तिळाची यशस्वी लागवड

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


महत्त्व : थंडीच्या काळात आहारामध्ये तीळ असणे फार आवश्यक आहे. तिळाचे लाडू, तिळाच्या वड्या, तिळाचा हलवा हे पदार्थ संक्रांती सणामध्ये हमखास खाल्ले जातात. पुर्वीच्या काळी एक तीळ सात जणांनी खाल्ल्या अशी दंतकथा आहे. परंतु तिळाचे वजन ०.००१ किंवा २ मिलीग्रॅम असते. तथापि सर्व गोष्टी समप्रमाणात वाटून खाव्यात आणि त्याही कोणताही कलह न होता. असा संदेश मानाला संस्कृतीने देणे अभिप्रेत असावे, म्हणूनच संक्रांतीच्या दिवशी 'तिळगुळ घ्या गोड बोला' असे म्हणण्याची व मानण्याची प्रथा आजही बऱ्यापैकी टिकून आहे. पांढरी तीळ सरसकट खाल्ली जाते, तर काळ्या तिळास आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे.

आयुर्वेदिक महत्त्व : तिळाचे तेल प्यायल्याने अशक्त व्यक्तीचे वजन वाढते. भूक लागत नसल्यास दोन मुठीएवढे तीळ भाजून गुळाबरोबर सुपारीच्या आकराएवढे लाडू तयार करावेत व दिवसातून दोन लाडू सकाळ, संध्याकाळ असे तीन दिवस सलग खाल्लास भूक व्यवस्थित लागते किंवा तिळाच्या तेलाचा मसाज नियमित सर्वांगाला करावा.

ज्या स्त्रियांना बाळंतपणानंतर पुरेसे दूध येत नाही त्यांनी दोन चमचे तिळाचे तेल रोज सकाळी प्यावे. स्त्रियांना अंगावर विटाळ कमी जात असेल त्यांनी तीळ नियमित खावे किंवा तीळ तेल प्यावे. ज्या स्त्रियांना अंगावर खूप जाते त्यांनी तीळ गाईच्या तुपाबरोबर सेवन केल्यास फाजील आर्तव कमी होते.

रक्त मुळव्याध झाल्यास बरे होईपर्यंत एक चमचा तीळ जेवणानंतर दोनदा खावे.

मुळा व तीळ एकत्र करून खाल्ल्याने त्वचेखाली साठलेले पाणी शोषले जाते आणि सूज ओसरू लागते.

तिळाच्या तेलाचा मसाज केल्यास थकलेले स्नायू पूर्ववत काम देऊ लागतात. कोणतेच श्रम जाणवत नाहीत. मुळव्याधीवर सकाळ, संध्याकाळ बरे होईपर्यंत त्या जागेवर तिळाचे तेल लावल्यास मुळव्याध बरा होतो.

टीप : उष्ण प्रकृती, डोळ्यांची आग होणाऱ्यांनी, ज्यांना लघवीला त्रास होत असेल व संडासवाटे रक्त पडत असेल तर तीळ खाऊ नयेत.

लागवड : तिळाची पेरणी शेतामध्ये मुख्य पिकाच्या आडतासाला केली जाते, याचे कारण म्हणजे तिळाचा पाला ना शेळी - मेंढी, ना गाय, म्हैस, बैल खात, त्यामुळे मुख्य पिकाच्या संरक्षणाबरोबरच ह्या तिळापासूनही चांगले उत्पादन घेता येते. ५ - ६ वर्षापासून काही भागात सलग पिकही केले जाते, मात्र त्याचे प्रमाण कमी आहे. तिळासाठी जमीन नांगरलेली असावी. फुळवाची पाळी किंवा फणपाळी मारून जमीन तयार करवी. तिळाला पाणी कमी लागते. साधारणपणे जुनचा पाऊस पडला की, पेरणी केली जाते. मात्र नंतर जर पाऊस १ महिना पडला नाही तर पाण्याची पाळी द्वावी लागते. नंतर फुले लागतेवेळी पाण्याचा ताण बसू देऊ नये. कारण तिळाची फुले नाजूक, कोमल असल्याने लगेच गळून जातात.

