'आणीबाणीत' कमी दिवसात शेतकऱ्याला मदतीचा हात देणारे पीक - मका

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


मका हे जगातील तिसरे महत्त्वाचे अन्नधान्य पीक आहे. अमेरिकेतील हे एक महत्त्वाचे अन्नधान्य पीक आहे. येथील जवळ - जवळ २५% क्षेत्र मका या पिकाने व्यापले आहे. मका हे पीक मुळचे पेरू, इक्वाडोर, बोलिव्हिया तसेच मेक्सिको आणि मध्य अमेरिकेतील आहे. १६ व्या शतकात पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी दक्षिण आशियात प्रसार केला. पुढे तिचा दक्षिण भारतातही प्रसार होत गेला. आता देशात मका हे महत्त्वाचे अन्नधान्य पीक झाले आहे.

आता तर मक्याची लागवड अन्नधान्य, चारा, पशुखाद्य तसेच काही उद्योगांसाठी कच्चा माल म्हणून केली जात आहे. मका हे पीक उष्ण हवामानात वाढणारे असून वाढीच्या काळात उबदार दिवस आणि रात्रीचे तापमान पिकास मानवते, तसेच कडक थंडीपासून मुक्त असा १४० दिवसांचा काळ या पिकास आवश्यक असतो. सुर्य - प्रकाशाचा कमी अधिक परिणाम मका या पिकाच्या वाढीवर व उत्पादनावर होतो.

* जगातील मका उत्पादन : जगात आज १४० दशलक्ष हेक्टर्स जमिनीवर प्रतिवर्षी मक्याची लागवड केली जाते आणि त्याचे सरसरी उत्पादन ६०५ दशलक्ष टन असून उत्पादकता ४.३ टन प्रति हेक्टरी इतकी आहे. याची अंदाजे खंडवार टक्केवारी उत्तर व मध्य अमेरिका खंड ५१.७%, अशिया खंड १६.४%, युरोपखंड १६.४%, दक्षिण अमेरिका खंड ८.२% आणि आफ्रिका खंड ७.१% अशी आहे. मका पिकविणाऱ्या देशांचा जर विचार केला तर अमेरिका सर्वात वरच्या क्रमांकावर असून जागतिक उत्पादनाचा ४८.१% मका येथे पिकतो. त्या खालोखाल चीन १०.३%, ब्राझील ५.४%, रुमानिया ३.५%, रशिया २.७%, युगोस्लाविया २.७ %, मेक्सिको २.७%, भारत २.०%, फ्रान्स व हंगेरी १.६% आणि कॅनडा १.१% हे देश आहेत. हे देश जागतिक मका उत्पादनाच्या ८५ ते ९०% मका दरवर्षी पिकवितात.

* भारताचे मका उत्पादन :

१) जगात मका उत्पादनात भारताचा ९ वा क्रमांक लागतो. तर उत्पादनकतेत १५ वा क्रमांक लागतो. भारतात मका उष्ण कटिबंधात येणाऱ्या भागात तसेच अर्धशुष्क भागात पिकविला जातो. सध्या मका पिकाखालील क्षेत्र ६ दशलक्ष हेक्टरपेक्षा थोडे जास्त आहे. गेल्या दोन दशकात ते ५.६ ते ६ दशलक्ष हेक्टर असे कमी जास्त होते. मधली दुष्काळाची एक दोन वर्ष ६ दशलक्ष टनापेक्षा उत्पादन कमी होते. अन्यथ: हे उत्पादन ६.६ ते १०.०० दशलक्ष टन असे कमी जास्त होते. यातील लक्षणीय बाब अशी की एकत्रित वार्षिक उत्पादनात वाढीच्या दराचा (CARI) विचार केला तर १९८० - ८१ आणि १९९० - ९१ ला संपलेल्या कालावधीत उत्पादनातील वाढ ३.७% दिसली कारण (CARI) मुळे उत्पादनात ३.५% वाढ होती. मका पिकविणारी उत्तरेतील प्रमुख राज्ये म्हणजे बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजरात, जम्मू कश्मिर ही सर्व राज्ये मिळून एकत्रितपणे देशाच्या मका उत्पादनाचे ७०% उत्पादन करतात. दक्षिणेत कर्नाटक आणि आंध्रप्रदेश ही मका पिकविणारी राज्ये देशाच्या एकूण उत्पादनाच्या १४.२% मका पिकवितात.

भारतामध्ये मका उत्पादनात राजस्थान, अत्तरप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यांचा वाटा मोठा आहे. देशातील एकूण मका लागवडीखालील क्षेत्रापैकी ५५ ते ६०% क्षेत्र या राज्यांचे आहे. मात्र उत्पादकता ही राष्ट्रीय उत्पादकतेपेक्षा फारच कमी म्हणजे ९.५ क्विटंल/हेक्टरी आहे. राजस्थानाची १२.५ क्विंटल/हेक्टरी उत्पादकता आहे.

आंध्रप्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि कर्नाटक या राज्यात ३०% क्षेत्र येते. मात्र उत्पादकता पातळी ही १८.३ क्विंटल/हेक्टर ते २४.१ क्विंटल/हेक्टर अशी आहे.

* मक्यामधील अन्नघटकांचे प्रमाण - मक्याचे दाण्यामध्ये स्टार्च ६७.७४%, फॅट ३.९ ते ५.८%, प्रथिने ८.१ ते ११.५%, राख १.३७ ते १.५ %, साखर १.१६ ते १.२२% असते. हे प्रमाण वेगवेगळ्या वाणाच्या उत्पादनात कमी - अधिक असते. पांढरा व पिवळसर अशा दोन रंगाच्या गाभ्यावरून 'अ' जीवनसत्वाचे प्रमाण बदलते. पांढऱ्या वाणात ०.०५ युनिट तर पिवळसर वाणात ७.०५ युनिट असते.

विविध उपयोग :

* मक्याचे दाणे, अन्नधान्य म्हणून, तसेच कुक्कुट पालनांतील खाद्य, पशुखाद्य म्हणून उपयोगात येतात. हिरवा भाग उदा. पाने, खोड आणि दाणे काढल्यानंतर घट्ट भाग जनावरांसाठी चारा म्हणून वापरता येतो. मक्याचे दाणे आणि घट्ट भागापासून रोजच्या वापरासाठी पशुखाद्यासाठी अनेक किंमती उत्पादने निर्माण करता येतात. अशा उत्पादनाची संख्या ५०० च्या वर भरेल. यात तेल, सायरप, स्टार्च, डेक्ट्रोजसाखर पेये, जीवनसत्त्वे, अॅमिनो, अॅसिड, औषधे, सेंद्रिय आम्ले व अल्कोहोल इ. चा समावेश आहे. निरनिराळ्या रासायनिक उत्पादनांसाठी वेट मिलींग तंत्रज्ञान तसेच निरनिराळे अन्न पदार्थ बनविण्यासाठी ड्राय मिलींग तंत्रज्ञान अमेरिका, फ्रान्स इ. देशात प्रगत व विकसित झाले आहे. म्हणूनच मका हे पीक उद्योगांकरिता फार महत्त्वाचे पीक आहे.

२) जगातील मक्याच्या उत्पादनपैकी बराच मोठा भाग अन्न, जनावरांचे खाद्य तसेच कोंबड्यांचे खाद्य म्हणून वापरला जाते. काही देशात तर हे प्रमाण ८५ ते ९०% आहे. सर्वसाधारणपणे ७० ते ७५% पशुखाद्य म्हणून वापरले जाते. तर १० ते १५% उत्पादन उद्योगांमध्ये प्रक्रियासाठी (वेट मिलींग), स्टार्च सायरप, तेल, डेक्ट्रोज इ. साठी वापरले जाते आणि उरलेले ड्रायमिलींग, अन्नधान्य आणि बियाणे म्हणून वापरले जाते.

३) भारतात मका पीक ६५% घरगुती वापरासाठी आणि १४.५% पशुखाद्य व पक्षीखाद्य, १०% उत्पादन स्ट्रार्चसाठी, ९% इतर प्रक्रियांसाठी (तेल इथेनॉलसाठी) आणि १.५% बियाणे म्हणून वापरले जाते.

* मक्याची मागणी : कुक्कुट पालनासाठी खाद्य आणि रसायन उद्योग यासाठी कच्च्या मालाची आवश्यकता असल्याने मक्याला जोरदार मागणी आहे. या धान्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खूप मागणी आहे. आपल्या देशात पिकणाऱ्या मक्याची प्रत जगामध्ये तुलनेने सर्वात्कृष्ट आहे. भारतात पशुखाद्य आणि रसायन उद्योगांच्या गरजा भागविता याव्यात म्हणून येत्या काही वर्षात मक्याचे उत्पादन व उत्पादकता वाढवून ती प्रगत राष्ट्रांच्या पातळीवर आणली पाहिजे.

