लिंबू प्रक्रिया

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


लिंबू प्रक्रिया : लिंबावर प्रक्रिया करून त्यापासून वेगवेगळे पदार्थ बनविण्याची प्रथा फार पूर्वीपासून आपल्याकडे आहे. लिंबापासून लोणचे, मिश्र लोणचे, सरबत, स्क्रॅश, सुगंधी तेल, लाझ्म कॉर्डिअल, पेक्टीन, सायट्रिक अॅसिड, इ. पदार्थ तयार करता येतात.

१) लोणचे : लोणचं हा आपल्याकडील लोकांच्या जेवणातील एक अविभाज्य घटक आहे. लिंबाचं लोणचं हे स्वादिष्ट असण्याबरोबर पाचकही असतं. हे लोणचं भारताबरोबरच बाहेरील देशातही लोकप्रिय आहे. मात्र भारतातल्या विविध प्रदेशात लिंबाचं लोणचं बनविण्याची पद्धत वेगवेगळी आहे. मिक्स लोणच्यात सुद्धा लिंबाचा वापर करण्यात येतो.

लिंबाचं लोणचं तयार करण्यासाठी पूर्णपणे पिकलेले व चांगल्या प्रतीचे लिंबू घ्यावे, त्यांना स्वच्छ धुवून घ्यावे. जेणेकरून त्यावरील माती व इतर कचरा निघून जाईल. लोणचं तयार करताना जितकी जास्त स्वच्छता राखली जाईल तेवढं चांगल्या प्रतीचं लोणचं तयार होते व लवकर खराब होत नाही. स्वच्छ धुतलेल्या लिंबाच्या चार - चार फोडी कराव्या. शक्य असल्यास बिया काढून टाकाव्या. प्रत्येकी चार किलो लिंबासाठी एक किलो मीठ वापरावे. एका स्वच्छ व निर्जंतुक केलेल्या बाटलीत दोन तृतीयांश फोडी भराव्यात व प्रत्येक लिंबाच्या थरानंतर मिठाचा थर टाकावा. अशा प्रकारे सर्व मीठ त्यात टाकावं. लोणचं तयार करतान कमीत - कमी १२% मीठ त्यात असणे आवश्यक असते. त्यापेक्षा कमी असल्यास लोणचं लवकर खराब होते. उरलेल्या एक तृतीयांश फोडी पिळून त्याचा रस काढावा व तो त्या बाटलीतील मिश्रणात टाकावा व ही बरणी एक आठवडाभर उन्हात ठेवावी. या दरम्यान लिंबाच्या फोडी मऊ होतात व सालींचा रंग कथ्थई व्हायला सुरुवात होते. यात चवीनुसार तिखट गुळ, तेल, हळद, मोहरीची डाळ इ. घटक टाकावे. तेल टाकून लोणचं करायचं असल्यास बाटलीत फोडींच्या वरपर्यंत तेल येईल एवढं तेल त्यात टाकावं.

२) मिरची - लिंबाचे लोणचं - या प्रकारचं मिश्र लोणचं तयार करण्यासाठी लिंबू व हिरवी मिरची याचं प्रमाण साधारणपणे ८:१ ते ४:४ एवढ्या पर्यंत घ्यावं. लिंबू चांगल्या प्रतीचे असावे. पूर्णपणे पिकलेले असावे व किड्यांनी कुरतडलेले किंवा बुरशीची वाढ झालेले असू नये. लोणच्यासाठी वापरण्यात येणारे इतर घटक पदार्थही स्वच्छ असावे. त्यात कडी कचरा असू नये. हिरव्या मिरच्या ह्या चांगल्या प्रतीच्या असाव्यात. किड लागलेल्या किंवा सडलेल्या मिरच्या लोणच्यासाठी वापरू नये. मिरच्या वापरण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्याव्या व मगच वापराव्या. मिरच्याचे तुकडे एकत्र करून त्यात मीठ टाकून एक आठवडा बाटली उन्हात ठेवावी व नंतर त्यात इतर घटक पदार्थ आवडीनुसार टाकावे.

