जरबेरा लागवड

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


शेती व्यवसाय किफायतशीर होण्याच्या दृष्टीने फलोत्पादन व फुलोत्पादन लागवडीवर भर देणे गरजेचे आहे. केंद्र शासनाच्या खुल्या आर्थिक धोरणाप्रमाणे फळे, फुले व भाजीपाला व्यवसाय वाढीसाठी आणि निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. सर्व स्थरावर मोठ्या प्रमाणात, खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये या पिकाची कृषी अर्थव्यवस्थेतील जाणीव होऊ लागली आहे. व्यापारीदृष्ट्या फुलशेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. महारष्ट्रामध्ये १२,००० हेक्टर क्षेत्र हे फुलशेतीखाली असून शेतकरी आता पारंपारिक फुलशेतीकडून उच्च तंत्रज्ञानावर आधारित फुलशेतीकडे वळालेले आहेत.

पॉलीहाऊसमध्ये वेगवेगळ्या कटफ्लॉवर्सची लागवड करण्यात येत आहे. यामध्ये गुलाग, जरबेरा, कार्नेशन, शेवंती, ऑर्क्टिडस, अँथुरियम, लिलियम इ. फुलांचा समावेश होतो. त्यामधील जरबेरा या फुलाचे व्यापारीदृष्ट्या महत्त्व व आवश्यक असणारी माहिती वा लेखात दिली आहे.

जरबेरा हे विविध रंगात आणि आकारात उपलब्ध असलेले लांब दांड्याच फुल आहे. फुलांचा दांडा लांब, सडसडीत व पाणी रहीत असतो. पुष्परचनेमध्ये या फुलाचा अतिशय सुंदरतेने उपयोग केला जातो. जरबेरा फुलांचा टिकाऊपणा व साठवण क्षमता चांगली आहे. देशभर आणि परदेशातही चांगली मागणी असल्याने माती विरहीत माध्यमात तसेच पॉलीहाऊससारख्या नियंत्रीत वारावरणात जरबेरा फुलाची लागवड करणे फायदेशीर ठरते.

जमीन : रोपांची लागवड गादी वाफ्यावर करतात. रोपांची मुळे ४५ ते ६० सेमी. पर्यंत खोल जातात. पाण्याचा निचरा उत्तम प्रकारे होण्यासाठी जमीन भुसभुशीत राहण्यासाठी गादीवाफे तयार करताना ५०० चौ. मी. आकारमानाच्या पॉलीहाऊसमध्ये सर्वसाधारणपणे कुजलेले शेणखत ९ ट्रक, बारीक वाळू ३ ट्रक व पोयट्याची लाल माती ९ ट्रक एकत्र मिसळून जमीन सपाट करून घ्यावी. जमिनीचा सामू ५.५ ते ६.५ च्या दरम्यान असणे आवश्यक आहे व तो तेवढाच राखला जावा.

मातीचे निर्जंतुकीक रण : जरबेरा लागवडीपुर्वी निर्जंतुकीकरण करणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे जमिनीत असलेली कीड, बॅक्टेरिया, निमॅटोड वगैरे किडींचा नाश होतो. फायटोप्थोरा ही बुरशी जरबेऱ्याला अत्यंत घातक असते. प्रामुख्याने मातीचे निर्जंतुकीकरण खालील तीन प्रकारे करता येते.

१) फॉरमॅलीनचा वापर : मातीचे निर्जंतुकीकरण करताना १०० चौ.मी. क्षेत्रासाठी ७.५ ते १० लि. फॉरमॅलिनचा वापर करावा, फॉरमॅलीन १० लि. पाण्यात टाकावे. अशारितीने तयार केलेले द्रावण झारीने मातीवर टाकावे. नंतर ह्यावर ६ दिवस काळे प्लॅस्टिक अंथरून माती झाकून ठेवावी. जेणे करून द्रावणापासून तयार झालेला ग्रस/वाफा बाहेर न पडता जमिनीमध्ये खोलवर जातात. ६ दिवसानंतर मातीवरील प्लॅस्टिक बाजूला काढून १०० लि. पाणी प्रती चौ. मी. या प्रमाणात रसायनांचा अंश नाहीसा होईल. मातीचे निर्जंतुकीकरण केल्यानंतर २ आठवड्यांनी रोपांची लागवड करावी.

