निशिगंध उत्पादनाचे तंत्रज्ञान

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


भारतात बहूतेक राज्यांतून मर्यादित स्वरूपात फुलशेती केली जाते. यात प्रामुख्याने बिनदांड्याच्या फुलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. निशिगंध हे सुद्धा अशाच गटातील फुलपीक असले तरी त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे, सुवासिकपणामुळे आणि लांब दांड्यावर उमलणाऱ्या पांढऱ्याशुभ्र फुलांमुळे ह्या फुलपिकाला भारतात तसेच परदेशी बाजारपेठांतही चांगली मागणी आहे. याशिवाय बागेतील शोभा वाढविण्यासाठी तसेच बागेतील, परिसरातील, घराभोवतालचे वातावरण सुगंधी आणि प्रसन्न राखण्यासाठी या फुलझाडाची लागवड केली जाते. निशिगांधाच्या फुलांत नैसर्गिक सुवास असल्यामुळे या फुलांतून सुवासिक तेल काढता येते. त्यामुळे औद्योगिक दृष्टीनेही हे महत्त्वाचे फुलपीक आहे या सुगंधी द्रव्यांचा उपयोग औषधे, सुवासिक तेले, उत्तरे, साबण इत्यादींसाठी करतात. परदेशात या तेलाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

महत्त्व : निशिगंध हे बहुवर्षीय फुलझाड आहे. निशिगंधाच्या पिकाला 'रजनीगंधा' अथवा 'गुलछडी' असेही म्हणतात. भारतात निशिगंधाचे फुल फार महत्ताचे मानले जाते. कारण एकदा लागवड केल्यानंतर त्याचा लागवडीपासून ३ ते ४ वर्षांपर्यंत फुले मिळतात. निशिगंध हे कंदवर्गीय फुलझाड आहे. निशिगंधाच्या लावलेल्या कंदापासून असंख्य फुटवे फुटून एका वर्षातच अनेक रोपे मिळतात. निशिगंधाचे फुलपीक १७ व्या शतकात मेक्सिको या देशातून युरोपमार्गे भारतात आले. भारतातील उष्ण हवामान या पिकास चांगले मानवते. भारतात बहुतेक सर्व राज्यांत निशिगंधाची लागवड केली जाते. निशिगंधाच्या झाडाला २० ते २५ पाने फुटून आल्यानंतर त्यांच्या मध्यातून लांब फुलदांडा निघतो. फुलदांडा ५० ते १०० सेंटिमीटर उंचीचा असतो. या फुलदांड्यावर २५ ते ३० जोडफुले येतात व ती क्रमाक्रमाने खालून वर उमलत जातात. उमललेली फुले पांढऱ्या रंगाची आणि उत्यंत सुवासिक असतात. म्हणून या फुलांचा उपयोग प्रामुख्याने वेणी, गजरा, पुष्पहार, गुच्छ लग्नमंडपावरील सुशाभित आरास आणि मुकुटावर खोवाण्यासाठी केला जातो. लांब दांड्याची फुले फुलदाणीत पुष्परचना करण्यासाठी वापरतात. यामुळ निशिगंधाच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. फुले वर्षभर येतात व त्यांना चांगला बाजारही मिळतो. असे असले तरी निशिगंधाची लागवड साधारणपणे मोठ्या शहरांच्या जवळपास, वाहतुकीच्या सोईने शहरांशी निशिगंधाच्या नुकत्याच उमललेल्या फुलांमध्ये दुर्मिळ असे उत्तम प्रतीचे सुवासिक तेल (अर्क) असते. ह्या तेलाचा उपयोग औषधव्यवासायात तसेच सुवासिक तेले, साबण, पावडर, स्नो, शॅम्पू यामध्ये केला जातो. निशिगंधाच्या तेलाचा दर्जा गुलाबाच्या अत्तरा इतकाच चांगला असतो, यामुळे काही शेतकरी निशिगंधाच्या लागवडीकडे आकर्षित होत आहेत.

गुलछडी अथवा निशिगंधाची सोपी व सुटसुटीत लागवडीची पद्धत, वर्षभर मिळणारी फुले, त्यामुळे उपलब्ध होणारा रोजगार, बाजारातून बारमाही मागणी, सतत चांगला भाव, रोग व किडींचा कमी प्रादुर्भाव, औद्योगिक महत्त्व यामुळे या पिकाच्या लागवडीस भरपूर वाव आहे.

