खरीप गेला आता नियोजन रब्बी पिकांचे

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


गेल्या ३ वर्षाच्या भिषण दुष्काळामुळे महाराष्ट्रातील हमखास मोसमी पावसाचे विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे यांना मोसमी पावसाने अक्षरश: इतके रडविले कि त्यांच्या डोळ्यातील आश्रू आटले आणि भरवश्याच्या म्हशीला टोणगा झाला व खरोखरच्या टोणग्याला पाणी पिण्यासाठीही उरले नाही, अशी भुतो ना भविष्यती भयानक परिस्थिती उद्भवली. गेल्या १० वर्षामध्ये पावसाळ्यामध्ये पावसामुळे जमिनीत पाणी मुरून जे मातीचे प्रसरण होते व उन्हाळ्यात अती उष्णतेने आंकुचन होते व जमीन भेगाळते. अशी अवस्था न होता. जमीन उष्णतेने नुसती भेगाळतच गेली आणि शेतकरी समाज अखंड दुःख सागरात उणेच्या गणितात दोनदा जर उणे आले तर त्याची बेरीज होते, परंतु हा उणे ३ वेळा आला त्यामुळे त्याचे उत्तर उणे आले. ३ वर्षाच्या भिषण दुष्काळाने शेतकरी हा कोणत्याच शेती वा शेतीपुरक व्यवसायाशी जोडून राहिला नाही.

परंतु निसर्गाच्या कनवाळू, दयाळू मायेमुळे यंदा मान्सून भरभरून बरसला. इतका बरसला की, गेल्या दोन वर्षामध्ये पाण्याची पातळी खोल गेल्याने नद्या, नाले, तलाव व तळी खोल गेल्याने त्याचे खोलीकरण, सबलीकरण व रुंदीकरण हे सेवाभावी संस्था आणि गावाच्या श्रमदानातून त्याच बरोबर ज्यांना मानवतेची कणव आहे अशा काही व्यक्तींकडून हे काम सहज सुलभ झाल्याने पहिल्या पावसाने बऱ्यापैकी भरून दुसऱ्या पावसामध्ये हे सर्व तुडूंब भरून वाहू लागले. एकूण ७५ ते ९० दिवसांच्या पावसाने जमिनीतील पाण्याची पातळी, विहिरीची पातळी सर्वदुर महाराष्ट्र, दक्षिण भारत व मध्य भारतातील राज्यात येथे गेली ५ - ६ वर्षे दुष्काळी परिस्थिती होती ती जाऊन प्रमाणापेक्षा जास्त पावसाने पिकांचे नुकसान झाले. परंतु असे म्हणतात कि अनावृष्टीपेक्षा अतिवृष्टी परवडली. कारण यामध्ये जनावरांचा पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न सुटतो. पर्यावरण, वनीकरण, गवताची रेलचेल, निसर्गाचा जैविक व अजैविक समतोल, सेंद्रिय पदार्थ व कर्बाचे प्रमाण, तहानलेली जमीन ही प्रचंड पावसाने बरेच दिवसापासून गाईचे वासरू गाईपासून दूर राहिल्याने जसे त्याला आईचा पान्हा मिळाला नाही म्हणून गाईच्या कासेला डुसण्या मारते व गटागटा दूध पिते अशा रितीने वसुंधरा ही तहानेने व्याकुळलेली या पावसाने तृप्त झाली आणि त्यामुळे बालकवी ठोंबरेंनी सांगितल्याप्रमाणे फक्त श्रावणात वसुंधरेने नुसता हिरवा शालू न नेसता श्रावण (पोळा, मंगळागौर, नागपंचमी व रक्षाबंधन), भाद्रपद(गणपती व पितृपंधरवडा) आणि आश्विन (दसरा, दिवाळी) मध्ये नाविण्यपुर्ण, अनुकूल आणि प्रसन्न असा हिरवा शालू वसुंधरेने लेल्याने मानवी मन हे गेल्या २५ वर्षात प्रथमच प्रफुल्लीत व टवटवीत झाले. कारण अती पावसाने खरीपाच्या आशा (सोयाबीन, मुगाच्या) मावळल्या, परंतु उडीद व कापसाच्या अपेक्षीत उत्पादन वाढीने या दोन्ही पिकांचे संभाव्य दरामध्ये अपेक्षीत तेजी येण्याच्या चाहूलीमुळे शेतकरी वर्ग व सरकार सुखावले आहे. अशी अधुनमधून फांद्यातील पडझड, भाजीपाला दरातील चढ उतार यांची फोडणी व तिखटपणा शेतकरी व सामान्य माणसांना अधुनमधून चटके देण्याचेच प्रयत्न करत आहे. परंतु ऑक्टॉबर ते मार्चपर्यंत पाण्याचे प्रमाण व पातळी विपुल राहण्याची संधी प्राप्त झाल्याने रब्बीचे नियोजन करणे शेतकऱ्यांना सहज साधू शकेल. अती पाऊस बरसल्याने निसर्ग आनंदाच्या भरात हस्तात बरसायचा विसरून गेला व परतीच्या मार्गाने निघून गेला. तरीही शेतकरी खुषच आहे. कारण निसर्गाचा पाऊस ही अशी देणगी आहे की त्याच्या स्पर्शाने, त्याच्या आवाजाने आळस आणि ताणतणाव निघून स्फुर्तीचे आणि चैतन्याचे नवीन घुमारे माणसाला येऊन नवनवीन कल्पना सुचत असतात आणि त्यामुळे बऱ्याच वर्षात नियोजनाने होकारार्थी निर्णय सफल होण्याची आशा निर्माण झाल्याने माणूस सुखावतो आहे.