* मक्यापासून पशुखाद्य, तेले, स्टार्च इ. तयार केले जाते.

१) कॉर्नतेल - भारतामध्ये सरसरी २२५ ते २५० लाख टन मक्याचे उत्पादन होते. त्यापैकी साधारण २०% म्हणजे ४५ ते ५० लाख टन मका प्रक्रिया उद्योगसाठी वापरली जाते. मक्याच्या दाण्यात ३.९ ते ५.८% स्निग्ध पदार्थ असतात. म्हणजे १५० ते २०० हजार टन कॉर्नतेल मिळते. हे तेल जगातील उत्कृष्ट तेल असून मानवी आरोग्यास चांगले असते. त्यामुळे याला मागणी आहे.

२) हाय फ्रक्टोज सायरप - ४२% फ्रक्टोज सायरपची गोडी सुक्रोज इतकी किंवा इनव्हर्ट साखरे इतकी आहे. यामुळे अन्न उत्पादनाच्या उपयोगात फ्रक्टोजचा समावेश राहील. आयसोमेरिझम तंत्राया वापर करून दोन हाय फ्रक्टोज सायरप तयार झाली आहेत. एक 'आयसोमेरोज ६००' ६०% फ्रक्टोज तर दोन 'आयसोमरोज ९००' ९०% फ़्रक्टोज असते ते सॅकॅरिनला पर्याय म्हणून वापरता येईल.

३) लॅक्टिक अॅसिड - मक्यापासून लॅक्टिक अॅसिड मिळते त्याचा उपयोग फळांची जेली, अर्क, पेये, मिठाई लोणची अशा पदार्थांना स्वाद आणण्यासाठी होतो. तसेच मक्यापासून ग्लुटेन हे वेट मिलींग प्रक्रियेतून तयार होते. यात प्रथिने व अन्नद्रव्ये असतात. झेन हे एक प्रथिने सॉल्व्हट, एक्टॅक्शन (अर्क करणे) आणि प्रेसिपिटेशन तंत्रान वेगळे करतात. औषधांच्या गोळ्यांचे आवरणासाठी याचा उपयोग

त्याचप्रमाणे गहू व तांदुक यांच्या तुलनेत अधिक उत्पादन देणाऱ्या मक्याचे क्षेत्र अधिक आहे.

अ.क्र.   बाब   गहू   भात  मका  
१)   जागतिक उत्पादकता (क्विं./ हे)   १८.७   १८.३   ३८.१०  
२)   भारतीय उत्पादकता (क्विं./हे)   २१.२   १६.५   १५.१  
३)   अधिक उत्पदान देणाऱ्या वाणांचे क्षेत्राची टक्केवारी   ८३%   ७२%   ३४%  


म्हणजे भारताची मक्याची सरासरी उत्पादकता १५.१% क्विं./हे एवढी आहे. याचे कारण अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांखालील देशातील क्षेत्र कमी आहे.

बियाणे - रब्बी हंगामासाठी अधिक उत्पादन मिळण्यासाठी रोपांची संख्या ९०,००० प्रति हेक्टर आणि खरीप हंगामासाठी ६५,००० ते ७५,००० इतकी ठेवणे फायदेशीर ठरते. दोन ओळीतील अंतर ६० ते ७५ सेमी आणि २ रोपांतील अंतर २० सेमी ठेवल्यामुळे अपेक्षित रोपे राखता येतात. यासाठी हेक्टरी २० - २५ किलो बियाणे लागते.

बीज प्रक्रिया - जर्मिनेटर २५ मिली + १ किलो बी + १ लि. पाणी या द्रावणात १५ ते २० मिनीटे भिजवून लागवड करावी. ज्यावेळेस प्रतिकुल परिस्थितीत म्हणजे कमी पाऊस किंवा पाण्याची उपलब्धता नसते. तसेच पेरणीनंतर उशीरा पाऊस सुरू झाल्याने पेरलेले बी वाया जाते. अशावेळी सुरूवातीसच जर्मिनेटसोबत 'प्रिझम' २० मिलीचा वापर करावा म्हणजे अशा कमी ते मध्यम प्रतिकूल परिस्थितीत देखील बियाची ८० ते ९० % उगवण होऊन पेरणी यशस्वी होते.