३) भरल्या लिंबाचे लोणचे :

या प्रकारचं लोणचं करण्यासाठी लिंबे शक्यतो सारख्या मध्यम आकाराची घ्यावीत. सर्व लिंबे स्वच्छ धुवून घ्यावे. मोठ्या पातेल्यात अर्धेपातेले पाणी उकळावे. उकळल्यानंतर पातेले खाली काढून त्यात सबंध लिंबे टाकावी व झाकण ठेवावे. पाच मिनीटांनी झाकण काढून घ्यावे व लिंबे तशीच पाण्यात अर्धातास राहू द्यावी. नंतर ती काढून कपड्यावर पसरून टाकावी व कोरडी करावी. प्रत्येक लिंबाला मसाला भरण्यासाठी दोन चिर द्याव्या. आल्याचे पातळ बारीक तुकडे करावे. काही हिरव्या मिरच्यांचे मोठे तुकडे करावे. आले, मिरच्यांचे तुकडे, मीठ, तिखट व मेथीचे फूट एकत्र करून लिंबामध्ये भरावे. रुंद तोंडाच्या, निर्जंतूक केलेल्या काचेच्या बाटलीत ही लिंबे भरावी व उरलेला मसाला तळाशी घालावा. उरलेल्या हिरवी मिरच्या लिंबाच्या वर पसराव्या तेल गरम करून गार करावे व लोणच्यावर ओतावे. बरणीचे तोंड स्वच्छ पातळ कपड्याने बांधावे व आठ दिवस रोज उन्हात ठेवावे. योग्य ती स्वच्छता पाळून काळजीपूर्वक लोणचे केले असल्यास वर्षभर चांगले राहते.

४) मिक्स लोणचे : या प्रकारच्या लोणच्यामध्ये लिंबू, कैरी, गाजर, हिरवी मिरची, फ्लॉवर इत्यादी फळभाज्या वापरतात. भारतातील काही भागात हे मिक्स लोणचे फार लोकप्रिय आहे.

५) लिंबाचा रस - लिंबाचा रस काढून त्याला आहे त्या स्थितीमध्ये टिकविता येतो किंवा या रसाचा वापर लिंबू सरबत, स्क्वेश यासारखे येतो किंवा या रसाचा वापर लिंबू सरबत, स्क्वेश यासारखे पेय पदार्थ बनविण्यात होतो. घरगुती स्तरावर लिंबाचा रस काढण्यासाठी चांगल्या दर्जाची, चांगली पिकलेली लिंब घ्यावी. त्यांना मधोमध आडवी कापून त्यांचा रस काढावा. रसातील बिया, सालीचे बारीक तुकडे, चोथा वगैरे काढण्यासाठी हा रस मलमलच्या स्वच्छ कापडातून गाळून घ्यावा. हा रस आहे त्या स्थितीत टिकवून ठेवण्यासाठी त्यात पोटॅशियम मेटाबायसल्फाईत किंवा सोडियम बेंझोएट ७१० मि. ग्रा./किलो रसासाठी या प्रमाणात वापरावे. हा रस निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटल्यात भरून त्याला घट्ट बूच लावावे व कोरड्या ठिकाणी ठेवावे.

व्यावसायिक स्तरावर लिंबाचा रस काढण्यासाठी स्वच्छ धुतलेल्या लिंबाचे आडवे काप करून दोन भाग करतात. ही कापण्याची क्रिया वर्तुळाकार चाकू असलेल्या यंत्राद्वारे केली जाते. या यंत्रांचा आकार व क्षमता वेगवेगळी असते. याला रोजिंग मशिन म्हणतात. याद्वारे लिंबातून रस बाहेर काढण्यात येतो. या रसामध्ये बीया, चोथा इत्यादी पदार्थ असतात. त्यामुळे हे वेगळे करण्यासाठी या रसाला गाळणी यंत्रातून पाठविले जाते. या गाळणी यंत्रात रसापासून बिया व चोथा रसापासून वेगळा करण्यात येतो व एका वेगळ्या टँकमध्ये रस जमा होतो. या रसाचा वापर पुढे वेगवेगळे पदार्थ पदार्थ बनविण्यासाठी होतो. तर चोथ्याचा वापर पेक्टीन तयार करण्यासाठी होतो.

या रस काढण्याच्या प्रक्रियेसाठी जर माणसांचा वापर करायचा नसेल किंवा स्वयंचलित यंत्राद्वारे रस काढावयाचा असेल तर त्यासाठी एफएमसी ज्यूस अॅक्सट्रॅक्टर या यंत्राचा वापर करावा. या यंत्राद्वारे लिंबाचा रस वेगळा व बिया, साल चोथा इ. वेगवेगळे मिळतात. यामध्ये लिंबापासून रस काढणे व त्याच्या सालीपासून तेल काढणे या दोन्ही प्रक्रिया एकदाच होतात. मात्र दोन्ही गोष्टी एकत्र न होता वेगवेगळ्या ठिकाणी मिळतात. अशा प्रकारच्या यंत्राचा वापर करण्यासाठी लिंबाचा आकार हा जवळपास एकसारखा असावा लागतो. या यंत्राची क्षमता २.५ ते ३.० मे . टन प्रति तास एवढी असते.

६) ज्यूस कॉन्सेंट्रेट : लिंबाच्या रसापासून ज्यूस कॉन्सेंट्रेट पण तयार करता येतो. यामध्ये रसातील पाण्याचा अंश कमी करून त्यातील विद्राव्य घटकांचे प्रमाण वाढविले जाते. लिंबाचा रस हा गाळून घेतल्यानंतरही एकदम स्वच्छ किंवा पारदर्शी नसतो. थोड्या प्रमाणात गढूळपणा त्यात असतो. कॉन्सेंट्रेट तयार करण्याच्या विविध पद्धती आहेत. योग्य पद्धतीचा वापर करून लिंबाच्या रसाला ४८ ते ५५% विद्राव्य घटकांपर्यंत आटविता येते. लिंबाच्या रसात गढूळपणा आणणाऱ्या घन पदार्थात प्रथिने पेक्टिन, फ्लेवोनॉईड, फॉस्फोलिपिड व इतर कमी वजनाचे घटक आढळून येतात. रस आटविण्यासाठी उष्णतेचा वापर करून रसातील पाण्याचे बाष्पीभवन घडवून आणून हा रस आटविता येतो. जर रसामध्ये हवेचे प्रमाण जास्त असेल तर त्याला डिएअरेटर यंत्रातून पाठवून हवा काढून घेतली जाते. बाष्पीभवन करताना उच्च तापमान कमी वेळ या तंत्राचा वापर केला जातो. याशिवाय रस आटविण्याची दुसरी पद्धत म्हणजे हवेच्या अनुपस्थितीत रस आटविणे (वॅक्यूम कॉन्सेंट्रे शन) लिंबाचा रस पारदर्शक बनविण्यासाठी किंवा त्यातील गढूळपणा नाहीसा करण्यासाठी त्यावर पेक्टीनेज किंवा पेक्टीनेझस्टरेज या विकाराची प्रक्रिया घडवून आणली जाते व स्वच्छ पारदर्शी लिंबाचा रस मिळते.

लिंबूरस किंवा आटविलेला रस काळा पडू नये म्हणून त्याला उष्णप्रक्रिया (पाश्चरायझेशन) दिली जाते व जास्त दिवस टिकावा म्हणून त्यात परिरक्षक द्रव्ये घटक मिसळले जातात.

७) लिंबाच्या रसापासून लिंबू रस पावडर बनविण्यासाठी या रसाला न आटवता तसेच स्पेडाईंग किंवा ड्रम डाईंग करतात. या लिंबू रस पावडरला २१ डी सें. पेक्षा कमी तापमानाला साठवावे. सहा महिने चांगल्या स्थितीत राहते.