२) मिथिल ब्रोमाईड : २५ ते ३० ग्रॅम मिथिल ब्रोमाईद प्रति चौ. मी. वापरून मातीचे निर्जंतुकीकरण करता येते. भारतामध्ये मातीचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी मिथिल ब्रोमाईडचा वापर करण्यास बंदी आहे. युरोपियन देशामध्ये या पद्धतीचा वापर केला जातो.

३) बासामिड (डॅझोमेट) : ३० ते ४० प्रति चौ.मी. वापरून मातीचे निर्जंतुकीकरण करता येते.

वाफे तयार करणे : व्यापारी तत्वावर जरबेरा फुलांची लागवड गादी वाफ्यावर करण्यात येते. पाण्याचा उत्तम निचरा होण्यासाठी व मुळांची चांगली वाढ व्हावी म्हणून जरबेरऱ्याची लागवड उंच बनविलेल्या गादी वाफ्यांवर केली जाते. गादी वाफ्यांचा आकार ६० सें.मी. रुंद ४० सें.मी. उंच तसेच २ वाफ्यातील अंतर ५० सें.मी. ठेवावे. लागवडीपुर्वी वाफे भुसभुशीत करावेत. वाफे तयार करताना मुळांची चांगली वाढ व्हावी म्हणून २.५० किलो कल्पतरू सेंद्रिय खत प्रति १०० चौ.मी. या प्रमाणात मातीमध्ये मिसळावे.

लागवड : जरबेऱ्याची लागवड जून - जुलै मध्ये करावी. म्हणजे पुढे फुलांना दर चांगला मिळतो. रोपांची लागवड करताना दोन रोपांतील अंतर ३० सें.मी. व दोन ओळीतील अंतर ३५ सें.मी. ठेवावे. रोपांची लागवड करण्याच्या आदल्या दिवशी गादी वाफे पुर्ण पाण्याने भिजवून घेऊन वाफसा आल्यानंतर रोपांची लागवड सकाळी किंवा संध्याकाळी करावी. तत्पुर्वी रोपे जर्मिनेटर या औषधाच्या द्रावणात (१ लिटर पाण्यामध्ये १० मिली जर्मिनेटर घेऊन) भिजवून घ्यावीत. म्हणजे रोपांची मर होत नाही. तसेच बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळला जातो.

पेपरपॉटमधील रोप लावताना पेपर पॉटचा अर्धा भाग अगदी हलक्या हाताने खड्डा करून मातीत ठेवावा व सभोवती हलकी माती लावून घ्यावी. लागवड सरळ रेषेमध्ये केल्यानंतर झारीने रोपाभोवती हलके पाणी द्यावे. प्रती चौ.मी. ६ रोपे प्रमाणे ५०० चौ.मी. आकारमानाच्या हरितगृहात ३ हजार रोपे बसतात. चांगल्या प्रतीची फुले मिळण्यासाठी साधारणत: ८०० ते १००० पीपीएम कार्बन डाय ऑक्साईड आवश्यक असतो. लागवडीनंतर ७० ते ८० % आर्द्रता ठेवावी व रोपांची वाढ चालू होईपर्यंत शेडनेट बंद ठेवावी. लागवडीनंतर ४ आठवडे झारीने पाणी द्यावे. दर २ महिन्यांनी माती परिक्षण करून घेणे गरजेचे असते. रोपांच्या मुळांना खेळती हवा मिळावी यासाठी दर ८ ते १० दिवसांच्या अंतराने रोपांच्या आजूबाजूची माती हलवावी.

हवामान : पॉलीहाऊसमध्ये रोपांच्या शाखीय वाढीसाठी रात्रीचे तापमान कमी असणे फायदेशीर असते. रोपे वाढीच्या दृष्टीने पॉलीहाऊसमध्ये दिवसा २२ डी.ते २६ डी.सें.ग्रॅ. आणि रात्रीचे तापमानात मोठा फरक असणे रोपांना अपायकारक ठरते.