मक्याची पेरणी - खरीप, रब्बी, उन्हाळी अशा तिन्ही हंगामात केली जाते. यामध्ये खरीप व रब्बी हे मुख्य हंगाम आहते. खरीपातील मक्याची पेरणी पाऊस सुरू होण्याच्या १० ते १५ दिवस आधी (पाण्याची सोय असल्यास) केल्यास पाऊस सुरू झाल्यानंतर पेरणी केलेल्या मक्यापेक्षा १५% उत्पादन अधिक मिळते. लवकर पेरणी केल्यामुळे तणांचा बंदोबस्त करता येतो. पाण्याची व्यवस्था नसल्यास पाऊस झाल्यानंतर जमिनीत पुरेसा ओलावा झाल्यावर लगेच पेरणी करावी. म्हणजे उगवण चांगली होईल. रब्बी हंगाम बियाच्या उगवणीच्या बाबतीत प्रतिकुल ठरतो. त्यासाठी योग्यवेळी पेरणी करणे आवश्यक असते. १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर नंतरच्या काळात मक्याच्या क्षेत्रात तापमान एकदम खाली जाते. त्यामुळे उगवण कमी होऊन पिकाची वाढही मंदावते. तसेच उशीरा पेरणी केलेल्या पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होतो. तशी वेळेवर पेरणी केलेल्या पिकात नसतो. त्याकरिता ऑक्टोबरअखेर पेरणी पुर्ण करावी. ऑक्टोबरचा मध्य काळ चांगला असतो. हिवाळी हंगामातील पेरणी डिसेंबर अखेरपर्यंत करतात, मात्र उत्पादनाची पातळी कमी होते. तापमान कमी असते अशावेळी सरीच्या खोलगट भागात पेरणी करावी. डिसेंबरनंतर सुर्य दक्षिणायनातून जात असल्याने सारी पुर्व - पश्चिम काढून दक्षिणेकडील बाजूस तळाशी पेरणी करावी. म्हणजे उत्तमप्रकारे सुर्यप्रकाश मिळून वाढ चांगली होते.

खते - मक्याला जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करणे जमिनीच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते, मात्र मका हे कमी दिवसात अधिक उत्पदान देणारे खादाड पीक असल्याने त्याला खताची मात्रा मोठ्या प्रमाणात लागते. त्यासाठी शेणखत एकरी १५ ते २० टन पुर्व मशागतीच्यावेळी देऊन लागवडीच्यावेळी १ - १ चमचा कल्पतरू सेंद्रिय खताचा (एकरी २ ते ३ बॅगा) बी टोकाताना द्यावे तसेच रासायनिक खताचीही मात्रा आवश्यकतेनुसार द्यावी. यामध्ये बागायती पिकास १२० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ४० किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. तर पावसावरील मक्यास ७० किलो नत्र, ३५ किलो स्फुरद व २५ किलो पालाश द्यावे.

सुक्ष्म अन्नद्रव्ये - मका पिकास झिंक सल्फेटचा वापर करणे उत्पादनाच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. त्याकरिता हेक्टरी २० किलो झिंक सल्फेट नांगरणीच्यावेळी द्यावे. मात्र हे खत देताना स्फुरदयुक्त खतांबरोबर मिसळनार नाही याची दक्षता घ्यावी.

* मका पिकातील तणाचे नियंत्रण : तणे ही अन्नद्र्व्यांसाठी व पाण्यासाठी मुख्य पिकाशी स्पर्धा करतात. त्यामुळे उत्पादनात घट येते. मका पिकात प्रमुख्याने रुंद पानांची तणे गवत, सायप्रस रोटंडस व फालारिस मायनॉर ही तणे पिकाबरोबर वाढतात. सायप्रस रोटंडस आणि फालारिस व्यतिरिक्त रुंद पानाच्या तणाचे नियंत्रण १ किलो अॅट्रॅझिन/एकरी याप्रमाणे उगवणीपुर्वी फवारली असता होते. तसेच उगवणीपुर्वीच्या तणनाशकाने नियंत्रीत न आलेली तणे १ - २ आंतरमशागतीने नियंत्रणात येतात. तणनाशक फवारताना वापरण्याची वेळ व त्याचे प्रमाण हे तणनियंत्रणासाठी फार महत्त्वाचे असते.