क्षेत्र आणि उत्पादन : मेक्सिको हा देश निशिगंधाचे उगमस्थान असून मेक्सिकोमधून त्याचा प्रसार प्रथम युरोपात इंग्लंड, हॉलंड, फ्रान्स, इटली आणि स्पेन या देशांत झाला. नंतर भारत, केनिया, मोरोक्को या देशात निशिगंधाची लागवड केली गेली. भारतात निशिगंधाची लागवड मुख्यत: पश्चिम बंगाल, कर्नाटक, महाराष्ट्रा, उत्तरप्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांत होते. भारतात निशिगंधाची लागवड सुमारे २०,००० हेक्टर क्षेत्रावर होते. महाराष्ट्रात ३,००० हेक्टर क्षेत्र या फुलपिकाखाली आहे. पुणे, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, सांगली, ठाणे, औरंगाबाद या जिल्ह्यांत निशिगंधाची लागवड मोठ्या प्रमाणावर होते.

निशिगंधाच्या मोहक आणि सुवासिक फुलांमुळे त्यांचा रोजच्या जीवनातील वापर वाढत असून या फुलांना बाजारात वर्षभर चांगली मागणी व भाव असतो. म्हणून या पिकाचे क्षेत्रही झपाट्याने वाढत आहे.

महराष्ट्रात निशिगंधाच्या लागवडीखालील क्षेत्र खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.   जिल्हा   क्षेत्र (हेक्टर)  
१.   पुणे   १,४००  
२.   सांगली   २००  
३.   अहमदनगर   १५०  
४.   सातारा   १५०  
५.   सोलापूर   १५०  
६.   नाशिक   १५०  
७.   कोल्हापूर   १००  
८.   धुळे   १००  
९.   जळगाव   १००  
१०.   इतर   ५००  


हवामान आणि जमीन : निशिगंधाच्या पिकाला उष्ण आणि काही प्रमाणात दमट हवामान चांगले मानवते. अती उष्ण (४० डी. सेल्सिअसपेक्षा जास्त) किंवा अती थंड (१० डी . सेल्सिअसपेक्षा कमी) तापमान निशिगंधाच्या पिकास अपायकारक ठरते. यामुळे झाडांची वाढ खुंटते. झाड नीट वाढत नाहीत आणि फुले येण्याचे प्रमाण कमी होते. म्हणून साधारणपणे २५ ते ३० डी. सेल्सिअस तापमान आणि ५० ते ५५% आर्द्रता असलेल्या भागात निशिगंधाची चाग्नाली वाढ होते आणि जास्त उत्पादन मिळते. अती थंड आणि धुके पडणाऱ्या ठिकाणी निशिगंधाच्या पिकाची वाढ नीट होत नाही. पिकाच्या चांगल्या जोमदार वाढीसाठी भरपूर स्वच्छ सुर्यप्रकाशाची आवश्यकता असते. अन्यथा झाडे नीट वाढत नाहीत आणि फुले चांगल्या प्रतीची मिळत नाहीत. थंडीची लाट अथवा अती उष्ण वारे या पिकाला सहन होत नाही. कडक उन्हात पाने गळणे , कळ्या सुकणे, फुले लवकर उमलणे असे प्रकार पिकावर होतात. महाराष्ट्रातील बहुतेक सर्वच ठिकाणचे हवामान निशिगंधाच्या पिकाला चांगले आहे.

निशिगंधाचे पीक कोणत्याही प्रकारच्या जमिनीत चांगले येते. क्षारयुक्त जमिनीतही निशिगंधाचे पीक घेता येते. उथळ आणि हलक्या जमिनीत निशिगंधाचे फुलदांडे आणि फुले लहान राहतात आणि पिकाचा हंगामही थोड्याच दिवसात संपतो. भारी काळ्या जमिनीत मर आणि कुज रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. फुलांसाठी जांभ्या दगडाच्या वाळूमिश्रित आणि सामू ६.५ ते ७ असलेल्या जमिनीत निशिगंधाची लागवड करावी. जमीन पाण्याचा निचरा होणारी आणि भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली असावी.

जाती : निशिगंधाच्या जातींचे फुलांच्या प्रकारानुसार सिंगल, डबल, सेमिडबल आणि व्हेरिगेटेड असे चार प्रकार पडतात.

१) सिंगल : या प्रकारातील फुले पांढरीशुभ्र असून अत्यंत सुवासिक असतात. फुलांमध्ये फक्त ५ पाकळ्या असून त्या आकर्षकरित्या एकाच वर्तुळाकार ओळीत असतात. या प्रकारची फुले हार, वेणी, गजरा ,माळा यासाठी विशेष योग्य असतात. परंतु काही वेळा गुच्छ आणि फुलदाणीत ठेवण्यासाठीही फुले वापरतात. उदाहरणार्थ मेक्सिकन सिंगल, कलकत्ता सिंगल.

