...

शेवग्यामध्ये काही शेतकऱ्यांनी कलिंगड, खरबूज, डांगर अशी वेलवर्गीय पिके घेतल्याचे आढळते आहे. तसेच कांदा हळद अशी देखील पिके घेतली आहे. मात्र हे सर्व हवामान अनुकूल असल्यास व योग्य व्यवस्थापनावर अवलंबून असते. अन्यथा या पिकांवरील रोगराई शेवग्यावर येते. त्याकरिता शक्यतो ३ - ४ महिन्यात येणारी व ज्यावर रोगाचा प्रादुर्भाव होतो अशी कांदा, भेंडी, वांगी, मिरची आणि आले. हळद तसेच वेलवर्गीय पिके (बुरशीचा प्रादुर्भाव होतो म्हणून) घेणे टाळावे. याकरिता वर सुचविलेली १ - १।। महिन्यात येणारी पालेभाज्या पिके फक्त घ्यावीत.

* क्षेत्रानुसार शेवगा लागवड : शेवग्याची लागवड करताना ज्यांच्याकडे अर्धा एकर जमीन आहे त्यांनी बांधाने शेवगा लावावा. १ एकर जमीन असणाऱ्यांनी १० गुंठे शेवगा लावावा. २ एकर क्षेत्र असणाऱ्यांनी अर्धा एकर, ५ एकर क्षेत्र असणाऱ्यांनी १ एकर, १० एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्र असणाऱ्यांनी जास्तीत - जास्त २ एकर शेवगा लावावा. म्हणजे त्याचे व्यवस्थापन करणे शक्य होते. शेवग्यास मिळणाऱ्या बाजारभावामुळे हव्यासापोटी शेवग्याची लागवड याहून मोठ्या क्षेत्रावर केल्यास त्याची छाटणी, पाणी व्यवस्थापन न जमल्याने शेवग्याची अनावश्यक शाखीय वाढ होऊन माल लागत नाही. मग शेतकरी बियाला दोष देतात, हे पुर्णपणे चुकीचे आहे. याची सर्व जवाबदारी शेतकऱ्याची राहील.

* हवामानातील बदल : अलिकडे रोज हवामान बदलत आहे. एकाच दिवशी सकाळी थंडी, धुके, सुरकी, दुपारी ऊन, संध्याकाळी ढगाळ हवा व झिमझिम पाऊस यातील एका सहा तासाच्या काळात वरीलप्रकारातील २ किंवा त्याहून अधिक प्रकारांना शेवग्यास तोंड द्यावे लागते. त्यामुळे उत्पन्न हे निसर्गावर आणि व्यवस्थापनावर अवलंबून असते, हे सर्वप्रथम शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे. वरील पैकी कोणत्याही एका गोष्टीचा उत्पन्नावर विपरीत परिणाम होवू शकतो, त्यामुळे विक्रेता किंवा बियाणे कंपनी उत्पन्नाची कोणतीही हमी देत नाही. त्यासाठी वरील सर्व गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात.