कपाशीची आधुनिक लागवड

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


नगदी पिकात महत्त्वाचे पीक कापूस असून पांढरे सोने म्हणून त्यास संबोधले जाते. देशात उत्पादन होणार्‍या क्षेत्रापैकी सर्वसाधारण १/३ क्षेत्र महाराष्ट्र राज्यात आहे. महाराष्ट्रात सुमारे २५ ते २७ लाख हेकटर क्षेत्र असून त्यातील जिरायत क्षेत्राचे प्रमाण जास्त असून बागायत क्षेत्र ३ ते ४ टक्के आहे. प्रामुख्याने ज्या भागात उन्हाळी पीक घेतले जाते त्या भागातच कमी पाण्यात व ६ महिन्यात बागायत कापूस पिकाचे उत्पादन चांगले मिळत असल्याने आर्थिक गरजेसाठी या पिकास जास्त महत्त्व प्राप्त होते. उत्पादन वाढीसाठी सुधारित पद्धतीने लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन घेणे योग्य ठरेल.

हवामान : कापूस पिकास संपूर्ण कालावधीसाठी ५०० ते ६०० मि.मी. पाऊस लागतो.

पेरणीच्यावेळी ७५ ते १०० मि.मी. पाऊस ब बियाणे उगवणीसाठी १५ डी सें.ग्रे. तापमानाची गरज असते.

रोप अवस्थेत शारीरिक वाढीसाठी २१ ते २८ डी. सें.ग्रे. तापमानाची गरज असते.

कापसाला जास्त फुले येण्याकरिता दिवसाचे तापमान २४ डी ते २८ डी सें.ग्रे. रात्रीचे तापमान २० डी. ते २१ डी. सें.ग्रे. लागते.

रात्रीचे २४ डी. सें.ग्रे. चे वर व दिवसाचे ३० डी. सें.ग्रे. चे वर तापमान गेल्यास फुले व पाते गळण्याचे प्रमाण वाढते.

जमीन : कापूस लागवडीसाठी जमीन निवडताना त्या जमिनीच्या नावातच काळी कापसाची जमीन हा उल्लेख येतो. परंतु बागायती कापूस लागवडीसाठी मध्यम, पाण्याचा चांगला निचरा होणारी, ७ ते ८ पर्यंत सामू आणि १ % पेक्षा जास्त सेंद्रिय कर्ब असलेली जमीन निवडावी. मात्र हंगामातील कापूस लागवडीसाठी मध्यम ते भारी जमीन योग्य असते. पूर्वहंगामी कापूस लागवड मे महिन्यात होत असल्यामुळे जास्त हलक्य जमिनीत किंवा खोल काळ्या जमिनीत या पिकाची लागवड केल्यास पाणी व्यवस्थापनेमध्ये अडचणी येऊ शकतात, म्हणून जमिनीची निवड योग्य पद्धतीने होईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

जमिनीची पूर्वतयारी : खोल नांगस्ट, कुळवाच्या ३ ते ४ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. या पिकाच्या मुळ्या खोल जात असल्यामुळे हे आवश्यक आहे.

कापूस लागवडीपूर्वी शेवटची पाळी देताना ती पूर्व - पश्चिम द्यावी. म्हणजे लागवड करताना अडचण येणार नाही.

शेवटच्या पाळीपूर्वी एकरी ८ ते १० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात मिसळावे.

जमिनीची पूर्वतयारी : कोळपट (न नांगरलेल्या ) रानामध्ये कापूस लावू नये. कारण पाण्याचा किंवा पावसाचा थोडाही ताण पडल्यास अशा जमिनीतील कपाशीचे उत्पादन घटते, हे सिद्ध झालेले आहे. त्यामुळे नांगरटीशिवाय कापूस लावू नये.

पूर्वीचे पीक गहू असेल तर उत्तम, नसल्यास एकरी एक ते दीड ट्रोंली गव्हाचे काड शेतात मिसळल्यास जमिनीला पाण्याच्या ताणाच्या काळात भेगा पडत नाहीत. पर्यायाने ओल उडण्याचे प्रमाण कमी होते.