रोपांच्या वाढीच्या दृष्टीने तापमान व सुर्यप्रकाश हे दोन घटक अतिशय महत्त्वाचे आहेत. जास्त तापमान व सुर्यप्रकाश ठराविक वेळेपर्यंत असल्यास रोपांची वाढ जलद होते. परंतु अति जास्त सुर्यप्रकाश व तापमानात थर्मलस्क्रीन किंवा शेडींग नेटचा वापर करावा. तसेच तापमान कमी करण्यासाठी व आर्द्रता वाढविण्यासाठी फाशर्षचा वापर करावा. जास्त तीव्र सुर्यप्रकाशात रोपांची वाढ अतिशय मंद होऊन फुलांच्या पाकळ्यांचा रंग कमी होतो. उन्हाळ्यात तयार केलेल्या बेडसच्या दोन्ही बाजूवर झारीने पाणी मारून ओलसर ठेवाव्यात

पाणी : जरबेऱ्यासाठी देत असलेल्या पाण्यात सामू ६.५ ते ७ असावा. तसेच इ.सी. ०.५ ते १.० असावा, रोपांना झारीने पाणी द्यावे. त्यामुळे रोपांची मुळी एकसारखी वाढण्यास मदत होते. पॉलीहाऊसमधील जरबेरा लागवडीसाठी रोपांना स्वयंचलित पाणी देण्याची पद्धत फायदेशीर असते. यामध्ये ठिबक सिंचन, फवारा सिंचन, उंचीवरील अतिसुक्ष्म फवारा यांचा समावेश होतो. पिकांन पाणी देण्यामुळे मर्यादित प्रमाणात गारवा राहतो. जरबेऱ्याच्या रोपांना पाण्याची कमतरता अजिबात सहन होत नाही. अती उष्णतेमुळे, बाष्पीभवनामुळे रोपांची वाढ खालावते. हे टाळण्यासाठी पॉलीहाऊसमध्ये सावलीसाठी शेंडींग नेट किंवा थर्मलस्क्रीनचे आवरण घालावे. त्यामुळे आतील आर्द्रतेचे प्रमाण वाढते. पॉलीहाऊसमधील रोपांना गरजेनुसार आवश्यक तेवढे मोजून सकाळी ११ वाजेपर्यंत पाणी द्यावे.

पॉलीहाऊसवरील प्लॅस्टिक दर चार महिन्यांनी पाण्याने स्वच्छ करावे. म्हणजे रोपांना आवश्यक सुर्यप्रकाश मिळेल व फुलांचे उतपादन वाढेल.

आंतरमशागत : जरुरीप्रमाणे अधून - मधून हलकी खोदणी, वाफ्यांची बांधणी, मर झालेल्या फांद्यांची व पानांची काढणी करावी. यामुळे उत्तम गुणवत्ता मिळून उत्पादनात वाढ होते.

रोग व किडी: जरबेरा पिकावर प्रामुख्याने मुळकूज, खोडकुज, मर, भुरी इ. रोग तेच मावा, कोळी, नागअळी, पांढरी माशी या किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो.

१) मुळकूज : ह्या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने अशक्त रोपांवर होतो. रोपांची मुळे तांबूस तपकिरी होतात. मुळाची वाढ खुंटते. रोगग्रस्त रोपे काढून टाकावीत व ५० मिली जर्मिनेटर आणि २० ग्रॅम कॉपर ऑकझीक्लोराईडचे १० लि. पाण्यातून ड्रेंचिंग करावे.

२) खोडकूज : रोपांची पाने कोरडी होऊन तांबूस दिसतात. रोपाच्या खोडाचा भाग कुजतो, फुले सुकतात. सुरुवातीस लक्षणे दिसू लागल्यानंतर २ आठवड्यात रोप मरते. जास्त पाणी देण्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. रोग आटोक्यात आणण्यासाठी ट्रायकोडर्मा ३ ते ५ ग्रॅम प्रती लिटरला वापरावे.

३) मर : हा बुरशीजन्य रोग आहे. अशक्त रोपे या रोगास तात्काळ बळी पडतात. रोपांचे खोड कुजते व रोपे मरतात. रोप उपटले असता रोप हातात येते व मुळे जमिनीतच राहतात. पानांचा देठ कापला असता शिरा काळ्या दिसतात. या रोगाच्या नियंत्रणासाठी जर्मिनेटर २५ मिली + थ्राईवर ३० मिली + कॉपशाईनर ३० मिली + हार्मोनी १० मिलीची १० लि. पाण्यातून फवारणी घ्यावी.

४) भुरी : या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पानांवर पांढरा बुरशीजन्य थर दिसून येतो. पानांची वाढ खुंटते आणि उत्पादन घटते. जास्त आर्द्रता वाढल्यास ह्या रोगाचा प्रादुर्भाव होतो.

