चारसूत्री भाताची लागवड अधिक फायदेशीर

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


पश्चिम महाराष्ट्र, कोकण हा भातशेतीचा भाग आहे. अतिशय डोंगराळ, उताराचा भाग, भरपूर पाऊस पण नंतर पाण्याची कमतरता अशा भागातील शेतकऱ्यांची भातशेती विचारात घेतली तर ती अतिशय छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागलेली आहे. त्यात १ ते २ एकरपर्यंतचे भातशेतीचे शेतकऱ्यांचे वर्षभराच्या शेतीमधले भाताचे उत्पादन विचारात घेतल्यास ही भातशेती न परवडणारी आहे. शेतकऱ्यांना वर्षभर पुरेल एवढासुद्धा तांदुळ त्यातून मिळत नाही. फक्त जनावरांसाठी चारा म्हणून ही भातशेती शेतकरी करतो, असेच म्हणावे लागेल. खेड्यातील ८० % शेतकरी हे छोटे शेतकरी असतात. १ ते २ एकरातून भात अधिक फायदेशीर व्हावा, अधिकाअधिक उत्पादन मिळावे व उत्पादन खर्चात बचत व्हावी. यासाठी चारसूत्री भात लागवड शेतकऱ्यांना एक वरदानच आहे.

चारसूत्री भात लागवडीची चारसुत्रे खालीलप्रमाणे

१) पहिले सूत्र : पहिल्या सुत्रानुसार भाताची रोपे तयार करताना रोपांना सिलीकॉनचा पुरवठा करणे. यासाठी भाताचा तूस जाळून शिल्लक राहिलेली राख वापरतात. ही राख शेतकरी स्वत:च घरी तयार करो शकतात. साधरणपणे १ चौ. मीटरला १/२ ते १ किलो राख वापरतात. यातून रोपांना सिलीकॉनचा वापर होऊन पुढे खोडकिडा, करपा, भात गळणे, लोळणे यासारख्या रोगांना प्रतिकार करण्याची शक्ती वाढते. रोपांना मुळे फुटणे, कणखरपणा प्राप्त होऊन रोपांना फुटवे भरपूर येतात. रोपे उपटताना मुळे तुटत नाहीत व रोपे अलगद उपटली जातात.

२) दुसरे सूत्र : चिखलणीच्या वेळी हिरवळीच्या खताचा उपयोग करणे, यामध्ये गिरीपुष्प झाडाचा पाला शेतात गाडला जातो. गिरीपुष्प झाडाच्या पानांमध्ये नत्राचे प्रमाण भरपूर असते. पावसाळ्यात या झाडाला भरपूर पाला येतो. फक्त तो तोडून शेतात पसरवला गेला व दोन दिवसांनी मोठ्या फांद्या शेतातून काढून शेताची चिखलणी केल्यास तो शेतात गाडला जातो. यामुळे शेतीचा पोट सुधारला जातो व खताच्या खर्चात निम्म्याने बचत होते. याशिवाय, ताग, धैंचा यासारख्या हिरवळीच्या खतांचा उपयोग केला तरी चालतो. परंतु गिरीपुष्पाची झाडे शेताच्या बांधावर लावून व लावणीच्या वेळी त्याची कापणी करून खतासाठी त्याचा उपयोग करता येतो. कोकणात या झाडाला 'उंदीरमारी' म्हणूनही ओळखले जाते. तर इंग्रजीमध्ये या झाडाला 'ग्लरिसिडीया' असे म्हणतात.

३) तिसरे सूत्र : नियंत्रित रोपाची लागवड म्हणजे दोरीवर १५ x २५ सें. मी. अंतरावर लागवड करणे या लागवडीतून एकाच वेळी २ ओळींची लागवड करून चौरस तयार होतात व दोन ओळीतून चालण्याचा रस्ता तयार होतो. अशी नियंत्रित लागवड केल्यास शेतात हवा खेळती राहते. रोगराई नियंत्रित राहते. शेतातील तण काढणे सोपे जाते. यासाठी १५ x २५ सें.मी. मापाची दोरी तयार करावी किंवा बांबूचाही वापर करता येतो. दोरीच्या दोन्ही टोकांना छोटा बांबूचा वापर करून चिखलात रोवता येतो.