२) डबल : या प्रकारातील जातींचा फुलदांड भरपूर जाड असतो. फुलांमध्ये पाकळ्यांची संख्या १० पेक्षा ज्सात असते आणि पाकळ्या ३ - ४ घेरांमध्ये असतात. फुलांचा रंग फिकट पांढरा असतो. या प्रकारातील जातीच्या फुलदांड्यांना वास कमी असतो, मात्र दांडा भरपूर जाड असतो. या प्रकारातील जातींचे फुलदांडे फुलदाणीत ठेवण्यास आणि परदेशात पाठविण्यास योग्य असतात. उदाहरणार्थ कलकत्ता डबल, पर्ल, ड्वार्फ पर्ल, एक्सेलसियर.

३) सेमिडबल : या प्रकारातील फुलात ५ पाकळ्यांची एकात एक दोन वर्तुळे असून १० पाकळ्या असतात. कळीच्या टोकाला गुलाबी छटा असते. कळी उमलताना पांढरीशुभ्र असते. फुलदाणीसाठी अथवा गुच्छ तयार करण्यासाठी या प्रकारातील जाती उपयुक्त आहेत.

४) व्हेरिगेटेड : या प्रकारातील जातींची फुले सिंगल प्रकारासारखीच असतात. मात्र पानांवर पांढरट - पिवळे पट्टे असतात. रंगीत पानांमुळे झाड अधिक शोभिवंत दिसते. हा प्रकार कुंड्यांत अथवा बागेत रस्त्याच्या कडेला लावण्यासाठी जास्त प्रमाणात वापरतात.

याशिवाय राष्ट्रीय बागवानी संशोधन संस्था, बंगलोर यांनी अनुक्रमे सिंगल प्रकारात श्रींगार तर डबल प्रकारात सुहासिनी या जातींची शिफारस केलेली आहे आणि त्यातील श्रींगार हा प्रकार दोन्ही उद्देशांसाठी म्हणजे सुटी फुले व लांब दांड्याच्या कटफ्लॉवर्ससाठी उत्तम असल्याचे पुणे केंद्रातील प्राथमिक चाचणीत आढळून आलेले आहे. तसेच राष्ट्रीय वनस्पती केंद्र, लखनौ यांनी सुवर्णरेखा व रजतरेखा अशा दोन जातींची शिफारस केलेली आहे. रंगीत गुलछडी अजून वनस्पती पैदासकरांना तयार करता आलेली नाही. परंतु कुत्रिम रंगांनी पिवळा, निळा, तांबडा अशी ती सजविता येते.