या रोगाच्या नियंत्रणासाठी थ्राईवर २० मिली + क्रॉपशाईनर २० मिली + हार्मोनी १५ मिलीची १० लि. पाण्यातून फवारणी करावी.

कीड :

१ ) मावा : हा किटक प्रामुख्याने रोपांची कोवळी पाने व खोडातील द्रव शोषतात, त्यामुळे पाने वेडीवाकडी होतात. परिणामी रोपांची वाढ खुंटते व रोपे निस्तेज दिसतात. या किडीच्या नियंत्रणासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारणीमधील प्रोटेक्टंटचे प्रमाण वाढवून (प्रति लिटर पाण्यात ३ ते ४ ग्रॅम घेऊन) फवारणी करावी.

२) फुलकिडे : रोपांच्या पानावर, फुलांवर या किडीचा प्रादुर्भाव आढळतो. फुलावर पांढरे ठिपके येतात. या किडीमुळे फुलांची प्रत खराब होते. रोपे निस्तेज व रोगट दिसतात.

३) पांढरी माशी : या माशीचा प्रादुर्भाव झाल्यास रोपे निस्तेज दिसतात व पाने पिवळी पडतात. कीड पानाच्या खालील बाजूस आढळते. रोप हलविल्यानंतर मोहळाच्या माशाप्रमाणे पांढऱ्या माशा उडतात.

४) नागअळी :या किडीचे प्रमुख लक्षण म्हणजे पानांवर नागमोडी आकाराच्या पांढरट रेषा दिसतात. ही कीड जमिनीत राहते.

५) सुत्रकृमी : सुत्रकृमीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पाने पिवळी पडू लागतात. मुळांवर गाठी येतात. त्यामुळे रोपांची मर मोठ्या प्रमाणात होते. सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी नीम केक ३० ते ४० ग्रॅम प्रति रोपास मातीत मिसळून द्यावे.

६) कोळी : या किडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर रोपाची जुनी पाने चुरगळून जातात. नवीन पालवी जाडसर येते. फुले वेडीवाकडी व्यंगयुक्त येतात.

जरबेऱ्यामध्ये अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार जाणवणारी लक्षणे.

१) नत्र : या आन्द्रव्याच्या कमतरतेमुळे रोपांची जुनी पाने पिवळी पडतात व नंतर नवीन पाने पिवळी पडतात.

२) फॉस्फरस : फॉस्फरसच्या कमतरतेमुळे जुन्या पानांच्या खालील बाजूस शिरा तप किरी होऊन पानांचे अंशत: नेक्रॉसिस होते.

३ ) बोरॉन : जरबेऱ्यामध्ये बोरॉनच्या कमतरतेमुळे नवीन पानांच्या देठांकडील भाग काळा पडतो.

४) पोटॅशियम : पोटॅशियमच्या कमतरतेमुळे जरबेऱ्याची पाने कडांच्या बाजूचे मध्य शिरेकडे जळाल्यासारखी दिसतात.

जरबेऱ्यामधील आढळणाऱ्या विकृती व कारणे :

१) फुले वाकडी होणे : पोषणाची कमतरता (कॅल्शियमची कमतरता )

२) प्री - हर्वेस्ट स्टेम ब्रेक : मुळांकडून येणारा पाण्याचा दाब व हवेतील अतिरिक्त आर्दता.

३) अकाली फुले कोमजणे : ढगाल हवामानापाठोपाठ प्रखर सुर्यप्रकाश किंवा कर्बोदकांची कमतरता.

४) दुतोंडी फुले फुलणे : पोषणद्रव्यांच्या असमतोलामुळे येणारे व्यंग. वाढ मोठ्या प्रमाणात होऊनही कळ्यांचे प्रमाण कमी.

५) देठांची लांबी कमी असणे : क्षारतेचे प्रमाण जास्त, ओलाव्याचा ताण, मातीचे तापमान कमी.

६) असमान फुले फुलणे : फुलांच्या देठाला इजा झाल्याने होते.

वरील रोग, किडीवर प्रतिबंधक तसेच प्रभावी उपाय आणि जरबेऱ्यावर (पाने, फुले, दांडा) येणाऱ्या विकृती टाळण्यासाठी, निर्यातक्षम, दर्जेदार फुलांचे उत्पादनासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पुढीलप्रमाणे नियमित फवारण्या कराव्यात.

