युरोपियन देशांना डाळींब निर्यातीसाठी अनुसरावयाची कार्यपद्धती

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर



भारत हा जगातील प्रमुख डाळींब उत्पादक देश आहे, तर महारष्ट्र हे प्रमुख डाळींब उत्पादक राज्य आहे. दिवसेंदिवस डाळींब पिकाखालील क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. राज्यात डाळींबाची लागवड प्रामुख्याने नाशिक, सोलापूर, अहमदनगर, सांगली, पुणे सातारा, उस्मानाबाद या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच बुलढाणा, जालना, बीड, औरंगाबाद, जळगाव या जिल्ह्यांतही क्षेत्र वाढत आहे.

राज्यातील डाळींबाखालील क्षेत्र, उत्पादन व निर्यातीस असलेला वाव लक्षात घेऊन निर्यात क्षम डाळींब उत्पादन करण्याकरिता १ जून २००३ रोजी अपेडामार्फत डाळींब कृषी निर्यात क्षेत्र (Agri Export Zone) म्हणून घोषित केलेले आहे. सदर डाळींब निर्यात क्षेत्राअंतर्गत राज्यातील पुणे, सोलापूर, अहमदनगर नाशिक, सांगली, लातूर व उस्मानाबाद या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. महारष्ट्रात राज्य कृषी पणन मंडळ, पुणे डाळींब निर्यातीचे क्षेत्राकरिता 'नोडल एजन्सी' म्हणून काम पाहत आहे.

भारतातून डाळींब निर्यात ही प्रामुख्याने संयुक्त अरब अमिराती, बहारीन, ओमान, सौदी अरेबिया, श्रीलंका व बांगला देश इत्यादी देशांना केली जात होती. परंतु मागील २ वर्षापासून युरोपियन युनियनमधील इंग्लंड, जर्मनी, युनायटेड किंगडम, फ्रांस, नेदरलँड, बेलजियम इत्यादी देशांतही डाळींबाच्या निर्यातीत वाढ होत आहे. अरेबियन देशांपेक्षा युरोपियन देशांचे, गुणवत्ता, कीडनाशक उर्वरित अंश आणि किडी व रोगांबाबत निकष हे अत्यंत कडक आहेत. निर्यातीकरिता युरोपियन देशामध्ये जास्त संधी असल्याने त्या देशातील अटी व शर्तीची पूर्ततेची हमी देण्याकरिता सन २००८ - २००९ पासून राज्यात 'युरोपियन देशांना डाळींब निर्यतीकरिता कीडनाशक उर्वरित अंश नियंत्रण योजनेचे (RMP) नियंत्रण अनारनेट द्वारे करण्यात येत आहे.

कृषी मालाची एका देशातून दुसऱ्या देशात निर्यात होत असतना किडी व रोगाचा प्रसार होऊ नये. तसेच त्यावर नियंत्रण राहावे म्हणून, जागतिक अन्न संघटनेच्या मार्गदर्शनाखाली सन १९५१ मध्ये आंतरराष्ट्रीय पीक संरक्षण करार (Intrernational Plant Protection Convention) करण्यात आलेला आहे. हा करार आंतरराष्ट्रीय पीक संरक्षण करार म्हणून ओळखला जातो. सदर कराराचा मुख्य उद्देश असा आहे, की कृषीमाल निर्यातीद्वारे कीड व रोगाच्या प्रसारामुळे मानव, प्राणी व पिकांना हानी होऊ नये, तसेच त्यांच्या संरक्षणासाठी व ग्राहकाच्या आरोग्याच्या हितासाठी योग्य त्या कार्यप्रणालीचा अवलंब करण्याचा अधिकार प्रत्येक सदस्य देशांना आहे. सध्या या कराराचे १६५ देश सदस्य असून भारतही कराराचा सदस्य आहे. जागतिक व्यापार संघटनेत सन १९९४ साली कृषी या विषयाचा प्रथमत: समावेश करण्यात आला आहे. जागतिक व्यापार संघटनेमध्ये कृषीविषयक विविध करार करण्यात आलेले आहेत. त्यामधील सॅनिटरी व फायटोसॅनेटरी करार (SPS Aanceement) अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानुसार प्रत्येक देशास ग्राहकाच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अटी व नियमांचे हमी बाबत खास नियम तयार केलेले आहेत.

