शेतीला कुंपण विविध प्रकारचे

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


शेतीला कुंपण ही फार मोठी गंभीर समस्या झाली आहे. जी जमीन शहराजवळ असते, अशा जमिनीमध्ये फळबागा, काकडी, कलिंग, खरबूज, यासारखी पिके घेतली, तर लोकवस्तीचा फार मोठा त्रास होतो. दुसरे म्हणजे ग्रामीण भागामध्ये शेती जर रस्त्याच्या कडेला असेल तर पिकांचे जनावरांपासून फार मोठे नुकसान होते.

कोकणामध्ये माकडांचा व मोकाट जनावरांचा उपद्रव होऊन पिकांचे नुकसान होते. त्यामुळे कोकणातील नवीन भागातील कृषी क्षेत्रामध्ये बागायती प्रगती होणे अवघड आहे.

शहराजवळील शेतीला सरसकट तारेचे कंपाऊंड केले जाते. याला एल शेप अँगलला जमिनीलगत होल्डफास्ट करून जमिनीत सिमेंट काँक्रीटमध्ये गाडून ५ ते ६ फुट उंचीचे अँगलला ५ ते ७ - ८ आडव्या काटेरी तारा लावतात, परंतु शहरातील अशा कंपाऊंडलाही लोक दाद देत नाहीत आणि ते ४ ते ५ वर्षाच्या आत मोडकळीस येते. लोखंड गंजते आणि ते महाग होत असल्याने अलिकडे सिमेंट पोलचा वापर होऊ लागला आहे. ही एक सुखद बाब आहे, कारण लोखंडाचा उपयोग औद्योगिक करणामध्ये होऊ शकतो.

कंपाऊंडचा अजून एक प्रकार म्हणजे विजेरी कंपाऊंड. या विजेरी कंपाऊंडमध्ये करंट सोडलेला असतो. त्यामुळे अशा कंपाऊंडला जर जनावराच्या तोंडाचा व माणसांचा स्पर्श झाला तर शॉक बसतो. तसेच या विजेरी कंपाऊंडजवळ धोका किंवा सावधानतेचा बोर्ड लावलेला असल्याने माणसे जवळ जात नाहीत. त्यामुळे शेतीचे संरक्षण होते. परंतु त्या सर्व बाबी खर्चिक आहेत.

आता आपण सजीव, कमी खर्चिक बाबींकडे वळूया.
चिलारचे कंपाऊंड- बागायतीक्षेत्र व खरीप किंवा रब्बीच्या पिकासाठीच्या जमिनी जर असल्या तर कमी खर्चिक व व्यवहारी उपाय म्हणजे चिलारचे काटेरी कंपाऊंड हे अतिशय मजबूत असते. याचे एकरी १२ ते १५ किलो बी लागते. शेताच्या कडेने नांगराने सरी काढून गांडूळखत किंवा कल्पतरू टाकून २ - ३ पाऊस झाल्यावर चिलारचे बी १ लिटर उकळत्या पाण्यात १ किलो बी २ दिवस भिजवून नंतर त्यात २५ मिली जर्मिनेटर टाकून रात्रभर झाकून ठेवावे. म्हणजे एक एकरसाठी २५० मिली जर्मिनेटर आणि १० ते १५ लि. पाणी लागेल. नंतर ते बी सरीत एक एक फुटावर टोकावे व खुरप्याने झाकून घ्यावे. म्हणजे एक महिन्याभरात सर्व बी चांगले येते.

उगवल्यानंतर दांडाने पाणी द्यावे. ४ इंच उंचीचे झाल्यानंतर चांगल्या वाढीसाठी सप्तामृताच्या १५ दिवसाच्या अंतराने २ - ३ फवारण्या कराव्यात. म्हणजे ४ - ५ महिन्यात ३ ते ४ फूट उंचीचे कंपाऊंड तयार होते. याचा काटा उलटा (बोरीसारखा) असल्याने मांजर, कुत्रे किंवा रानडुक्कर ही जनावरे शेतात जाताना याचा काटा शरीरात शिरतो. तसेच हा काटा विषारी असल्याने त्याच्या वेदना फार होतात. त्यामुळे एकदा जनावराला इजा झाली. तर पुन्हा ते जनावर शेताकडे जाण्यास धजवत नाही. चिलारपासून मिळणारे बी वन विभागास विकता येते.

राजस्थानी मेंहदी- बी किंवा रोपापासून याची लागवड शेताभोवती करून जोपासना करता येते. मेंदीची पाने कडू असल्याने याला कोणतेही जनावर तोंड लावत नाही आणि याची छाटणी (कटिंग) केल्यानंतर चांगली बाँड्री तयार होते. याचे एकरी १५ ते २० किलो बी लागते. (मेंहदी ची लागवड 'कृषी विज्ञान' मे २०११ पान नं. ३४ वरील लेख पहावा.)