८) लिंबू स्क्वेश : संत्र्याचा स्क्वेश, आंब्याचा स्क्वेश तसेह लिंबाचा स्क्वेश हे पेय पदार्थ भारतात फार लोकप्रिय आहेत. स्क्वेश पिण्यासाठी देताना एक भाग स्क्वेश व तीन भाग पाणी असे मिसळून देतात. लिंबाचा तयार रस यासाठी वापरता येतो किंवा ताजा रस काढून वापरता येतो. यासाठी लिंबाचे स्वच्छ स्टीलच्या सुरीने दोन भाग करावे व लागडी रस काढायचं यंत्र वापरून रस काढावा किंवा रोलर प्रेसने काढावा. रस काढून झाल्यावरती वस्त्रगाळ करून घ्यावा, त्यामुळे त्यातील बिया व चोथा वेगळा होईल. हा रस स्क्वेश तयार करण्यासाठी वापरावा. स्क्वेश तयार करताना त्या साखर, सायट्रिक अॅसिड, सुगंधी द्रव्य, रंग व परिरक्षक द्रव्ये इत्यादी घटक रसात योग्य प्रमाणात मिसळण्यात येतात. साखर ही पाक करून वापरली जाते. पाक करताना त्यात सायट्रिक आम्ल व पाणी मिसळून त्याला गरम केले जाते. गरम करताना वर येणारी मळी काढून टाकावी व स्वच्छ पाक स्क्वेश तयार करण्यासाठी वापरावा. स्क्वेशमध्ये कमीत - कमी २५% फळांचा रस असणे आवश्यक असते व एकूण विद्राव्य पदार्थ कमीत - कमी ४०% असावे, लिंबूरस, पाक सुगंधी द्रव्य, रंग इत्यादी घटका एकत्र करावे व नंतर त्यात ३५० पीपीएम एवढे परिरक्षक पदार्थ टाकावे. लिंबू स्क्वेशसाठी पोटॅशियम मेटाबाय सल्फाइट हा रासायनिक पदार्थ परिरक्षक म्हणून वापरता येतो. तयार झालेला स्क्वेश हा निर्जंतुक केलेल्या बाटल्यात भरावा व त्याला घट्ट बूच लावून हवाबंद करावे.

लिंबू स्क्वेशसाठी पदार्थांचे प्रमाण : लिंबाच्या रसामध्ये असलेल्या विद्राव्य घटकांचे प्रमाण, त्यातील आम्लता यावरून इतर घटकांचे प्रमाण ठरविले जाते. लिंबाच्या रसामध्ये जर १०% विद्राव्य घटक असतील व ५% त्या रसाची आम्लता असेल तर त्यात पुढीलप्रमाणे घटक पदार्थ टाकावे (२५० किलो स्क्वेशसाठी)

लिंबाचा रस - ६२.५ कि., साखर -१०० कि., पाणी - ८४ लि., सुगंधी द्रव्य - आवश्यकता असल्यास रंग, पोटॅशियम मेटाबाय सल्फाईट (के.एम.एस.) १५० ग्रॅम.

९) लिंबूरस कॉर्डिअल - कॉर्डिअल तयार करण्यासाठी लिंबाच्या रसाला मोठ्या लाकडी बॅरल, ज्याला आतून मायक्रोक्रिस्टाईन मेणाचा थर दिलेला असतो, त्यात ठेवतात. त्यामध्ये रस खराब होऊ नये म्हणून ५६ ग्रॅम के.एम.एस. प्रती ४५ कि. रस या प्रमाणात टाकावे. साठवणुकीच्या काळात या रसातील गढूळपणा आणणारे घनपदार्थ हळूहळू खाली तळाशी बसून त्यांचा एक थर तयार करतात व वर असलेला रस हा पारदर्शी असतो. या प्रक्रियेसाठी २ ते ३ महिन्याचा कालावधी लागतो. त्यानंतर वरचा स्वच्छ पारदर्शी रस हा न ढवळता काढून घेण्यात येतो व यामध्ये साखर, रंग, पाणी, परिरक्षक पदार्थ मिसळले जातात. साखर ही पाक करून, मळी काढून स्वच्छ स्वरूपात मिसळली जाते. या पारदर्शी कॉर्डिअलला निर्जंतुक केलेल्या बाटल्यात भरावे व घट्ट बूच लावून हवाबंद करावे. या कॉर्डिअलमध्ये सुद्धा कमीत - कमी २५% लिंबाचा रस असणे आवश्यक आहे.

