लिंबू निर्यातीतील संधी व आव्हाने

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


देशात लिंबू उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याचा चौथा क्रमांक लागतो. आंतराराष्ट्रीय स्तरावर लिंबाच्या उत्पादनामध्ये अनुक्रमे मेक्सिको, भारत आणि अर्जेटिना या देशांचा समावेश होतो. संपूर्ण भारतामध्ये लिंबाचे सुमारे १८ लाख मे. टन इतके उत्पादन घेण्यात येते. त्यापैकी महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे १.४० लाख मे. टन इतक्या लिंबाचे उत्पादन घेतले जाते. लिंबाच्या उत्पादनामध्ये भारतानंतर अर्जेंटिना या देशांत जरी क्रमांक लागत असला तरी लिंबू निर्यातीमध्ये अर्जेंटिना या देशांचा आंतराराष्ट्रीय स्तरावर ४९ टक्के इतका वाटा आहे. भारतामधून होणाऱ्या लिंबाच्या सुमारे १३ हजार मे. टन इतक्या निर्यातीपैकी जवळ - जवळ ८५ टक्के लिंबाची निर्यात ही केवळ संयुक्त अरब राष्ट्रांना केली जात असून, इतर आयातदार देशांमध्ये नेपाळ, सौदी अरेबिया, मालदिव, ओमान आणि जर्मनी या देशांचा प्रामुख्याने सहभाग होतो.

महाराष्ट्र राज्यामध्ये लिंबाचे उत्पादन जरी मोठ्या प्रमाणावर घेतले जात असले तरी लागवडीचे क्षेत्र हे मोठ्या प्रमाणावर विखुरलेले आहे. काही लागवडीची क्षेत्रे तर मुंबई बंदरापासून इतक्या दूर अंतरावर आहेत की, त्या ठिकाणावरून लिंबाचे संकलन व पॅकींग करून मुंबई बंदरापर्यंतची वाहतूक करणे हे खूपच खर्चिक आहे. त्यामुळे उत्पादनोत्तर होणाऱ्या अतिरिक्त खर्चावर त्याचा विपरीत परिणाम होतो आणि परिणामी किफायतशीर खर्चामध्ये अथवा आयातदाराला आवश्यक असलेल्या दरांमध्ये लिंबाची व्यापारी दृष्टीने निर्यात करणे यावर मर्यादा येतात. मुख्यत्वेकरून महाराष्ट्रातून लिंबाची निर्यात ही समुद्रामार्गे कंटेनरद्वारे केली जाते. २० फुटी कंटेनरचा विचार केल्यास त्याकरिता मोठ्या प्रमाणावर मालाची आवश्यकता असते. परंतु विखुरित लागवड क्षेत्रामुळे आवश्यक त्या प्रमाणामध्ये निर्यात योग्य गुणवत्तेच्या मालाची उलब्धता करून घेण्यामध्ये अडचणी उद्भवतात

राज्यामध्ये प्रामुख्याने उन्हाळ्यातील हंगाम वगळता इतर हंगामामध्ये घाऊक बाजारातील लिंबाचे दर हे अत्यंत कमी असतात. कारण उन्हाळ्याच्या हंगामात कमी उत्पादनामुळे लिंबाची मागणी तसा पुरवठा होत नाही. निर्यातीच्या बाबतीतसुद्धा हेच सूत्र लागू होते. उन्हाळ्याच्या काळात विविध देशांतून आपणांकडे लिंबू आयातीच्या मागण्या प्राप्त होत असतात. परंतु वाढलेल्या स्थानिक दरांचा विचार करता त्या दरांमध्ये लिंबाची आयात करण्यास आयातदार तयार होत नाही. निर्यातीच्या बाबतीत विचार केल्यास मागणी तसा पुरवठा सातत्य याला खूप महत्त्व असून, त्याचे तंतोतंत पालन न झाल्यास त्याचा निर्यातीवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे मागणी नुसार पुरवठ्याच्या दृष्टीने लागवड करण्याकडे शेतकऱ्यांची लक्ष देणे गरजेचे आहे. राज्यामध्ये उत्पादित होणाऱ्या लिंबामध्ये छोट्या आकाराच्या लिंबाचे प्रमाण जास्त असून. निर्यातीसाठी मोठ्या आकाराच्या लिंबाची जास्ती मागणी असते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रती किलोमध्ये २० ते २२ नग बसतील अशा आकाराच्या लिंबाच्या फळांना मागणी असते त्यामुळे तशा गुणवत्तेच्य लिंबाचे उत्पादन घेण्याबाबत प्रयत्नांची आवश्यकता आहे. त्याबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये इतर देशांच्या तुलनेत स्पर्धा करावयाची झाल्यास उत्पादकता वाढविण्याकडे सुद्धा शेतकऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