लागवडीची वेळ : पूर्वहंगामी कापूस लागवड करताना आपण वेळेचा विचार कधी केल्याचे दिसून येत नाही. मग अक्षय्य तृतीयेपासून ते मे अखेर किंवा जूनचा पहिला आठवडा या कालावधीमध्ये आपण लागवड करत असतो. या विषयावर जास्त माहिती व्हावी, महणून कपाशीचे शरीरशास्त्राचा या ठिकाणी आपण आधार घेणार आहोत. काही थोड्या जाती वगळता इतर सर्व जातींमध्ये कपाशीच्या झाडास लागवडीपासून ३० ते ३५ दिवसांनी पाते, ५० ते ५५ दिवसांनी फुले, ९० दिवसांनी बोंडे तयार होणे आणि १२० दिवसांनी बोंडे फुटून कापूस वेचणीस येतो.

जर १ ते २० मे रोजी कपाशीची लागवड केल्यास त्याची बोंडे फुटण्याची अवस्था ही साधारणपणे १० सप्टेंबर रोजी पूर्ण होते. कापसाच्या भागामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात हमखास मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. त्यातल्या त्यात मराठवाडा विभागामध्ये परतीचा मान्सून मोठ्या प्रमाणावर येतो, हे नक्की. मग यावेळी एकतर पावसामुळे बोंडे सडण्यास सुरुवात होते. फुटलेले बोंड पावसात सापडल्यामुळे मोठे नुकसान होते आणि सुरुवातीस लागलेली चांगली बोंडे खराब झाल्यामुळे उत्पादनावर फार मोठा परिणाम संभवतो. म्हणून पूर्वहंगामी कापूस लागवड २० मे ते २५ मे या दरम्यान करावी. या अगोदर लागवड लक्षात घेऊन मगच वाणांची निवड करावी. साधारणपणे ७५ ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतरच लागवड करणे योग्य. लागवडीत चूक केल्यास तूट होण्याची शकयता जास्त असते.

अ.क्र.   कपाशीच्या वाणांचा प्रकार  
लागवड अंतर (सें.मी.)
भारी जमीन मध्यम जमीन
एकरी झाडांची संख्या
भारी जमीन मध्यम जमीन
1)   बागायती सं.बी.टी. वाण  
१८० x ३०   १५० x ३०  
७२६०   ८७००  
२)   कोरडवाहू सं.बी.टी. वाण  
१५० x ३०   १२० x ३०  
८७००   १०८२०  
३)   कोरडवाहू सं.बी.टी. वाण  
९० x ३०   ६० x ३०  
१४५२०   २१७८० 
४)   सर्व इतर संकरित वाण  
१५० x ६०   १२० x ६०  
४३५०   ५४४५  
५)   सर्व इतर सुधारित वाण  
६० x ३०   ६० x ३० 
२१७८०   २१७८०  


बीजप्रक्रिया : कपाशीमध्ये किडी, रोग व अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी बीजपक्रिया करावी. यासाठी पुढीलप्रमाणे बीजप्रक्रिया कराव्यात.

१) जर्मिनेटर २५ ते ३० मिली + १० ग्रॅम प्रोटेक्टंट + २५० मिली पाणी या द्रावणात १ किलो बी कालवून घ्यावे. म्हणजे उगवण लवकर व अधिक होईल.

२) बाजारात उपलब्ध असलेल्या बियाण्यास इमिडाक्लोप्रीड या किटकनाशकाची प्रक्रिया सामान्यत : करू नये. कोरडवाहू कापूस लागवड करताना दोन प्रकाराने करता येते.

१) धूळ पेरणी : यामध्ये गावरान जातीची लागवड करत येईल. बियाणाची किंमत कमी असल्यामुळे, पाऊस न पडल्यामुळे किंवा कमी पावसामुळे होणारे नुकसान हे कमी राहील.

२) पाऊस पडल्यानंतर : यामध्ये ज्यावेळी पाऊस सुरू होईल, त्यानंतर लगेच लागवड करणे. कापूस, मूग, उडीद ही पिके सर्वात अगोदर पेरावीत.

