७०० माणिकचमन द्राक्षाच्या वेलीपासून १७५० पेटी २॥ लाख तर द्राक्षाच्या सभोवार ६६ 'सिद्धीविनयक' शेवग्यापासून ४० हजार

श्री. नामदेव नारायण माळी,
मु. पो. मळणंगाव, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली,
मोबा. ९८८१४०११२०



आमच्याकडे जुनी शरद सिडलेस द्राक्षबाग १ एकरमध्ये होती. जमीन मध्यम प्रतिची आहे. या द्राक्षबागेपासून जवळपास २००५ पर्यंत उत्पादन घेतले. मात्र शेवटी शेवटी रोगराईचा प्रादुर्भाव या व्हरायटीवर खूपच होऊ लागल्याने उत्पादन खर्च खूपच वाढू लागला.

द्राक्षबाग काढून 'सिद्धीविनयक' शेवगा लागवड

द्राक्षबाग परवडेनाशी झाली म्हणून मग ही द्राक्षबाग काढून 'सिद्धीविनायक शेवगा' २००५ साली लावला. त्याला रोगराई कमी त्यामुळे फवारणीचा खर्च कमी, द्राक्षापेक्षा खते कमी, मजुर कमी असे कमी पाण्यावरील हे खात्रीशीर उत्पादन व बाजारभाव मिळून देणारे पीक आम्हाला या रूपाने मिळाले. त्यापासून २०११ पर्यंत चांगले उत्पादन मिळाले. शेवटच्या २ वर्षात तुटाळ (मर) झाल्याने फक्त प्लॉट च्याकडेची झाडे ठेवून मधली शेवग्याची झाडे काढून टाकली. तेथे अगोदरच्याच द्राक्षाच्या मांडवावर ८' x ४' अंतरावर डॉंग्रीजचा रूट स्टॉंक लावला. त्यावर माणिक चमनचे डोळे भरले. वाय(Y) पद्धतीचा मांडव आहे. पाणी विहीरीचे कमी प्रमाणात आहे. बागेला ठिबक आहे. या रूट स्टॉंकच्या २ झाडांमधील ४ फुटाच्या अंतरामध्ये प्रत्येक २ झाडामध्ये सोनाका वनरूट लावला. त्यापासून १ वर्ष चांगले उत्पादन मिळाले. मात्र नंतर तो काढून टाकला व फक्त माणिक चमनच ठेवता आहे. त्याला सुरूवातीपासून वेळापत्रकाप्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर केला. माणिकचमणच्या या ७०० झाडांपासून चालूवर्षी जवळपास १७५० पेटी माल निघाला. तो १३० रू/ पेटी प्रमाणे जागेवरून गेला. त्याचे २॥ लाख रू. झाले.

पुर्ण द्राक्ष बागेच्या कडेने काही बाजूला २ तर काही बाजोला ३ ओळी अशी 'सिद्धीविनयक' शेवग्याची एकूण ६६ झाडे आहेत. त्यालाही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरात आहे. या ६६ झाडांपासून चालू वर्षी ४० हजार रू. चे उत्पन्न मिळाले. प्रत्येक झाडापासून ५०० ते ७०० पर्यंत शेंगा मिळाल्या. याला बाजारभावदेखील अतिशय चांगले मिळाले. डिसेंबर - जानेवारी मध्ये तर ६०० रू/१० किलो भावाने शेवग्याच्या शेंगा विकल्या. एरवी ३०० रू. पर्यंत भाव मिळाला आहे. या शेवग्याच्या उत्पन्नापासून द्राक्षाचा सराव खर्च निघाला.

माझ्या अनुभवावरून द्राक्षाच्या किचकट पिकापेक्षा शेवगा हे पीक अत्यंत कमी देखभालीत, कमी कष्टात, कमी उत्पादनखर्चात दर्जेदार व जादा उत्पन्न देत असून त्याला खात्रीशीर बाजारभाव मिळत आहेत. आमचा शेवगा पाहून बऱ्याच शेतकऱ्यांनी 'सिद्धीविनायक' या शेवग्याची लागवड केली आहे.

हा शेवगा मिरज, सांगली मार्केटला तर काही पिंपरी चिंचवड (पुणे) मार्केटला विकला.