१०% विद्राव्य घटक व ६% आम्लता असलेल्या लिंबाच्या रसापासून कॉर्डिअल तयार करताना खालील प्रमाणात घटक पदार्थ वापरावे. लिंबाचा रस - ४५.४ कि. साखर - ५८.३४० कि. पाणी - ७७.१ लि. परिरक्षक घटक (केएमएस)

१०) लिंबू बारली वॉटर : हा पेय पदार्थ बनविताना लिंबाचा प्रथम रस काढावा व वस्त्रगाळ करून घ्यावा. थोड्या प्रमाणात बारलीचे पीठ घ्यावे व पाण्यात त्याची पातळ पेस्ट करावी. पेस्ट तयार झाल्यावर त्यात अजून पाणी टाकावे न नंतर गरम करावे. गरम केल्यामुळे पीठातील स्टार्च जिलेटिनाइज होतो. त्याला थंड करावे व गाळून घ्यावे. नंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालावे व लिंबाच्या रसात मिसळावे. सोबतच साखर, सायट्रिक आम्ल, सुगंधी द्रव्य परिरक्षक पदार्थ टाकवे. यासाठी १०% विद्राव्य घटक असलेल्या व ५% आम्लता असलेल्या रसासाठी खालीलप्रमाणे घटक पदार्थ वापरावे. लिंबाचा रस - ४५.४ कि., साखर - ७६.३४० कि. सायट्रिक आम्ल - बारली वॉटन -५७.२७ कि. (५७८ ग्रॅम बारली पीठापासून) लिंबू सुगंध -१.२२६ परिरक्षक (केएमएस) -११३ ग्रॅम यापासून तयार होणाऱ्या पेय पदार्थात २५% रस असेल. ४५% विद्राव्य घटक व १.५% एवढी आम्लता असेल.

११) सायट्रिक अॅसिड/आम्ल : लिंबाच्या रसामध्ये. सायट्रिक आम्ल जास्त प्रमाणात असते. या रसापासून शुद्ध स्वरूपाचे सायट्रिक आम्ल तयार करता येते. यासाठी लिंबाच्या रसात आधी नैसर्गिक किण्वीकरण घडू देण्यात येते. या किण्वीकरण प्रक्रियेमुळे रसातील गम, पेक्टीन व शर्करा इत्यादी पदार्थ रसातून निघून जातात. या पदार्थांमुळे रस गाळताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे हे पदार्थ रसातून नाहिसे करणे आवश्यक असते. या किण्वीकरण झालेल्या लिंबाच्या रसासोबत नंतर किसेलगर या गाळण्यास मदत करणाऱ्या पदार्थाची ६० डी. ते ६६ डी. सें. तापमानावर प्रक्रिया घडवून आणतात व नंतर रस गाळतात. या गाळलेल्या रसातून कॅल्शियम सिट्रेट वेगळे करण्यासाठी त्यावर हायड्रेटेड लाईम व कॅल्शियम कर्बोनेटची प्रक्रिया घडवून आणतात. त्यामुळे कॅल्शियम सिट्रेटची क्षार तयार होतात व हे क्षार वेगळे करून लगेच वाळविण्यात येते. या सिट्रेटपासून सायट्रिक आम्ल तयार करण्यासाठी सिट्रेट क्षार ओल्या स्वरूपात असतानाच त्याची पेस्ट तयार करण्यात येते व ठरविलेल्या प्रमाणात त्यावर कॉन्सेंट्रेट सल्फुरिक आम्लाची क्रिया घडवून आणण्यात येते. यामुळे सिट्रेटपासून सायट्रिक आम्ल तयार होते. द्रावणातून कॅल्शियम सल्फेट वेगळे काढून द्रवाणाला कण तयार होईपर्यंत आटविण्यात येते.