४) चौथे सूत्र : युरिया ब्रिकेट (गोळी) चा वापर करणे. नियमित लागवड पद्धतीत चार चुडांचा रुमाल तयार होतो. या चौकोनात १ ब्रिकेट २ ते ३ इंच खोल चिखलात रोवणे. ही ब्रिकेट युरिया व डीएपी खतापासून तयार केली जाते. भात लागवड झाल्यानंतर लगेच किंवा दुसऱ्या दिवशी ब्रिकेट लावणे गरजेचे असते. म्हणजे ती चिखलात रोवणे सोपे जाते.

या चारसूत्रापैकी काही शेतकरी फक्त दोन सूत्राचा वापर करतात तरी दुप्पट उत्पादन घेतात.

१) नियमित लागवड व

२) ब्रिकेटचा वापर शेतकरी करतात व दोन सूत्रे

१) सिलिकॉनयुक्त खताचा वापर व

२) गिरीपुष्प किंवा हिरवळीचा खतांचा वापर शेतकरी बहुतांशी करत नाही

चारसूत्री भात लागवड करून भात उत्पादन दुप्पट होत नसेल तर शेतकऱ्यांच्या काही गोष्टी राहून गेलेल्या असतात.

१) तुसाच्या राखेचा वापर रोपवाटिकेत न होणे.

२) बियाणे मर्यादित घेऊन पेरणी योग्य पद्धतीने रोपवाटिका तयार न करणे

३) गिरीपुष्पाचा पाला, हिरवळीचे खत न वापरणे.

४) नियंत्रित मापाच्या दोरीत मापे कमी जास्त होणे. लागवड पद्धत एकेरी ओळीत होते. त्यामुळे रुमाली पद्धतीने होत नाही व ब्रिकेट दूरवर गाडली जाते. ती चुडांना उपलब्ध होत नाही.

५) ब्रिकेट लावताना काही ठिकाणी ब्रिकेट लावणे चुकवले जाते. त्यामुळे पीक एकसारखे न येता कमी - जास्त उंचीचे होते.

६) ब्रिकेट लावण्याला लागवडीपासून जास्त दिवस लावणे. लागवड होऊन ८ - १५ दिवसांनी ब्रिकेट लावल्यास ती चिखलात खोलवर रुतली जात नाही व तिचे छिद्र उघडे राहून पाण्याबरोबर खत वाहून जाते.

७) ब्रिकेट लावताना कमरेत पिशवी बांधून एका हाताने ब्रिकेट घ्यावी व दुसऱ्या हाताने ती रोपांना लावावी. परंतु शेतकरी ओल्या हाताने ब्रिकेट घेतात व ती रोपांना लावतात. त्यामुळे ब्रिकेट ओल्या होऊन ब्रिकेटचे पाणी होऊन त्या छोट्या होतात. ब्रिकेट ओल्या होणार नाही याची काळजी घेतली जात नाही.

बऱ्याच शेतकऱ्यांनी समस्यामध्ये असते, की यासाठी दोरीवर लागवड करावी लागते. त्यामुळे या पद्धतीच्या लागवडीस फार उशीर लागत असेल. परंतु पारंपारिक लागवडी एवढाच दोरीवर लागवड करण्यास वेळ लागतो. कारण एकाचा वेळी २ ओळींची लागवड केली जाते. तसेच एकदा हातवळणी पडल्यावर अगदी जलद गतीने लागवड करता येते. ब्रिकेट लावण्यासाठीही जास्त वेळ व मजुरी लागत नाही. फार तर पारंपारिक लागवडीपेक्षा २ मजुरांचा खर्च वाढतो ब्रिकेट लावताना १ मजूर ३ ओळींना ब्रिकेट लावतो व पुन्हा येताना ३ ओळी घेतो. त्यामुळे ब्रिकेट लावणे सोपे झाले आहे.

चारसूत्री लागवडीमध्ये पहिल्या सूत्राचा वापर शेतकरी करताना आढळत नाहीत. तेव्हा तुसाच्या राखेपासून 'भातुरा' हे खात शेतकऱ्यांनी तयार करून त्याचा वापर केला असता त्याचा फायदा होतो.

नियंत्रीत लागवड करण्यासाठी नयलॉन दोरी व ट्रोचा वापर करता येतो व तो २ - ३ वर्षे वापरता येतो. गिरीपुष्पाच्या पाल्याचा खत म्हणून वापर करण्यासाठी गिरीपुष्पाची पाला उपलब्ध होऊन त्याचा वापर करून खतांच्या मात्रेत व खर्चात बचत होते.