'सिद्धीविनायक' शेवग्यातील पथदर्शक (पायलट) प्रयोग !

श्री. संभाजी सखाराम सावंत,
मु.पो. आर्वी, ता. कोरेगाव, जि. सातारा,
मोबा. ९८८१२५०१५२



मी टेल्को (Telco) कंपनीत पुण्यामध्ये नोकरी करीत आहे. आमची आर्वी येथे वडीलोपार्जित शेती असून वडील व लहान भाऊ (९ वी शिक्षण) हे शेती करतात. यामध्ये ते कायम पारंपारिकतेने शेती करीत असल्याने शेती व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून खर्च वजा जाता फारसे हाती काही लागत नाही. या तळमळीतून आपणच काहीतरी नव - नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतीकडे लक्ष देऊन सुधारित प्रयोग करून शेती व्यवसायास उभारी देऊ अशा उद्देशाने माहिती घेऊ लागलो. यामध्ये मला डॉ. बावसकर तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. त्याचबरोबर मी सेंद्रिय शेतीचा सभासद झालो असून त्यातून होणाऱ्या मार्गदर्शन मिटींगमध्ये सहभागी होतो. तेथून ज्ञान जमा करत असतो.

डॉ.बावसकर सरांच्या मार्गदर्शनातून जून २०१० साली प्रथम 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवग्याची लागवड १।। एकर क्षेत्रात केली. जमीन मध्यम प्रतीची आहे. या जमिनीत झाडांना पुढे दक्षिणोत्तर सुर्यप्रकाश भरपूर मिळण्यासाठी जमिनीच्या लांबी किंवा रुंदीशी समांतर ओळी न करता तिरप्या ओळी आखल्या. दोन ओळींमध्ये १२ फुटाचे अंतर ठेवून ६ -६ फुटावर 'सिद्धीविनायक' शेवग्याचे रोप लावले. तिरप्या ओळींमुळे शेवग्याच्या झाडांमध्ये ३० चा कोन तयार झाला आहे. यामुळे सर्व झाडांना सुर्यप्रकाश मिळतो. तसेच शेवग्याची झाडे (फांद्या) नाजूक, ठिसूळ असतात, त्या या पद्धतीत झाडे एकाआड एक आल्याने वाऱ्याचा वेग कमी होतो, त्यामुळे फांद्या मोडण्याची शक्यता कमी होते.

या शेवग्याला वेळोवेळी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ऑफिसमध्ये संपर्क साधून छाटणी, कल्पतरू खताची मात्रा देणे, सप्तामृताची फवारणी करणे हे समजून घेऊन तसा शेतात अवलंब करून घेऊ लागलो.

