शेती मालाचे भाव कशावरून ठरतात -(२)

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


कडधान्यामध्ये मुख्यत्वे करून प्रथिने हा महत्वाचा घटक असतो. कडधान्य वेगवेगळ्या स्वरूपात प्रथिने पुरविण्याचे कार्य करतात. प्रथिनांचे कार्य पेशी निर्मिती यामध्ये महत्वाचे आहे. विविध डाळींबमध्ये प्रथिनांचे प्रमाण विविध असते.

कडधान्ये   कर्बोदके   प्रथिने  
तूर   ७५.२%   २२.३%  
हरबरा   ६१.२२%   १७.१२%  
उडीद   ६०.०%   २४.०%  
मूग   ५७.३%   २४.०%  
मटकी   ५१.३%   २७.६%  
मसूर   ५७.७७%   २६.१२%  


कर्बोदके हा उर्जेचा मुख्य स्त्रोत आहे आणि हे जरी सत्य असले तरी प्रथिनांचे कार्य हे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे कर्बोदकानंतर प्रथिनांची महत्त्वाची गरज आहे.

मुख्य प्रकारच्या डाळी भारतामध्ये तूर डाळ, हरबरा डाळ, मूग डाळ, उडीद डाळ, लाखेची डाळ, मटकीडाळ, मसूर डाळ असे विविध प्रकार आहेत. डाळीचा दर्जा ह डाळीची चव, लवकर शिजण्याची वेळ आणि प्रथिनांचे प्रमाण जास्त यावर ठरतो.

तूर - तुरीच्या डाळीमध्ये असे समजते की, ती लवकर शिजत नाही. त्यामुळे इतर डाळीपेक्षा दर्जा कमी मानला जातो. विदर्भ व खानदेशची डाळ रुचकर लागते. त्यावरून तिचा भाव ठरविला जातो. साधारणपणे जानेवारी ते मार्च या काळात तूर काढणीस येते आणि तूर निघाल्यानंतर व्यापारी होलसेल खरेदी करतात. त्यावेळी भाव कमी ४० - ४५ ते जास्तीचा ५० रू. चा दर असतो. तुरीच्या डाळीचे ३ प्रकार असतात. तुरीची डाळ करताना निघणाऱ्या चुनीचा वापर पशुखाद्यात होतो. त्यामुळे डाळ कारखानदाराला त्याचे वेगळे ७- ८ रू. किलो मागे मिळतात, मग या डाळीच्या भावात लग्नसराईत वाढ होते. ती मग १०० रू. किलो पर्यंत जाते. अशी अवस्था गेल्या ७ वर्षात ३ - ४ वेळा आली आहे. नंतर हे भाव हळूहळू वाढत जाऊन उच्चांकीला स्थिर होतात आणि जेव्हा मान्सूनचा पाऊस सुरू होतो. तेव्हा नवीन लागवडीस सुरुवात होऊन भाव उतरायला सुरुवात होते आणि हे भाव तूर मार्केटला येईपर्यंत कमी राहतात व नंतर पुन्हा २ महिन्यानंतर व्यापाऱ्यांची खरेदी झाल्यावर भाव वाढू लागतात. तेव्हा शेतकऱ्यांनी या गोष्टीचा विचार करून कडधान्याची विक्री करावी. काही भागात उन्हाळी तुरीचा खोडवा घेण्याचा प्रघात आहे. हे खोडव्याचे पीक शेंडे कापून त्याला कल्पतरू भरून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे ३ ते ४ स्प्रे घेतल्यावर मे अखेर कापणीस येते. ही तूर खोडव्याची जरी असली तरी तिचा दर्जा चांगला मिळतो. ज्यांना सेंद्रिय तूर घ्यावयाची आहे त्यांनी शेणखत, गांडुळखत, प्रेसमड, कल्पतरू सेंद्रिय खत वापरणे उचित ठरते. या डाळीपासून वरण, डाळतडका, डाळमखणी हे पदार्थ तयार केले जातात. तुरीच्या डाळीपासून खेडेगावात फुणके तयार करतात. दुधाळ जनावरांसाठी चुनीचा वापर अंबवण म्हणून फार उपयुक्त ठरतो. विशेष करून दुधाच्या व मशागतीच्या जनावरांना ती भिजवून दिली जाते. त्यामुळे त्यांची तब्येत दणकट राहते. म्हणजे मुख्य डाळीबरोबर त्याचे उपपदार्थही उपयुक्त ठरतात.

