बांधावरील 'सिद्धीविनायक' ५० झाडांपासून पहिल्याच वर्षी ५० हजार
श्री. विजय दत्तात्रय पांडे,
मु.पो. भोकरदन, जि. जालना,
मो. नं. ९०२८९६०८१८
माझी भोकरदन येथे शेती आहे. मी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, सिल्लोड येथे नोकरी
करीत असल्याने शेती करण्यास जास्त वेळ मिळत नाही. तरीदेखील शेतीत काहीतरी नवीन करत
राहतो. डिसेंबर २०१३ मध्ये पुण्याला किसान प्रदर्शन पाहण्यास आलो होतो. तेव्हा डॉ.बावसकर
टेक्नॉंलॉजीच्या स्टोलवरून तंत्रज्ञान व 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवग्याबद्दल माहिती
घेतली. तेथून शेवगा बियांचे १ पाकिट आणि शेवगा माहिती पुस्तक घेऊन गेलो. त्याची जून
(२०१४) मध्ये प्रयोग म्हणून बांधाने १० - १० फुटावर लागवड केली. पुस्तकात दिल्याप्रमाणे
झाडांची २।। फुट उंची असताना शेंडा छाटणी केली. त्यामुळे फुटवे चांगले (प्रत्येक झाडास
७ - ८ फुटवे) फुटले हे फार महत्त्वाचे आहे. हा शेवगा जानेवारी २०१५ मध्ये चालू झाला.
तर आठवड्याला ५० झाडांपासून ४० - ५० किलो शेंगा मिळत होत्या. शेंग मध्यम जाडीची १।।
ते २ फुट लांबीची, मासाळू, गरयुक्त, हिरवीगार असल्याने लोकल मार्केटला १० ते १५ रू.
पावशेर म्हणजे ४० - ५० रू. किलो भाव मिळत होता. या बांधावरील ५० झाडांपासून आतापर्यंत
५० -६० हजार रू. उत्पन्न कमी कष्टात, कमी खर्चात खात्रीशीर उत्पादन व हमी भाव मिळणारे
हे पीक असल्याचे लक्षात आले, त्यामुळे चालूवर्षी शेतात लागवड करण्याचे ठरविले आणि जून
२०१५ मध्ये एकूण ८३० झाडांची ८' x ८' वर लागवड केली आहे. याचेदेखील छाटणी तंत्रज्ञान
योग्यप्रकारे अवलंबल्यामुळे हा शेवगा सध्या ६ महिन्याचा असून लहान - लहान शेंगा लागल्या
आहेत. तो आता महिन्याभरात चालू होईल.