कोरडवाहू कापूस लागवड करताना कालावधी केलेली असते, नसल्यास इमिडाक्लोप्रीड / थायोमिथाक्झाम या किटकनाशकाची ७.५ ग्रॅम प्रति किलोग्रॅम बियाणे

या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. यामुळे रस शोषणार्‍या किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.

पेरणीसाठी वाणांची निवड : कापूस लागवड करताना त्या वाणांचा कालावधी लक्षात घेऊनच त्यांची निवड करावी. सर्व वाण बी. टी. १ व २ या प्रकरात उपलब्ध आहेत. १) पूर्वहंगामी (२५ मे ते १० जून ) - जास्त कालावधीचे वाण जसे महिको - ७३५१, पारस ब्रम्हा, जेके-९९, राशी -२, अजित -११, गब्बर, छत्रपती इ.

२) हंगामी (१० जून ते ३० जून ) - अजित - १५५, मल्लिका, बन्नी, महाशक्ती, कॅश, कृषिधन -९६३२, प्रतीक, मार्गो, महिको - १६२, सिग्मा - ६, एनकाऊंटर, दुर्गा विश्वनाथ, नांदेड -४४ इ.

३) उशिरा लागवड (१ जुलै ते १५ जुलै) - महिको - ६३०१, किसान अली, डायना, नांदेड - ४४ इ.

इतर सुधारित वाण : बी. एन - १ (बीटी), एलआरए -५१६६ रजत, जीएलए - ७९४.

खते :

भरखते : अधिक व दर्जेदार कापसाचे उत्पादन मिळवण्याकरिता ४ ये ६ टक्के सेंद्रिय पदार्थ जमिनीत आवश्यक आहे. कोरडवाहू कपाशीसाठी २५ गाड्या (१२.५ टन) व बागायत कपाशीसाठी ५० गाड्या (२५ टन ) चांगले कुजलेलेल शेणखत किंवा कंपोस्ट खत शेवटच्या पाळीपूर्वी जमिनीत मिसळून द्यावे किंवा हेक्टरी ५ टन गांडूळखत कापूस लागवडीनंतर २० ते २५ दिवसांनी पाळीसोबत जमिनीत मिसळावे.

कल्पतरू सेंद्रिय खत : बी लागवडीच्यावेळी प्रत्येक ठिकाणी ५० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत मातीआड करून त्यावर बी टोकावे. नंतर पहिली खुरपणी झाल्यावर एकरी १०० किलो कल्पतरू खत द्यावे. बागायती कापसास फुलापात्या लागतेवेळी पुन्हा एकदा एकरी १०० किलो कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे. हे खत दिल्यामुळे खालील रासायनिक खताच्या मात्रेत ५० % बचत होते असे प्रयोगावरून आढळून आले आहे.

वरखते : कपाशीचे पीक त्याच्या विविध वाढींच्या अवस्थेत खालीलप्रमाणे नत्र, द्फुरद व पालाश शोषण करते.

अ. क्र.   अवस्था   नत्र टक्के   स्फुरद टक्के   पालाश टक्के  
१)   रोप अवस्था (७ ते १० दिवस)   ४.४   २.५   ३  
२)   रोप ते पाते येण्याची वेळ (३० ते ४५ दिवस)   १२.८   ७.८   १३.८  
३)   पाते ते बोंड घरणे अवस्था ( ६० ते ७० दिवसात)   ४३.३   ३४   ३४.७  
४)   बी धरणे ते पक्कता   ३९.५   ३७   ४७.५  
पूर्वहंगामी कपाशीसाठी खत मात्रा : बी . टी . वाणांसाठी व पूर्व हंगामी लागवडीसाठी खतांच्या मात्रा (२० मे ते ७ जून लागवड ) पुढील प्रमाणे घ्याव्यात.

१) लागवडीपूर्वी एकरी २५ कि. नत्र, २५ कि. स्फुरद, ३५ कि. पालाश, १० कि. गंधक, १० कि. मॅग्नेशियम सल्फेट.