युरोपियन देशांना निर्यात होणाऱ्या डाळींबामधील कीडनाशक उर्वरित अंश नियंत्रणा बाबत अपेडा, कृषी विभाग, डाळींब उत्पादक संघ, राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्र, डाळींब निर्यातदार व डाळींब उत्पादक यांच्याशी तसेच युरोपियन युनियनने केलेल्या सूचना व अटींचा व इतर सर्व बाबींचा विचार करून चालू वर्षापासून द्राक्षाप्रमाणेच (ग्रेपनेट) युरोपियन देशांना डाळींब निर्यातीकरिता कीडनाशक उर्वरित अंश नियंत्रणाबाबत 'अनारनेट' या सिस्टीद्वारे ऑनलाईन नियंत्रणाचे काम कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

'आरएमपी' या मुख्य उद्देश:

१) निर्यातक्षम डाळींब बागेतील कीडनाशकांचे उर्वरित अंश नियंत्रण करणे.

२) निर्यातक्षम डाळींब बागेतील किडी व रोगाचे नियंत्रणाकरिता एन. आर. सी. ने शिफारस केलेल्या औषधांचा वापर करणे.

३) कीडनाशक उर्वरित अंशाचे प्रमाण क्षम्य मर्यादेपेक्षा जास्त आढळून आल्यास इंटरनल अलर्टद्वारे उपाययोजना व अंमलजावणी करण्याची पद्धत विहित करणे व त्यानुसार शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे.

निर्यातक्षम डाळींब बागांची नोंदणी : युरोपियन देशांना डाळींब निर्यात करू इच्छिणाऱ्या डाळींब बागायतदारांना त्यांच्या डाळींब बागेची कृषी विभागाकडे 'अनारनेट' द्वारे नोंदणी करणे सन २००८ - २००९ पासून बंधनकारक करण्यात आलेले आहे.

अनारनेटद्वारे नोंदणी करण्याकरिता पुणे, नाशिक, सांगली, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, लातूर, अहमनगर, बीड, जालना, बुलढाणा, जळगाव या जिल्ह्यांचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना नोंदणी अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे.

निर्यातक्षम डाळींब बागांची नोंदणी करण्याकरीता प्रति प्लॉट (४ हेक्टर क्षत्रे) करिता रू. ५०/- प्रतिवर्ष फी निश्चित करण्यात आलेली आहे.

नोंदणी करण्याकरिता खालील कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

१) विहित नमुन्यातील प्रपत्रात अर्ज

२) ७/१२ ची प्रत

३) बागेचा नकाशा

४) बागेचा (४ अ) मधील तपासणी अहवाल

५) फी रू. ५०/- प्रति प्लॉट (४ हेक्टर क्षेत्राकरिता) वरीलप्रमाणे सर्व माहिती संबंधित मंडळ कृषी अधिकाऱ्यांकडे सादर केल्यानंतर मंडळ कृषी अधिकाऱ्यामार्फत बागेची प्रत्यक्ष तपासणी करून (४ अ) मध्ये तपासणी अहवाल तयार करून संबंधित शेतकऱ्यांचा प्रस्ताव नोंदणी अधिकारी तथा जिल्हा अधिकक्ष कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकडे पाठविल्यानंतर अनारनेटद्वारे ऑन लाईन नोंदणी करण्यात येते व संबंधित शेतकऱ्यांना एक वर्षाकरिता युरोपियन देशांना डाळींब निर्यातीकरिता नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येते. नोंदणी प्रमाणपत्रात कायमस्वरूपी नंबर देण्यात येतो. त्या नंबरनुसार पुढील सर्व कार्यवाही ऑनलाईनद्वारे करण्यात येते.

सन २००८ - ०९ या वर्षामध्ये ३१ ऑगस्ट २००९ अखेर नोंदणी केलेल्या डाळींब बागांची जिल्हानिहाय स्थिती खालीलप्रमाणे आहे.

अ. क्र.   जिल्हा   नोंदणीकृत बागांची संख्या  
१.   अहमदनगर   ८०४  
२.   सोलापूर   ४४९  
३.   उस्मानाबाद   १४७  
४.   सांगली  १८३  
५.   नाशिक   ३६  
६.   पुणे   २८  
७.   लातूर   १२  
८.   सातारा   ३८  
९.   जालना   ९  
१०.   औरंगाबाद   ६  
११.   बुलढाणा   १७  
  एकूण   १७२९  


युरोपियन देशांना डाळींब निर्यातीकरिता नोंदणी करण्यासाठी जास्तीत जास्त बागांचे ऑन लाईन नोंदणी करण्याकरिता प्रयत्न करण्यात येत आहेत.

नोंदणीकृत डाळींब बागायतदारांच्या जबाबदाऱ्या व कर्तव्ये :

१) डाळींब बागेतील कीड व रोगांचे नियंत्रणाकरिता आरएमपी व शिफारस केलेल्या औषधांचा वापर करणे व त्याचा सविस्तर तपशील विहित केलेल्या प्रपत्रात ठेवणे.

२) मुदतबाह्य व बंदी घातलेल्या औषधांचा वापर न करणे.