कोयनेल - ही सुद्धा अतिशय कडसर वनस्पती असल्याने याला जनावर अजिबात तोंड लावत नाही. याला लावताना बी किंवा रोपे क्रॉस करून लावावे, म्हणजे याची दाट बॉर्डर तयार होते. काही नागरी उद्यानामध्ये उदा. कामाठी बाग, बेंगलोर, बडोदा येथील बागांमध्ये या कोयनेलपासून कटींग करोन मोर, हत्ती असे प्राणी साकारले आहेत आणि ते अतिशय सुबक दिसते व लहान मुलांचे आकर्षण ठरतात.

काटेरी व्हेरीगेटेड डुरांटा (Verigeted Duranta )- याचीसुद्धा पिशवीर रोपे तयार करून लागवड करता येते. पावसाळा चांगला असला तर तीन महिन्यात ते चांगले वाढून दिवाळीपर्यंत दोन - तीन फूट उंच होतात. याची पाने कडू व निमुळती असतात. याचा काटा अतिशय टोकदार व विषारी असतो. चुकून जर काटा बोटाला टोचला तर तो आठ दिवस ठणकतो. याची छाटणी केल्यानंतर दाट सुंदर एकसारखे कुंपण असे तयार होते. तेव्हा सर्व कंपाऊंडमध्ये हे कंपाऊंड जास्त प्रचलित व फायदेशीर आहे. याचे कंपाऊंड १५ वर्षापर्यंत राहते, म्हणून बऱ्याचशा बागांभोवती याचे कंपाऊंड फायदेशीर ठरते.

पिवळा डुरांटा (Yellow Duranta) - हे पिवळसर रंगाचे असल्याने आणि याच्या काड्या क्रॉस करून लागवड केली म्हणजे दाट होते. हे गुडघ्यापासून ते छातीपर्यंत भक्कम कंपाऊंड तयार होते. विशेष म्हणजे याची कात्रीने छाटणी केल्यानंतर पालवी चांगली येते आणि याचा पिवळसर रंग बाँड्रीला आकर्षक वाटतो. शहरी किंवा निमशहरी भागातील उद्यानात या बॉर्डरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

खैर - कोकणात व जेथे जास्त पाऊस आहे. अशा ठिकाणी खैराचे कुंपण उपयुक्त ठरते. खैराचा काटा हा अतिशय टोकदार असतो. तो जर टोचला तर आग फार होते. त्यामुळे खैराचे कुंपण चिलार इतकेच उपयुक्त ठरते. खैराचे उपयोग म्हणजे खौराजे सालीपासून कात बनवायचा कोकणामध्ये कुटीरोद्योग/लघुउद्योग आहे. चांगला दर्जेदार कात हा खैराच्या लाकडापासून केल्यास त्याला भाव चांगला मिळतो. म्हणून खैराची लागवड अती पाऊस पडणाऱ्या भागात सागापेक्षा फायदेशीर ठरते. खैर तोडताना मात्र जंगल खात्याची परवानगी लागते.

गुलाब - गुलाबाचे डोळे ज्या जंगली काडीवर भरतात अशा ब्रायरची लागवड कुंपण म्हणून करता येते. कारण ब्रायरचा काटा हा खैराच्या काट्याइतकाच तीक्ष्ण व झोंबणारा असतो. तसेच वर्षातून २ वेळा वित - वित लांबीचे एका झाडापासून ४० ते ५० कटींग्ज मिळून एका झाडापासून १० ते १५ रू. चे उत्पन्न मिळू शकते. म्हणजे कुंपणाचे कुंपण व काडीपासून पैसे. याच काडीवर गुलाबचे डोळे जर भरले तर गुलाबाची कलमे होलसेल ५ ते ७ रू. पासून किरकोळीने १५ रू. पर्यंत व कुंडीत ५० ते १०० रू. पर्यंत एक कुंडी महानगरात, तालुका, जिल्हा पातळीवर विकता येते. तसेच विविध गावठी गुलाबाचे कुंपण केळी, पपई अशी बागायती पिके घेताना जनावरांचा मोठा त्रास होतो. खाण्यापेक्षा (चरण्यापेक्षा) नुकसान अधिक होते. तेव्हा गावठी (देशी) गुलाबाची कलमे तयार करून कडेला एक सरी पाडून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करून लावल्यास उत्कृष्ट काटेरी गुलाबाचे कंपाऊंड होते. देशी गुलाबाच्या फुलापासून गुलाबाचे अत्तर, गुलकंद, गुलाब पाणी तयार करता येऊन गुलाबाच्या फुलांपासून मधाच्या पेट्या व मधमाश्या ठेवल्यास गुलाबाचा औषधी मध मिळेल. मुस्लीन बांधवांमध्ये तोरे करण्यासाठी अशा गुलाबांना मोठी मागणी असते. गुलाबाच्या काड्या नवीन लागवडीसाठी विकता येतील. महिला बचत गटासाठी हा एक चांगला उपक्रम ठरू शकेल. सरांच्या प्रेरणेतून जालना जिल्हयात १३०० मजूर महिला बचत गटांनी डच गुलाबाची लागवड ओपन फिल्ड शेतात करून ते फुलाचे गुच्छ ऑफिसेस व हॉस्पिटलमध्ये लावतात व दुसऱ्या दिवशी ते काढून गुलकंद करून विकतात. अशा मजूर महिलांनी ३ वर्षात २ ते ३ एकर जमिनी विकत घेतल्या आहेत, असे प्रकल्प समन्वयक श्री. शिवाजी तनपुरे यांनी प्रत्यक्ष भेटीत आम्हास कळविले.