अभिवृद्धी आणि लागवडीची पद्धत : निशिगंधाची अभिवृद्धी बियांपासून तसेच जमिनीत वाढणाऱ्या सुप्त कंदांपासून लागवड करतात. मात्र निशिगंधाची व्यापारी लागवड कंदांपासूनच केली जाते. निशिगंधाच्या लागवडीसाठी कंद निवडताना आधीच्या पिकाचे नीट निरीक्षण करणे आवश्यक असते. कारण या पिकातूनच फुलांचा हंगाम संपल्यानंतर बेण्याची निवड केली जाते. म्हणून ज्या पिकातून बेणे निवडायचे ते रोगमुक्त आणि चांगले उत्पादन देणारे असणे आवश्यक आहे. मूळ मातृकंदाभोवती लहान - मोठे बरेच कंद असतात. या सर्व समूहाचा उपयोग करून निशिगंधाची लागवड केली जाते. परंतु लहान - मोठ्या आकाराच्या कंदांमुळे येणारे पीक एकसारखे न वाढता कमी - अधिक प्रमाणात वाढते आणि उत्पादन कमी मिळते. शिवाय मर्यादित क्षेत्रच त्यामुळे लावता येते. हे टाळण्यासाठी समूहाने लागवड करण्यापेक्षा निवडक कंदाची लागवड करावी. यासाठी मूळ मातृकंदाभोवती असलेले सर्व लहान - मोठे कंद वेगवेगळे ठेवावेत. आधीच्या पिकातील निवडलेले क्षेत्र खोल खणून कंदसमूह सावलीत दोन आठवडे पसरवून ठेवावेत. नंतर त्यामधून सारख्या आकाराचे ५ ते ७ सेंटिमीटर व्यासाचे कंद लागवडीसाठी निवडावेत. अशा कंदाचे वजन साधारणपणे प्रत्येकी ३० ते ५० ग्रॅम असते. साधारणपणे उभट, त्रिकोणी कंद लागवडीसाठी निवडावेत. असे कंद वापरल्यास फुले लवकर मिळतात. फुलांचा दांडा लांब मिळून फुलांची सख्याही जास्त मिळते. ३० ग्रॅमपेक्षा कमी वजनाचे कंद वापरल्यास ५० ते ६० दिवसांत फुले येतात, तर २५ ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी वजनाचे कंद वापरल्यास फुले येण्यास २०० ते २५० दिवस लागतात. ५० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे कंद वापरल्यास फक्त ४० दिवसांत फुले येतात. पर्यायाने त्यांची गुणवत्ता चांगली मिळत नाही. कंदांना काही काळ साठवणीची प्रक्रिया दिल्यास अथवा लागवडीपूर्वी जर्मिनेटरच्या द्रावणामध्ये बुडवून लागवड केल्यास त्यांच्या सुप्तावास्थेचा काळ कमी होतो व कंद लवकर उगवतात. त्यासाठी निवडलेले कंद १५ ते ३० मिनिटे जर्मिनेटरच्या द्रावणात बुडवून कंद सावलीत वाळवावेत आणि मग लागवडीसाठी वापरावेत. निशिगंधाची लागवड करण्यासाठी सरी - वरंबा अथवा सपाट वाफे पद्धतीने शेताची आखणी करून त्यात लागवड करावी. जमीन जर हलकी, पाण्याचा चांगला निचरा होणारी असेल तर सपाट वाफे वापरावेत. जमीन मध्यम आणि पाण्याचा कमी निचरा होणारी असल्यास सरी - वरंबा पद्धत वापरावी.

लागवड करण्यासाठी निवडलेल्या बागेतील जमीन उभी - आडवी खोल नांगरून कुळवाच्या दोन उभ्या - आडव्या पाळ्या घालून ती भुसभुशीत करावी. हेक्टरी ४० ते ५० टन चांगले कुजलेले शेणखत आणि २०० ते २५० किलो कल्पतरू सेंद्रिय खत मिसळावे. जमिनीच्या पोताप्रमाणे, उताराप्रमाणे भारी जमिनीसाठी सरी - वरंबे अथवा हलक्या जमिनीसाठी सपाट वाफे तयार करावेत. वाफे शक्यतो ३ मीटर लांब आणि २ मीटर रुंद आकाराचे करावेत.

हंगाम आणि लागवडीचे अंतर : निशिगंध उष्ण कटिबंधातील बहुवर्षीय फुलझाड असून एकदा लागवड केल्यानंतर त्याच शेतात सतत तीन - चार वर्षे पीक ठेवता येते. काही ठिकाणी प्रत्येक वर्षी नवीन लागवड केली जाते. वर्षभर सतत फुले मिळविण्यासाठी निशिगंधाची जानेवारी - फेब्रुवारी, मे - जून आणि सप्टेंबर - ऑक्टोबर या महिन्यात लागवड करावी.

निशिगंधाची सरी वरंब्यावर लागवड करताना ६० सेंटिमीटर अंतरावर सऱ्या काढून प्रत्येक वरंब्याच्या दोन्ही बाजूस ३० ते ४० सेंटिमीटर अंतरावर कंदांची लागवड करावी. सपाट वाफ्यात लागवड करताना दोन ओळीत ३० ते ४० सेंटिमीटर आणि दोन कंदांमध्ये २० ते ३० सेंटिमीटर अंतर राखून करावी.

लागवडीपूर्वी निवडलेल्या बेण्याला बुरशीनाशकाची प्रक्रिया करून सपाट वाफ्यात २० ते ३० सेंटिमीटर अंतरावर प्रत्येक ठिकाणी एक चांगला कंद लावावा. कंद लावताना ५ ते ६ सेंटिमीटर खोल जमिनीत पुरावा. त्याचा निमुळता भाग वरच्या बाजूस राहील असे पहावे आणि त्याला मातीने झाकून टाकावे. लागवडीनंतर शेतास त्वरीत पाणी द्यावे. सरी - वरंबा पद्धतीमध्ये लागवड करावयाची झाल्यास ६० सेंटिमीटर अंतरावर सऱ्या काढून प्रत्येक फुटावर सरीच्या दोन्ही बाजूला एक - एक कंद लावावा.