२) लागवडीपासून २५ दिवसांनी एकरी २५ किलो नत्र (कॅल्शियम, अमोनियम, नायट्रेटच्या माध्यमातून)

३) लागवडीपासून ५० दिवसांनी २५ किलो नत्र, ३५ किलो पालाश, १० किलो मॅग्नेशियम व १० किलो गंधक.

४) लागवडीपासून ७० दिवसांनी २५ किलो नत्र (अमोनियम सल्फेटच्या माध्यमातून)

हंगामी लागवडीसाठी खत मात्रा : बी. टी. वाणांसाठी व हंगामी लागवडीसाठी खतांच्या मात्रा (७ जून ते ३० जून लागवड) पुढील प्रमाणे घ्याव्यात.

१) लागवडीपूर्वी एकरी १५ किलो नत्र, ३० किलो स्फुरद, २० किलो पालाश, १० किलो गंधक, १० किलो मॅग्नेशियम सल्फेट.

२) लागवडीपासून २५ दिवसांनी एकरी १५ किलो नत्र (कॅल्शियम, अमोनियम, नायट्रेटच्या माध्यमातून)

३) लागवडीपासून ५० दिवसांनी १५ किलो नत्र ,२० किलो पालाश, १० किलो मॅग्नेशियम सल्फेट.

४) लागवडीपासून ७० दिवसांनी १५ किलो नत्र (अमोनियम सल्फेटच्या माध्यमातून)

ठिबक सिंचनाद्वारे पिकासाठी लागणार्‍या पाण्याची गरज काढण्यासाठी महत्त्वाच्या बाबी:

१) पीक व पिकाचे वय,

२) जमिनीची प्रत,

३) जमिनीच्या पृष्ठभागावरून होणारे बाष्पीभवन,

४) पानांवाटे होणारे उत्सर्जन ,

५) मुळांचा विस्तार ,

६) दोन ओळीतील व दोन रोपातील अंतर ,

७) वार्‍याचा वेग व हवेतील आर्द्रता.

ठिबक सिंचन संचाची निगा :

१) संपूर्ण संचाची नियमितपणे पाहणी करावी

२) फिल्टर नियमितपणे साफ करावा .

३) रासायनिक प्रक्रिया नियमितपणे करा - पाण्यातील क्षार, सूक्ष्म जीव, शेवाळ इत्यादींमुळे ठिबक सिंचन संचातील पाण्याच्या प्रवाहामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. याकरिता नियमितपणे रासायनिक प्रक्रिया करणे आवश्यक आहे.

४) पाईलाईन नियमितपणे साफ करा - आढवड्यातून एक वेळ संपूर्ण पाईल लाईनची पाहणी करून पाण्याची गळती आहे का ते पहावे. पाणी ठिबकणार्‍या तोट्या (ड्रीपर ) ठीकपणे कार्यरत आहेत किंवा नाहीत. हे पहावे.

ठिबक पद्धतीचा अवलंब करावयाचा असल्यास, ओलिताचे पाणी तपासून घ्यावे. म्हणजे ते पाणी ठिबक सिंचनास योग्य आहे किंवा नाही हे ठरविता येईल, जमीन तयार करताना हेक्टरी २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा सेंद्रिय खत टाकावे. ठिबक सिंचनाद्वारे रासायनिक खते देत येतात. त्यासठी साध्या ठिबक सिंचन संचाला व्हेंच्युरी बसविणे आवश्यक आहे.

ठळक बाबी : माती परिक्षणाप्रमाणे ठरविलेल्या खताची मात्रा खालील पद्धतीने देत येईल.

अ) नत्र व पोटॅशची प्रत्येकी १ /३ मात्रा उगवणीच्या वेळी ठिबक सिंचनाद्वारे द्यावी.

ब) स्फुरदाची ७०% मात्रा जमिनीत प्राथमिक मात्र म्हणून सुपर फॉस्फेटद्वारे द्यावी.

क) ३५ ते ४० दिवसांनी राहिलेले ३० टक्के स्फुरद, २/३ भाग नत्र व पोटॅश ठिबक सिंचनाद्वारे ५ समान टप्प्यात विभागून दर आठवड्यास याप्रमाणे द्यावे. नत्रासाठी पाण्यात विरघळणारा युरिया, पालाशसाठी म्युरेट ऑफ पोटॅश ही खते वापरावीत आणि स्फूरदासाठी डी. ए. पी. पाण्यात विरघळवून व गाळून वापरावे.

