शेतीमालाचे भाव कशावरून ठरतात? (३) तेलबिया - सोयाबीन

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


मागील अंकामध्ये आपण देशातील विविध पारंपारिक मोठ्या प्रमाणात लागवड होणाऱ्या तेलबियांचे भाव कसे ठरतात याचे सविस्तर विवेचन केले होते. आता आपण १९५० च्या दशकामध्ये एका क्रांती कारी तेलबिया व प्रथिनेयुक्त नाविण्यापुर्ण पिकाची म्हणजे सोयाबीन पिकाची सुरुवात झाली तेव्हा त्याविषयी पाहूया -

स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या २० - ३० वर्षामध्ये सोयाबीन हे पीक भारतात आले. परदेशातून आलेल्या या पिकाच्या जाती प्रक्रिया उद्योगामध्ये उदा. तेलासाठी प्रसिद्ध होत्या. परंतु या तेलाला एक रापलेला (Taint) वास यायचा. त्यामुळे या तेलाला १९६० - ८० च्या दशकांत एवढी मागणी झाली नाही. नंतर मात्र मध्यप्रदेशातील कृषी विद्यापिठे व संशोधन संस्थांनी जो रापलेला येणारा वास होता तो न येणाऱ्या जाती विकसीत केल्या. त्यानंतर मग पुण्यामध्ये आघारकर संस्थेतील (MACS) शास्त्रज्ञांनी महाराष्ट्रासाठी दोन्ही - तिन्ही मोसमासाठी अधिक उत्पादन देणाऱ्या, तांबेरा रोगास बळी न पडणाऱ्या जाती १९८० - ९० साली विकसीत केल्या व तेव्हापासून या पिकाने तिसऱ्या जगातील राष्ट्रात क्रांती केली. सोयाबीनचे भाव हे त्यात असणारे तेलातील व विविध प्रथिनांचे प्रमाण आणि त्याचा दर्जा यावर ठरतात. जगभरामध्ये सोयाबीनला प्रक्रिया पदार्थ व उपपदार्थ निर्मितीमध्ये प्रचंड प्रमाणात मागणी आहे. सोयाबीनचे पावसाळी खरीप उत्पादन हे ९ - १२ क्विंटलपर्यंत होते. परंतु याला जेव्हा ९० च्या दशकामध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची साथ मिळाली तेव्हा एकरी १८ - २० क्विंटल उत्पादन शेतकरी घेऊ लागले. मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशच्या खालोखाल महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यात हे पीक प्रचलित झाले. कारण हे मोसमी पावसात कमी पाण्यावर येणारे पीक म्हणून शेतकऱ्यांनी याला प्राधान्य दिले. खरीपापेक्षा रब्बीमध्ये याचे उत्पादन कमी येऊ लागले आणि उन्हाळ्यात भरपूर सूर्यप्रकाश व रोग - किडीचा प्रादुर्भाव कमी असून देखील पाण्याच्या मर्यादित उपलब्धतेमुळे उन्हाळी सोयाबीन हे प्रचलित होऊ शकले नाही व तसे वाणही निर्माण झाले नाही. परंतु या सोयाबीनवर तांबेरा व तत्सम रोग, उंट अळी पाने खाणारी व शेंगा पोखरणारी अळी अशा किडींनी हे पीक ग्रासले गेले. मग आघारकर संस्थेने याला प्रतिबंधात्मक जाती विकसीत केल्या. गेल्या १० - १५ वर्षामध्ये डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी सोयाबीनच्या दर्जेदार जाती विकसीत केल्या आणि त्यामुळे देशामध्ये सोयाबीन हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाऊ लागले. त्यामुळे देशामध्ये तेलाची आयात कमी झाली. काही प्रमाणात डाळवर्गीय पिकांवरील ताण कमी पडला. वाढत्या लोकसंख्येसाठी २०२० ते २०५० पर्यंत हे पीक जगातील ९ अब्ज लोकसंख्येची व देशातील १.५ अब्ज लोकसंख्येची गरज भागवू शकेल अशी आशा आहे.

परंतु बदलत्या हवामानामध्ये जेव्हा मोसमी पाऊस हा १ ते २ महिने पुढे ढकलला जातो तेव्हा या हवामानातील बदलांना अनुकूल व योग्य अशा जाती निर्माण करणे मोठे आव्हान शास्त्रज्ञांपुढे आहे आणि यात येत्या ५ वर्षात शास्त्रज्ञ यशस्वी होतील, अशी खात्री आहे.

