शेतकऱ्याला व सामान्य माणसाला सुख - शांती, समाधान देणाऱ्या आठवडे (डी) बाजाराचे पुनरागमन

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


पारंपारिक पद्धतीने शेतकऱ्याला शेतीमाल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देशभर आणावा लागत असे व तो दलालाच्या म्हणण्यानुसार तो पहाटे ६ च्या अगोदर आला पाहिजे या परंपरेनुसार बरेचसे शेतकरी मालाबरोबरच रात्री गाळ्यावर मुक्कामाला येत असत. काही मध्यरात्री तर जवळपासचे शेतकरी पहाटे येत असत. काही हुशार शेतकरी हे बारदाना किंवा व्यवस्थित पॅकिंग करून प्रतवारी करून आणत असे. म्हणजे दलालाचे म्हणण्यानुसार ? मालाला चांगला भाव ? मिळतो आणि त्यानुसार सुज्ञ व सुशिक्षीत माणसे करत असत. पण ज्यांना याचे ज्ञान किंवा जाण नसे ते किलतानात पालेभाज्या जसे गवत बांधून शेतातून बांधावर फेकले जाते. तसे पालेभाज्या इ. बांधून आणत. यामध्ये जर मालाची आवक कमी असेल तर भाव मिळतो अशी गोष्ट पितृ पंधरवडा व अक्षय्य तृतीयेच्या काळात घडत असे. परंतु जेव्हा पाऊसमान जास्त असते तेव्हा ह्या पालेभाज्या माजतात, सडतात. तेव्हा सर्व शेतकरी व काही चुकून - माकून कोथिंबीर, मेथी लावून मागणीपेक्षा पुरवठा वाढल्याने दर न मिळाल्याने मार्केटमध्येच पडून राहते व त्याचा कचरा होतो. भुईमूग पावसाळ्यामध्ये काढल्यावर माती आणि चिखल असल्याने दलाल ५० किलोच्या पोत्यामध्ये ५ ते ७ किलो कडता (तूट) लावतो आणि ६० रु. भाव असताना ३५ रु. भाव देतो आणि हे जर शेंगा धुवून आणल्या तर कडता धरता येत नाही व १० रु. भाव अधिक मिळतो. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सामान्य शेतकऱ्याला कळत नाहीत. दलालांना माल घेणाऱ्या केवट्यांना उधार माल द्यावा लागतो. त्यामुळे दलालाला पट्टी करण्यासाठी व्याजाने पैसे काढावे लागतात असे त्याचे गोंडस म्हणणे असते.

यासर्व कौटुंबिक आणि शेतीच्या कामाच्या अनंत प्रश्नांनी पिचल्यामुळे शेतकऱ्याची अवस्था उसाच्या चरख्यातील पाचटासारखी होते आणि महिनेच्या महिने त्याला पैसे न दिसल्याने आणि दलाल उचल देण्याचे सांगतो तेव्हा शेतकऱ्याचा जीव भांड्यात पडला असे वाटते किंवा व्यवहाराची थोडी हालचाल करता येईल असे होते. ही प्रथा ब्रिटिश जेव्हा या देशात आले तेव्हापासून शेतकऱ्यांनी धुळधान झालेली आहे.

या सर्व संकटांच्या जोखडातून बाहेर यावे, त्याचे जीवन पुलकीत, सुखी, आनंदी, समृद्ध व्हायला अजून १० वर्ष तरी लागतील, पण ते सुसह्य होण्यासाठी व नैराश्येतून बाहेर येण्यासाठी त्याला उभारी येण्यासाठी दलालाच्या जोखडातून काढण्याचा धाडसी निर्णय झालेला आहे आणि अनेक पर्यायी उपायांमध्ये 'आठवडे बाजार' ही संकल्पना पारंपारिक ६० ते ७० वर्षापासून चालू झालेली होती, ती थेट कृषी उत्पन्न बाजार समितीचा जन्म होईपर्यंत होती.