राज्यामध्ये जवळ जवळ वर्षभर लिंबाची उपलब्धता असते. हिरवट पिवळ्या रंगाची लिंबू फळे ६% मेणाच्या द्रावणात बुडवून नैसर्गिक तापमानामध्ये सुमारे १५ दिवस टिकू शकतात. शुन्य उर्जेवर आधारित शीतकक्षात सुमारे ४५ दिवस टिकविता येऊ शकतात. त्यामुळे कॅनडा, इस्राईल, इंग्लंड, जर्मनी, इटली, पोलंड, बेल्जियम, स्वित्झर्लंड यासारख्या दूर अंतरावरील विकसित राष्ट्रांमध्ये लिंबाची मोठी मागणी असल्यामुळे अशा देशांना महाराष्ट्रातून लिंबाची निर्यात करण्यास मोठ्या प्रमाणावर वाव आहे. राज्यामध्ये वर्षभर लिंबाची उपलब्धता असल्यामुळे वर्षभर नियमित पणे लिंबाची मोठ्या प्रमाणवर निर्यात करता येऊ शकते आणि ते आव्हान पेलण्याची ताकद राज्यातील लिंबू उत्पादकांमध्ये निर्माण होऊ शकते. तथापि, आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आवश्यक असलेल्या गुणवत्तेबाबतची जागरूकता लिंबू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निर्माण करण्याची गरज आहे आणि त्यासाठी सहकारी संस्थांनी पुढाकार घेऊन कामकाज करणे आवश्यक आहे.

लिंबामध्ये व्हिटॅमिन -सी ची उपलब्धता जास्त असल्यामुळे शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास त्याचा चांगला उपयोग होतो. लिंबू सेवनामुळे रक्त शुद्धीकरणासाठी मदत होते, त्यामुळे शरीरात निर्माण होणाऱ्या विविध विषांपासून मुक्तता मिळू शकते. लिंबू फळाच्या औषधी गुणधर्माचा विचार करता लिंबापासून लेमन ज्यूस, लेमन ऑईल, लेमन पावडर अशा प्रक्रिया युक्त उत्पादनांची निर्मिती करून त्याची निर्यात करणेसुद्धा सहज शक्य आहे. त्यादृष्टीने लिंबूवर आधारीत प्रक्रिया उधोगांची उभारणी करण्याकडे लक्ष देणे काळाची गरज आहे. तसेच लिंबाचे उत्पादन आणि निर्यात याबाबत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे आहे. यास्तव संबंधीत संशोधन संस्थामार्फत अनुषंगिक कामकाज होणे अपेक्षित आहे.

निर्याती व्यतिरिक्त स्थानिक बाजारपेठांचा विचार केल्यास एन.डी.डी.बी., एच.पी.एम.सी. यासारख्या संस्था लिंबाच्या थेट विक्री क्षेत्रात कार्यरत असून, अशा संस्थांना संघटीतपणे लिंबाचा पुरवठा केल्यास तसेच शेतकरी अथवा शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांनी पुढाकार घेऊन त्यांच्या स्तरावर लिंबाची गुणवत्तेनुसार प्रतवारी व पॅकींग करून मोठ्या शहरांमधील मॉल्सन थेट पुरवठा केल्यास इतर घाऊक बाजारपेठांपेक्षा चांगले उत्पन्न लिंबू उत्पादकांना प्राप्त होण्यास निश्चितच मदत होऊ शकणार आहे.