भारत देश हा मोठ्या प्रमाणात तुरीची डाळ आयात करतो. तेव्हा देशभरातील शेतकऱ्यांनी तुरीचे क्षेत्र वाढवून भुकबळी कमी करता येणे शक्य आहे. तेव्हा शास्त्रज्ञांनी कमी पाण्यावर, कमी अन्नद्रव्य घेणाऱ्या, अधिक व दर्जेदार उत्पादन देणाऱ्या तुरीच्या जाती विकसीत करणे गरजेचे आहे. हैद्राबाद येथील इक्रीसॅट या जागतिक संशोधन केंद्राचे काम वाखाणण्याजोगे आहे.

हरभरा - हरभरा हे तुरीखालोखाल प्रथिनेयुक्त महत्वशीर पीक आहे. गेल्या १० -२० वर्षामध्ये पाऊसमान कमी झल्याने, हवामानात बदल झाल्याने हरभर्याखालील रब्बीचे क्षेत्र घटल्याने १५ - २० रू. किलो मिळणारी डाळ ७० - ७५ रू. किलो झाली आहे. ज्या काळात पाऊस जास्त पडतो, तेव्हा हरभऱ्याची लागवड फोकून किंवा नंगारीमागे पेरतात आणि हरभरा हा ३।। ते ४ महिन्यात काढणीस येतो. देशी हरभर्याच्या जाती ह्या स्वातंत्र्यानंतरच्या ३० ते ४० वर्षात घेतल्या जात असत. त्याचा लहान आकाराचा दाणा असून त्याचे उत्पन्न कमी असे, राहुरी विद्यापीठाच्या गेल्या २० ३० वर्षापासून डॉ. राजाराम देशमुख हे ब्रीडर होते. तेव्हा विराट, विजय, विकास ह्या नाविन्यपुर्ण जाती ठरल्या आहेत. या जातींचा दाणा मोठा असून हा हरभरा उबळत नाही. किडीच्या संदर्भात घाटेअलीचा प्रादुर्भाव कमी होतो. तेव्हा प्रतिकुल हवामान व किडीचा प्रादुर्भाव झाला की, हरभऱ्याचे उत्पन्न कमी येते. या डाळीपासून १०० - २०० प्रकारचे विविध प्रकार केले जातात. यामुळे जगभर हरभऱ्याला मागणी असते. मागणी भरपूर असल्याने आपले उत्पन्न १२० कोटी जनतेला पुरत नाही, त्यामुळे तीदेखील आयात करावी लागते. या डाळीचे पीठ करण्यास इतर डाळींपेक्षा ज्यादा वेळ लागतो व ह्या डाळीचे पीठ अतिशय बारीक करावे लागते. या डाळीच्या दरामध्ये विशेष करून चढ - उतार दाखवत नाही. तिचे भाव साधारण वर्षभर स्थिर असतात. या पिकाची कसदार जमिनीमध्ये पेरणी करतात. त्यामुळे याचा उत्पादन खर्च तुरीपेक्षा कमी येत असल्याने हरभरा डाळीचे दर साधारण तुरीपेक्षा कमी म्हणजे ४० - ६० रू. पर्यंत स्थिरावतात. मार्केटमध्ये तुरीच्या डाळीपेक्षा हरभरा डाळीला व्यापारीदृष्ट्या अधिक महत्त्व आहे. परंतु तुरीची डाळ ही घरटी आहारात दिवसातून एकदा असतेच. त्यामुळे ती जास्त लागते. तर हरभरा डाळ व्यापारी तत्वावर जास्त लागते. त्यामुळे ह्याचे मुल्यवर्धन झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. हरभरा डाळ ही जसे माणसाचे खाद्य आहे. तसे विशिष्ट जनावरांच्या विशिष्ट हेतूसाठी वापर केला जातो. विशेषकरून शर्यतीचे घोडे किंवा बैल यांना चंदी म्हणून हरभऱ्याचा वापर केला जातो व ती कुठल्याही पोषणमुल्यापेक्षा श्रेष्ठ असते. ज्याप्रकारे तुरीची डाळ करताना चुनी निघते तसे हरभरा डाळीत निघत नाही. याची फोलपटे निघतात. ती पशुखाद्यात वापरली जातात.