खते आणि पाणी व्यवस्थापन : निशिगंध हे कंदवर्गीय पीक असल्यामुळे खतांना चांगला प्रतिसाद देते. तसेच वेगवेगळ्या जमिनीत आणि हवामानात हे पीक वेगवेगळा प्रतिसाद देते. निशिगंधाच्या लागवडीसाठी जमिनीची पूर्वमशागत करताना एकरी २० ते २५ टन चांगले कुजलेले शेणखत आणि १०० किलो कल्पतरू सेंद्रिय खत मिसळावे. शेणखत उपलब्ध नसल्यास लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीत प्रथम पावसाळ्यात तागासारखे हिरवळीचे पीक लावावे. ते पावसाळ्यात फुलण्यापूर्वी जमिनीत गाडावे आणि चांगले कुजल्यानंतर निशिगंधाची लागवड करावी.

लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे. दुसरे पाणी ५ ते ७ दिवसांनी द्यावे. त्यानंतर पावसाळ्यात पाऊस नसेल तर १० ते १२ दिवसांनी, हिवाळ्यात ८ ते १० दिवसांनी तर उन्हाळ्यात ५ ते ६ दिवसांनी, जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे. फुलांचे दांडे येण्यास सुरुवात झाल्यावर पाणी नियमित द्यावे. या वेळी पाण्याचा ताण पडल्यास पिकाच्या उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो.

आंतरपिके : निशिगंध हे कमी अंतरावर लावले जाणारे फुलपीक असल्यामुळे निशिगंधाच्या पिकात आंतरपिके सर्वसाधारणपाने घेतली जात नाहीत. परंतु शहरी भागाजवळ फुलशेती असल्यास वाहतुकीची रोजची सोय असल्यास मेथी, कोथिंबीर, मुळा यांसारखी लवकर येणारी भाजीपाला पिके पाटाच्या कडेने अथवा सपाट वाफ्याच्या आतील कडेच्या बाजुने घेता येतात.

महत्त्वाच्या किडी :

१) नाकतोडे : नाकतोडे निशिगंधाची कोवळी पाने तसेच कोवळे फुलदांडेही खातात.

२) पाने कुरतडणाऱ्या अळ्या : ह्या अळ्या रात्रीच्या वेळी निशिगंधाच्या कोवळ्या खोडावर आणि पानांवर राहून अन्नरस शोषण करतात. विशेषत: पानांच्या कडा कुरतडून त्यातील रस शोषून घेतात आणि त्यामुळे पाने कातरलेली दिसतात. ही अळी मुळांवरही आढळते. कंदाचा भाग खाऊन अळी कंदामधून बोगदे तयार करते.

३) मावा : हे लहान, हिरव्या रंगाचे किडे फुलांच्या कोवळ्या पाकळ्यांवर, कळ्यांवर आणि शेंड्यावर राहतात आणि त्यातील अन्नरस शोषून घेतात.

४) फुलकिडे : ही कीड पाने, फुलदांडा आणि फुलांवर राहून अन्नरस शोषून घेते. त्यामुळे झाड निस्तेज बनते.

महत्त्वाचे रोग :

१) खोडकुज : या रोगामुळे पानांवर तांबुस रंगाचे बुरशीचे ठिपके पडतात. पानांचा रंग फिकट हिरवा होतो. पानांवरील ठिपक्यांचा आकार वाढत जाऊन सर्व पानभर ठिपके पसरतात. काही दिवसांनी रोगट पाने गळून पडतात. हा बुरशीजन्य रोग पावसाळ्यात पाण्याचा योग्य निचरा न होणाऱ्या जमिनीत मोठ्या प्रमाणात आढळतो.

उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगट झाडे उपटून नष्ट करावीत. रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जमिनीतील पाण्याचा चांगला निचरा करावा. तसेच लागवड करण्यापूर्वी जर्मिनेटरची बीजप्रक्रिया व नंतर ड्रेंचिंग करावे. नवीन लागवड करताना रोगट झाडांचे कंद लागवडीसाठी वापरू नयेत.

२) फुलदांडा सडणे : हा रोग जिवाणूंमुळे होतो. मुख्यत: कोवळ्या फुलांच्या कळ्यांवर या रोगाचा प्रादुर्भाव होतो. कळ्या कोरड्या होतात. त्यांच्यावर तपकिरी खोलगट खड्डे पडतात आणि निस्तेज होतात. कालांतराने कळ्या सुकतात. रोग कळ्यांच्या टोकाकडून देठाकडे पसरत जातो. फुलदांडे सुकतात.