रब्बीचे नियोजन

खरे तर करडई पेरणीची तारीख ११ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर असते. परंतु अतिपावसाने ही मागेपुढे होऊ शते व आधुनिक तंत्रज्ञानाने याची घट भरून चांगल्या प्रकारे उत्पन्न साधता येते. परंतु करडईला अनुकूल पर्याय दुसरे महत्वाचे रब्बी पीक म्हणजे जवस होय. जवससुद्धा एक दुर्लक्षीत, कमी पाण्यावर उत्पन्न देणारे, अतिशय आरोग्यवर्धक, निकस जमिनीत येणारे व बऱ्यापैकी भाव देणारे गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत साथ देणारे असे बहुगुणी पीक आहे. त्यामुळे जरी सप्टेंबर महिना उलटून गेला असला तरी १५ नोव्हेंबरपर्यंत डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरून याची लागवड करावी. जमिनीतील भौतिक, जैविक व सेंद्रिय गुणधर्म हे यावर्षी चांगले असल्याने कमी निविष्ठांवर चांगले उत्पन्न मिळण्याची आशा आहे. याला मात्र आठवडी बाजारात मागणी मर्यादीत असल्याने अपेक्षीत भाव मिळणे कठीण आहे. तेव्हा आता व्हॅटसअॅप, डिजीटल मोबाईलमध्ये याचे भुसार मार्केटमध्ये किंवा याच्या कारखान्यांमध्ये पुरक उद्योग व प्रक्रिया उद्योग हे शोधून काढून त्यांच्याकडे माल डायरेक्ट (थेट) न नेता सॅम्पल (नमुना) नेऊन योग्य भाव देईल त्यांच्याशी करार करून मग माल पाठविणे व व्यवहार पहाणे.

आजपासून (१७ ऑक्टॉबर) आठ दिवसावर दिवाळीचा सण आला आहे आणि सणासुदीत हरभरा डाळीला (चकल्या, लाडू, शेव, फरसाण, गाठी, भजी, गोड मिठाया यामध्ये) फार महत्व आहे. सर्व धर्म जातीचे लोक दिवाळी हा सण गुण्यागोविंदाने, मानवतेचे, एकात्मतेचे प्रतिक म्हणून साजरा करतात. मागच्या वर्षी उत्पन्न कमी आल्याने डाळी आयात केल्या. मात्र आयात केलेल्या डाळींचा दर्जा कमी असतो. देशी डाळीचा दर्जा उत्तम असल्याने त्याला देशभर व जगभर मागणी अधिक असते. त्यामुळे डाळींचे दर वाढून जनतेला भावाचा चटका बसू शकतो. आता नद्या, नाले, तळी यांना मुबलक पाणी आहे. तेव्हा ऑक्टॉबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये ठिबकपेक्षा तुषार सिंचनाच्या ३ पाण्यावर हरभरा येईल. किंबहुना आता थंडी, धुके पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे हरभरा हा नुसत्या थंडीवरसुद्धा बऱ्यापैकी येऊ शकतो. हरभऱ्याचा अनुभव असा आहे की, हरभरा एक फुटाचा झाल्यावर ८ - १५ दिवसांनी २ वेळा खुडणी केली म्हणजे ही भाजी वापरता येते व खुडणीमुळे बेचक्यातून फुले मोठ्या प्रमाणात निघून अधिक घाटे लागतात. घाटे आळीचा बंदोबस्त सेंद्रिय किटकनाशकाने करावा.