३) एकाच औषधाची सलग फवारणी न करणे.

४) उर्वरित अंश तपासणी करण्याकरिता नमुने घेतल्यानंतर औषधांची फवारणी न करणे.

५) औषधांच्या पीएचआरनुसार औषधाची फवारणी करणे.

६) खरेदी केलेल्या सर्व औषधांचे व खतांचे रेकॉर्ड ठेवणे.

७) उर्वरित अंश तपासणी करण्याकरिता नमुने घेण्यापूर्वी तपासणी अधिकाऱ्याकडून निर्यातक्षम डाळींब बागेची (४ ब) मध्ये तपसणी करून घेणे.

कीडनाशक उर्वरित अंश तपासणी : सन २००८ - २००९ या वर्षापासून युरोपियन युनियनची एकच एमआरएस निर्धारित केलेले आहे. युरोपियन देशांना डाळींब निर्यातीकरिता नोंदणी केलेल्या डाळींब बागायतदारांनी किडी व रोगांचे नियंत्रणाकरिता २९ औषधांची शिफारस केलेली आहे. ९६ औषधांची उर्वरित अंशची तपासणी करण्यात येते. उर्वरित अंश तपासणी करण्याकरिता राज्य शासनाचा कीडनाशक उर्वरित अंश तपासणी प्रयोगशाळा कृषीभवन, पुणे तसेच खाजगी १२ असे एकूण १३ प्रयोगशाळांना अपेडानी प्राधिकृत केलेले आहे. उर्वरित अंश तपासणीकरिता रू. ५०००/- प्रति नमुना फी विहीत करण्यात आली असून अपेडामार्फत ५० टक्के अनुदान देण्यात येते. उर्वरित अंश तपासणी करण्याकरिता नमुने घेण्यासाठी प्राधिकृत उर्वरित अंश तपासणी करण्याकरिता नमुने घेण्यासाठी प्राधिकृत उर्वरित अंश तपासणी प्रयोगशाळेच्या प्रतिनिधीस अधिकृत केले आहे.

१) हेक्साकोन्याझोल (Hexaconaxzole)

२) कार्बारिल (Carabaryl)

३) एन्डोसल्फान (Endosalfan)

४) फॉझोलोन (Fuzolone)

५) डायक्लोरोव्हॉस (Dichlorovos)

६) कॅरटॅप हायड्रोक्लोराईड (Cartap Hydrocloride)

७) डायकोफॉल (Dicofol)

८) डायफेनपिरॉल (Difenpirol)

९) मॅल्याथिऑन (Malathion)

डाळींब निर्यातीकरिता गुणवत्ता निकष :

युरोपियन देशांना डाळींब निर्यातीकरिता एगमार्क प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे. कृषीमाल (प्रतवारी व विपणन) अधिनियम १९३७ व नियम १९८८ मधील परिशिष्ट - ५ अन्वये डाळींबाची प्रतवारी व गुणवत्ता निर्धारित केलेली आहे. सर्वसाधारण गुणवत्ता

- फळ हे ताजे असेल पाहिजे

- पूर्ण वाढ झालेले असेल पाहिजे

- स्वच्छ व बाह्य वस्तूपासून मुक्त

- फळावर ओरखडा, डाग, रोगाची लक्षणे व कीटकांनी पाडलेले डाग नसावेत.

- फळांमध्ये काळे दाणे नसावेत.

- फळांचा रंग तजेलदार व आकर्षक असावा.

- कीडनाशक व हेवी मेल्टचे उर्वरित अंशाचे प्रमाण मर्यादित असावे.

* डाळींबाची प्रतवारी ३ प्रकारात केली जाते.



दर्जा गुणवता

१) खास वर्ग (Extra Class) : डाळींब अधिक उत्कृष्ट दर्जाचे असले पाहिजे. फळांचा आकार, रंग, वाढ ही जातीशी निगडीत असली पाहिजे. फळामध्ये कोणताही दोष नसला पाहिजे. ५ टक्के फळांच्या वजनात सवलत.

२) वर्ग - १ (Class -१): डाळींब हे उत्कृष्ट दर्जाचे असले पाहिजे. जातीच्या गुणधर्माप्रमाणे असणे आवश्यक. फळांच्या गुणवत्तेवर परिणाम होणार नाही अशा दृष्टीने फळाचे आकार रंग, यामध्ये ५ टक्के सूट १० टक्के फळाच्या वजनात सवलत.

३) वर्ग २ (Class - २) : डाळींब हे अतिउत्कृष्ट/उत्कृष्ट दर्जाचे नसले तरी ते सर्वसाधारण गुणवत्तेचे असले पाहिजे. फळाचे आवश्यक गुणधर्म अबाधित राहिल्यास फळाचा आकार, रंग यामध्ये १२ टक्के सूट, १० टक्के फळाच्या वजनात सवलत.

