दुष्काळी परिस्थितीत शेती सेंद्रिय का असेंद्रिय यावरील शोधलेला अनुभवी उपाय

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


गेल्या ६ ते ७ वर्षापासून हवामानात झालेल्या बदलांमुळे पावसाचे सरासरी मान कमी होऊन आणि २ महिने पाऊस लांबल्याने एकूण पावसाचे दिवसही कमी झाले आहेत. पुर्वी मृग संपता - संपता (७ जून ते २२ जूनपर्यंत) ९०% पेर पूर्ण होत असे. काही राहिलेली १०% पेर ही २२ जून ते ४ जुलैला (आर्द्रामध्ये) संपत असे, परंतु आता सर्व हवामानाचे चक्र बदलल्याने जो महाराष्ट्रातील आणि देशातील २०% आवर्षनप्रवण भाग होता आणि महाराष्ट्रातील काही जिल्हे विशेषकरून महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा पूर्व भाग हा अवर्षनप्रवण असल्याने तो सतत दुष्काळाच्या छायेखाली असायचा. याचा दुष्परिणाम म्हणजे जनावरांचा चारा व पाणी कमी झाल्याने दुष्काळ भीषण जाणवू लागला. ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे अशा ठिकाणी छावणीतील दावणीला जनावरे बांधावी लागली. अशा एका बॅक वॉटर पाण्याजवळ जनावरांची छावणी उभारून त्याच्या ४० एकर उसाला २७०० रू. चाऱ्याचा भाव मिळून बक्कळ पैका झाला.

छावणीची परिस्थिती उद्भवण्याचे कारण जनावरांसाठी जो चारा असतो त्याचे नियोजन करताना शेतातील काही भाग हा जनावरांच्या चाऱ्यासाठीच ठेवावा. ही संकल्पना जशी दुबत्या जनावरांसाठी राबविली जाते तशी मशागतीच्या कामाच्या जनावरांसाठीही राबवावी. चंदी, चुणी, ढेप हे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जावू लागले आणि जेथे छावणीची सोय नाही तेथे लाख मोलाची जनावरे शेतकऱ्यांच्या इच्छेविरुद्ध जनावरांच्या आठवडे बाजारात २५% किंमतीला सुद्धा कोणी विकत मागेना आणि गेली ती कत्तलखान्याची धनी झाली. अशा रितीने पशुधन हे कमी झाले. पशुधनाचे प्रमाण कमी झाल्याने शेतीसाठी जनावरांचे शेण व मूत्र दुरापास्त झाले. २० वर्षापुर्वी १५०० रुपयाला असणारा शेणखताचा ट्रक हा आता ४ ते ५ हजारालाही मिळत नाही. ही आजची मोठी शोकांतिका आहे.

शेणखताचा भासणारा तुटवडा लक्षात घेता त्याला पर्याय म्हणून गांडूळखताचा आधार शेतजमिनीला - फळ व बागायती पिकांना गेल्या १० वर्षापासून प्रचलित झाला. यामध्ये शेतामधील काडी - कचरा, धसकटे, जनावरांच्या अंगाखाली मूत्र व शेणानी भिजलेला ओला चारा तसेच शेतातील तण हे गांडूळ खताच्या खड्ड्यासाठी आधारभूत ठरले. गांडुळांना मेथीच्या काड्या, गव्हाचा कोंडा व कांद्याची टरपले आवडतात. तद्वतच गांडूळांच्या प्रजोत्पादनासाठी १०' x ६' x १।।' या मापामध्ये काडी - कचरा व गवत बसविल्यानंतर शेणकाला अथवा कुजलेले शेणखत किंवा २ पाट्या शेणाच्या स्लरीमध्ये १ किलो डाळीचे पीठ व १ किलो गुळाचे पाणी करून गांडूळ खताच्या पृष्ठभागावर शिंपडले तर गांडुळांची संख्या वाढून गांडूळ खताचे उत्पादन वाढून चांगल्या प्रकारचे खत मिळते. तथापि शेणखतातून बायोगॅस पद्धतीने स्लरीचे शेणखत आणि बायोगॅस असा दुहेरी फायदा मिळतो. असा गॅस गांडूळ खतापासून मिळत नाही ही गांडूळ खताची डावी बाजू आहे. तथापि गांडूळ खतामुळे चांगली पोकळी तयार होऊन पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढून जमिनीतील मुलभूत अन्नघटक सहजतेने पिकांना उपलब्ध करून देते. विशेषेकरून सेंद्रिय कर्ब, सेंद्रिय नत्र, सेंद्रिय स्फुरद, सेंद्रिय मॅग्नेशिअम, सेंद्रिय लोह हे घटक शेणखतापेक्षा गांडूळ खतात अधिक असतात. त्यामुळे हे घटक फळपिके, धागापिके, तृणधान्य, कडधान्य, गळीतधान्य यांना सहजतेने उपलब्ध होतात. याठिकाणी मध्यम सुपीक जमिनीमध्ये या गांडूळ खतावर पिकांची भूक भागवून उत्पादन आणि उत्पादनाचा दर्जा हा सरस मिळतो. बऱ्याच ठिकाणी साखर कारखाने निर्माण झाल्यामुळे उसाची मळी (प्रेसमड केक) हा फॉस्फरस व सेंद्रिय कर्बाचा स्रोत म्हणून बऱ्यापैकी वापरता येवू शकतो. तसेच या प्रेसमड केकचा सामू ४.५ ते ५.५ (आम्लयुक्त) असल्याने ज्या भागातील जमिनी अल्कलाईन (विम्लयुक्त) आहेत. उदा. महाराष्ट्रातील बारामती, दिग्रज, देवळाली प्रवरा येथे पाण्याचा वापर जास्त झाल्याने जमिनी खारपट झाल्या. अशा जमिनीत प्रेसमडचा वापर केल्यास ज्यांचा सामू ८ हून अधिक आहे. त्यांचा सामू ६.५ ते ७ करता येऊन या वाया गेलेल्या जमिनी वहीतीखाली येऊ शकतील.