१९६० ते १९७० च्या काळात हिवाळ्यात मसराईजचे पातळ धोतर कोरडे रात्री ह्या हरभरा पिकावर पसरत असता आणि पहाटे उठून हरभऱ्याच्या आंबने त्या दवाचे रूपांतर औषधी द्रवरूप पदार्थात होत असे व ही आंबा धोतर पिळून काचेच्या बाटलीत भरून अनेक पोट दुखीच्या इलाजावर वापरली जात असे. त्याकाळी खेडेगावात डॉक्टरच उपलब्ध नसायचे. ही आंब मात्र वौद्याच्या सल्ल्यानेच वापरावी. अशा रितीने हरभरा लागवड करताना एकरी ४० किलो बियाण्याला जर्मिनेटर १ लि. हाताला रबरी किंवा मोजे घालून त्या बियाला लावणे व तसेच सुकवून मोघड्यावर किंवा पाभरीने १२ ते १८ इंचावर पेरणी आणि २ ते ३ फवारण्या सप्तामृत (२५० मिली, ५०० मिली, ७५० मिली), हार्मोनी २०० ते ३०० मिलीसह घेऊन करणे, म्हणजे साधारण ११० ते ११५ दिवसात हरभरा काढणीस येतो. याला लागवड करताना १ ते २ पोती मोघड्यावर वा चाड्यावर पेरावे आणि फुले लागल्यावर १ ते २ पोती कल्पतरू खत द्यावे. जमल्यास खुरप्याने खत मातीआड करावे. यंदा हरभऱ्याची लागवड जास्त होईल. तरी हिरव्या हरभऱ्याची एक गड्डी १५ रु. ला सहज जाईल. गेल्यावर्षी उत्पादन कमी आल्याने २० -२५ रु. जात होती. ह्याची डाळ करून विकता येईल. जेव्हा हा हरभरा मार्केटला येईल तेव्हा डाळ मिल मालक याचे भाव पाडतील. त्यामुळे ४० ते ५० रु. किलो भाव हरभऱ्यास मिळेल. कारण यंदा लागवड ही वाढेल आणि लागवड वाढल्याने उत्पादनही वाढेल.

गव्हाची लागवड ही मात्र हरभरा लागवडीपेक्षा कमी करावी. कारण यंदा गव्हाचे उत्पादन चांगले येईल मात्र भाव कमी मिळेल. याला यावर्षी १५ ते १८ रु. किलो भाव राहील. त्यामुळे लागवड मर्यादीत करावी. गव्हाला कल्पतरू खताच्या लागवडीच्या वेळी २ बॅगा द्यावे म्हणजे फुटवे चांगले निघतील व पोग्यात असताना २ बॅगा (६५ ते ७५ दिवसांनी) द्यावे. १५ - २० दिवसाच्या अंतराने सप्तामृतच्या (२५० मिली, ५०० मिली, ७५० मिली अशा ) ३ फवारण्या कराव्यात. म्हणजे दाणा चांगला भरेल. उत्पन्न चांगले येईल. दर्जा चांगला राहील. याचे देखील मार्केट जवसाच्या मार्केटप्रमाणे व्हॅटसअॅप, डिजीटल मोबाईल वरून बाजारभावाची चौकशी करून विक्री करावी. येथे मात्र जवसाला जसे आठवडी बाजारात भाव मिळत नाही. तसे न होता सामान्य जनता आठवडी बाजारामध्ये एप्रिल - मे मध्ये साठवणीचा गहू घेतील तेव्हा या महिन्यात ४ - ६ आठवडे चांगला भाव मिळेल. अशारितीने सेंद्रिय डाळ व सेंद्रिय गहू पिकविता येईल.