उडीद - उडीद डाळीचे पोषणमुल्य वरील दोन्ही डाळींपेक्षा उच्च आहे. गरीब कष्टकरी लोकांचे खाद्य केवटेवरण म्हणून याचा अधिक वापर होतो. हरभरा व उडीद डाळीचे हे केवटेवरण भाकरी बरोबर कष्टकरी लोक खातात. या डाळीला व्यापारी मुल्य जगभर प्रचंड आहे. दक्षिण भारतात विशेष करून वडा आणि डोसा यामध्ये मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. खेडेगावात खीर आणि उडीदवडे बनवून त्याचे नैवेध देण्याची प्रथा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे. खेडेगावामध्ये या डाळीचा वापर कमी होतो. परंतु शहरामध्ये व दक्षिण भारतात आणि जगभरातल्या दक्षिण भारतीय हॉटेल्समध्ये उडीदाच्या डाळीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे याचे मुल्यवर्धन फार परिणामकारक आहे. साधारण: मोसमी पाऊस जून ते सप्टेंबरच्या काळात नियमित ४० दिवस सलग झाला तर हे पीक चांगले येऊन दिवाळीपर्यंत हाती येते. उडीदाचे भूस दुभत्या व कष्टकरी जनावरांना अतिशय उपयुक्त ठरते. उडीदाच्या डाळीचा वापर जनावरांच्या आहारात दुर्मिळ असतो. ही डाळ पचायला जड असते. जसे डोसे व इडली बनवताना तांदळाबरोबर वापरल्याने पचायला हलकी होते, म्हणजे ती इतर पदार्थांबरोबर वापरली तर तिचे मुल्यवर्धन वाढते. ही डाळ लोकाभिमुख आहे. ही डाळ पचायला जड असल्याने उन्हाळ्यात वापर कमी असतो. उडीदाच्या डाळीचे लाडू हे थंडीत तालिम करणारे खातात. उडीदाच्या डाळीचा भाव वर उल्लेखल्याप्रमाणे मोसमी पाऊस चांगला झाला तर उत्पन्न उत्तम येते. याचे भाव ३५०० ते ४००० रू./क्विंटल असतात. कारण ही व्यापाऱ्यांची खरेदीची वेळ (जानेवारी - फेब्रुवारी) असते.हिचे भर ५५०० ते ५८०० पासून क्वचित प्रसंगी ८५०० रू./क्विंटल होतात व किरकोळ भाव १०० रू. किलो होतात. जेव्हा दुष्काळी परिस्थिती असते तेव्हा व्यापारी लोक नफेखोरी करून अधिक पैसे कमवितात आणि ज्यावेळी उत्पादन अधिक येते तेव्हा खरेदीचे दर कमी ठेवतात व विक्रीचे दर ही त्याच प्रमाणात ठेवतात, मात्र ज्यादा विक्री होत असल्याने त्यांना अधिक पैसे राहतात.

