मूग व उडीद पिकांवरील महत्त्वाच्या किडी व त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन

श्री. एस. टी. शिंदे,
डॉ. बी. बी. भोसले व श्री. बी. व्ही. भेदे - कीटकशास्त्र विभाग, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी



खरीप हंगामात तूर या मुख्य कडधान्यप्रमाणेच मूग व उडीद ही कडधान्य घेतली जातात. या पिकांवर येणाऱ्या किड नियंत्रणाच्या दृष्टीने विचार केला जात नाही. त्यामुळे या पिकाच्या उत्पादनात घट येते. पीक लहान असताना मावा, फुलकिडे, तुडतुडे हिरवी उंट अळी आणि पाने खाणारी स्पिंजिड अळी या किडीमुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादनात घट येते.

१) फुलकिडे :फुलकिडे फुलांमध्ये आढळतात. त्यामुळे उमलण्यापुवींच उडीद, मुगाची फुले गळून पडतात. फुल किडग्रस्त झाडांची वाढ खुंटते. पावसाची उघडीप पडली की या किडीचा प्रादुर्भाव वाढता.

२) मावा : मावा ही बहुभक्षी कीड असून पानाच्या मागीला भागावर राहून पानातील रस शोषण करतात, त्यामुळे पाने आकसतात, झाडांचा जोम कमी होऊन वाढ खुंटते. तसेच बऱ्याचवेळी त्याचा प्रादुर्भाव कोवळ्या शेंड्यावर व शेंगांवर देखील आढळून येतो. त्यामुळे दाण्याची वाढ होत नाही व उत्पादनावर विपरीत परिणाम होता.

३) तुडतुडे : प्रौढ तुडतुडे व त्याची पिल्ले पानाच्या पेशीतील रस शोषण करतात. त्याचवेळी त्यांच्या शरीरातील विषारी द्रव पानाच्या पेशीत सोडतात. परिणामत: पाने फिकट पिवळी पडून आकसतात व तांबडी पडून वाळून जातात.

४) पांढरी माशी : पिल्ले व प्रौढ पांढरी माशी पानातील रस शोषण करीत असल्याने झाडांचा जोम कमी होतो. ही कीड शरीरावाटे पानांवर चिकटगाडे पदार्थ उत्सर्जित करते. त्यावर काळ्या बुरशीची वाढ होऊन प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते व वाढ खुंटते. मूगामध्ये पांढरी माशी येलो मोझॅक व्हायरस (Y.M.V.) या रोगाचा प्रसार करतात.

५) कोळी : प्रौढ कोळी व पिल्ले लाल रंगाची असून ती पानातील रस शोषण करतात, त्यामुळे पाने व फुले सुकतात. पाने खालील बाजूस वळून आकसतात.

६) पाने खाणारी स्पिंजिड अळी : या किडीचा पतंग मोठा, गर्द, करड्या रंगाचा असून त्याच्या छातीचा भाग निळसर असतो. पुर्ण वाढ झालेली अळी ३.५ ते ४ सेमी लांब असून तिच्या शेपटावर काटा असतो. अळ्या मुग/ उडीदाची पाने अघाशीपणे कुरतडून खातात त्यामुळे झाडे पर्णहिन होऊन बऱ्याचवेळी पिकाचे अतोनात नुकासान होते.

७) लाल केसाळ अळी : पुर्ण वाढ झालेली केसाळ अळी २.५ ते ३ सेमी लांब असून तिच्या शरीरावर लांब लांब केसांचे अनेक झुपके असतात. लहान - लहान अळ्या झाडांचे कोवळे शेंडे खातात तर पुर्ण वाढ झालेल्या अळ्या संपूर्ण झाडाची पाने खाऊन फस्त करतात. ही कीड शेतामागून शेत फस्त करीत इतस्तत: फिरत असते.

८) हिरवी उंट अळी : किडीचा पतंग मध्यम आकाराचा फिक्कट पिवळसर रंगाचा असतो. तर अळ्यांचा रंग हिरवट असून पूर्ण वाढ झालेली अळी २ ते २.५ सेमी लांब असते. अळ्या पानांचा हिराव भाग खाऊन फक्त शिराच शिल्लक राहतात परिणामी झाडांची वाढ खुंटत.

किडींचे व्यवस्थापन :

१) पीक काढणीनंतर खोल नांगरट करावी, म्हणजे किंडीच्या अवस्था उघड्या पडून नष्ट होतील.

२) पिकांचे अवशेष / घसकटे गोळा करून नष्ट करावेत म्हणजे किडीच्या सुप्तअवस्था इ. चा नायनाट होईल .

३) आजूबाजूच्या बांधावरील द्विदलवर्गीय तणांचा नाश करावा म्हणजे मुख्य पीक नसतांना किडीच्या अवस्था यांचे जीवनचक्र नष्ट होईल.

४) शिफारस केलेल्या अंतरावरच लागवड करावी म्हणजे आंतरमशागत तसेच किडीचे नियंत्रण करणे सोईल होते.

५) मूग उडीदाच्या चार ओळीनंतर एक ओळ ज्वारीची पेरणी करावी. जेणेकरून त्याचा पक्षीथांबे म्हणून उपयोग होईल. तसेच किडींचा प्रसार होण्यास अटकाव होईल.

कीड   किटकनाशक   मात्रा/१० लि. पाणी  
मावा, पाने खाणारी अळी व स्पिंजीड अळी   मिथिल पॅराथिऑन २ टक्के भुकटी   २० किलो/हे  
मावा, फुलकिडे   डायमेथोएट ३० टक्के प्रवाही किंवा १० मिली
थायोमेटॉंन २५ टक्के प्रवाही   ८ मिली  


अशाप्रकारे मुग व उडीदावरील किडींची ओळख करून योग्य पद्धतीने एकात्मिक कीड व्यवस्थापन करून भरघोस उत्पादन घ्यावे.