जनावरांचे प्रमाण घटल्याने सेंद्रिय शेती करणाऱ्यांची कुचंबणा जरू झाली आहे. परंतु याला पर्याय म्हणून दरवर्षी पाण्याची उपलब्धता असल्यास ताग, धैंचा, चवळी अशी द्विदल वनस्पती हवेतील जैविक नत्र आपल्या मुळावरील गाठीत साठवून ठेऊन त्याची उपलब्धता पुढील पिकांना करून देतात. ही हिरवळीची पिके पाऊस पडण्याअगोदर नुसत्या पावसाळी हवेच्या झोतानेसुद्धा वाढतात आणि ही पिके १।। ते २ महिन्याने ट्रेक्टरने अथवा नंगारामागे गाडली जातात आणि रब्बी कांदा, ऊस, फळबागा, रब्बीचा भाजीपाला घेता येऊन त्याचे दर्जेदार उत्पादन मिळू शकते. अशारितीने ज्या ठिकाणी सेंद्रिय खताचा तुटवडा भासतो. तेथे हा पर्याय उपयुक्त ठरू शकतो.

ज्या ठिकाणी उन्हळ्यात २ पाणी देणेही शक्य नसेल तेव्हा भाद्रपद अथवा संक्रांतीनंतर पाण्याची उपलब्धता आहे तेथे १।। ते २ महिन्यात येणारे हिरवळीचे पिकाची लागवड करून जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे नत्राबरोबर प्रमाण २० ते ४० करता येते. कर्बाचे प्रमाण ४० हून अधिक झाल्यास तर याचा अर्थ असा की, गाडलेल्या खताला पुरेसे पाणी उपलब्ध न झाल्याने त्याचे सेंद्रिय पदार्थात रूपांतर नीट होत नाही. त्यामुळे नंतर घेतलेल्या पिकाचे उत्पादन कमी येते. तसेच हा सेंद्रिय पदार्थ नीट कुजत नाही. तेव्हा या पदार्थास विशिष्ट वास येऊन त्याने बांधावर लपलेली हुमणी परत शेतात येते आणि भुईमूगासारखी गोड मुळे असणारी पिके उदा. बटाटा, कोबी , फ्लॉवर, भेंडी यांची मुळे कुरतडून टाकतात व पिकाचा नाश करून टाकतात. तेव्हा ती करण्याअगोदर घेतलेले हिरवळीचे खत संपूर्ण कुजले असल्याची खात्री करावी. तरी अशा परिस्थतीत हुमणीचा प्रादुर्भाव झाल्यास रासायनिक पद्धतीत एकरी ५ ते १० किलो थायमेटचा वापर करण्यास सांगितले जाते. मात्र थायमेटचा वास हा जमिनीत ३ फूट खोल जातो तर हुमणी ही ५ फूट खोल जाते व ती स्वत: चा जीव डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे वाचविते. तेव्हा याच अंकातील पान नं. ३० वरील 'सांगीन चार गोष्टी युक्तीच्या' सदरातील 'हुमणी नियंत्रणाचा जैविक उपाय' पहावा. अशा पद्धतीने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने निर्माण केलेला जैविक पद्धतीने हुमणी नियंत्रणाचा फायदा बऱ्याच शेतकऱ्यांना झाला आहे. तसा आपणही वापर करून आपला अनुभव आम्हाला कळवावा. म्हणजे त्याचा इतर शेतकरी बांधवांना उपयोग होईल.