यामध्ये मी प्रगतशील शेवगा बागायतदार श्री. वसंतराव काळे, हडपसर, पुणे हे गेले १५ वर्षापासून 'सिद्धीविनायक' शेवगा व त्यामध्ये विविध आंतरपिके यशस्वीरित्या घेत आहेत. तसेच अॅड. देवीदास खिलारे, फलटण यांचे 'सिद्धीविनायक' शेवगा प्लॉट पाहून तेथील आंतरपिकांचे यशस्वी प्रयोग पाहून आपल्या शेवग्याच्या प्लॉटमध्येदेखील असे प्रयोग करण्याचे ठरविले. यातून प्रेरणा घेऊन जून २०१२ मध्ये शेवग्यामध्ये वेस्टर्न ४४ भुईमूग लावला. मात्र दुष्काळी परिस्थितीने पिकाला पाणी कमी पडल्याने दाणे कमी भरले. तरी अत्यंत कमी पाण्यावर घरच्यापुरते भुईमूगाचे उत्पादन मिळाले. त्यानंतर ऑक्टोबरला थोडा कांदा व लसूण, हरभरा या पिकांच्या ओळी घरच्यासाठी केल्या, तसेच जनावरांसाठी वैरण म्हणून शाळू घेतला. तो देखील चांगला आला. शेवग्याचा जानेवारी ते एप्रिल २०१३ पर्यंत बहार मिळाला. शेंगांचे उत्पादन चांगले मिळाले मात्र विक्रीतील अडचर्णीमुळे थेट मार्केटला माल पाठवून दिला. त्यावेळी आमचे घरचे कोणीच मालासोबत नसल्याने दलाल १० - १२ रू./किलो भावाने पट्टी करत होते. एप्रिलनंतर शेवग्याचे उत्पादन कमी झाल्यावर मे २०१३ मध्ये छाटणी केली. मात्र त्यानंतर शेंगा लागण्यास बराच अवधी लागला. याचवेळी २०१३ च्या खरीपात शेवग्यात आंतरपीक कोणतेच घेतले गेले नाही. त्यामुळे या झाडांमुळे काहीसे दुर्लक्षच झाले. त्यानंतर मी थोडे लक्ष देऊन ऑक्टोबर मध्ये शेवग्याच्या दोन्ही ओळीमध्ये २ - २ फुटावर ८६०३२ वाणाच्या उसाची रोपे लावली. शेवग्याची झाडे दोन्ही बाजूने मातीची भर लावून गादी वाक्याप्रमाणे ३ फुट रुंदीच्या बांधावर घेतली आहेत आणि बाजूच्या सरीमध्ये स्प्रिंक्लरच्या पाईपने पाणी देताना छाटलेल्या शेवग्याच्या फांद्यामध्ये पाणी जाऊन त्याला कीड लागू नये म्हणून आडव्या पाईप वरची उभी दांडी व स्प्रिंक्लरची चकती काढून पोगरने पाणी जमिनीलगत देत आहे. दोन पोगरमधील अंतर १२ फूट असल्याने आणि जमिनीस तेवढ्याच प्रमाणात उतार असल्याने प्रत्येक पोगरमधून १२ - १२ फुटाची सरी ओली होते (भिजते). या पद्धतीने शेवग्याच्या बुंध्याला थेट पाणी न देता सरीमधून पाणी जाते. त्यामुळे शेवग्याचे खोड सडण्याची समस्या उद्भवत नाही. शेवग्याचे खोड सरीपासून थोडे अंतरावर असले तरी शेवग्याच्या मुळ्या तिथपर्यंत पोहचलेल्या आहेत आणि सरीच्या आतील बाजूला ऊस लावल्याने या सरीतील पाणी दोन्ही पिकांना एकाच वेळी मिळते. फक्त या सरीचे अंतर शेवग्यापासून थोडे जास्त तर उसाच्या थोडे जवळ असल्याने शेवग्याला गरजेपुरतेच पाणी मिळते व उसाला मात्र पुरेसे पाणी मिळते. यामुळे दोन्ही पिकांना एकाच वेळी पाणी देता येते. शिवाय कुठेही खोऱ्याने दारे देण्याची गरज भासत नाही. उसाला लागवडीनंतर जीवामृत, शेणाची स्लरी व जर्मिनेटर एकत्र करून दिले असल्याने २ महिन्यात ऊस गुडघ्याला लागत आहे. या स्लरीमध्ये जर्मिनेटर वापरल्याने फुटवे व वाढ भरपूर झाल्याचे जाणवते. याचा शेवग्याला देखील फायदा होत आहे.

या शेवग्याच्या बांधाने घायपात कंपाऊंडसाठी लावले आहे. यामध्ये गिरीपुष्पाचीही लागवड केली आहे, त्याचा पाला पडतो. त्यापासून आपोआप हिरवळीचे खत मिळते. गिरीपुष्पाच्या फुलांमुळे उंदरांचा वावर कमी होतो. उंदीर येत नाही, त्यामुळे उसाचे उंदरांपासून होणारे नुकसान टळते. असे नवनवीन प्रयोग करण्यावर माझा कायमच भर आहे, मात्र हे सर्व करत असताना मी पुण्यामध्ये नोकरी करून नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेऊन गावी वडील व भावाकडून तसा शेतात वापर, प्रयोग, अवलंब करून घेताना बऱ्याच अडचणी येतात. कारण मुळात घरच्यांना पुर्वीपासून चालत आलेली पारंपारिक शेती सुटत नाही. त्यांना आपण जे काही सांगू ते त्यांना लवकर अंगवळणी पडत नाही. त्यामुळे शेवगा छाटणी म्हणा, नाहीतर फवारणी, खते देणे हे वेळच्यावेळी त्यांच्या कडून होत नाही. त्यामुळे अजून फारसे समाधानकारक उत्पादन मिळत नाही. तरी मी खचून न जाता वेळोवेळी शेतातील खर्चासाठी मदत करून त्यांच्याकडून ते प्रयोग करून घेण्याच्या प्रयत्न करीत असतो. आता काही प्रमाणात सुधारणा होऊ लागली आहे. शेवग्यास यावेळी मे मध्ये छाटणी केल्यानंतर उशीरा नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये फुले लागली व आता जानेवारीत शेंगा दिसत आहेत. तेव्हा झालेल्या चुका पुन्हा होऊ नयेत म्हणून आज (दिन ८/१/१४) सरांचा सल्ला घेण्यास आलो आहे.