सोयाबीन पिकावरील महत्त्वाच्या किडी व त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन

श्री. एस. टी. शिंदे, डॉ. बी. बी. भोसले व श्री. बी. व्ही. भेदे
कीटकशास्त्र विभाग, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी


सोयाबीन पिकावर गेल्या काही वर्षांत किडींच प्रादुर्भाव आढळून येत आहे. सोयाबीन या पिकावर प्रामुख्याने तंबाखूवरील पाने खाणारी अळी, उंट अळ्या, खोड माशी, चक्री भूंगा, पाने गुंडाळणारी अळी या किडींचा पादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येतो व फार मोठे आर्थिक नुकसान होवू शकते. यासाठी किडींची ओळख, नुकसानीचा प्रकार व व्यवस्थापनाविषयी माहिती असणे आवश्यक आहे. किडींचा 'उद्रेक होण्याची नेमकी कारणे शोधली असता असे निष्कर्ष मिळाले, की गतकाळत पीक व्यवस्थापन, तसेच कीड नियंत्रण करताना काही त्रुटी राहिल्या. एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धत वापरल्यास उत्पादनखर्चात कपात तर होईलच, शिवाय प्रभावी कीड व्यवस्थापन व्यवस्थापनसुद्धा मिळेल.

१) खोड माशी: प्रौढ माश्या लहान, चमकदार काळ्या रंगाच्या असून त्यांची लांबी २ मिमी असते, तिचा रंग चमकदार काळा असतो. फक्त पाय, स्पर्शिका व पंखांच्या शिरा फिकट तपकिरी असतात. अंडी पांढरी, अंडाकृती असतात, अळी पिवळी, तोंडाच्या बाजूने टोकदार व मागची बाजू गोलाकार असते. मादी नरापेक्षा किंचीत मोठी असते. अंड्यातून निघालेल्या अळ्या पाने पोखरून पानांच्या शिरा आणि मुख्य शिरांमधून फांदीत अथवा खोडात शिरतात व आतील भाग खातात. त्यामुळे नागमोडी पोकळ्या तयार होतात. पूर्ण वाढ झालेली अळी फांदीला अथवा खोडाला माशीला बाहेर पडण्यासाठी छिद्र तयार करते. अशा नुकसानीमुळे लहान रोपे झुकतात. तसेच पाने व फांद्या सुकू लागतात. मादी माशी सोयाबीनच्या मुख्यत: वरच्या बाजूच्या पानामध्ये अंडी घालते. अंड्यातून २ ते ४ दिवसांनी अळी बाहेर पडते. अळीच्या तीन अवस्था असतात. ६ ते १२ दिवसांनी अळीची पूर्णवाढ होते व खोडामध्ये कोषावस्थेत जाते. ५ ते १९ दिवसांनी पौढ माशी बाहेर पडते. अशाप्रकारे खोडमाशीचे वर्षभरात ८ ते ९ जीवनक्रम पुर्ण होतात. अंड्यातून अळी निघाल्यानंतर बीजदल पोखरते. सुरुवातीला अळी पोखरत वरच्या बाजूला व नंतर खालच्या बाजूला जाते. अशाप्रकारे अळी आतील भाग खात जमिनीपर्यंत पोहचते व कोषामध्ये जाते. झाड मोठे झाल्यानंतर वरून या किडीचा प्रादुर्भाव जाणवत नाही. फक्त जमिनीजवळ खोडामधून प्रौढ माशी निघाल्यास खोडाला छिद्र दिसते. यामुळे झाडाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. फुले व शेंगा कमी लागतात. शेंगामध्ये दाणे लहान व सुरकुतलेले असतात. खोडमाशीचा प्रादुर्भाव रोपावस्थेमध्ये झाल्यावर पूर्ण झाड वळून जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

२) उंट अळी : सोयाबीनवर विविध प्रकारच्या उंट अळ्या आढळून येतात. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने क्रायसोडेक्सीस अक्यूटा, थायसॅनोप्लूसोया ओरिसाल्सीचा, जूसुनिया प्रजाती व अकाया जनाटा या प्रजातीच्या उंटअळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. अळ्या हिरव्या व करड्या रंगाच्या असून त्या पाठीवर बाक काढून चालतात. या अळ्या सुरुवातीला पानाचा खालचा हिरवा भाग खरवडून काढतात.