उपाय : वाळत जाणारे दांडे आणि झाडे काढून नष्ट करावीत. तसेच जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर व न्युट्राटोन प्रत्येकी ३० मिलीची १० लि. पाण्यातून दाट फवारणी घ्यावी.

३) कंदकुज : या बुरशीजन्य रोगामुळे कंद कुजतात, ज्या जमिनीत पाण्याचा चांगला निचरा होत नाही अशा जमिनीत या रोगाचे प्रमाण जास्त आढळते.

उपाय : यारोगाच्या प्रतिबंधासाठी लागवडीपूर्वी कंद जर्मिनेटर व बुरशीनाशकाच्या द्रावणात १५ मिनिटे बुडवून नंतर सुकवून हे कंद लावावेत. पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत कंदांची लागवड सरी - वरंब्यावर करावी. वाफ्यांमध्ये ०.६ % तीव्रतेच्या बोर्डो मिश्रणाच्या द्रावणाचे ड्रेंचिंग करावे.

४) बंची टॉंप : या विषाणुजन्य रोगामुळे फुलांचा दांडा सारखा न वाढता चेंडूसारखा गोल होतो आणि त्याची लांबी नेहमीच्या लांबीच्या निम्मीच राहते.

उपाय : यारोगाच्या नियंत्रणासाठी रोगट झाडे उपटून नष्ट करावीत. रोगाचा प्रसार फुलकिडी मार्फत होत असल्याने फुलकिडीचा योग्य प्रकारे बंदोबस्त करावा.

वरील कीड, रोग तसेच विकृतीवर प्रतिबंधक व प्रभावी उपाय तसेच दर्जेदार उत्पादनासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या खालीलप्रमाणे फवारण्या कराव्यात.

फवारणी :

१) पहिली फवारणी : ( लागवडीनंतर १० ते १५ दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + हार्मोनी १५० मिली + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी) : जर्मिनेटर ३५० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + न्युट्राटोन २५० मिली. + हार्मोनी २५० मिली + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : ( लागवडीनंतर ४० ते ४५ दिवसांनी ) : थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी ३५० मिली + २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : ( लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली. + न्युट्राटोन ७५० मिली.+ हार्मोनी ५०० मिली + २५० लि. पाणी.

पुढील फवारण्या आवश्यकतेनुसार दर १५ ते २० दिवसांच्या अंतराने आमच्या कृषी विज्ञान केंद्रावरील तज्ज्ञांना भेटून सल्ल्यानुसार कराव्यात.

तणे आणि त्यांचे नियंत्रण : निशिगंध हे जमिनीलगतच वाढत असल्यामुळे त्याच्या वाढीचा वेग गवतासारखाच असतो. लागवड केल्यापासून पहिल्या ३ ते ४ महिन्यांत वेळोवेळी तण काढून जमीन स्वच्छ व भुसभुशीत ठेवली तर मुख्य पिकाची वाढ जोमाने होते. काही दिवसांनी जमीन मुख्य पिकाने व्यापल्यानंतर तणांचा उपद्रव जास्त प्रमाणात होत नाही. पटाच्या पाण्याची शेती असेल तर किंवा वाऱ्याबरोबर शेतात दुसरीकडून काही तणांचे हलके बी येऊन पडल्यास पिकामध्ये तणांची वाढ दिसून येते. मुख्य पिकाचा काढणीचा बहर ओसरल्यानंतर त्याच्या आजूबाजूची पाने वाळल्यावर काही जमीन मोकळी मिळते. या मोकळ्या जमिनीत तणांचा उपद्रव वाढतो. अनेकदा हरळी आणि लव्हाळा या सारखी बहुवर्षायु तणेही मोठ्या प्रमाणावर निशिगंधाच्या पिकात आढळतात.

