चाफा बोलेना, चाफा हालेना, डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने त्याचा सुगंध दरवळलाना !

श्री. संतोष पांडूरंग मुजुमले,
मु.पो. कोंढणपूर, ता. हवेली, जि. पुणे,
मो. ९८५०६६५१८८


पिवळ्या चाफ्याची २४० कलमे १५० रु. ने कोकणातून आणून जून २०१० मध्ये लावली. जमीन मुरमाड आहे. पिवळा चाफा खडकाळ, लालसर, मुरमाड रानात चांगला येतो. काळ्या रानात झाड नुसते माजते. पाने मोठी, पोपटी होतात. काडी जाड, रसाळ, फोकीसारखी दिसते. त्यामुळे १० ते ४०% पर्यंत फुले कमी लागतात. पानातून गाळून येणारे ऊन फुलांना चांगले मानवते. थेट आलेल्या उन्हाने फुल तंबाखूच्या रंगाचे (करपल्यासारखे) होते. पावसाळ्यात कीड व बुरशीला बळी पडते. राखाडी रंगाचा कोळी हा फुलांतील पुंकेशर खातो. तसेच गोगलगाईचा त्रास या पिकास आमच्या भागात जाणवतो. तेव्हा सरांनी सांगितले, "याला झाडाच्या भोवताली ३ फुटाच्या गोल आळ्यात भोवताली फक्किचा चुना टाकावा. शक्यतो तो भिजू देऊ नये. गोगलगाई त्यावरून जाते तेव्हा चुन्याची आग गोगलगाईला खालच्या बाजुने लागून ती मरते. त्यामुळे गोगलगाई झाडाकडे येत नाहीत. एरवी गोगलगाईचे प्रमाण वाढल्यास गोगलगाई झाडावर चढून नवीन फूट जी कोवळी. हिरवी साल असलेली तसेच कोवळी पाने देखील खाते, कोवळी फुट ही मऊ कलकत्ता पानासारखी असते. तिच्यावर ही गोगलगाई तुटून पडते."

सरांनी सांगितले, "पिवळ्या चाफ्याचा सुगंध हा मंद, शांत, अल्हाददायक, प्रसन्न असतो. या फुलाच्या सुगंधाने डोळ्यावर ताण आला असेल तर तो दूर होतो, हळुवार सुगंध घेतला तर माणसाचा थकवा आळस जाऊन मन:शांती होते, चांगले विचार येतात. हे फुल लक्ष्मी, रामाला, गणपती, साईबाबा, बहुतेक हिंदू धर्मातील तसेच मुस्लीम समाजातील धार्मिक कार्यात आवडीने वापरले जाते. म्हणजे या फुलाला धर्म, जात, देश अशी बंधने नाहीत. म्हणून याचे स्थान अतिशय असामान्य आहे."

एका झाडावरून दररोज ८ ते १० फुले येतात. तेव्हा सरांनी सांगितले, डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने २५ ते ५० फुले मिळतील. पुण्यात गणपतीत २ रुपयाला हे फुल जाते. एरवी १ रु. ला जाते. प्लॅस्टीक पिशवीत १० फुले भरून पेकिंग केले जाते. पिशवीला होल पाडू नये. यामध्ये २ दिवस फुल टिकून राहते. दुबईला १० ते २० रुपयाला एक फुल जाऊ शकतो. सार्क राष्ट्रात भरपूर मागणी आहे. परंतु आपल्याच येथे भरपूर मागणी असल्याने येथे विकणेही परवडते. मुंबईला किरकोळ १ फुल ५ रुपयाला जाते.

रातराणीचा सुगंध मंद दरवळतो. जसजसा दुरवर पसरतो, तसा नाग हमखास येतो. म्हणून सरांनी सांगितले, "रातराणी ही घराजवळ लावू नये. सोनचाफ्यात झेंडू, लसूण, सेविल घेवडा याचे आंतरपीक घ्यावे. गवारीवर भुरी येते म्हणून ते घेऊ नये. कोथिंबीर, मेथी, पालक करावे. बांधाने शेवगा, सिताफळ कढीपत्ता लावावा."