३) शेंगा पोखरणारी अळी : ही कपाशीवरील अमेरिकन बोंडअळी म्हणून सुद्धा ओळखली जाते. घाटेअळीचा पतंग मजबूत बांध्याच्या फिकट पिवळा किंवा बदामी रंगाचा असतो. समोरच्या पंखांवर मध्यभागी एक एक काळा ठिपका असतो व कडेच्या बाजूला गडद पट्टा असतो. मादी पतंग कोवळ्या पानांवर अंडी घालते. अंडी घुमटाच्या आकाराची पिवळसर असतात. अंड्यातून अळी निघण्याअगोदर ती काळी पडतात. ३ ते ४ दिवसांनी अळी बाहेर पडते. पहिल्यांदा ती अंड्याचे कवच खाते. मगच पाने खाते. पहिल्या अवस्थेतील अळी फिक्कट हिरवी असते व मोठी अळी हिरवट फिक्कट पिवळसर, तपकिरी किंवा काळी असते. अळीच्या शरीरावर दोन्ही कडांना तुटक तुटक गर्द करड्या रेषा असतात. तसेच अळीच्या शरीरावर थोडे केस असतात. अळी सुरुवातीला पाने खाते. कळ्या, फुले व शेंगा लागल्यानंतर ही अळी त्यांना नुकसान पोचाविते. अळीने प्रादुर्भावग्रस्त कळ्या, फुले व कोवळ्या शेंगा खाली जमिनीवर पडतात. मोठ्या शेंगांना अळी गोल छिद्रे पाडून आतील दाणे खाते. २० ते २४ दिवसांनी कोषातून पतंग बाहेर पडतो. एक जीवनक्रम ३१ ते ३५ दिवसांमध्ये पूर्ण होतो.

४) स्पोडोप्टेरा : स्पोडोप्टेराचे पतंग मजबूत बांध्याचे आणि मध्यम आकाराचे असून, त्यांचे पुढील पंख फिक्कट करडे ते गर्द तांबूस रंगाचे असतात. त्यावर ठिपके असतात. कोवळ्या पानांखाली मुख्य शिरेजवळ पतंग गोलाकार पुंजक्याने १०० ते ४०० अंडी घालून ती भुरकट केसांनी आच्छादून घेतात. अंडी ३ ते ८ दिवसांत उबतात. अळी अवस्था २० ते ३० दिवसांची असते. ५ वेळा कात टाकून पूर्ण वाढल्यानंतरच अळ्या जमिनीवर पडलेल्या पालापाचोळयात किंवा मातीमध्ये कोषावस्थेत जातात. ७ ते १५ दिवसांनी त्यातून पतंग बाहेर पडतात. अशाप्रकारे या किडींचा जीवनक्रम ५० ते ६० दिवसांत पूर्ण होतो. अळ्या लहान असताना एकत्रितपणे पानांच्या खालच्या बाजूने हरितद्रव्य खातात. त्यामुळे पानांच्या शिरा तेवढ्या दिसतात. मोठ्या झाल्यावर अळ्या वेगवेगळ्या होतात आणि पानांना लहान - मोठ्या आकाराची छिद्रे पाडतात. तसेच सोयाबीनच्या कळ्या, फुले, कोवळ्या शेंगा, शेंड्यांचा फडशा पाडून पिकाचे अतिशय नुकसान करतात. ही कीड अत्यंत खादाड आहे. त्यामुळे किडींच्या संख्येत झालेली थोडीशी वाढही प्रचंड नुकसानीला कारणीभूत बनते.