निशिगंध हे बहुवर्षायु फुलपीक असल्यामुळे या पिकात मुख्य हंगाम संपल्यावर खोडवा म्हणजे दुबार अथवा तिबार पिके घेता येतात. यासाठी नवीन लागवड केलेल्या निशिगंधाच्या बागेतील फुलांची वेचणी झाल्यानंतर म्हणजेच एप्रिल महिन्यात बागेचे पाणी तोडून बागेला विश्रांती घ्यावी. ७ - ८ आठवड्यानंतर विश्रांतीनंतर हलकी खांदणी करून पुन्हा खते द्यावीत आणि बागेला पाणी देण्यास सुरुवात करावी. दुसऱ्या वर्षी फुलांचे उत्पादन १॥ ते २ पटीने जास्त येते. अशाप्रकारे ३ वर्षापर्यंत त्याचा शेतात पीक घेता येते. मात्र अशा खोडवा घेतलेल्या शेतात तणांचा योग्य बंदोबस्त करता येतो नाही. त्यामुळे हरळी आणि लव्हाळा या तणांचा उपद्रव वाढतो. हरळी आणि लव्हाळा निशिगंधाच्या शेतात आल्यास संपूर्ण बागच नष्ट होते. म्हणून सुरुवातीलाच लव्हाळा आणि हरळी मोठ्या प्रमाणात असलेले शेत निशिगंधाच्या लागवडीसाठी निवडू नये किंवा अशा शेतात निशिगंधाची लागवड करण्यापूर्वी अॅट्रॅझिन या तणनाशकाची ३ किलो दर हेक्टरी मात्रा वापरून लागवडीपूर्वी जमिनीवर फवारावे. त्यामुळे उगवण होण्यापूर्वी किंवा उगवण झालेली सर्वच तणे नष्ट होतात. पांढरी फुली, घोळू, कुरडू अशी हंगामी तणे बागेत दिसल्यास लगेच निंदणी करून उपटून काढावीत.

फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री :

निशिगंधाच्या कंदांच्या लागवडीनंतर ६० ते ८० दिवसांत फुलांचे दांडे दिसू लागतात आणि एक आठवड्यात फुलदांड्यावरील सर्वांत खालची जोडी पूर्ण उमलते. यावेळी निशिगंधाच्या फुलदांड्याची काढणी करावी. या फुलदांड्याचा उपयोग फुलदाणीत सजावटीसाठी अथवा गुच्छ तयार करण्यासाठी करतात. फुलदांडे जमिनीपासून १० - १५ सेंटिमीटर उंचीवर धारदार चाकूने कापून लगेच पाण्यात बुडवून ठेवावेत. दांडा कापताना जमिनीलगत न कापता पानांच्या वरील बाजूस कापावा. पानांसह दांडा कापल्यास त्यामुळे कंदाच्या वाढीवर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. सर्व फुलदांडे कापून बागेत झाडाखाली अथवा एखाद्या थंड खोलीत बादलीतच सहा तास ठेवावेत. नंतर ९० - १०० सेंटिमीटर लांबीचे लांब दांडे, ८० ते ९० सेंटिमीटर लांबीचे मध्यम दांडे आणि ८० सेंटिमीटर लांबीचे लहान दांडे अशाप्रकारे फुलदांड्याची प्रतवारी करून एक डझनच्या जुड्या बांधाव्यात. वर्तमानत्राच्या कागदात वरच्या बाजूने गुंडाळून आणि वेताच्या लांब करंड्यातून अथवा खोक्यांत भरून लांबच्या बाजारपेठेत पाठवाव्यात. सर्वसाधारणपणे निशिगंधाचे दर हेक्टरी ७ ते ८ लाख फुलदांडे मिळतात.

हार, वेणी, गजरा, यांसाठी सुटी पुर्ण वाढलेली फुले लागतात. अशी फुले, फुलदांडे यायला सुरुवात झाल्यानंतर १५ -२० दिवसांनी उमलू लागतात. यासाठी अशा फुलांची वेचणी दररोज करावी लागते. हार, वेण्यांसाठी पूर्ण उमललेली फुले वापरता येत नाहीत. म्हणून पूर्ण वाढ झालेल्या कळ्यांची तोडणी करावी. ह्या कळ्या दांड्यावर जोडीने येतात. एका फुलदांड्यावर सर्वसाधारणपाने १६ -२० जोडकळ्या येतात. साधारणत: एका दांड्यावरील २ - ३ जोडकळ्या रोज काढणीस येतात. या जोडकळ्यांची रोज काढणी करावी. फुलदांड्याच्या टोकाकडे ३ - ४ जोडकळ्या अतिशय लहान असतात. त्या तशाच सोडून द्याव्यात. जोडकळ्या वेचताना फुलदांडी मोडणार नाही याची काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे पूर्ण उमललेली फुले फुलदांड्यावर तशीच ठेवू नयेत. फुलदांड्यावरील कळ्यांची वेचणी पूर्ण झाल्यावर असे फुलदांडे कापून टाकावेत. यासाठी उद्देश लक्षात घेऊन योग्य अवस्थेतील फुले तोडून करंडीत अथवा कापडी पिशवीत भरावीत आणि बाजारात बिक्रीसाठी पाठवावीत. फुले करंड्यात भरण्यापूर्वी करंडीच्या तळाशी कडूनिंबाच्या पाल्याचा पातळ थर द्यावा आणि नंतर फुले अंथरावीत. करंडी बंद करून सुतळीने चांगली शिवून पाठवावी.