स्वातंत्र्यापूर्वीची ५ वर्षे व स्वांतत्र्यानंतर ५२ चा दुष्काळ पडण्यापर्यंत सर्वसाधारण कुटुंबाची भाजी २ आण्यात येत असे. पाव आण्याची कोथिंबीर, पाव आण्याचे लिंबू व अर्धा ते १ आण्यात पालेभाजी येत असे. मेथी, शेपू, अंबाडी, चुका आणि चिलघोळ (कडेला तांबूस रंगाची व बारीक गोल पाने असलेली, जमिनीलगत वाढणारी, कधीही न मरणारी व न पेरता येणारी अशी भाजी शेतकऱ्यास फ्री मिळत असे) तसेच वांगी, कांदा, गावठी (खाजरी) गवार ह्या भाज्या प्रचलित होत्या. बटाटा म्हणजे दसरा, दिवाळी आणि पाहुणा आला तर अशी ही श्रीमंत भाजी होती. त्याकाळी घरच्या तुरीच्या डाळीची न शिजणारी हिरवी आणि लालसर पापुद्रा (टरफल) आणि डाळ करून उरलेली चुणी ह्याचे फुणके करताना त्यात अशा या चिलघोळच्या २ - ३ बुचकुल्या भाजीचा वापर केला असता. ते फुणके गरम पाण्यावर पितळेच्या कल्हई केलेल्या चाळणीत चुलीवर शिजवून कढी व भाकरी सोबत गोरगरीब मजुर लोक व सामान्य माणसेही खात असत. खेडेगावात घरातील निम्म्याहून अधिक लोकांना ते आवडत असे. इतक्या भाज्या त्या काली सहज उपलब्ध होत असते.

हे म्हणण्याचे कारण असे २ आण्यामध्ये त्याकाळी भाजी मिळत असे. हे आजच्या पिढीत स्वतःला दिवसा चिमटा काढून आपण स्वप्नात तर नाही ना? किंवा हे खरे असेल का? हे तो त्याच्या आजी आजोबाला विचारेल तेव्हा ते सांगतील होय हे सत्य आहे. त्याकाळात भाजी ही फारशी विकत कोणी आणत नसत. आजूबाजूचे शेतकरी त्याकाळात भाजी पिकली की त्याचा वानोळा एकमेकाला देत असत आणि म्हणून भाजी हा प्रश्नचिन्हात्मक विषय गृहिणीमध्ये किंवा शेतकऱ्याकडे व्यापारी पीक म्हणून येत नसे. तर ते सहज उपलबध होणारे उदरनिर्वाहाचे मामुली साधन होते. म्हणून बाजार समितीची तेव्हा गरज भासली नाही. अशा काळात गावामध्ये दाट वस्तीची बऱ्यापैकी सारवलेली घरे पुढे ओसरी असलेली असत. रस्त्याच्या दोन्ही बाजुला सांड पाण्याच्या वेड्यावाकड्या घरातील सांडपाण्याचा न्हाणीवाटे वाट करून देणाऱ्या चारी असत. चारीच्या बाजूने ४ -६ गृहिणी, मुली, बाया ह्या संध्याकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत शेतात असलेला भाजीपाला, कोथिंबीर, पालक, अंबाडी, गवार विकण्यास बसत असत. तेव्हा १।। ते २ तासात आठआणे ते रुपया मिळाला की बक्कळ कमाई झाली असा तो महान काळ होता.

शैक्षणीकी सुविधा, शिक्षणाचे पर्याय, आर्थिक सुधारणा, उत्पन्नाचे श्रोत, नोकऱ्या, दुकानदारी, उदयोगधंदे व कारखानदारी ही नव्हती. नंतर साधारण १९५० ते ६० चे दरम्यान बाजार समिती निर्माण झाली. तेव्हा शेतकरी धनधान्य, कडधान्य, तृणधान्य, भुसार, भाजीपाला व तत्सम शेतीमाल हा या कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीस घेऊन येऊ लागला आणि त्या वेळेस कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या सुरुवातीला सरकारच्या आर्थिक टेकूवरच चालत असत. शेतीमालाचे आडते, दलाल व व्यापारी हे सुज्ञ झालेले नव्हते आणि मग जसे गाळे सिस्टीम सुरू झाली. तरी ती मुख्य बाजारपेठा सोडून गावाबाहेरच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये जे गाळे किंवा प्लॉट हे अत्यल्प व काही वर्ष मुदतीत भरणा करण्याच्या बोलीवर देऊन तेथे हलविण्याचा प्रयत्न सरकार करत असे. तरीही पारंपारिक बाजाराचा गावात जो जम बसला आहे तो एवढ्या दूर मुंबई, पुणे, नागपूर, इंदौर, सुरत, बडोदा, अहमदाबाद, कोचिन, मुद्रास, दिल्ली, बेंगलोर अशा शहरात जम बसवायला जवळजवळ २० वर्षे यंत्रणेला लोकांची मने वळविण्यासाठी समय लागला आणि त्यानंतर बाजार समितीतील दलाल, व्यापारी आणि शेतकरी यांचे नाते अपवाद सोडून साप - मुंगुस, विळा- भोपळा, उंदीर-मांजर, वाघ - बकरी, सिंह -हरिण, कोळी आणि त्याच्या जाळ्यात सापडलेला किटक असा गेल्या ४० - ५० वर्षांमध्ये झालेला सगळा इतिहास याने ब्रिटिश या देशात अवतरण्याच्या अगोदर शेतकऱ्यांच्या जिवनात व भारतीय जिवनात जी सुख समृद्धी, प्रामाणिकपणा, माणुसकीचा गहिवर व उत्कंठा होती ती कशी लोप पावली त्याचा चलचित्रपट न संपणारा क्लेशदायक ठरला.