तिळाचे खोड हिरवट पोपटी असते. पाने जाड असतात. खोडाच्या बेचक्यातून तिळाची कुडी बाहेर येते. त्यामुळे तीळ चांगले टचटचीत भरण्यासाठी तिळाचे खोड सशक्त असणे गरजेचे असते. या कालावधीत झिमझिम पाऊस, ढगाळ वातावरण असल्यास तिळाच्या खोडावर हिरवा व काळा मावा पडतो. त्याचा प्रादुर्भाव अधिक झाल्यास खोड पोचट, कमकुवत होते, परिणामी तीळ पोसत नाही याकरिता डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पुढे दिल्याप्रमाणे फवारण्या घ्याव्यात.

जाती :

१) फुले तीळ नं. १:९० ते ९५ दिवसात तयार होणारी जात असून नगर, नाशिक भागामध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. सरासरी एकरी उत्पादन २ ते २.५ क्विंटल मिळते.

२) डी ७-११-१ : ९० ते ९५ दिवसात तयार होणारी जात जात असून खानदेशात उपयुक्त अशी आहे. सरासरी एकरी उत्पादन १.५ ते २ क्विंटल मिळते.

३) नं. ८ व १२८ : १२० ते १२५ दिवसात तयार होणाऱ्या 'गरव्या' प्रकारातील जाती असून विदर्भ, मराठवाड्यामध्ये उपयुक्त आहेत. या जातीचे सारासरी उत्पादन एकरी सव्वा ते १.५ क्विंटल मिळते.

४) जळगाव : खानदेशामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचलित झालेली सुधारित जात असून या जातीचे एकरी उत्पादन ६ ते ७ क्विंटल आल्याची नोंद आहे.

बीजप्रक्रिया : एकरी २ ते ३ किलो बी पुरेसे होते. बियाण्यास जर्मिनेटची बीजप्रक्रिया करावी, म्हणजे बी ८ - १० दिवसात चांगले उगवून येते. जर्मिनेटरच्या द्रावणामध्ये (२५ मिली जर्मिनेटर + १ लि. पाणी) १ ते २ तास बी भिजवून, सावलीत सुकवून लावल्यास बीजजन्य रोग होत नाही. आभाळ आल्यास उबळ होते तो होत नाही. शक्यतो बी वाळू मिसळून पेरावे. पेरताना बी नेहमी दाटच होते, कारण मुठीतून बी सटकते, बी पेरतान बोटावर तीळ येते. तेव्हा ६'' अंतरावर विरळणी करावी. बांधावर पेरल्यास विरळणी करण्याची गरज नाही. खुरपणी अवघड असते. कारण तिळाचे दांडे थोडे नाजूक असल्याने काळजीपुर्वक खुरपणी करावी. दोन तासातील अंतर १।। फूट ठेवावे. ९ ते १२'' अंतर झाल्यास खुरपणीस त्रास होतो. गवत काढताना बायांच्या हालचालीमुळे पिकाचे नुकसान होते, दांडे तुटतात. वितभर पीक झाल्यानंतर खुरपणी करावी.

खते : खुरपणी झाल्यानंतर एकरी १०० किलो कल्पतरू सेंद्रिय खत टाकावे. ४० ते ४५ दिवसात बी फुलोऱ्यात येते. फुले जांभळ्या रंगाची असतात.

कीड व रोग: तिळाचे बी सहसा कीड व रोगाला बळी पडत नाही. कीड व रोगाला बळी पडणाऱ्या पिकाऐवाजी उदा. भुईमुगासारख्या पिकाखालील क्षेत्र वाढत आहे, परंतु अधिक उत्पादन देणाऱ्या जाती निर्माण होणे गरजेचे आहे. ज्यावेळेस कुड्यात तीळ भरले जाते (Dough Stage) (दुधाळ अवस्थेत) म्हणजे साधारणपणे ६० ते ७५ दिवसाचे पीक असताना पाऊस झाल्यास तीळ काळे पडते. असा तीळ बदला म्हणून विकले जाते. भाव कमी मिळतो.