ठिबकद्वारे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे सप्तामृत देता येते. त्यासाठी आमच्या कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वापर करावा.

एकात्मिक तण व्यवस्थापन : १) नांग्या भरणे, २) विरळणी , ३) खुरपणी ४) कोळपणी ५) तणनाशकांचा वापर.

कापसाचे झाड सुरवातील अतिशय हळू वाढते, म्हणून ६० दिवसांपर्यंत तणांचा जास्त प्रादुर्भाव होतो आणि वेळीच बंदोबस्त झाला नाही, तर अतोनात नुकसान होते. तणांचा बंदोबस्त ३ प्रकारे करावा.

अ) निंदणी गरजेप्रमाणे मजुरांकडून २ ते ३ वेळा करावी आणि पीक तण विरहित ठेवावे.

ब) आंतरमशागत - गरजेप्रमाणे कुळवाच्या पाळ्या वरचेवर देत राहाव्यात. औत पाळी देताना फक्त सुरुवातीलाच त्यावर उभे राहून घालावी. या नंतर मात्र हाताभारानेच पाळी दिली पाहिजे, दोन पाळ्यांतील अंतर १५ ते २१ दिवस असावे. हस्त नक्षत्रामध्ये पहिल्या चरणात पाऊस पडल्यास जमीन कडक येते. त्यासाठी हस्त नक्षत्रास सुरुवात होण्यापुर्वी एक हलकी पाळी द्यावी. म्हणजे कापूस लाल पडत नाही.

जुनी पाने काढणे: कपाशीचे पीक ६० दिवसांचे असताना झाडांना ११ पासून १३ फांद्या आलेल्या असतात. यावेळी शेंड्याकडील तीन फांद्या सोडून झाडावरील इतर फाद्यांखालील जुने पान काढावे. जास्तीत जास्त ८ ते ११ पाने एका झाडाची निघतात. पाने शेतातच पडू द्यावीत. यामुळे उत्पादनात २० टक्क्यांपर्यंत वाढ होते. संपूर्ण झाड मोकळे होते असल्यामुळे जुन्या पानांखाली लपून बसणार्‍या किंडीपासून व रोगांपासून संरक्षण तर होतेच, त्याचाबरोबर संपूर्ण खोड व फांद्या सूर्यप्रकाशात आल्यामुळे बोंडे लागण्यामध्ये अडचण येत नाही.

पाणी व्यवस्थापन : कपाशीच्या पाण्याच्या गरजेनुसार चार संवेदनशील अवस्था आहेत.

१) रोपावस्था : पेरणीपासून २५ दिवसांचे काळात पाण्याची कमतरता पडल्यास झाडांची वाढ थांबते फांद्या व बोंडे कमी लागतात.

२) पाते येण्याची अवस्था : लागवडीपासून ४० ते ४५ दिवसांचे काळात पाणी कमी पडल्यास पात्यांची गळ होऊन बोंडे कमी लागतात.

३) फुलोरा येणे : लागवडीपासून ७५ ते ९० दिवसांच्या काळात पाणी कमी पडल्यास पाते व फुले गळतात व बोंड लहान राहते.

४) बोंडांची वाढ : लागवडीपासून ११५ ते १२५ दिवसांच्या काळात पाणी कमी पडल्यास बोंडे चांगली फुटत नाहीत.

ठिबक सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन : ठिबक सिंचनावर कपाशीची लागवड करावयाची असल्यास योग्य लागवड अंतराची निवड करणे आवश्यक आहे.

१) ५ x १, ६ x १, ४ x २ x १, ५ x २ x १ फूट ही लागवड अंतरे ठिबक सिंचनावर कपाशी लागवडीसाठी वापरावीत. यामुळे ठीबकवरील खर्च कमी करता येईल.

२) जोड ओळ पद्धतीने लागवड करावयाची असल्यास मात्र फांदी खालील मोठे पान पीक ६० दिवसांचे असताना काढणे आवश्यक.