वरील सर्व अवस्थांसाठी फुलांची काढणी शक्यतो सकाळी सुर्योदयापुर्वी करावी. लांब फुलदांड्यांसाठी ९ वाजेपर्यंत अथवा संध्याकाळी ५ नंतर काढणी केली तरी चालते. हार, गजरा आणि वेणीसाठी शक्यतो सकाळी ५ - ६ पर्यंत फुलांची काढणी पूर्ण होणे आवश्यक आहे. सुट्या फुलांना भारतीय बाजारपेठेत नियमित मागणी असते. परंतु सर्व शेतकऱ्यांनी एकाच वेळी माल पाठविल्यामुळे बाजारभाव कमी मिळतो. सशक्त, लांब आणि फुलांची भरपूर संख्या असलेल्या फुलदांड्यांना मुंबई - पुणे बाजारात चांगला भाव मिळतो. अशा चांगल्या दांड्यांना विशेषत: 'डबल' निशिगंधास इंग्लंड आणि फ्रान्समध्ये भरपूर मागणी आहे.

फुलांचे पॅकेजिंग आणि साठवण : सुटी फुले काढल्यानंतर ती १० ते १५ किलो वजनाच्या बांबूच्या अथवा वेताच्या टोपलीत भरून पाठवितात. बाजारासाठी फुले पाठविताना ट्रक, मोटारसायकल, सायकल इत्यादी साधनांचा उपयोग होतो. बाजारात फुलांची विक्री वजनावर होते. लांब दांड्याची फुले छोट्या - छोट्या जुड्यांच्या स्वरूपात बांधून बाजारपेठेत पाठवितात. त्यांचा भाव डझनावर ठरतो. लांब दांड्याची फुले जास्त काळ टिकविण्यासाठी क्रॉंपशाईनरचा वापर करावा. म्हणजे ती जास्त काळ टिकतात.

परदेशी बाजारपेठेसाठी निशिगंधाच्या फुलांचे पॅकिंग करताना १०० फुलदांड्याचे एक अशी गोल बंडल्स बांधतात. बंडलच्या बुंध्याकडील भाग ओल्या वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळतात. कळ्यांना इज होऊ नये, यासाठी फुलदांड्याचे पूर्ण बंडल नरम, पांढऱ्या टिश्यूपेपरमध्ये गुंडाळून हे फुलदांडे कार्डबोर्डे बॉक्समध्ये पॅक करून त्वरित विक्रीसाठी पाठवावे.

कंदाची काढणी आणि साठवण : निशिगंधाच्या लागवडीनंतर तीन वर्षांनी वाफ्यातील सर्व जागा कंद आणि आजूबाजूस वाढलेल्या कंद पिल्लांनी व्यापली जाते. त्यानंतर पुन्हा खोडव्याचे पीक घेणे फायदेशीर होत नाही. म्हणून जास्तीत जास्त फुले काढून झाल्यानंतर बागेचे पाणी एक महिनाभर बंद करावे. सर्व जूनी पाने पिवळी पडून वाळू लागतात आणि जमिनीतील कंद चांगले पोसतात. नंतर खोलवर नांगरट करून अथवा टिकावाने खोल खणून कंद काढावेत. दोन आठवडे त्यांना चांगले सुकू द्यावे. त्या वेळेस कंदाच्या समूहाच्या आजूबाजूची माती वाळते आणि गळून पडते. असे कंद समूहनंतर थंड आणि कोरड्या सावलीच्या जागी पातळ थरात पसरून ठेवावेत. कंदावर बुरशी आणि किडींचा उपद्रव होऊ नये म्हणून गंधक भुकटी आणि ब्लॉयटॉंक्स यांचे एकत्रित मिश्रण धुरळून घ्यावे. या पद्धतीने ४ -५ महिन्यापर्यंत कंद चांगल्या स्थितीत टिकतात.

अधिक माहितीसाठी खालील संदर्भ पहावा :

एका वर्षात गुलछडीचे १ लाख रुपये

श्री. बद्रीनाथ पंढरीनाथ चांदगुडे, मु. दंडवाडी, पो. सुपा, ता. बारामती, जि. पुणे. फोन नं. (०२११२) २८५२५५

(संदर्भ : कृषी विज्ञान मासिक, फेब्रुवारी २००६, पान नं. ९)