५) चक्री भुंगा : चक्री भुंग्याच्या प्रादुर्भावामुळे ३५ टक्क्यापर्यंत नुकसान होते. सोयाबीनशिवाय मूग, उडीद, चवळी, तूर, भुईमूग, मिरची, कारली इ. पिकांवर चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव होतो. या किडीचा प्रौढ भुंगा फिक्कट तपकिरी रंगाचा असतो. त्याचे समोरचे पंख खालच्या बाजूने एक तृतीयांश ते अर्धा भाग काळ्या रंगाचे असतात. मादी भुंगा पानाचे देठ. खोड यावर दोन खापा करून त्यामध्ये अंडी घालते. पहील्यांदा खालची खाप व नंतर वरची खाप करते. यानंतर दोन्ही खापेच्यामध्ये खालच्या खापेजवळ तीन छिद्र करते. मध्य भागाच्या छिद्रामधून आत अंडी घालते. अशाप्रकारे एक मादी एका जागी एक अशी जवळपास ७८ अंडी घालते. अंडी फिक्कट पिवळसर व लांबट आकाराची असतात. अंड्यातून ३ ते ४ दिवसांनी अळी बाहेर पडते. लहान अळी पांढऱ्या रंगाची आणि पूर्ण वाढ झालेली अळी पिवळी व गोलाकार असते. अळीच्या डोक्याची मागील बाजू थोडी मोठी असते. अंड्यातून अळी निघाल्यानंतर ती पानाचे देठ, खोड पोखरत खाली जमिनीकडे जाते. त्यामुळे खापेच्या वरील भाग सुकून नंतर वाळतो. चक्री भुंग्याच्या प्रादुर्भावामुळे शेंगा कमी लागतात व त्या पूर्ण भरत नाहीत. तसेच पीक काढणीच्या वेळी खापा केलेल्या जागी खोड तुटून पडते. त्यामुळे देखील नुकसान होते. अळी ३४ ते ३८ दिवसांनी कोषावस्थेत जाते. यापैकी काही अळ्या पुढच्या पावसाळ्यापर्यंत सुप्तावस्थेमध्ये जातात, तर काही अळ्या कोषामध्ये जातात. या कोषातून ८ ते ९ दिवसांनी प्रौढ भुंगे बाहेर पडतात. हे भुंगे अंडी देतात. या अंड्यातून अळ्या निघून पिकास नुकसान करतात. अशा अळ्या पुढच्या पावसाळ्यापर्यंत सुप्तावस्थेत जातात. अशाप्रकारे चक्री भुंग्याचे दोन प्रकारचे जीवनक्रम असतात. म्हणजेच एक प्रकारामध्ये वर्षभरात एकच जीवनक्रम, तर दुसऱ्या प्रकारामध्ये दोन जीवनक्रम होतात. सुप्तावस्था ही झाडाच्या खोडामध्ये राहते. पहिला पाऊस झाल्यानंतर अळीची सुप्तावस्था संपते व ती कोषात जाते. कोषातून प्रौढ भुंगा बाहेर येतो व अंडी घालते.

६) पाने पोखरणारी व गुंडाळणारी अळी : पतंग लहान व करड्या रंगाचे असतात. त्यांचे पुढील पंखावर टोकाकडील मागच्या किनाऱ्यावर पांढरा ठिपका असतो. मागील पंख दातेरी असतात. अळी पाने गुंडाळते व आत राहून पाने पोखरते. कीडग्रस्त पाने कपासासारखी अथवा चोचे सारखी दिसतात, ती गळून पडतात.

७) केसाळ अळी : लहान अळ्या सामुहिकपणे पानातील हरितद्रव्य खातात. मोठ्या अळ्या शेतभर पसरतात व पाने खातात. किडीच्या प्रदुर्भावाव दाण्याचा आकार लहान होतो.

व्यवस्थापन :

१) अंतर मशागत: निंदणी व कोळपणी वेळेवर करावी.

२) नत्रयुक्त खताचा समतोल वापर करावा.

३) संप्रेरकाचा वापर टाळावा.

४) पीक ८ - ९ आठवडे तणविरहित ठेवणे गरजेचे. अंड्यांची पुंजकी, लहान व मोठ्या अळ्या वेचून आणि कीडग्रस्त भाग काढून नष्ट करावेत. बांधावर असणाऱ्या किडीच्या पुरक वनस्पतीचा नाश करावा.

५) हेक्टरी २० - २५ पक्षी थांबे उभारावेत.

६) कामगंध सापळे हेक्टरी १५ ते १८ या प्रमाणात शेतात लावावेत. यामुळे प्रौढ कीटक सापळ्यात अडकून त्यांचे प्रमाण कळून येईल व त्यांची संख्या नियंत्रणात येण्यास मदत मिळेल.