३) लॅटरलवर ३० सें.मी. अंतरावर ड्रिपर असावा. (इनलाईनचा वापर करावा.)

पूर्व हंगामी कपाशीसाठी ठिबकद्वारे सिंचनाचे वेळापत्रक:

महिना   पाण्याची गरज लि./झाड/दिवस   महिना   पाण्याची गरज लि./झाड/दिवस  
मे (लागवड)   १.१३२   ऑक्टोबर   ७.१००  
जून   १.६००   नोव्हेंबर   ४.७५०  
जुलै   २.२१०   डिसेंबर   ३.२६०  
ऑगस्ट   ३.६०५   जानेवारी   ३.३१०  
सप्टेंबर   ५.५००   फेब्रुवारी   ३.६१०  
कापसाच्या दर्जेदार अधिक उत्पादनासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृताची फवारणी


१) पहिली फवारणी : (उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी) : जर्मिनेटर २५० मिली.+ कॉटन थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + हार्मोनी १०० मिली + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (उगवणीनंतर ३० ते ४० दिवसांनी) : जर्मिनेटर ५०० मिली.+ कॉटन थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी १५० मिली + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (उगवणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी) : कॉटन थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली + न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी ३०० मिली + २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : (उगवणीनंतर ७० ते ७५ दिवसांनी) : कॉटन थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ७५० मिली.+ हार्मोनी ३०० मिली + २०० लि. पाणी.

५) पाचवी फवारणी : (९० ते १०५ दिवसांनी) : कॉटन थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर १ लि. + न्युट्राटोन १ लि. + न्युट्राटोन १ लि. + हार्मोनी ३०० ते ४०० मिली + २०० लि. पाणी.

फरदड (खोडवा) कपाशीस डॉ.बावसकर तंत्रज्ञान पुढीलप्रमाणे वापरावे.

कल्पतरू सेंद्रिय खत एकरी १०० किलो द्यावे.

१) पहिली फवारणी : जर्मिनेटर, कॉटन थ्राईवर, प्रिझम प्रत्येकी १ लि. + २५० लि. पाणी याप्रमाणे करावी.

२) दुसरी फवारणी : वरील फवारणीनंतर २१ ते ३० दिवसांनी - कॉटन थ्राईवर,क्रॉंपशाईनर,न्युट्राटोन प्रत्येकी १ लि. + २५० लि. पणी याप्रमाणे करावी.

३) तिसरी फवारणी :(बोंडे पोसून पांढराशुभ्र, लांबधाग्याचा 'ए' ग्रेड कापूस मिळण्यासाठी):

कॉटन थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन प्रत्येकी १ लि. + २०० लि. पाणी याप्रमाणात करावी.

वरील तंत्रज्ञानने फडदड पिकाचे गेल्यावर्षी चांगले उत्पादन विदर्भ, मराठवाड, खानदेश भागातील शेकार्‍यांनी घेतले आहे. त्यासाठी पुढील संदर्भ पहावेत.

कपाशीवरील लाल्या रोगाची लक्षणे : पानाच्या कडा तांबूस दिसतात. शेंड्यावरील पाने लालसर तांबूस झालेली आढळतात व शेवटी पाने वाळून गळून पडतात. लाल्या हा कोणत्याही जीवाणू अथवा विषाणूमुळे होणारा रोग नसून अन्नद्रव्यांच्या कमतरमुळे दिसून येणारी शारीरशास्त्र विकृती आहे.

उच्च उत्पादकता असलेल्या संकरीत व बी. टी. वाणांची लागवड हलक्या जमिनीवर केल्यास अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण होते व लाल्याची लक्षणे दिसून येतात. कापसाची लागवड पाणथळ जमिनीत केल्यामुळे झाडास नत्र घेण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे पाने लाल होऊन झाडांची वाढ खुंटते.