* निर्यातक्षम डाळींब उत्पादन : जागतिक बाजारपेठेतील गुणवत्तेची मागणी लक्षात घेवून डाळींबाचे निर्यातक्षम उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील बाबतीत विशेष महत्त्व दिले पाहिजे.

१) डाळींब फळाची गुणवत्ता, आकार, रंग इत्यादीकरिता एकात्मिक सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा वापर करणे.

२) डाळींब फळावरील किडी व रोगांचे प्रभाव प्राथमिक अवस्थेत नियंत्रण करण्याकरिता एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे.

३) फळामधील कीडनाशक उर्वरित अंशाचे प्रमाण क्षम्य मर्यादेच्या आत (Below MRL) राखण्यासाठी एकाच औषधाची फवारणी न करणे.

डाळींबाच्या आकारानुसार व वजनानुसार प्रतवारी

साईज कोड   वजन ग्रॅममध्ये   फळाचा व्यास
मी. मी. मध्ये
(कमीत कमी)  
अ)   ४००   ९०  
ब)   ३५०   ८०  
क)   ३००   ७०  
ड)   २५०   ६०  
ई)   २००   ५०  


४) रासायनिक खते व औषधाचा गरजेनुसार व सुरक्षित वापर करणे.

५) डाळींबावरील किडी व रोगांचे नियंत्रणाकरिता आरएमपीमध्ये शिफारस केलेल्या औषधांचाच वापर करणे व त्याचे विहित नमुन्यात रेकॉर्ड ठेवणे.

६) गुड अॅग्रिकल्चर प्रॅक्टीसचा वापर करण्यासाठी ग्लोबल गॅप प्रमाणिकरण करून घेणे.

७) फळाची प्रतवारी आकार, रंग व वजनानुसार करणे. तसेच वर्ग - १ दर्जाच्या मालाचा जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी नियोजन करणे.

युरोपियन देशांन डाळींब निर्यातीकरिता ऑन लाईन (अनारनेट) द्वारे फायटोसॅनेटरी प्रमाणपत्र देण्याकरिता पुणे, नाशिक, सांगली व सोलापूर येथे कृषी विभागामार्फत सुविधा निर्माण करण्यात आलेल्या आहेत. डाळींब निर्यात करू इच्छिणाऱ्या डाळींब उत्पादक शेतकरी निर्यातदारांनी त्यांची माहिती कृषी विभागाकडे देणे आवश्यक आहे.

निर्यातक्षम डाळींबाचे उत्पादन करण्याकरिता व ऑनलाईन डाळींब बागांची नोंदणी करण्याकरिता महाराष्ट्र डाळींब संस्था व कृषी विभागाच्या समन्वयाने मालेगाव (नाशिक), आटपाडी (सांगली) व पंढरपूर (सोलापूर) येथे माहे मार्च व एप्रिल २००० मध्ये कार्यशाळा आयोजित करून शेतकऱ्यांना तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आलेले होते. तसेच जालना व लातूर येथे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येणार आहेत.

दिनांक १८ मे २००९ रोजी पुणे येथे डाळींब उत्पादक, निर्यातदार, नोंदणी अधिकारी, फायटोसॅनटरी अथॉरिटी, उर्वरित अंश प्रयोगशाळा, अपेडा, राष्ट्रीय डाळींब व संशोधन केंद्र, महाराष्ट्र डाळींब संघ व इतर संबंधितांकडील कृषी विद्यापीठामार्फत कार्यशाळा आयोजित करून अनारनेट वापराबाबत सर्व संबंधितांना अपेडाच्या तज्ज्ञ व्यक्तींमार्फत मार्गदर्शन करण्यात आले आहे.

आनरनेट सन २००८ -२००९ मध्ये श्री. विलास विष्णू शिंदे व मे. एन. व्ही. इंडियन अॅग्रीफ्रेश प्रा. लि. नाशिक या निर्यातदारामार्फत युके व नेदरलँड या देशास १६४.५७ मे. टन डाळिंबाचा (१० कंटेनर) सांगली येथून सेव्हनस्टार एक्सपोर्ट या निर्यातदारांमार्फत ३०.८० मे. टन (२ कंटेनर) निर्यात करण्याकरिता ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करून फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी कृषी प्रक्रिया व नियोजन विभाग, कृषी आयुक्तालय, साखर संकुल, पुणे - ५ दूरध्वनी क्र. (०२०) २५५१०६८४ व २५५३४३४९ वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

'अनारनेट' बाबत अधिक माहिती www.apeda.com वर उपलब्ध आहे.