* मक्यावरील प्रमुख किडी :

१) खोड पोखरणारी आळी : ही अळी रोपाचे मूळ सोडले तर सर्वच भागावर हल्ला करते. अळी सर्व अवस्थांमध्ये मक्याचे खोड, कणीस पोखरते. लहान अळी पानांवर बारीक छिद्र पाडून त्यावर आपली उपजिवीका करते. अशी छिद्रे मोठी झाली की मग अळी देठाभोवती पेराजवळ छिद्र (भोक) पाडून आत शिरते व देठ खाते. कालांतराने खोडाचा मध्यभाग वाळू लागतो व कोवळे पीक पुर्णपणे मरते. जुने पीक सहसा या अळीच्या प्रादुर्भावाने मरत नाही, मात्र खोडाचा गार कुरतडल्याने रोपाचा जोम थांबतो. अशी रोपे हलक्याशा वाऱ्यादेखील पडतात व वाळतात. या किडीचा प्रादुर्भाव वाढल्यास २४.३ ते ३६.३ % पर्यंत उत्पादनात घट येते.

या किडीच्या नियंत्रणासाठी सप्तामृतसोबत स्प्लेंडर हे किटकनाशक २० मिली/१० लि. पाणी याप्रमाणे ८ - ८ दिवसांनी २ वेळा फवारावे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सप्तामृत फवारणीसोबत स्प्लेंडर घेत राहणे. म्हणजे किडीचा प्रादुर्भाव टाळता येतो. रासानिक औषधांमध्ये नुवान अथवा क्लोरोपायरीफॉस १५ मिली/१० लि. पाण्यातून २ वेळा फवारावे.

२) खोडमाशी : या किडीच्या लहान अळ्या प्रथम पानांच्या अवरणाकडे जातात आणि बाजूने छिद्र पाडून खोडात शिरतात. वाढीच्या ठिकाणचा भाग खातात. २५ दिवसांच्या झाडांची पाने गुंततात. रोप मरत नाही, मात्र वाढ खुंटते.

या किडीच्या नियंत्रणासाठीदेखील वरील प्रमाणेच नियोजन करावे.

३) लष्करी अळी : ही अळी खादाड अळी म्हणून ओळखली जाते. मक्याच्या रोपांवर याचा प्रादुर्भाव होताच ती आधाशीपणे पीक नष्ट करते. प्रथम ही कीड कोवळी पाने खावून जगते. मोठ्या अळ्या मोठी पाने खातात आणि झाडाचा सांगाडाच शिल्लक राहतो. या अळ्यांनी टाकलेला उत्सर्जित पदार्थ पानांवर ठिपक्यांच्या स्वरूपात दिसतो. अळ्या कोवळी कणसेदेखील खातात. अळ्यांचे प्रमाण वाढले की पूर्ण शेतच्या शेत फस्त करतात. नियंत्रणासाठी वरीलप्रमाणे उपाययोजना करावी.

४) मावा. पावसाळ्यात या किडीचा जास्त प्रादुर्भाव होतो. पाने खात इतर भागांवर पसरून तो खावून त्यावर जगते. कीड पिकाचा रस शोषते. माव्याचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास पाने वेडीवाकडी होतात व रोपाची वाढ खुंटते. ही कीड विष्टेद्वारे मधासारखा स्त्राव बाहेर टाकते. त्यामुळे उत्पादनात घट येते. मावा किडीच्या नियंत्रणासाठी मॅलेथिऑन किंवा फॉस्फोमिडॉन ०.०५% ची फवारणी करावी.

* मक्याच्या निरोगी वाढीसाठी तसेच दर्जेदार चांगल्या उत्पादनासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पुढीलप्रमाणे फवारण्या कराव्यात.

१) पहिली फवारणी : (उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रिझम १०० मिली. + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + हार्मोनी १०० मिली. + स्प्लेंडर १०० मिली. + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (उगवणीनंतर २५ ते ३० दिवसांनी) : थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ राईपनर २५० मिली. + प्रिझम २५० मिली.+ न्युट्राटोन २५० मिली. + हार्मोनी २५० मिली.+ स्प्लेंडर २५० मिली. + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (उगवणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी) : थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली.+ न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी ३०० मिली.+ स्प्लेंडर ३०० मिली. + २०० लि.पाणी.