सर्व साधारण परिस्थितीमुले फुले येणे ते बोंडे तयार होण्याच्या कालावधीत नत्राची कमतरता झाल्यास वरील लक्षणे दिसतात. बी.टी. कापसासाठी केलेल्या खताच्या शिफारशीप्रमाणे खते न दिल्यास पात्यांच्या पोषणासाठी झाडांच्या खालच्या पानातील अन्नद्रव्य उपयोगात येते, त्यामुळे पाने लाल पडतात. मॅग्नेशियम या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता हे देखील पाने लाल पडण्याचे एक कारण आहे. अचानक उष्ण वारे वाहू लागल्यास तसेच दिवस व रात्रीच्या तापमानात जास्त फरक पडल्यास पाने लाल होतात. एकाच जमिनीत वारंवार कापसाचे पीक घेतल्यामुळे झाडाला पुरेसे अन्नद्रव्य उपलब्ध होत नाही, त्यामुळे लाल्या उद्भवतो. रस शोषण करणर्‍या किडींमुळे देखील पाने लाल पडतात.

लाल्यावरील उपाययोजना : खताची मात्रा शिफारशीनुसार द्यावी. तसेच लागवडीचे अंतरही शिफारशीप्रमाणे ठेवावे. संकरित व बी. टी. वाणाची लागवड हलक्या जमिनीमध्ये करू नये. पाणथळ जमिनी कापूस लागवडीसाठी टाळाव्यात. पाने व फुले तयार होण्याच्या अवस्थेत जर्मिनेटर ३ मिली, थ्राईवर ३ मिली, हार्मोनी १।। मिली/ लि. पाणी याप्रमाणे फवारणी करावी. बोंडे तयार होण्याच्या अवस्थेत थ्राईवर ३ मिली, क्रॉंपशाईनर ३ मिली, राईपनर २ मिली, न्युट्राटोन २ मिली , हार्मोनी १।। मिली/ लि. पाणी याप्रमाणे फवारणी करावी. लाल्याची लक्षणे दिसताच १ टक्का मॅग्नेशियम सल्फेट फवारावे किंवा प्रति हेक्टरी २० ते ३० किलो मॅग्नेशियम सल्फेट जमिनीत टाकावे.

कीड नियंत्रणासाठी सिंथेटीक पायरेथ्राइडचा वापर कमी करवा. कपाशी लागवडीनंतर ५० ते ७० दिवसांच्या दरम्यान सायकोसिल २ मि.लि. पाण्यात फवारावे. पावसाने जास्त दिवस ताण दिल्यास उपलब्ध सिंचन सुविधेचे पाणी मर्यादितच द्यावे. जास्त पाणी देऊ नये. पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल याची दक्षता घ्यावी.

कापूस वेचणी : १) ३० ते ४० टक्के बोंडे फुटल्यानंतर पाणी देणे बंद करावे.

२) कापूस वेचणी, सकाळच्या वेळी करावी.

३) वेचणी करताना रोगग्रस्त, कवडी, पिवळसर कापूस वेगळा वेचावा .

४) नंतरच्या वेचण्या १५ ते २० दिवसांचे अंतराने कराव्यात.

५) पूर्ण परिपक्क व पूर्ण उमललेल्या बोंडातीलच कापूस वेचावा.

६) वेचणी करताना प्लॅस्टिक गोण्यांचा वापर करू नये.

कापूस साठवण : १) कापसाला बांधावरील गवत व काडीकचरा लागणार नाही, याची काळजी घ्यावी.

२) वेचणीनंतर २ ते ३ दिवस कापूस वाळवाव .

३) प्रत्येक वेचानीचा कापूस वेगळा व जातवार साठवावा .

४) साठवणूक स्वच्छ व मोकळ्या जागी करावी .

५) धूळ, धूर व उंदीर यापासून कापसाचे संरक्षण करावे.

कापूस विक्री :

१) प्रत्येक वेचणीचा कापूस वेगळा व जातवार विक्रीसाठी न्याव.

२) ओलसर कापूस विक्रीसाठी नेऊ नये.

३) कापूस विक्रीसाठी नेतांना त्यावर पाणी मारू नये .

४) शेवटच्या वेचणीचा कापूस वेगळा व सर्वात शेवटी विक्रीसाठी न्यावा.