सेंद्रिय शेती करणाऱ्यांसाठी हा वरील पर्याय मध्यम ते सुपीक जमिनीसाठी उपयुक्त ठरलेला आहे. दुष्काळी भागामध्ये २ पाण्यावर तरोटा (Cassia Tora) किंवा चुनखडीयुक्त मुरमाड पडीक जमीनीमध्ये बरबडा हे प्रचंड नत्रयुक्त गाठी असलेले द्विदल तण उपटून त्याचा वापर हिरवळीच्या पिकासाठी चांगल्याप्रकारे होऊ शकतो. तरोटा हे २ पाण्यावर सगळ्यात लवकर व झपाट्याने वाढणारे, दारीद्र्य रेषेखाली रोजंदारीवर आपली रोजी - रोटी करणारे दिवसभर काम करून संध्याकाली घरी जाताना चालता - चालता गुडघ्यापासून ते कंबरेपर्यंत वाळलेला तरोटा कापून भारे बांघून त्याचा सगळ्यात स्वस्त जळण म्हणून वापर करतात. याच तरोड्याच्या बिया दळून गरीब लोक भाकरी खातात. तर श्रीमंत लोक हे बी तूपात तळून कॉफी मिश्रीत तयार होते. तसेच धरणावर काम करणारे मजूर बरबड्याच्या पाल्याची भाजी शिजवून खातात.

अशारितीने एकदलावर द्विदल व द्विदलावर एकदल पिके घेऊन ऊस, कांदा अशा बागायती पिकांना त्यावेळेस दिलेल्या रासायनिक खतांच्या अंशावर फेरपालटीमध्ये दुसोट्याची पिके घेता येतात.

रासायनिक खताच्या किंमती महाग झाल्याने व ती कमी प्रमाणात व वेळेवर उपलब्ध न झाल्याने सेंद्रिय शेतीकडे लोक आपोआपच वळू लागले आहेत. परंतु सेंद्रिय शेतीमध्ये दर्जा मिळाला तरी उत्पादन कमी होत असल्याचा गोड गैरसमज झाला. परंतु रासायनिक खतांचा, बुरशीनाशक व पाण्याचा वापर वाढल्यामुळे एका ब्रेक इव्हन अवस्थेला उसाचे उत्पादन एकरी ७० टन होते. त्यामध्ये घट येऊन ते ३० ते ४० टनावर आले. अशा रितीने रासायनिक खतांचे तोटे प्रकर्षाने जाणवू लागले. तेव्हा हा दुष्परिणाम टाळण्यासाठी रासायनिक खतांचा वापर हा सेंद्रिय खताला पुरक ठरावा म्हणून हलक्या मुरमाड माळरानयुक्त मातीचा भाग ६ इंच ते १।। फूट आहे आणि त्याखाली मुरूम आहे अथवा मध्यम कडक दगड आहे. अशा ठिकाणी सेंद्रिय खताबरोबर रासायनिक खताचा संतुलित वापर घेतलेल्या पिकाचे उत्पादन वाढावे हे अपरिहार्य आहे. मातीच्या थराखालील मुरूम (Sub -Soil) चे रूपांतर पिकांच्या फेरपालटीमध्ये किंवा मशागतीमध्ये २ - ३ फुटापर्यंत पोयटा अथवा चिकणमातीचे प्रमाण ६०% पर्यंत झाले तर मात्र नुसत्या सेंद्रिय खतांवरही शेती सुफल आणि सफल होऊ शकेल आणि विशेषेकरून जेथे पाण्याची उपलब्धता आहे, तेथे ह्या जमिनी फळपिकास उपकारकच ठरतील.

आतापर्यंत झालेला पाऊस आणि गेल्या ४ - ५ वर्षातील पाऊसमानाची आकडेवारी लक्षात घेतली तर इस्राईलपेक्षा अधिक पाऊस आतापर्यंत महाराष्ट्रात व भारतात झालेला आहे. तेव्हा कमी पाण्यावर जे उत्पादन घेऊन माल निर्यात करू शकते. तेथे पाण्यासारखा पैशाचा गैरवापर न करता सुयोग्य पद्धतीने, सद्सद्विवेक बुद्धी जागृत ठेऊन पैशाचा विनियोग वरील उपायांच्या आधारे जर सरकारांनी व शेतकऱ्यांनी केल्यास सेंद्रिय का असेंद्रिय, दुष्काळ का सुकाळ असा प्रश्न न पडता हे भारतातील सुधारित मॉडेल साऱ्या जगाला मार्गदर्शक ठरेल हे निश्चितच !