लिंबाच्या रसाला न आंबविता सुद्धा त्यापासून सायट्रिक आम्ल तयार करता येते. या दोन्ही प्रकारे सायट्रिक आम्ल तयार करणे व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर नाही.

१२) लिंबाच्या सालीचे तेल (लेमन ऑईल) : लिंबापासून रस वेगळा काढल्यानंतर उरलेल्या साल, बिया व चोथा यापासून बरेच उपपदार्थ बनविता येतात. यातील एक म्हणजे लिंबाच्या सालीचे तेल हे आहे. लिंबाच्या बियांमध्ये २५ ते ३०% तेल असते व चवीला हे फारच कडू असते. त्यामुळे याचा वापर रिफाइनिंग केल्यावरच अन्नपदार्थात केला जाऊ शकतो. अशुद्ध तेलाचा वापर साबण व डिटर्जंट बनविण्याच्या उधोगात केला जातो. तेल काढल्यावर बियांमध्ये खालीलप्रमाणे घटक पदार्थ राहतात. प्रथिने ३२.५%, मेद - ७.५%, तंतूमय पदार्थ - ८%. याचा वापर कोंबड्यांचे खाद्य म्हणून होतो.

लिंबाच्या सालीपासून तेल काढण्यात येते. या तेलाचा अन्नपदार्थात, शीतपेयांमध्ये सुगंधी द्रव्य म्हणून वापर करण्यात येतो. शिवाय सौंदर्य प्रसाधने, औषधीमध्ये व घरगुती पदार्थात वापरण्यात येते. या तेलाला बाजारात चांगली किंमत मिळते. या तेलामध्ये सिट्राल हा मुख्य घटक पदार्थ असतो. लिंबाच्या सालीपासून तेल काढण्याकरिता कोल्ड प्रेस पद्धतीचा वापर अवलंब करतात.

१३) पेक्टीन : लिंबाच्या सालीमध्ये व चोथ्यामध्ये साधारणत: २.५ ते ५.५% पेक्टीन असते. लिंबाच्या सालीपासून तेल व लिंबापासून रस काढल्यानंतर ही साल व चोथा चांगला वाळविला जातो. सालीचे तुकडे भरपूर पाण्याने धुवून घ्यावे. जेणेकरून त्यातील विद्राव्य शर्करा आम्ल पाण्यासोबत निघून जाईल व ते प्रक्रिया दरम्यान काळे पडणार नाही. नंतर यातून सर्व पाणी काढून घ्यावे व यासाठी स्क्रू प्रेसचा वापर करावा. नंतर ह्या निर्जल केलेल्या चोथ्याला ८ ते १० % पाणी जलांश राहील एवढे वाळविले जाते. याला पेक्टीन पोमेस असे म्हणतात. यापासून पेक्टीन बनविण्यात येते.

प्रत्यक्ष साल व चोथा यापासून पेक्टीन बनविण्याची पद्धती पुढीलप्रमाणे आहे - लिंबाची साल व चोथा वाळवून घेणे. सालींचे बारीक तुकडे करणे व दळूण घेणे. चोथा जाळीवर घेऊन थंड पाण्याने धुवून घ्यावा. सालीची पावडर धुतलेला चोथा ०.१५ ते ०.२० एन हायड्रोक्लोरिक किंवा सल्फरिक आम्लासोबत ४० ते ४५ मिनिटे उकळावा . हे मिश्रण दाबून घ्यावे व वस्त्रगाळ करावे. या द्रावणावर उपयुक्त विकरांची क्रिया घडवून आणणे. द्रावण गरम करावे (विकारांना निष्क्रिय करण्यासाठी). अॅक्टीवेटेड कार्बन वापरून हे रंगहिन करावे. त्यानंतर फिल्टर प्रेसमधून काढावे. या द्रावणात ०.७ ते १.० % पेक्टीन असते. २५ ते ३०% पेक्टीन येईपर्यंत आटवावे. ९५% अल्कोहोल वापरून पेक्टीन वेगळे करावे/पेक्टीन प्रेसिपिटेट करावे. हे प्रेसिपिटेट अल्कोहोलने धुवावे. वाळवावे - त्याची भुकटी करावी. मिश्रण ४.५% पेक्टीन येईपर्यंत आटवावे. बाटल्यात भरावे. ७७ डी. सें. ला ३० मिनिटे गरम करावे. थंड करावे. अशाप्रकारे पेक्टीन (द्रवरूप) तयार होते.

