रब्बीतला गहू उगवण उत्तम, कारल्यासाठी डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर

श्री. सुरेश पांडुरंग मेहर (८ वी),
मु.पो. जवळा, ता. पारनेर, जि. अहमदनगर.
मोबा. ९६६५२०८२०२


१।। महिन्यापुर्वी मी कांदा विक्रीसाठी पुणे मार्केटला आलो होतो. तेव्हा पट्टी होईपर्यंत मार्केटमधून माहिती घेत असताना डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीची माहिती झाली. ऑफिसवर डॉ. बावसकर सरांची भेट झाली. त्यांनी आम्हाला कांदा, गहू, केली पिकाबद्दल मार्गदर्शन केले. त्यानुसार गहू लागवडीसाठी जर्मिनेटर घेऊन गेलो. निर्भय वाणाच्या ३० किलो गहू बियाला जर्मिनेटरची प्रक्रिया करून १।। एकरमध्ये १० नोव्हेंबर २०१४ ला पातळ पेरला. तर उगवण लयभारी, अगदी १००% झाली व गव्हाला फुटवे निघून काळोखी भरपूर आली आहे.

कांद्याची (४ एकर) लागण अगोदरच झालेली होती. त्यामुळे जर्मिनेटरची रोपांवर प्रक्रिया करता आली नाही. म्हणून कॉक बसविलेल्या कॅनमध्ये जर्मिनेटरचे द्रावण तयार करून पाटपाण्याद्वारे सोडले. तर कांदा इतरांपेक्षा टवटवीत असून वाढही जादा आहे. खाली पांढऱ्याशुभ्र, रसरशीत मुळ्यांचा जारवा वाढला आहे.

गव्हाचे बी मी नेहमीच कमी वापरतो. प्रथम सारे पाडतो. त्यानंतर गहू साऱ्यात फोकतो. त्यानंतर वरंबे न फोडता सारे फणपाळीने काकरून घेतो. गव्हाच्या बाबतीत अनुभव असा आहे की गहू जेवढा पातळ तेवढे फुटवे अधिक निघतात. ओंबी भरीव व लांब सुटते. वरंब्यावरील जागा रिकामी असल्याने हवा खेळती राहते. मध्येही शेतात दाटी नसल्याने उंदीर लागत नाही, तांबेरा पडत नाही. एरवी अगोदर बी फोकून मग सारे पडले की वरंब्यावरच जास्त बी गोळा होते. तेथील ओंबी पोसत नाही. तसेच दाट झाल्यावर गहू पडतो. या सर्व समस्यांचा परिणाम उत्पादनावर होतो. दाणा बारीक राहून उत्पादनात घट येते. दर्जाही ढासळतो

अजून जर्मिनेटर शिल्लक आहे ते मी कारल्याला वापरणार आहे. मी दरवर्षी जानेवारीत कारली लावतो. गेल्यावर्षी केवडा, डावणी रोगाने माल कमी निघाला. सर्वत्रच खराब हवामान असल्याने आवक कमी होती. चंदननगर (पुणे) मार्केटला ३५ रू./किलो ने ठोक विक्री (व्यापाऱ्यांना) होत असे. मुलगा तरकारीची गाडी घेऊन संध्याकाळी ५ वाजता चंदननगर मार्केटला जात असे. तेथे रात्री १० वाजल्यानंतर मार्केट चालू होते. रायगड, मुंबई, कोकणातील व्यापारी माल खरेदीस तेथे येतात. तेथे थेट विक्री होत असल्याने आडत, तोलाई, मापाई, वगैरे खर्च वाचतो, माल हातोहात खपत असल्याने सर्व माल विकून मुलगा पहाटे १।। - २ वाजता घरी येत असे. मागच्या वर्षी केवडा व डावणी ने जे नुकसान झाले ते टाळण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या सरांच्या सल्ल्याने आता सुरूवातीपासूनच घेणार आहे.