* मका प्रक्रिया आणि मूल्यवृद्धी : सध्या स्टार्च आणि माल्ट उद्योगासाठी २.८ दशलक्ष टन मक्याची प्रक्रिया होत आहे. सर्वसाधारणपणे मक्याची भाकरी जेवणात खाल्ली जाते. लिंबाच्या पाण्यात मका उकडल्यास त्याची साल लवकर निघते. त्यानंतर त्यापासून सपाटपाव बनवितात. लिंबू प्रक्रिया केलेल्या मक्याच्या पिठास बाजारात खूप मागणी आहे. सोयाबीन व चवळीप्रमाणे मक्याची लापशी बनविता येते. खेडेगावातील स्त्रियांमध्ये पंडूरोग (अॅनिमिया) मोठ्या प्रमाणात पसरल्याचे आढळते, तेव्हा त्यांना पालेभाज्यांबरोबर मक्याचे पदार्थ खाण्यास देणे फायदेशीर ठरते.

रेड सिग्नल (लाल दिवा)

गेल्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये विशेष करून खान्देश, मराठावाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये मक्याची लागवड झपाट्याने वाढत आहे. खरीपात हे पीक घेतल्यानंतर ऑक्टोबरमध्ये काढणीस येते. कधी काळी ३ ते ४ रू. किलो मिळणारी मका सध्या १० ते १२ रू. किलो झाली आहे. तसेच एकरी २५ ते ५० क्विंटलपर्यंत उत्पादन काढणारे शेतकरीहि आहेत. त्यामुळे कमी काळात अधिक उत्पादन मिळाल्याने मक्याखालील क्षेत्रात वाढ होत आहे.

युरोप आणि अमेरिका या प्रगत राष्ट्रांत ओझोनचे प्रमाण कमी होऊन कार्बनचे प्रमाण वाढल्याने तेथील पॉलिहाऊसचे प्रमाण कमी करून ते दुष्परिणामकारक, महागडे तंत्रज्ञान भारतात आले आणि सबसिडीच्या आधाराने ते पसरू लागले. त्या तत्वावर मक्याला भारतात आश्रय मिळाला आहे. शेतकरी फेरपालटीमध्ये कापसानंतर मका घेवू लागले. जरी हे तृणमूलवर्गीय (Gramminee Family) पीक असले तरी ते खादाड पीक आहे असे जगभर माहित आहे. ज्याप्रमाणे ऊस पिकाचे अधिक पाणी व अधिक रासायनिक खताने काही टप्प्यापर्यंत उत्पादन वाढले, परंतु सततच्या निविष्ठांच्या अधिक (रासायनिक व पाणी) माऱ्याने ६० टनाची सरासरी ३० टनावर खाली आली आणि हे शासनाला व शास्त्रज्ञांना कळायला १५ वर्षे लागले. तोपर्यंत जमिनी खराब झाल्या आणि यावर उपाय शोधण्यासाठी वेळ आणि खर्च वाढू लागला.

फेरपालट आणि पिकांचे नियोजन, सेंद्रिय खतांचा, हिरवळीच्या खतांचा वापर नाही केला तर उसाहूनही बिकट अवस्था या मक्याने जमिनीची होईल, मक्यामुळे शेतकऱ्यांना तात्पुरता फायदा होईल परंतु सततच्या मक्यामुळे जमिनीची जडण - घडण, सेंद्रिय सुपिकतेचा, जैविक सुपिकतेचा, रासायनिक सुपिकतेचा नाश होऊन तो एक भारतीय शेतीला शाप ठरेल. वसुंधरेची भाषा आजार सुरू झाल्यावर शास्त्रज्ञांनाही कळायला १० त १५ वर्ष लागतात. मग ते सतत राबणाऱ्या अज्ञानी शेतकऱ्याचे काय ? त्याकरिता रासायनिक खतापेक्षा उसाचे पाचट, धसकटे, विविध प्रकारची हिरवळीची खते, गांडूळ खताचा व कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर आवश्यक तेवढ्या प्रमाणात करून जमिनीचे आरोग्य दिर्घकाळ टिकविता येईल. मात्र तरीही ही धोक्याची सुचना समजावी.