१) पहिली फवारणी :(लागवडीनंतर ८ ते १५ दिवसांनी) : जर्मिनेटर २५ मिली.+ थ्राईवर २० मिली + क्रॉंपशाईनर २५ मिली. + प्रिझम १० मिली. + हार्मोनी १० मिली + १० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (लागवडीनंतर २१ ते ३० दिवसांनी) : जर्मिनेटर २५ मिली.+ थ्राईवर २५ मिली + क्रॉंपशाईनर ३० मिली. + प्रोटेक्टंट २० ग्रॅम + प्रिझम १५ मिली. + न्युट्राटोन १० मिली + हार्मोनी १५ मिली + १० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (लागवडीनंतर ४० ते ४५ दिवसांनी) : जर्मिनेटर २५ मिली.+ थ्राईवर २५ मिली + क्रॉंपशाईनर ३० मिली. + राईपनर १० मिली + प्रोटेक्टंट २५ ग्रॅम + प्रिझम २५ मिली. + न्युट्राटोन २० मिली + हार्मोनी १५ मिली + १० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : (लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी) : जर्मिनेटर २५ मिली.+ थ्राईवर ३० मिली + क्रॉंपशाईनर ३० मिली. + राईपनर २५ मिली + प्रोटेक्टंट २० ग्रॅम + प्रिझम २५ मिली. + न्युट्राटोन ३० मिली + हार्मोनी १५ मिली + १० लि.पाणी.

५ ) पाचवी फवारणी : (तोडे चालू झाल्यानंतर १० ते १५ दिवसांनी) : जर्मिनेटर २५ मिली.+ थ्राईवर ३० मिली + क्रॉंपशाईनर ४० मिली. + राईपनर २५ मिली + प्रोटेक्टंट २० ग्रॅम + प्रिझम २५ मिली. + न्युट्राटोन ३० मिली + हार्मोनी १५ मिली + १० लि.पाणी.

फुलांची काढणी : जरबेऱ्याची फुले साधारणपणे लागवडीपासून ८ ते १० आठवड्यांनी काढणीस येतात. फुलांतील बाहेरील पाकळ्यांचे दोन थर उमलल्यानंतर फुलांची काढणी करावी. फुले तोडू नयेत ती वाकवली की तुटतात, फुले काढताना दांडा मुळापासून तुटला पाहिजे. फुले तोडल्यानंतर दांड्याला खालून ३ ते ४ सें. मी. तिरपा कट घ्यावा. फुले शक्यतो सकाळी काढावीत. फुलांची काढणी चालू असताना काढलेल्या फुलांचे दांडे पाण्याच्या बादलीत बुडवून ठेवावेत. काढणी केलेली फुले टवटवीत राहण्यासाठी प्रति लिटर पाण्यामध्ये सोडियम हायपोक्लोराईड ७ ते १० मिली घेऊन द्रावण तयार करून त्या द्रावणात फुलांचे दांडे बुडवून ठेवावेत. हे द्रावण प्रत्येक काढणीला बदलावे. प्रत्यके झाडापासून ३९ ते ३५ फुले पहिल्या वर्षी, तर ४० ते ४५ फुले दुसऱ्या वर्षी मिळतात. सरासरी वार्षिक उत्पन्न २४० फुले प्रति चौ. मी. मध्ये मिळते.

काढणी केलेल्या फुलांची त्यांच्या जातीनुसार, रंगानुसार, आकारमानानुसार आणि दांड्याच्या लांबीनुसार प्रतवारी करणे गरजेचे असते. नंतर ह्या फुलांना ४ x ४ सें.मी. आकाराच्या प्लॅस्टिक पिशवीचे आवरण देवून १० फुलांची एक, अशा जुड्या किंवा बंच तयार करावेत. फुलांच्या जुडीला रबर लावतान पेपर गुंडाळावा म्हणजे दांडे तुटत नाहीत. फुलांच्या दांड्याच्या टोकाला भिजविलेल्या कापसाचा बोळा लावून ठेवावा, म्हणजे दांडे तुटत नाहीत. १०० x ४० x २० सें. मी. आकाराच्या बॉक्समध्ये पॅकिंग करावे. कापसाचा ओला बोळा लावल्याने फुले जास्त काळ टवटवीत राहतात.

फुलांच्या दांड्यांची लांबी ५० ते ६० सें.मी. फुलांचा घेर १० ते १२ सें.मी. व सरळ दांडा असलेल्या फुलांना बाजारपेठेत चांगली मागणी असते.