सागर गोटा -याची लागवड दाट करावी लागते. म्हणजे याचे कंपाऊंड हे एकसारखे होते व पाने कडू असल्याने जनावर धजवत नाही. सागरगोट्याचा वापर आयुर्वेदात कॅन्सरवर होतो.

सुबाभळीचे कंपाऊंड - सुबाभुळ ही उंच होते, परंतु याच्या बिया पडून जमिनी खराब होतात. काही प्रमाणात याच्या पाल्याचा उपयोग चारा म्हणून शेळ्या, मेंढ्यासाठी होतो. लाकूड जळणासाठी व शेती औजारांसाठी वापरले जाते.

विविध प्रकारची टणटणी (घाणेरी) - याचे कंपाऊंड सहसा करण्याची गरज भासत नाही. खेडेगावात बाराही महिने बांधावर उगविलेले असते. याचे खोड ठिसूळ व काटे बारीक - बारीक पण विषारी असतात. त्यामुळे जनावरापासून शेताचे संरक्षण होते. हे झाड अतिशय काटक असून याची फांदी जरी पडली तरी ती जीव धरते. शेताला जर मोठे बांध असतील तर कमी वेळात कमी पैशात घनदाट कंपाऊंड पावसाळ्याच्या तीनच महिन्यात यापासून भक्कम स्वरूपात तयार होते. वर्षभरात छाटणीच्या बाबतीत याकडे लक्ष दिले गेले नाही तर हे कंपाऊंड तीन ते सहा फूट आडवी - तिडवी जागा व्यापते, त्यामुळे वहितीखालील जमीन वाया जाण्याची शक्यता असते.

आखाती राष्ट्रांत भारतीय कृषी मालास निर्यात बाजारपेठेची चाचपणी करताना दौरा १५ वर्षापुर्वी बहारीन, अबुधाबी, दुबई, शारजा, कुवेत, मस्कत (ओमेन) या राष्ट्रात १५ दिवसांनी झाला. तेथे हिरवळी नैसर्गिक झाडांपेक्षा आकर्षक सिमेंटची IT इमारतीसारखी जंगले आहेत. सर्वत्र उंच इमारतींना काचा लावल्याने AC चा वापर करावा लागल्याने Co२ चे प्रमाण अधिक व नॉर्मलपेक्षा ५ डी. ते ७ डी. सेल्सिअस वातावरणाचे तापमान अधिक होऊन तेथे एका ठिकाणी शेतावर आढळणारी कॉमन टणटणी दुबईच्या भारतीय दुतावासात लावून व्यवस्थित आकर्षक छाटणी केल्याने देखणी दिसत होती. त्यामुळे काहीही हिरवळ नसताना ते एकमेव झाडही ओअॅसिस सारखे आकर्षक वाटत होते.

पिवळे हिरवे बांबू - काही ठिकाणी पिवळ्या हिरव्या बांबूचे कंपाऊंड केले जाते. मात्र यामध्ये उंची वाढल्यानंतर सावली पडत असल्याने कासराभर वावर (शेत) पिकत नाही. त्यामुळे नाल्याच्या बाजूने पाण्यामुळे मातीची धूप होऊ नये म्हणून तेथे लावावे.

शेवटी व निलगिरी - शेवरीचे किंवा निलगिरीचे कंपाऊंड पश्चिमेकडील वाऱ्यापासून सरंक्षण होण्यासाठी (Wind Break) द्राक्ष, केळी, डाळींब, संत्रा, मोसंबी, लिंबाच्या बागांभोवती केले जाते, शेवरीचा पाला शेळ्यांना चारा म्हणून वापरला जातो. तर निलगिरीच्या पाल्यापासून तेल काढले जाते.

कुंपणाच्या विविध रोपे व बियांसाठी पुणे येथील डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क करावा.