७) चक्रीभुंगा व खोडमाशीच्या प्रादुर्भावामुळे किडग्रस्त पाने, फांद्या वाळतात, अशी किडग्रस्त झाडे, पाने, फांद्या यांचा आतील किडीसह नायनाट करावा.

८) पाने खाणाऱ्या अळ्या, चक्रीभुंगा आणि खोडमाशी या किडींनी अंडी घालू नये, याकरिता सुरुवातीलाच ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.

९) केसाळ अळी तसेच तंबाखुची पाने खाणारी अळी, एकाच पानावर पुंजक्याने अंडी घालतात व त्यातून बाहेर पडलेल्या अळ्या सुरुवातीला एकाचा पानावर बहुसंख्य असतात, अशी अंडी व अळीग्रस्त पाने अलगद तोडून किडीसह नष्ट करावीत.

१०) तंबाखुवरील पाने खाणाऱ्या (स्पोडोप्टेरा) अळीच्या व्यवस्थापनासाठी एस.एल.एन. पी.व्ही. ५०० एल.ई. विषाणू २ मि.ली. प्रति लिटर पाणी किंवा नोमुरिया रिलाई या बुरशीची ४ ग्रॅम लिटर पाण्यात मिसळून फवारणी प्रादुर्भाव आढळून येताच करावी.

११) पिकांचे नियमित सर्वेक्षण करून किडीनी आर्थिक नुकसानीची मर्यादा पातळी गाठल्यास किड नियंत्रणाचे उपाय योजण्याबाबत विचार करावा.

१२) हिरवी घाटे अळी या किडीची प्रादुर्भावाची पातळी समजण्याकरिता हेक्टरी किमान ५ - १० कामगंध सापळे शेतात लावावेत. सापळ्यामध्ये प्रतिदिन ८ ते १० पतंग सतत २ ते ३ दिवस आढळल्यास किडीच्या नियंत्रणाची उपाययोजन करावी आणि सापळ्यात जमा झालेला पतंग रॉकेलमिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावेत.

१३) पिकांची फेरपालट करावी. सोयाबीन पिकानंतर भुईमूगाचे पीक घेऊ नये.

१४) सोयाबीनचे पीक काढल्यानंतर लागवड करण्यापूर्वी शेतात उन्हाळी नांगरट करावी.

१५) किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडताच कीटकनाशकाची फवारणी करावी.

१६) प्रकाश सापळ्यांचा वापर करावा.

१७) नियंत्रणासाठी ५ % निंबोळी अर्काची फवारणी. जास्त प्रादुर्भाव दिसल्यास नोमूरिया रिलाई ही बुरशी १००० ग्रॅम प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळून त्यात एक किलो गूळ विरघळून फवारणी करावी. आर्द्रता जास्त असल्यास या बुरशीची अळ्यांच्या अंगावर झपाट्याने वाढ होऊन अळ्या मरतात. त्या गोळा करून ५०० अळ्या प्रति १०० लिटर पाण्यात चिरडून ५०० ग्रॅम गूळ टाकून फवारणी केल्यास किडींचा बंदोबस्त होतो.

१८) जास्त प्रादुर्भाव असलेल्या भागात पूर्ण वाढ झालेल्या अळ्यांना आकर्षित करण्यासाठी विषारी आमिष तयार करावे. त्यासाठी गव्हाचा भरडा, गुळाचे मिश्रण ८:१:१ या प्रमाणात घ्यावे आणि ठिकठिकाणे ठेवावे. तसेच ५ किलो भाताचा कोंडा अधिक एक किलो मोलॅसिस अधिक ५०० ग्रॅम कार्बारिल ५०% हे किटकनाशक मिसळून बिषारी आमिष तयार करून ठेवल्यास किडीचे पतंगही आकर्षित होऊन मरतात.