हिवाळ्यातील कोबीवर्गीय भाजीपाला

५० ते ७५ वर्षापूर्वी कोबीवर्गीय भाजीपाला म्हटले की, कोबी, फ्लॉवर, नवलकोल व बीट यांना नवरात्राची चाहूल म्हणजे अल्हाददायक गुलाबी थंडीची वाट बघावी लागत असे. कारण स्वातंत्र्याची पहाट नुकतीच झालेली होती आणि देश शेतीच्या संशोधन विकासामध्ये आणि पिकांचे नवीन वाण शोधण्यामध्ये एवढा प्रगत नव्हता. जगातील कृषी संशोधनातील आघाडीच्या राष्ट्रांनी कृषी मार्केट हस्तगत करण्याचे ठरविले व त्यांनी संशोधन करून नवीन नवीन संकरीत वाण शोधले. गेल्या ३० वर्षात भारतातील राज्यांमधे जशी कृषी विद्यापिठांमध्ये वाढ झाली तसे त्यांनी संशोधनाचे व नवीन वाण निर्माण करण्याचे दमदार पाऊल उचलले. संकरीत पिकामध्ये टोमॅटो पिकाने आघाडी घेतली आणि टोमॅटोची लागवड ही पावसाळी मे - जून मध्ये, थंडीतील डिसेंबर आणि उन्हाळ्यातील मार्चमध्ये असे ढोबळ मानाने काळ ठरले आणि टोमॅटो पिकाने या देशामध्ये लोकांच्या मनात व अंत:करणात याच्या सेवनाने उत्साह व हुरूप निर्माण केला. थंडीत येणारी पिके (Cold Corps) यांची नवनवीन बारमाही येणारे वाण निर्माण झाले आणि एरवी थंडीत फ्लॉवर स्नोबॉल -१६, हा २ ते ४ किलोचा वाण जाऊन चौकोनी कुटुंबासाठी बाराही महिने या कोबी, फ्लॉवर व नवलकोलचे लहान आकाराचे गड्डे एकावेळी पुरतील अशा वाणांची निर्मिती झाली आणि अशा छोट्या वाणांच्या या भाजीला चव चांगली प्राप्त झाली. त्यामुळे मागणी वाढली.

कोबी आणि फ्लॉवरला ऑगस्ट व फेब्रुवारीमध्ये मागणी चांगली असते. त्या हिशोबाने लागवड करावी. नंतर डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या गेल्या ६० वर्षाच्या अनुभवातून 'शेतकऱ्यांनी केव्हा, का, कसे, काय करावे' या लेखाचा आधार घेऊन पिकांचे नियोजन करावे म्हणजे विविध पिकांचे मार्केट बदलत्या परिस्थितीत सुद्धा भाव देऊन शेतकऱ्यांना फायदा होईल.

वांग्याच्या बाबतीत हिवाळ्यात येणाऱ्या वांग्याला बी कमी असते व याला हिवाळ्यात बाजार चांगले मिळतात. याला आठवडी बाजार ही संकल्पना खरोखरच चांगली याला. सर्वांना सोईची किफायतशीर आहे त्यामुळे आठवडी बाजाराची मागणी लक्षात घेऊन तालुका पातळीवर व जिल्हा पातळीवर लागणाऱ्या भाजीपाला व फळांची लागवड (कलिंगड, खरबुज, डांगर आणि डाळींब, संत्रा, मोसंबीच्या मृगबहाराची जानेवारीत येणारी फळे, द्राक्षाचा अर्ली बहार (परदेश निर्यात करण्याचा बहार), याला मागणी चांगली असल्याने भाव मिळून पैसे होतात. जे कोरडवाहू क्षेत्र आहे त्याचे चांगले नियोजन केले तर रबीत यातील निम्मे क्षेत्र लागवडीखाली येऊ शकते. फुलशेतीत गुलछडी, झेंडू, लिली, बिजली, ग्लॅडीओलस, दचगुलाब ह्या पिकांना अनुकूल म्हणून व्हॅलेंटाईन डेच्या वेळेस अधिक भाव येऊन यांचे १४ फेब्रुवारीच्या अगोदर २ महिने नियोजन करून जागतिक मार्केटमध्ये सिंगापूर किंवा नेदरलॅंड या ठिकाणी मालाची रेलचेल होऊन भाव कोसळण्याची शक्यता असते. तेथे फुलांचा पुर येणार नाही व भारतीय फुलांचे नुकसान होणार नाही हे चाणाक्षपणे लक्षात ठेवावे. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या विविध फळ पिकांची (द्राक्ष, डाळींब, केळी, संत्रा-मोसंबी-लिंबू, आले, हळद, कापूस, शेवगा, ऊस) या पुस्तकांच्या मार्गदर्शन व संदर्भ म्हणून यातील सुचनांचा शेतकऱ्यांच्या यशोगाथा यांचा अभ्यास करावा. म्हणजे नवीन शेती करण्याऱ्यांना 'L' बोर्ड लावावा लागणार नाही व तुम्ही पुढे नवीन पिढीचे मार्गदर्शक व दिपस्तंभ ठराल!