म्हणून शेतकऱ्याला मार्केटची पर्यायी व्यवस्था त्याच्या मालाला भाव देण्यासाठी शोधावी लागली. शेतकऱ्याला त्याच्या मर्यादित गरजा परंतु त्याला जगाचा पोशिंदा होण्यासाठी जगाची काळजी मिटावी यासाठी गरज मिटण्यासाठी त्यांना लागणाऱ्या निविष्टा, गरजा, सेवा ह्या विकत घेण्यासाठी त्या -त्या गोष्टींचे भाव व्यापारी ठरवतात आणि जगाच्या कल्याणाचे सत्कर्म करणाऱ्या पोशिंद्याला त्याच्या मालाचा भाव ठरवता येत नाही या दुःखाची सल इतकी अगाध (मोठी) न दुरुस्त होणारी (Incurable) होती की मोत्यासारखे पिकविलेले धान्य या नवीन अर्थ व्यवस्थेमध्ये पिस्तुलातील गोळीतील छऱ्याप्रमाणे अंत:करणाला जखमा करीत असत.

आठवडे बाजाराचे पुनरागमन

८० वर्षाच्या वाटचालीनंतर काळ उद्योगधंदे, व्यापार उदीम, शेतीव्यवस्था, शिक्षण, शिक्षणाचे पर्याय, व्यवसायाचे पर्याय, कुटीरउद्योग, लघुउद्योग, विविध सरकारी, निमसरकारी, एन. जी. ओ. च्या संस्था, बालवाड्या, वस्तीगृहे, प्राथमिक शाळा बॅंका, पतपेढ्या, बचत गट, रेडीओ, ट्रांजिस्टर, टी. व्ही., मोबाईल, पारंपारिक बलुते सिस्टीम जाऊन व्यापाराचे, व्यवहाराचे उद्योगाचे विविध पर्याय उपलब्ध झाल्याने गावाला एक प्रकारचे बाळसे (नवे रूपडे) आले आणि ८० वर्षापुर्वीची १ - २ मध्यम घरे जाऊन त्यांच्या जागी, सिमेंटची जंगले उभारली जाऊ लागली व अशारितीने पर्यावरणाचा ऱ्हास निर्माण झाला. मात्र ८० वर्षाच्या गावातला एकदम छोट्या बाजारात वाढ होऊन आठवडे बाजाराच्या पसाऱ्यामध्ये ४० ते ५० पट व्याप्ती झाली आणि ही संकल्पना नुकतीच २ महिन्यापासून थोडक्यात नवीन भाजीपाला उत्पादन सुरू झाल्यापासून आणि सर्वसाधारणपणे रविवार हा आठवडे बाजाराचा दिवस म्हणून करण्याचा ठरला. कारण रविवार हा सर्वसाधारण सुट्टीचा मजाहजा करण्याचा, आठवड्याची भाजी घेण्याचा दिवस सर्व मान्य ठरला. म्हणून स्थानिक नेतृत्वाने या बाजाराची सुरुवात दुपारी ३ ते रात्री ८ वाजेपर्यंत करण्याचा दवंडी, फ्लेक्स लावून मुहूर्तमेढ केली आणि १० ते २० किमी परिसरातील लोक मोटर सायकलवर ३ चाकी छोट्या, मध्यम टेम्पोतून आवाक्याप्रमाणे आपला भाजीपाला आणून देवळाच्या पुढे असलेले गावाची यात्रा भरते, कुस्तीचे फड उठतात, गणपती बसतात किंवा नवरात्र उत्सव असतो किंवा बैल पोळ्याला बैलाची मिरवणूक निघते अशा प्रकारे सामाजिक, धार्मिक आपल्या गावाची ओळख उजळ करण्याकरिता सांस्कृतिक कार्यक्रम करणारे हक्काचे सर्वमान्य असणारे हे आठवडे बाजाराचे बाजारतळ म्हणून एक 'पावन ठिकाण' ठरले. येथे परिस्थितीनुसार पाल, तंबू अशी पारंपारिक व्यवस्था आणि सुधारित आवृत्तीमध्ये कव्हरवरील फोटोत दाखविल्याप्रमाणे आधुनिक संरक्षित पाल व शेतकऱ्याचा माल व्यवस्थित मांडणी करून ठेवण्यासाठी आणि घेणाऱ्याला सोईचे व्हावे आणि पारंपारिक बैठकांच्या जेवणाच्या