कीड   आर्थिक नुकसान संकेत पातळी  
तंबाखूची पाने खाणारी अळी   १० अळ्या/मी. ओळीत पीक फुलोऱ्यावर येण्यापूर्वी  
केसाळ अळी   १० अळ्या/मी. ओळीत पीक फुलोऱ्यावर येण्यापूर्वी  
उंट अळी   ४ अळ्या/मी. ओळीत पीक फुलोऱ्यावर असताना ३ अळ्या/मी.
ओळीत पीक शेंगा धरण्याच्या अवस्थेत असताना  
घाटे अळी   ५ अळ्या/मी. ओळीत पीक शेंगा धरण्याच्या अवस्थेत असताना  
पाने पोखरणारी अळी   सरसरी १०% प्रादुर्भावग्रस्त पान  
चक्री भुंगा   ३ ते ५ प्रादुर्भावग्रस्त झाडे प्रति मीटर आळ  
खोडमाशी   १० ते १५ टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे  


किटकनाशकांचा वापर :

कीड   किटकनाशक   मात्रा/१० लिटर पाणी  
पाने पोखरणारी/गुंडाळ्णारी अळी   मिथिल पॅरथिऑन २% भुकटी धुरळावी.
ट्रायझोफॉस ४० ई.सी किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ % प्रवाही  
२० किलो./ हे.
१६ मिली
८ मिली  
चक्री भुंगा (गर्डल बिटल)   डायमेथोएट ३० प्रवाही किंवा
फेनव्हेलरेट १० प्रवाही किंवा
इथोफेनप्रॉक्स १० टक्के प्रवाही किंवा
लॅम्बडा सायहेलोथ्रिन ५ टक्के प्रवाही किंवा
डायफेनथायुरॉन ५० टक्के प्रवाही किंवा
प्रोफेनोफॉस ५० टक्के प्रवाही  
१० मिली
२.५ मिली
२० मिली
६ मिली
१० मिली
२५ मिली  
खोडमाशी   फोरेट १० जी किंवा
क्लोरोपायरीफॉस २० टक्के प्रवाही किंवा
अॅसिफेट ७५ टक्के पाण्यात विरघळणारी पावडर किंवा
थायमिथोक्साम २५ टक्के डब्ल्यु जी किंवा
डायप्ल्युबेनझ्युरॉन २५ टक्के पा.मि. किंवा
इथोफेनप्रॉक्स १० टक्के प्रवाही किंवा
ल्युफेन्युरॉन ५ टक्के किंवा
ट्रायझोफॉस ४० टक्के प्रवाही
१० किलो/ हे
२० मिली
१० ग्रॅम
२ ग्रॅम
८ मिली
२० मिली
१२ मिली
१० मिली  
मावा, तुडतुडे, पांढरी, माशी   मोनोक्रोटोफॉस ३६ % प्रवाही किंवा
डायमेथोएट ३०% प्रवाही किंवा
ऑक्सिडेमिटॉंन मिथाईल २५% प्रवाही किंवा
थायोमिथोक्झाम २५ डब्ल्यु. जी.
 
८ मि.ली.
१० मि.ली.
१० ग्रॅम
२ ग्रॅम
पाने खाणाऱ्या अळ्या
(स्पोडोप्टेरा, उंटअळ्या
केसाळ अळी घाटेअळी इ.)  
निंबोळी अर्क ५% किंवा
बिव्हेरीया बॅसियाना किंवा
एसएलएनपीव्ही ५०० एल.ई. किंवा
अॅझॉंडिरॅक्टिन किंवा
नोमुरीया रिलाइ किंवा
डायफ्ल्युबेन्झ्युरॉन २५% किंवा
लुफेन्युरॉन ५ % प्रवाही किंवा
बॅसिलस थुरिजिएनसिस किंवा
मिथोमिल ४० टक्के पा. मि.
फेन्वलरेट २०% प्रवाही किंवा
इन्डाँक्सिकार्ब १४.५ टक्के किंवा
ईमामेक्टिन बेन्झोएट ५ एस.जी. किंवा
क्लोरोपायरीफॉस २०% प्रवाही किंवा
मिथिल पॅराथिऑन २% भुकटी धुरळावी
क्विनॉलफॉस २५% प्रवाही  


४० ग्रॅम
२० मिली
२५ मिली
४० ग्रम
६ - ८ ग्रॅम
८ - १२ मिली
२० ग्रॅम
२० ग्रॅम
२.५ मिली
६ मिली
३.६ ग्रॅम
२० मिली
२० किलो/ हे.
२० मिली