या पेक्टीनचा वापर जाम, जेली, मार्मालेड यासारखे पदार्थ तयार करताना होतो. शिवाय केचप, सॉस यासारख्या पदार्थांना घट्टपणा वाढविण्यासाठी याचा उपयोग होतो. कॉडलिव्हर ऑईल , आईस्क्रिम, मायोनेसी यासारख्या पदार्थात पेक्टीनचा वापर इमल्सीफाईंग एजंट म्हणून होतो. लिंबाच्या सालीपासून बनविलेल्या पेक्टीनची प्रत ही संत्र्याच्या सालीपासून बनविलेल्या पेक्टीनपेक्षा चांगली असते. भारतामध्ये सध्या ८ ते १० टन पेक्टीनचे प्रतिवर्षी उत्पादन होते. या उलट मागणी मात्र ८० टन प्रतवर्षी एवढी आहे. त्यामुळे ही दरी भरून काढण्यासाठी लिंबाच्या सालीपासून पेक्टीन तयार करणे हा एका यशस्वी प्रयत्न होऊ शकतो. कारण बाकीची पेक्टीनची गरज ही सध्या आपण परदेशातून पेक्टीन आयात करून भागवतो.

१४) सिट्रस प्यूरी : संत्री, लिंबू, मोसंबी यासारख्या फळांपासून सिट्रस प्यूरी बनविण्यात येते. प्रक्रिये दरम्यान स्वच्छतेबाबतची योग्य काळजी घेतली व प्रक्रिया योग्य प्रकारे एकली तर या प्रकारच्या प्यूरीचा खराब वास येत नाही व अधिक काळ चांगली राहते. मुख्यत्वे अमेरिका व पश्चात्य देशांमध्ये हा प्रकार अधिक बनविला जातो.

लिंबाची प्यूरी बनविताना चांगल्या प्रतीचे, पूर्ण पिकलेले लिंबू घ्यावे व स्वच्छ धुवावे. शक्य झाल्यास त्यावरील सूक्ष्मजंतूंची संख्या कमी करण्यासाठी फूड ग्रेड डिटर्जंट ने धुवावे व शेवटी पुन्हा साध्या पाण्याने धुवावे. मध्यम आकाराची फळे यासाठी वापरावी, धुतल्यानंतर त्याचे देठ तोडावे व डाग असलेला भाग सुरीने कापून बाजूला काढून घ्यावा. यानंतर संपूर्ण फळ यंत्रामध्ये टाकून प्यूरी तयार करण्यात येते किंवा लिंबाचे दोन तुकडे करून ते स्क्रू प्रेसमध्ये टाकण्यात येते. या प्रेसमध्ये बारीक छिद्र असलेली जाळी बसविलेली असते. जाळीला ०.०२७ ते ०.०४४ इंच असलेली छिद्र असतात. त्यामुळे या लिंबाचा आकार एवढा लहान होऊन त्याची प्युरी तयार होईल एवढं त्याला बारीक करण्यात येते. या प्यूरीमध्ये ०.४० ते ०.७५% सालीचे तेल असावे लगाते. यामध्ये नंतर १ भाग साखर व ५ भाग प्यूरी या प्रमाणात साखर मिसळली जाते. साखर ही ऐच्छिक असते. ही प्यूरीनंतर इनॅमलयुक्त टीनच्या डब्यांमध्ये भरून गोठविली जाते व १८ डी. सें. ते १३ डी. सें. तापमानाला साठविली जाते.

या प्यूरीचा वापर सरबत, बर्फ, पेय पदार्थ बनविण्यासाठी तसेच मार्गालेड, जॅम, केक यासारख्या पदार्थांमध्ये सुद्धा होतो.