व्यवस्थेपेक्षा पण पुरातन काळी तीच एकमेव गाजलेली जाऊन त्याजागी डायनिंग टेबल सारखी व्यवस्था आली त्याप्रमाणे घेणाऱ्याला व विकणाऱ्याला सुलभ व सहज भावणारी लोखंडी, टेबल यांची मांडणी सुरू झाली. शेतकऱ्याला त्याच्या शेतीमालाला त्याच्या तोंडून भावाचा दर ठरवण्याचे स्वातंत्र्य व अधिकार हे देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळाण्याचा जो आनंद होता त्यापेक्षा अधिक आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसू लागला. तर दुसऱ्या बाजुला सामान्य ग्राहकाला शेतकऱ्याचा ताजा माल हवा तसा हवा तेवढा अत्यंत रास्त भावात म्हणजे एरवी १५ ते २० रुपयाला मिळणारी १ मेथी - कोथिंबीरीची गड्डी १५ रु. त २ अशी मिळत होती. खर तर १० रुपयातच २ मिळायला पाहिजे. परंतु त्याच्या शेतीच्या अंतरापासून ज्या ठिकाणी आठवडे बाजार भरला होता. तेथे आणण्यास २।। रु. एका गड्डीस खर्च लागला. परंतु ज्याठिकाणी आठवडे बाजार भरला त्या परिसरातील शेतकऱ्याला १ किमी अंतर चालण्यात पैसे खर्च न होता पायी चालण्याने घर ते एसटी स्टॅण्ड यात लागणारा वेळ व मामुली पेट्रोल हे न्युनतम असते. त्यामुळे एका गड्डीस २।। रु. हा जादा भाव त्याला 'बोनसच' ठरला आणि प्रत्यक्षात सामान्य माणसाला १ गड्डीच्या पैशामध्ये २ भाजीच्या ताज्या गड्ड्या, पाव किलोच्या पैशात १ किलो भेंडी, गवार, मिरची, टोमॅटो मिळाल्याने सामान्य माणसाला अत्यंत वाजवी अशा दरात चांगला, ताजा, चविष्ट असा ८ दिवसाचा भाजीपाला एकाच जागी, एकाच वेळेस, कमी पैशामध्ये मिळाला. यामध्ये त्याचे वेळ, श्रम, शक्ती, पैसा, पेट्रोल - डिझेलची बचत, पर्यावरण, सुविधा, शांतता, समाधान, सुद्दढ आरोग्य हे मिळाल्याने त्याला अटकेपार झेंडा लावल्याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर झळाळू लागले.

यामध्ये बचत गटवाले उद्योजक हे त्यांचा स्वतःच माल विकू शकतात व ते त्यांचा माल स्वित्झर्लंडची घड्याळे, चॉकलेट, फळांची रसयुक्त पेये, कोकाकोला किंवा पेप्सी यांना मज्जाव करून पिझ्झा, पास्ता व बर्गर यांना हद्दपार करून ज्या आयुर्वेदाने व फळांच्या सुमधुर ताज्या, पाचक रसांना भारतीय संस्कृतीने आयुरारोग्य दिले त्याला उभारी द्यावी. म्हणजे या आठवडी बाजाराला मॉलच्या सेलचे स्वरूप न येता मानवतेचे व मानवाचे अलबेल होईल.

ही बाजार व्यवस्था सफल, सदृढ, सर्वमान्य, सयुक्तिक, सुलभ, शेतकऱ्यांना कायमच्या समृद्धीकडे वाटचाल नेणारी व सामान्य ग्राहकाला वेठीस न धरता कांद्यासारखी अवस्था जनतेची, शेतकऱ्याची व सरकारची न करता सामान्य माणसाचे जीवन सदाफुलीसारखे गुलाबी - जांभळ्या रंगाचे सतत फुलणारे, टवटवीत कायम समाधान आणि शांती देणारे, न सुकणारे अशी जीवन शैली शेतकऱ्याची रहावी आणि एका दगडात दोन पक्षी मारले म्हणजे राष्ट्राचा सुवर्णो उद्धार होईल!