सोयाबीनचे भाव ठरवताना अनुकूल हवामान, पावसाचे प्रमाण व खरीप पेरणी जर वेळेवर होवून कीड रोगाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला तर खरीप पिकाचे उत्पादन चांगले येते आणि जर चीन, पाकिस्तान, रशिया, अमेरिका येथे नैसर्गिक आपत्ती (भुकंप, पूर, दुष्काळ, चक्रीवादळ) आल्या तर भारतीय सोयाबीन निर्यातीला वाव असतो. अशावेळी सोयाबीनचे भाव वाढतात. जेव्हा सोयाबीनच्या काढणीचा काळ असतो तेव्हा सुरूवातीच्या काळामध्ये (सप्टेंबर - ऑक्टोबर) शेतकऱ्यांनी माल मार्केटला अधिक आणावा म्हणून व्यापारी त्याचा दर ३६०० ते ४००० रू. /क्विंटल असा काढतात आणि शेतकऱ्याचा माल या कृत्रिम दर वाढीला बळी पडल्याची चाहूल व्यापाऱ्यांना लागल्यावर मार्केटला माल मोठ्या प्रमाणात आल ही सबब सांगून त्याचे भाव मालाचा दर्जा पाहून २६०० ते ३००० रू./क्विंटल असे स्थिरावतात. म्हणजे व्यापाऱ्यांची जेव्हा खरेदी असते तेव्हा नेमके सोयाबीनचे भाव पडतात आणि परत जेव्हा शेवटच्या टप्प्यात (दिवाळी ते मे) निर्याती ची मागणी वाढली व माल जर मार्केटला कमी आला तर परत पहिले भाव ३६०० ते ४००० पर्यंत होतात. अशाप्रकारे सोयाबीन तेलबियाचा चढउतार होत असतो. सोयाबीन हे तेलबिया व प्रथिनातील कल्पवृक्ष पीक असून प्रक्रिया उद्योगामध्ये याला जगभर मागणी असल्याने याचे वायदे बाजारातील सौदे हे निर्यातदारांना व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बऱ्यापैकी आकर्षित करतात. म्हणजे जसे ऊस, कापूस कांदा, बटाटा व कधीकधी टोमॅटो या पिकाची दराच्या बाबतील जी दैन्यावस्था होते ती सोयाबीनमध्ये पहायला मिळत नाही. हा एक चांगला मुद्दा सोयाबीन पिकाचा आहे.

जगभरातील सोयाबीनचे एकूण क्षेत्र, उत्पादन व हेक्टरी उत्पादकता याचा २००६ आणि २००७ मध्ये जो चढ - उतार झाला तो पुढील तक्यामध्ये दिला आहे.

विविध देशांतील सोयाबीन खालील क्षेत्र व उत्पादन

देश   क्षेत्र (हेक्टर)   उत्पादन (टन)   उत्पादकता (किलो/हे.)
२००६   २००७  २००६   २००७   २००६   २००७  
अमेरिका   ३०,१९०,६८०   २५,९६०,०००   ८३,५१०,०००   ७२,८६०,४००   २,७६६   २,८०६  
ब्राझील   २२,०४७,३४९   २०,५६५,३००   ५२,४६४,६४०   ५७,८५७,२००   २,३७९   २,८१३  
अर्जेंटिना   १५,१३०,०३८   १५,९८१,२६४   ४०,५३७,३६४   ४७,४८२,७८४   २,६७९   २,९७१  
चीन   ९,१००,०८५   ८,९००,०६८   १५,५००,१८७   १३,८००,१४७   १,७०३   १,५५०  
भारत   ८,३३४,०००   ८,८८०,०००   ८,८५७,०००   १०,९६८,०००   १,०६२   १,२३५  
कॅनडा   १,२०१,२००   १,१७१,५००   ३,४६५,५००   २,६९५,७००   २,८८५   २,८०१  
रशिया   ८१०,१३०   ७०९,९००   ८०६,५७०   ६५१,८४०   ९९५   ९१८  
इंडोनेशिया   ५८०,५३४   ४५९,११६   ७४७,६११   ५९२,६३४   १,२८७   १,२९०  
इटली   १७७,९०९   १३२,६०४   ५५१,२९२   ४४२,१५१   ३,०९८   ३,८३४  
दक्षिण अफ्रिका   २४०,५७०   १८३,०००   ४२४,०००   २०५,०००   १,७६२   १,१२०  
जपान   १४२,१००   १३८,३००   २२९,२००   २२६,७००   १,६१२   १,६३०  
थायलंड   १३७,६४०   १२८,८७२   २१४,७७३   २०३,९७३   १,५६०   १,५८२  
कोरिया   ९०,२४८   ७६,२६७   १५६,४०४   ११४,२४५   १,७३३   १,४९७  
ब्रह्मदेश (म्यानमार)   १२२,०००   १२३,०००   १२०,०००   १२२,०००   ९८३   ९९१  

(Ref. FAO 2009)