शेतीमालाचे भाव कशावरून ठरतात? (फुलपिके -२)

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


निसर्गाच्या आकाराच्या, उकाराच्या व ओंकाराच्या हुंकारातून निर्माण होणाऱ्या रंगाच्या छटा, सुगंधाच्या छटा आणि सौंदर्याची उधळण ही इतकी अगाध आणि अपरिमीत आहे की, समुद्रही त्यापुढे एक थेंब दिसेल.

सुगंधी फुले आशिया खंडात काही प्रमाणात इस्लामी व आखाती राष्ट्रात जास्त प्रचलित आहेत. परंतु विविध प्रकारचे समारंभ, इथे नुसते दिखावू पण टिकावू अशा फुलांना जगभर मागणी आहे. भारताची जी भौगोलिक परिस्थिती आहे ती सुगंधी फुलांच्या प्रकाराला अनुकूल आहे. परंतु अमेरिका, सिंगापूर, हॉलंड येथे दिखावू (शोभिवंत) पण टिकावू अशा फुलांच्या प्रकाराला जास्त मागणी आहे.

सुगंधी फुलांमध्ये मोगऱ्याचे विविध प्रकार जसे बदलापूर मोगरा, वसई मोगरा, बट मोगरा, हजारी मोगरा, शेतकरी मोगरा हे आहेत. शेतकरी मोगरा हा संक्रातीला विरळ येतो तेव्हा भाव अधिक असतो. नंतर फेब्रुवारीपासून ऊन जसे तापते तशी उन्हाने कळी टोकाला थोडी लालसर व अमूल बटर कलरची कळीची दांडी होते. जसजसे ऊन तापते तसे ही कळी लवकर फुलत जाते. म्हणून आदल्या दिवशी कळ्या (मोगरा, जाई - जुइ) तोडून ठेवतात. जाई - जुई ही नगर भागात प्रसिद्ध आहे. जाईची फुले साधारण पावसाळ्यात कळ्या वेचायला येतात. पाकळीच्या मागील बाजूस तांबडसर कलर असतो. याचा वेळ असतो. त्याची कळी वेचायला किचकट असते. याच्या वेलाला पावसाळ्यात बुरशी येते. तेव्हा उन्हाळ्यात त्याची छाटणी करून कळी पावसाळ्यात सुरू होऊन दसऱ्यापर्यंत चालते. त्या काळात १८० ते ३०० रू./किलो भाव असतो. एरवी ९० रू. किलो भाव असतो. शेतकरी मोगऱ्याची लागवड गेल्या ६० वर्षात पुण्याजवळील ७० किलो मीटर परीसरामध्ये हळूहळू प्रचलित होऊ लागली आहे. कारण याला लग्न सराईत, सणावारात जास्त मागणी असते. जेव्हा उत्पन्नाची सुरुवात लवकर होते (म्हणजे मार्केटमध्ये नवीन वाण हा तेव्हा दुर्मिळ असतो) तेव्हा त्याचा दर जास्त असतो. उदा. संक्रातीला मोगरा कमी असतो, तेव्हा याला दर अधिक (१५० रू. किलोच्या वर) असतो. परंतु जसे ऊन वाढून माल वाढतो. तेव्हा १५० रू. वर पोहचलेला मोगरा ६० - ५० रू./किलो एवढा खाली येतो. कारण उष्णतेने कळी भरपूर लागून माल ज्यादा येतो. या उलट नवरात्रीपासून ते दिवाळीपर्यंत कमी तापमान, कमी ऊन यामुळे कळी कमी लागते आणि दसरा दिवाळी हे भारतीय संस्कृतीचा पारंपारिक हिस्सा असल्याने या काळात माल कमी आला ते २०० ते २५० रू./किलो भाव मोगऱ्याला मिळतो.

पारंपारिक प्रथेप्रमाणे जसे पांढरी कबुतरे, पांढरी फुले, तिरंग्याचा पांढरा रंग हा पवित्रता, सोज्वळता, शांतता, अहिंसा वात्सल्य, माणुसकी आणि कणव दर्शवितो. म्हणून महावीर जैन समाजात पांढरी तगर जी असुगंधी व जी पांढऱ्या कागदाचा वापर करून कृत्रिम फुलासारखे दिसते, भासते, वाटते ते भगवान महावीराला फार प्रिय असते. त्यामुळे जैन समाजात परसात पांढऱ्या फुलांची झाडे (तगर) ही आवर्जुन असतात.

जसे उन्हाळ्यात सुरू झालेला मोगरा हा साधारण गणपतीत संपतो तेव्हा तेथे गणपतीत पांढऱ्या, मंद सुगंध असणाऱ्या लिलीचा एरवी कमीत कमी ३५ पैसे/ गड्डी असणारी गणपतीत ९ रू. पासून १३ रू./गड्डी असते. हे फूल लोकप्रिय असते म्हणून याचे दर कमालीचे वाढतात.

बेंगलोरी कागडा याला भारतभर जास्त मागणी असते. हा कागडा अहमदनगर, नाशिक, पुणे येथे होतो. दक्षिण भारतात देवस्थाने अधिक असल्याने तेथे अशा सर्व प्रकारच्या फुलांना भरपूर मागणी असते. कारण उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतात देवलाये भरपूर आहेत.