पीक संरक्षण : फुलातील अळी, मर, पाने कुरतडणारी अळी, उबळ तसेच पावसाचा ताण सहन करण्यासाठी आभाळ असल्यास होणारी फुलगळ टाळण्यासाठी व अधिक उत्पादन घेण्यासाठी सप्तामृताच्या खालीलप्रमाणे फवारण्या कराव्यात.

१) पहिली फवारणी : (उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + हार्मोनी १०० मिली + स्प्लेंडर १०० मिली + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (उगवणीनंतर २० ते ३० दिवसांनी) : थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली.+ न्युट्राटोन २५० मिली + हार्मोनी १५० मिली + स्प्लेंडर १५० मिली+ १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (उगवणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी ) : थ्राईवर ७५० मिली + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी ३०० मिली + स्प्लेंडर ३०० मिली + २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : (उगवणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली. ते १ लि. + प्रोटेक्टंट ७५० मिली. + न्युट्राटोन ७५० मिली. + २०० लि. पाणी.

काढणी : हळवी तीळ ७० ते ८० दिवसात काढणीस तयार होते, तर गरवी तीळ ९० ते १२० दिवसात तयार होते. तीळ तयार झाल्यानंतर पाने पिवळी पडतात. कुड्या करड्या रंगाच्या होऊन तोंडे उमलतात. आभाळ आल्यानंतर तीळ काढू नये. तीळ काढून बांधून उभ्या/तिरप्या रचून कोप्या करून तोंडे उघडतात २ - ४ दिवसांत वाळल्यानंतर कुड्याची तोंडे उमलल्यानंतर काढून कापडावर अंथरले जातात व हुलवणी केले जाते. यामध्ये एका हाताने पेंढ्या उलट्या करून हलविल्या की तीळ पडले जाते. पेंढ्या हुलविण्याची क्रिया अतिशय काळजीपुर्वक केली जाते. सक्रांतीमुळे तिळाचे महत्त्व सर्व सामान्यांना माहित आहे. त्यामुळे बऱ्यापैकी भाव मिळतो.

उत्पादन : हळवी जातीचे सरसरी एकरी १।। ते २ क्विंटल उत्पादन मिळते तर गरव्या जातीचे एकरी ५ ते ६ क्विंटल उत्पादन मिळते. तिळासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर केल्यास उत्पादनात हमखास वाढ होते.

प्रक्रिया उद्योग : तिळामध्ये Linoleic Acid असते. हृदयरोगासाठी तिळाचे तेल उपयुक्त आहे. वयाच्या ४० शी नंतर जो सांधेदुखी, अंगदुखी, शीरदुखीचा त्रास होतो, त्याकरिता तिळातेलाचा सर्वांगाला मसाला उपयुक्त आहे. तेलाचे प्रमाण ५०% तर ५० % पेंड निघते. घाणीवर संपुर्ण तेल निघत नाही. म्हणून Solvent Extraction Method ने तिळाचे तेल काढावे. चॉकलेट सारखे तत्सम, गोड पदार्थ बनविण्यामध्ये Feed Additives म्हणून याचा वापर केला जातो. तिळाची पेंड अतिशय पौष्टिक आहे. तिळाचे तेल काढून जी पेंड तयार होते तिचा Feed Additives म्हणून मोठा वाटा आहे व याला जगभर मागणी आहे. परदेशामध्ये या पेंडीपासून बिस्कीटे बनविली जातात. तिळाच्या तेलामुळे केस गळण्याचे थांबते. सुरूवातीपासून तिळाचे तेल केसांना लावल्यास अकाली पांढरे केस होत नाहीत. खोबऱ्याचे तेल तिळाच्या तेलापेक्षा महाग असल्याने प्रक्रिया उद्योगामध्ये तीळ तेलास मागणी आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तिळाचे अधिक व दर्जेदार उत्पादन घ्यावे व खेडोपाडी पक्रिया उद्योग कसे उभारता येतील याकडे लक्ष द्यावे.