मूग - मुगाचे पीक आंध्रप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, गुजरात या राज्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. हे खरिपाचे पीक ४५ दिवसाचे आहे. याला जून ते ऑगस्ट या काळातील फक्त ३० दिवसाचा जरी पाऊस मिळाला तरी मुगाचे पीक हमखास चांगले येते. मुगाचे हळवी व गरवी असे दोन प्रकार आहेत. ज्या मुगाच्या शेंगा लांब, दाणा मोठा, उत्पादन जास्त अशा मुगाला जगभर मागणी असते. कारण डाळीची पाकळी मोठी राहते व जे पदार्थ केले जातात त्याला उठाव राहतो. दाणा लहान असलेल्या मुगामध्ये डाळ छोटी तयार होते. परंतु काही लोकांच्या मते चवीला छोटी दल चांगली असते व प्रक्रिया उधोगात मोठ्या डाळीला मागणी असते. ही डाळ पचायला हलकी असते. त्यामुळे आजारी माणसाला भाताबरोबर मूग डाळीचे वरण द्यायला डॉक्टर सांगतात, त्यामुळे या डाळीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. याच्या इतके लवकर येणारे पीक अधाप शास्त्रज्ञांना सापडले नाही. तेव्हा यामध्ये संशोधन करून दुष्काळी भागात, कमी पाण्यावर, मध्यम ते हलक्या जमिनीत येणारे वाण विकसीत करावे. या डाळीचे भाव उडीद डाळीपेक्षा ५ ते १० % जास्त असतात. आहारामध्ये याला महत्त्व असल्याने याला उच्च दर्जाचे स्थान आहे. पहिल्या पावसाच्या आगमनावेळी मूग पेरणी केली तर २५ - ३० दिवसात फुले येवून ४५ दिवसात काढणीस येते. काही ठिकाणी वैशाखी मूग उन्हाळ्यात घेतला जातो.

लाख - लाख ही हरभरा डाळीला पर्यायी आहे. या डाळीमध्ये एक गैरसमज होता की, ह्या डाळीच्या आहारातील वापराने बहिरेपणा येतो. परन्तु वैधकियदृष्ट्या तसे आढळले नाही. शास्त्रज्ञांनी हा आरोप खोटा ठरविला आहे. यामुळे या डाळीचे पीक वाढण्यास वाव आहे.

मटकी - मटकी हे मुगापेक्षा पाण्यावर येणारे पीक आहे. मटकी हे कोकण, खानदेश, विदर्भ, मराठवाडा येथे अत्यंत कमी पाण्यावर येते. ज्या काळात पालेभाज्या महाग असतात. तेव्हा कडधान्याचा वापर केला जतो. आणि त्यामध्ये विशेषेकरून मोड आलेला मटकीला अव्वल स्थान आहे. मूल्यवर्धनामध्ये हॉटेलमध्ये मिसळपाव, मटकीभेळ यामध्ये याचा वापर केला जातो. मटकीचे भाव गेल्या १० ते १५ वर्षात ६० - ७० रू. किलो झाले आहेत. ही भाजी पचायला जड असल्याने पावसाळ्यात व रात्रीच्या वेळी खाण्यास दिली जात नाही. तसेच गरोदर बायांना ही डाळ दिली जात नाही. ज्याप्रमाणे तूर, हरभरा, उडीद, मूग यांचा वापर केला जातो. त्याच्या २० % च वापर मटकीचा केला जातो.

मसूर - मसूर या डाळीचा रंग साधारण केसरी असून ती मऊ व लवकर शिजून पचायला हलकी आहे. मसुराची भाजी करतात. डाळीचे वरण गरीब लोकांत प्रचलित आहे. साधारण १० % लोक या डाळीचा वापर करतात. याचे उपपदार्थ कमी होतात. या डाळीपासून डाळमठ हा एक पदार्थ केला जातो. हिचे भाव इतर सर्व डाळींपेक्षा कमी होते. मात्र इतर डाळींचे जसे भाव वाढले तसे याचेही भाव वाढू लागले व गरीबांना न परवडणारे झाले.

विविध प्रकारच्या डाळींचे मूल्य व मुल्यवर्धन करण्याकरिता आहारात व व्यापारीदृष्ट्या करण्याकरिता बदलत्या हवामानात व प्रतिकूल परिस्थितीत हलक्या, खारवट जमिनीत लवकर येण्यासाठी आणि दर्जेदार उत्पादन देणाऱ्या जातींचे शास्त्रज्ञांनी संशोधन करणे गरजेचे आहे.