मोगरा गणपतीत संपला की, कागडा सप्टेंबरला सुरू होवून डिसेंबरपर्यंत म्हणजे मोगरा पुन्हा चालू होईपर्यंत चालतो. याचे मोगऱ्याप्रमाणेच कणखर झाड असते. याच्या दोऱ्यात गुंफलेल्या माळा बेंगलोरहून मुंबई, दिल्ली, हैद्राबाद अशा मेट्रोसिटीत विमानाने निर्यात होतात. त्यामुळे जातीवंत फुलांना देशांतर्गत परंतु श्रीमंत शहरात शारदा उत्सव असो किंवा गणपती उत्सव असो, नेपाळचा पशुपती उत्सव असो किंवा मिनाक्षीचा (मदुराई) उत्सव असो. तर दैवत, त्यांची वृतवैकल्य आणि पूजेचा काळ व त्यांना आवडणारी पाने, फुले उदा. जसे गणपतीला दुर्वा, शंकराला बेल तसेच गणपतीला शमीचे पण आवडते. शमीचे झाड हे जगभर दुर्मिळच आहे. असे म्हटले जाते शमीच्या झाडाखाली उंबराच्या झाडापेक्षा अधिक पाणी असते.

जी राष्ट्रे वाळवंटी आहेत. तेथे पाने फुले नसतात. तेथे शोभिवंत पाना - फुलांची रचना करून मार्केट मिळविले जाते. उदा. म्हणजे नेदरलँड (हे समुद्रसपाटीखालील राष्ट्र असल्याने त्याला नेदरलँड म्हणतात) ला 'ट्युलिप ' नावाचे फूल राष्ट्रीय फूल आहे. याचे मळे थंडीत मोठ्या प्रमाणात विविध रंगांच्या गर्द छटा निर्माण करण्यामध्ये रंग, त्याचे प्रमाण थंड हवामानात अधिक येते म्हणून त्याला जगभर मागणी असते. थंडीत निर्माण होणाऱ्या फुलांना जगभर मागणी असते आणि हे सत्य प्रत्यक्षामध्ये उतरविण्यासाठी पॉलिहाऊसचा जन्म झाला. दिखावू पण टिकावू, शोभिवंत पण मागणी असणारे पीक जगाच्या पाठीवर उष्ण ते समशितोष्ण हवामानात कृत्रिमरित्या आर्दता, उष्णता, खत आणि मुलद्रव्य व्यवस्थापन, रोगकीड व्यवस्थापन अशा प्रकारच्या कालबद्ध, तालबद्ध आणि मार्केटच्या मागणीनुसार हुकमी उत्पादन करून आधुनिक जगातील फुलशेतीतील ७५ % हुकमी, चिकाटी असलेला तरूण श्रमाला प्रतिष्ठा देणारा, वेळेवर सर्व गोष्टीचे काटेकोर नियोजन करणारा, दुग्धोत्पादनासारख्या पारंपारिक व्यवसायाप्रमाणे व्यवसायिक फुलशेतीस वाहून घेतलेला, न चुकणारा, न थकणारा, प्रमाणिक तंत्रज्ञानाची गतिमानता, वेग पकडून, अवलंबुन फुलशेती करणारा, आजचे काम उद्यावर न ढकलणारा किंबहुना 'कल करे सो आज' आणि 'आज करे सो अब' या उक्तीला जागणारा फुलशेतीमध्ये नुसता उत्पादनात यशस्वी होत नाही तर चाणाक्षपणे मार्केटचा अभ्यास करून भाव मिळविण्याचा प्रयत्न करीत असतो आणि म्हणूनच तो यशस्वी होतो नव्हे तर श्री. गणपतराव सारे पाटलांसारख्या या सर्व चौकटीत बसणाऱ्या माणसाकडे जेव्हा एक एकर पॉलीहाऊस होते तेव्हापासून त्यांच्या ३० वर्षापुर्वी अशा विदेशी फुलांच्या अगणीत प्रश्नांवर संशोधन, प्रयोग करून त्यांची योग्य प्रतिसाद डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीला देवून त्यांची फुले जगभर निर्यात होवू लागली आणि जयसिंगपूरसारख्या भागात फुलशेती यशस्वी ठरली. आज सारे पाटलांची पॉलिहाऊसची शेती ५५ एकर आहे. म्हणून या चौकटीत बसणारे हे देशातले आज पहिले मॉंडेल ठरले आहे.

अंतरराष्ट्रीय पातळीवर नेदरलँड व सिंगापूरसारखे अनउत्पादक राष्ट्रही जागतिक निर्यातीच्या क्षेत्रात फुले विमानाने जगभरातून आयात करून आपल्या देशातून जगभर निर्यात करून देशाची आर्थिक अर्थव्यवस्था बळकट करीत आहेत. मग भारतासारख्या महाकाय राष्ट्रात अनुकूल जमीन, मुबलक पाणी, मुबलक हवामान व विविधता आणि प्रकाशाची मुबलकता (प्रकाशाचे एकूण तास आणि काळ) जमिनीचे विविध प्रकार ही निसर्गाने व परमेश्वराने मुक्तहस्ते केलेली उधळण वनस्पती प्रजातीला पारंपारिक व आधुनिक तंत्रज्ञानाला (डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी) प्रतिसाद देणाऱ्या गोष्टी याचा जर साकल्याने विचार व कृतीशिल आराखडा तयार केला तर देशांतर्गत आणि निर्यातक्षम शेकडो फुलांच्या पाने आणि वनस्पतीच्या विविध अंगांच्या सुशोभिकरण, आयुर्वेदिकीकरण, अॅरोमा थेरिपीकरण या विविध अंगाचा जर विचार केला तर हॉलंडसारखे जगाच्या नकाशावरील अंगठ्याएवढे राष्ट्र जगभर फुले निर्यात करते तर याची तुलना भारताशी केली तर जगाच्या नकाशावर पंजाएवढे भारत हे राष्ट्र काय करू शकणार नाही याचा होकारार्थी विचार आताच करावा. कारण 'अच्छा दिनांचा सुगंध दरवळू' लागलेला आहे.